असे ‘समजूतदार’ मित्र आपल्याही आयुष्यात असावे…!
संदेश संजय थोरवे
ईमेल – sandesh2157@gmail.com
पत्ता – भोसरी, पुणे.
८४४६६०२१५७ / ८८८८४०२१५७
अच्युत गोडबोले यांच ‘मनात’ पुस्तक वाचत होतो. एका प्रकरणातील ‘‘सर्वांच्या सुखात आपण आपलं सुख मानलं तरच तो माणूस मानसिकदृष्ट्या जास्त सक्षम, निरोगी आणि जास्त वरच्या पातळीवर जातो.’’ हे वाक्य ज्याक्षणी वाचलं, मनात ते सारखं इकडून-तिकडून घोळायला लागलं.
आजकाल प्रत्येकजण स्वतःचा ‘स्व’ जपणारा आहे, तो सर्वांचा विचार करेलच कसा हा प्रश्न माझ्या मनात पडला. स्व आणि सर्व शब्दांमध्ये अक्षरं सारखीच आहे, पण त्यांच्या अर्थात जमीन आसमानाचा फरक आहे. यावरून मला अभियांत्रिकीच्या एका मित्राची आठवण झाली.
तो माझा अगदी खास मित्र होता. माझाच काय तर पूर्ण वर्गातील सर्वांचाच तो अगदी खास मित्र होता. त्याला कारण म्हणजे तो सर्वांच्या मदतीला धावून जायचा. फक्त अभ्यासतच नव्हे तर अन्य कोणत्याही मदतीला तो नेहमी तत्पर असायचा.
खरंतर आजच्या धावपळीच्या जगात असे व्यक्ती प्रत्यक्षात असणे ही खूपच मोठी गोष्ट आहे. त्या मित्राचे नाव ‘समीर’ होते. समीर वागायला अतिशय साधा आणि सरळ होता. त्याला कुणी कधी वाईट बोलले किंवा त्याच्याबरोबर वाईट कृत्य केले तर तो त्याच्याशीही प्रेमानेच वागायचा. असा त्याचा अगदी प्रेमळ आणि सर्वांना भावणारा स्वभाव होता.
समीरने वर्गात सर्वांनाच जाहिरपणेच सांगितलं की, तुम्हाला काही मदत लागली तर निःसंकोचपणे मला सांगा. असा प्रेरणादायी मित्र आपल्याजवळ असेल तर ही खूपच भाग्याची गोष्ट आहे, असं मला वाटतं. वर्गातील प्रत्येक दिवस आमचा आनंदात जायचा.
समीरचे अनुभव ऐकायला आम्हाला खूपच आवडायचे. खरंतर आम्ही सर्वांनी मिळून एक तासभर त्याचे अनुभव ऐकण्यासाठी राखूनच ठेवला होता. कारण त्याचे अनुभवही त्याच्यासारखे अगदी अनोखे कधीही कुठेही न ऐकलेलेच असायचे.
वर्गातील आम्हा सर्वांनाच शिक्षकांपेक्षा त्याचेच जास्त अनुभव ऐकायला आवडायचे. म्हणजे आम्ही सर्व त्याचे अनुभव कधी ऐकायला मिळतात, याचीच आम्हाला सर्वात जास्त उत्सुकता लागून राहायची.
एके दिवशी तास चालू असतांना एक नोटीस आली. नाट्यस्पर्धेसंबंधी ती नोटीस होती. आम्ही त्याकडे काही खास लक्ष दिले नाही. त्या दिवशी समीर असंच गप्पा मारत होता आणि तो बोलला,‘‘आपण या नाटकात भाग घेऊ.’’
आम्ही सर्वच त्याच्याकडे पाहत होतो. तेवढ्यात एक जण म्हणाला,‘‘अरे..! आम्हाला यातलं काही कळत नाही.’’
त्यावर समीर बोलला,‘‘मलाही यातलं फारसं काही माहित नाही. पण आपण सर्व मिळून एकदा प्रयत्न तरी करून पाहू. जमलं तर उत्तमच आणि नाही जमलं तरी काही हरकत नाही. पण यानिमित्ताने आपल्यातला दडलेला कलाकार जागृत होईल.’’
