Skip to content

असा एक मानसिक आजार…हि माणसं तुमच्या अवतीभवती तर नाहीत ना??

कथा एका करंड्याची!!


गीत वाळवेकर

(मानसशास्त्र शिक्षिका)


वर्षांपूर्वीची ही घटना. पण अजूनही मनावर कोरली गेली आहे. मार्गशीर्ष महिन्यातला तो पहिला गुरुवार होता. घरात देवघराची स्वच्छता करून चौरंगावर मूर्ती ठेवून, समया, निरंजने, हळदीकुंकवाचे करंडे, फुले सारी तयारी झाली होती.

तेवढ्यात सगुणा आली. ती अलीकडेच घरी कमासाठी येऊ लागली होती. भांडी, धूण, झाडूपोछा अशी खूपशी माझी काम तिच्यामुळेच हलकी होऊ लागली होती. तीनं माझ्यासाठी एक गजरा आणून माझ्या केसात माळला. तिची तर श्रद्धा माझ्यावरच जास्त दिसत होती.

ती स्तिमित होऊन चौरंगाकडे पहात म्हणाली, ‘ वहिनी, ती मूर्ती चांदीची हाय?’ मी म्हटल ‘होय’. ‘ आणि तो करंडा?’ खडे जळवलेल्या चांदीच्या करंड्याकडे पहात तीनं विचारलं. ‘ होय ग, सगळं चांदीचचं आहे, ‘ मी म्हंटल .

तेवढ्यात बेल वाजली. माझी एक मैत्रीण आली होती. तिची नी माझी अलीकडेच एका सेमिनारमध्ये ओळख झालेली. ती मुंबईची. पण आमची फोनाफोनी, पत्रापत्री यातून खूप जिव्हाळा निर्माण झाला होता. ती कोल्हापूरला एका नातेवाईकांकडे उतरली होती. व आज माझ्याकडे आली. ती आत येऊन इकडेतिकडे आमचं घर पाहू लागली.

अंगण, स्वयंपाकघर, देवघर, माजघर … ते जुनं, प्रशस्त घर तिला आवडलं होत. मी तिच्यासाठी चहापाण्याची तयारी करण्यात गुंतून गेले होते. नंतर आम्ही गप्पा मारत बाहेरच्या खोलीत बसलो. सगुणाही काम आवरून गडबडीत निघून गेली, तीला घाई होती. दूर नळावरून पाणी भरायच होत, तिच्या चार कच्चाबच्यांना खाऊ घालायच होत. माझ्या मैत्रिणीला मी जेवायला थांबायचा आग्रह केला, पण ती आज गडबड आहे. उद्या दुपारी येते म्हणाली. मग आपण बाहेरच हिंडू फिरू म्हणून ती बाहेर पडली.

दुसऱ्या दिवशी सकाळी माझ्या लक्षात आलं, तो चांदीचा करंडा तेथे दिसत नाही. मी खूप शोधला पण सापडला नाही. मग लक्षात आल_ सगुणाच असणार. त्याकडे काल डोळे विस्फारून पाहणारी. किती विश्वास टाकला होता मी तिच्यावर. मला विलक्षण चीड आली. तिन स्वच्छतेसाठी झाडू हातात घेतला.

मी संतापून म्हटल, ‘ टाक तो झाडू खाली _ देवापुढचा करंडा उचलताना तुला लाज कशी वाटली नाही?? ती गोंधळली पण परोपरीने सांगू लागली, की मी कशालाही हात लावलेला नाही. पण माझा संताप अनावर झाला होता. मी म्हटलं, ‘ आज करंडा उचललास, उद्या घरचं धुवून नेशील. ‘ ती शपथा घेऊन ‘नाही नाही ‘ म्हणत होती पण मी तिला म्हटलं ‘ चालू लाग, पुन्हा यायचच नाही इथे असल्या चोरांनी अखेर ती म्हणाली, ‘ जाते,पण ध्यानात ठेवा वैनीबाय, आम्ही गरीब हाय, पण आम्हालाबी इज्जत हाय ‘ अस म्हणून ती रडतरडतच बाहेर पडली.

माझा तर मूड गेला होता. त्यातच घरातल्या कामांचा डोंगर उपसावा लागला. दुपारी ठरल्याप्रमाणे माझी ती मैत्रीण आली. आम्ही बाहेर पडलो. अंबाबाईच्या देवळात गेलो. तिथून काही खरेदी करून मग एका हॉटेलमध्ये खाणपिण केलं. नंतर आम्ही एका बझारमधे गेलो.

तिथं हे बघ, ते बघ, खूप वेळ चाललं होत आणि क्षणभर माझा विश्र्वासच बसेना, माझ्या मैत्रिणीने तिथलं वेलदोड्याच पाकीट पटकन तिच्या कपड्यात टाकलं होत. तेवढ्यात तिथल्या निरीक्षकांनी हे टिपलं. आम्हा दोघींना बाजूला नेल. तिच्याकडे ते पाकीट त्यांना सापडलं. मलातर अगदी मेल्याहून मेल्यासारख झालं. तिथली सारी गर्दी आमच्याकडेच पहात आहे अस वाटू लागलं. पुढील सारे सोपस्कर पार पडले.

मी घरी आले आणि मला आठवलं कालचा तो करंडा ? अरेरे ! मी उगीचच त्या बिचाऱ्या सगुणाला कसही बोलले, अस्वस्थ होऊन मी तिचं घर शोधत गेले. एका बोळात घराच्या दारात ती कपडे धुत होती. मी तिच्यापुढे अक्षरश: हात जोडले, माफी मागितली. ती ही पुन्हा मीठ मन करून माझ्याबरोबर परत आली.

पण प्रश्न पडला तो असा की, अतिशय श्रीमंत सुखवस्तू घरातली ती मैत्रीण असं का बरे करत असेल ? जास्त विचार करू लागल्यावर माझा मानसशास्त्राचा अभ्यास मला आठवला.

_ म्हणजे चोरी करण्याची एक विकृतीच.

पैशाची चणचण भासली, गरज पडली यासारख्या कारणांनी सावधगिरी बाळगून चोरी करणारी माणसे असतात तो भाग वेगळा. पण अशा विकृतीत मात्र काहीही कारण नसताना काहीतरी उचलायचेच हेच एक वेड.

अगदी साधे मंडईत गेलं तरी एखादा कांदा किंवा बटाटा हळूच उचलून पर्समध्ये टाकल्याशिवाय अशा व्यक्तींना चैनच पडत नाही. ही विकृती स्त्रियांमध्ये जरा जास्त प्रमाणात आढळते असे दिसून आलेले आहे. दुकानात ग्राहक म्हणून जायचे व काहीतरी वस्तू उचलायचीच हे अमेरिका व इंग्लंडमधील पहाणीतही आढळले आहे.

काहीही असो पण या विलक्षण घटनेमुळे मला मात्र मोठ्या कसोटीच्या प्रसंगातून जावे लागले हे खरे.



तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

3 thoughts on “असा एक मानसिक आजार…हि माणसं तुमच्या अवतीभवती तर नाहीत ना??”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!