हे ऐकून सर्वांनी होकारार्थी मान हलवली. काही वेळापूर्वी कोणाच्याही डोक्यात हा विषयच नव्हता. पण समीरने सांगितल्यावर सर्वांनी त्याला एकमताने संमती दर्शवली.
ते नाटक आम्ही आठ जणांनी मिळून करायचं ठरवलं. यात पाच मुली आणि तीन मुलं होते. यात मी, समीर आणि अजून एका मित्राचा समावेश होता. सर्व तास संपल्यावर आम्ही नाटकाचा सराव महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागात करायचो. या नाटकात समीरचे आणि वर्गातील मीना या दोघांचे काही संवाद होते.
त्यात काही संवाद असे होते.
मीना म्हणते,‘‘या जगात निःस्वार्थी प्रेम आहे का रे ?’’
समीर म्हणतो,‘‘आहे गं. जो व्यक्ती सतत तुम्हाला काहीतरी देत असतो. त्यालाच निःस्वार्थी प्रेम म्हणायचं.’’
मीना म्हणते,‘‘अरे पण निःस्वार्थी प्रेम प्रत्येकाला मिळेलच का रे ?’’
समीर म्हणतो,‘‘आपण दुसऱ्याला काही अपेक्षा न ठेवता दिलं तर ते एक प्रकारचे निःस्वार्थी प्रेमच आहे.’’
खरंतर हे नाटक कधी सादरच होऊ नये, असंच आम्हाला वाटतं होतं. कारण नाटक एकदा सादर झालं की, ते पुन्हा आम्हाला कधी पाहायला मिळालंच नसतं. आम्ही नाटकाचा सराव पाहतांना आणि ते ऐकताना अगदी हृदयाला स्पर्श करून जायचे.
प्रेमाचं द्या सोडून पण निःस्वार्थी काहीही करणे ही खूपच कठीण गोष्ट आहे. कृतज्ञ असणाऱ्या व्यक्तीलाच हे जमू शकेल आणि योगायोगाने ते पात्र समीरसारख्या अगदी योग्यच व्यक्तीला मिळाले होते. मीनाचा स्वभावही अगदी साधा आणि सरळच होता. त्यामुळे ते दोघेही त्या पात्रांना पुरेपूर न्याय देत होते. आणि हे सर्व पाहतांना आम्हाला खूपच आनंद व्हायचा.
थोड्याच दिवसात ते नाटक सादर झाले. नाटकातील सर्वांचेच खूप कौतुक झाले पण त्यातल्या त्यात समीर आणि मीना यांचे खूपच कौतुक झाले. कारण त्यांचे पात्र आणि ती भूमिका त्यांनी खूपच विशेष निभावली होती.
त्या दोघांचेही पात्र आणि त्यांचे संवाद प्रत्येकाच्या लक्षात राहण्यासारखेच होते. समीरला मी हळूहळू खूपच चांगला ओळखायला लागलो. तो प्रत्येक गोष्टीत काहीतरी सकारात्मक पाहून त्या दिशेने वाटचाल करायचा. कोणाला काहीही अडचण आली तर तो त्यातून काही ना काही काहीतरी मार्ग नक्कीच काढायचा.
मीना तशी फारशी बोलकी नव्हती पण समीरशी ती चांगली गप्पा मारायची. कारण नाटकाच्या वेळी त्यांची एकमेकांशी चांगलीच ओळख झाली होती.
हळूहळू दिवस जात होते. समीरचे चांगले अनुभव काही संपता संपत नव्हते. समीरला कोणत्याही विषयावर काहीही विचारले तरी तो निर्भीडपणे आपले मत मांडायचा.
माझ्या बाजूच्या बाकावर बसलेल्या मुलीने विचारले,‘‘प्रेमाच्या बाबतीत तुझे काय मत आहे ? तुझ्या मनातील प्रेमाची व्याख्या काय आहे ?’’
(मी मनातल्या मनात म्हणलं की ही नक्कीच कोणाच्यातरी प्रेमात आहे. त्यामुळेच तिने असा प्रश्न विचारला.)
तेव्हा समीर प्रेमाबद्दल बोलताना म्हणाला,‘‘प्रेम म्हणजे ज्या व्यक्तीवर आपण प्रेम करतो त्या व्यक्तीने खूप आनंदाने राहावं आणि त्यांच्या आनंदासाठी जे आपल्याला करणे शक्य आहे, ते करण्याची मनापासून तळमळ असणे.’’
(हे ऐकून मी चक्रावूनच गेलो. कारण हे ऐकायला खूपच चांगले वाटते. पण मला आजपर्यंत आजूबाजूला असं कुठेच दिसलं नाही. आजकाल मुल-मुली एकमेकांना अटी घालतात की आपण हे करू ते करू पण प्रत्यक्षात असं काहीच घडत नाही. मग हे मुलं अटी घालतात ते बरोबर की चूक हा प्रश्न माझ्या मनात पडला.)
मी लगेच समीरला विचारलं,‘‘आजकाल मुल-मुली एकमेकांना प्रेमाच्या अटी घालतात, हे बरोबर की चूक ?’’
यावर समीर म्हणाला,‘‘तिची किंवा त्याची साथ आपल्याला मिळावी ही प्रत्येकाचीच इच्छा असते. पण त्यात अट घातली की ते प्रेम नाही मग तो करार होतो. प्रेम हे अगदी आतून वाटायला हवं. अगदी साधं सांगतो.
तू माझ्यावर प्रेम करणार असशील तर मी तुझ्यावर प्रेम करेन. यात तुम्हाला प्रेम कुठे दिसतंय का ? यात प्रेम नाही तर स्वार्थ आहे. आणि प्रेम हे कधीही स्वार्थी असू शकत नाही.’’
एका मुलीने लगेच विचारले,‘‘मग प्रेम म्हणजे नक्की काय ?’’
यावर समीर म्हणाला,‘‘प्रेम म्हणजे नेमकं काय हे मलाही माहित नाही. पण मला प्रेमाचा कळलेला अर्थ तुम्हाला सांगतो. प्रेम ही खूपच सुंदर आणि पवित्र भावना आहे. तुम्ही ज्या व्यक्तीवर प्रेम करता, त्या व्यक्तीने तुमच्यावर प्रेम केलेच पाहिजे हा अट्टाहास करणे चुकीचे आहे. पुढच्या व्यक्तीला प्रेम आतून वाटलं पाहिजे. पुढून जर प्रतिसाद मिळाला तर आनंदच.’’
तेवढ्यात लगेच एकाने विचारलं,‘‘जर पुढच्या व्यक्तीकडून प्रतिसाद आला नाही तर ?’’
त्यावर समीरने उत्तर दिले,‘‘आपण बऱ्याचदा ऐकतो की, प्रेमात नकार दिल्याने त्याने आत्महत्या केली किंवा अशा प्रकारच्या बऱ्याचशा बातम्या आपण पाहतो. पण हे योग्य नाही. जी व्यक्ती आपल्याला प्रिय आहे, तिच्यासाठी असं उलटसुलट कृत्य केल्यामुळे प्रेम खरंच व्यक्त होतं का ? तर मुळीच नाही. अशा कृत्यामुळे आपण प्रेम या पवित्र भावनेचा अपमान करतोय, हे प्रत्येकानेच लक्षात ठेवावं.’’
वर्गात तासाला कधीही न बोलणारा एक जण जोरात म्हणाला,‘‘मग पुढून जर होकार आला तर मज्जाच ना..’’
त्यावर समीर हसून म्हणाला,‘‘तिने तुम्हाला प्रतिसाद दिला नाही तरीही तुम्ही तिला मनापासून शुभेच्छाच द्यायला हव्या. आणि जर तिने प्रतिसाद दिला तरी प्रेम म्हणजे काही मालकी हक्क गाजवण्याचा परवाना नव्हे. शेवटी एकच सांगतो की, प्रेम हे मागून मिळत नाही. कारण जे मागून मिळतं ती मेहेरबानी असते, प्रेम नाही.’’
त्यावेळी सर्व वातावरण अगदी प्रेमळ झालं होतं. समीर प्रेमाविषयी सांगत असतांना शेजारच्या वर्गातील मुलंही आली होती. संपुर्ण वर्ग भरला होता. बाकी जण वर्गात कधी आले याचा तपासच आम्हाला लागला नाही. कारण संपूर्ण वर्ग प्रेमात बुडाला होता.
तो एक तास वर्ग प्रेमाच्या नदीत पार न्हाऊन निघाला. समीरच बोलणं कधीही थांबू नये असंच वाटतं होतं. पण तो वेळेच्या बाबतीतही तसा कठोरच होता. समीरने कधीही कोणाला हात राखून मदत केली नाही. मग तो मुलगा असो की मुलगी.
वर्गात सर्वजण समीरशी अगदी मनमोकळेपणाने कोणीही गप्पा मारायचे, त्यात मीनाही होती. समीर आणि मीना दोघेही विचारांनी खूपच प्रगल्भ होते. एके दिवशी समीरने त्याच्या मनातील प्रेमाबद्दलच्या भावना मीनासमोर व्यक्त केल्या.
समीरने स्वतः ही गोष्ट मला सांगितली. हे मला तो सांगत असताना वर्गातील एकाने ते गुपचूप ऐकलं. मी तिथे जाईपर्यंत तो निघूनही गेला. दुसऱ्या दिवशी वर्गातील एक दोन जणांनी समीर आणि मीनाविषयी उलटसुलट चर्चा करण्यास सुरवात केली. त्यांच काहीतरी नक्कीच चालू आहे, असं ते इतरांना सांगत होते.
ही गोष्ट जेव्हा माझ्या कानावर आली तेव्हा मला खूपच वाईट वाटलं. कारण ज्याने हे ऐकलं होतं, त्याला नक्कीच काहीतरी गैरसमज झाला होता, हे मला जाणवलं. कारण वस्तुस्थितीत मुळात तसं त्या दोघांच्यात काहीच नव्हतं. फक्त समीरने त्याच्या मनातील भावना मीनाला सांगितल्या होत्या.
मला वाटलं की वर्गात त्यांच्याविषयी सुरू असलेल्या उलटसुलट चर्चेची गोष्ट जेव्हा समीरला कळेल तेव्हा त्याला राग येईल. पण प्रत्यक्षात तसं काहीच घडलं नाही. समीर मला म्हणाला,‘‘आमचं प्रत्यक्षात तसं काही नाहीच, त्यामुळे आम्हाला घाबरण्याचे काही कारण नाही. पण मला आता एक महत्त्वाचे काम करायचे आहे.’’
मी विचारलं,‘‘कोणतं काम ?’’
तो म्हणाला,‘‘मला लगेच मीनाशी बोलायला हवं.’’
मी म्हणलं,‘‘पण आता मीनाकडे तुझं काय काम आहे ?’’
तो म्हणाला,‘‘मी तुला नंतर सांगेन.’’
असं बोलून तो तिथून गडबडीतच निघून गेला. पण मला काहीच कळेना की समीर आता नेमकं काय करणार आहे. मी गुपचूप समीरच्या मागे गेलो. त्याने लगेच मीनाला फोन केला. मीना पाचेक मिनिटात सांस्कृतिक विभागाजवळ आली.
समीर काही बोलणार तेवढ्यात मीनाच त्याला म्हणाली,‘‘वर्गातील काहीजण आपल्या दोघांविषयी उलटसुलट चर्चा करत आहे. पण मुळात आपल्यात तसं काहीच नाही.’’
समीर म्हणाला,‘‘हो, मलाही ते समजलं. मीना, मला माफ कर. माझ्यामुळे हे सर्व घडलंय.’’
यावर मीना म्हणाली,‘‘समीर, तू माफी मागू नकोस. यात तुझी काही एक चूक नाही. खरंतर तू तुझ्या मनातील भावना फक्त व्यक्त केल्यास आणि भावना व्यक्त करणे हा काही गुन्हा नाही. ज्यांना भावना व्यक्त करणे आणि प्रेम यातला फरक कळत नाही, ते इतरांची बदनामी करण्यात धन्यता मानतात. भलेही ते खरं असो की खोटं.’’
(त्या दोघांचा हा सर्व संवाद ऐकून मी आतून पार हादरून गेलो. कारण अशा प्रकरणात मुल-मुली एकमेकांना दोष देतात की हे सर्व तुझ्यामुळेच घडलंय. मग नंतर त्यांच्यात भांडणं होतात. आणि नंतर ते पार एकमेकांच्या बदनामी करण्यापर्यंत पोहोचतात. पण इथं तसं काहीच घडलं नाही. इथं घडलेली गोष्ट माझ्या सहसा कधी पाहण्यातच आली नव्हती.)
मीनाचे बोलणे ऐकून समीरच्या डोळ्यांत पाणी आले. मीनाने मग लगेच त्याला रुमाल दिला.
समीर तिला बोलला,‘‘मनःपूर्वक धन्यवाद..!’’
त्यावर ती बोलली,‘‘पहिले डोळे तर पुस आणि तसंही मैत्रीत धन्यवाद बोलत नाही रे.’’
काही वेळानंतर तो मीनाला म्हणाला,‘‘इतकी समजदार मुलगी माझी मैत्रीण आहे, याचा मला खूपच अभिमान वाटतोय.’’
त्यावर मीना म्हणाली,‘‘अरे मी समजदार वगरे काही नाही. खरंतर तू समजदार आहेस आणि तुझ्यासारखा मित्र मला लाभला, याचा मला अभिमान वाटतोय.’’
(त्या दोघांचा संवाद ऐकून अक्षरशः मला रडायला आलं. या दोघांचा केवढा हा समजूतदारपणा…! बाकी ठिकाणी एकमेकांचे नाव बदनाम करतांना मी पाहिलं आहे. पण इथे घडलेली प्रत्येक गोष्ट ही माझ्या कल्पनेपलीकडची होती. समीर समजूतदार आहे हे मला ठाउकच होते पण मीनाही तेवढीच कदाचित त्याच्यापेक्षाही जास्तच समजूतदार होती, याची मला पक्की खात्री पटली.)
अजूनही वर्गात त्या दोघांबद्दल उलटसुलट चर्चा चालूच होत्या. पण ते दोघेही कधीही कोणाला काहीच बोलले नाही. समीर आधीसारखाच सर्वांशी आदराने आणि प्रेमानेच बोलायचा आणि वागायचा.
त्याचबरोबर मीनाच्या स्वभावातही काहीच बदल झाला नाही. दोघांच्या स्वभावातही समजूतदारपणा, नम्रपणा, दुसऱ्यांप्रति असलेला आदर, कृतज्ञता या गोष्टी मला समान दिसल्या. खरंतर मैत्रीची व्याख्या करणे खूपच सोपी गोष्ट आहे पण मैत्री टिकवणे ही गोष्ट प्रत्येक व्यक्तीनुसार बदलत जाणारी गोष्ट आहे.
अनेक लेखकांनी, कवींनी मैत्रीची व्याख्या त्यांच्या परीने केली आहे. पण वर्गात घडलेल्या त्या दोघांच्या प्रसंगातुन मला खूप काही शिकायला मिळाले. आज २१ व्या शतकात आपल्या आजूबाजूला अपेक्षा, स्वार्थ आणि त्यातल्या त्यात गैरसमजाशिवाय काहीच दिसत नाही पण त्या दोघांची मैत्री विश्वासावर मजबूत टिकून होती, हे त्यांनी त्यांच्या मैत्रीतून मला नक्कीच दाखवून दिले.
माझ्या जीवनात मी अनेक मित्र पाहिले आणि त्यांची मैत्री पाहिली. पण त्या दोघांची मैत्री माझ्यासाठी खूपच अनोखी आणि वेगळी होती. माझ्या मते यालाच ‘खरी मैत्री’ म्हणत असावे. माझ्या डोळ्यांचे अश्रू पुसण्यासाठी मी डोळ्यांना हात लावला, तेव्हा मला समजलं की मी जुन्या आठवणीत रमलो होतो. पुस्तकातील पुढचे वाक्य वाचायला लागलो पण मी अजूनही त्यातून काही बाहेर आलो नव्हतो.
(टीप : यातील नावे, ठिकाणं आणि अन्य सर्व गोष्टी फक्त कथा लिहिण्यासाठी घेतल्या असून याचा कोणाशी काहीही संबंध नाही.)
संदर्भ – यातील प्रेमाच्या संदर्भातील वाक्य ‘सकाळ’ वृत्तपत्रातील टुडे पुरवणीत छापून आलेल्या प्रेरक साहित्य लेखक शिवराज गोर्ले यांच्या लेखातून घेतले आहे.


