“अवास्तव प्रश्नांच्या मागे धावत बसाल तर अर्ध्यापेक्षा जास्त आयुष्य संपलेलं असेल.”
मधुश्री देशपांडे गानू
“थोड़ा हैं, थोड़े की जरूरत हैं
जिंदगी फिर भी यहां खूबसूरत हैं..”
प्रत्येकाच्या आवडीचं असेल ना हे गाणं! मनुष्यप्राणी कधीही आहे त्यात समाधानी नसतो. आणखी हवं.. आणखी हवं.. थोडं तरी हवं.. यातच तो मनाने, विचारांनी, शरीराने, कृतीने गुरफटलेला असतो. त्याच्या अपेक्षा संपतच नाहीत. पण तरीही हे जीवन खूप सुंदर आहे. या उद्याच्या आशाच तर त्याला जगण्याची उमेद देतात. नवीन काहीतरी करण्याचं बळ देतात. सतत नाविन्याचा ध्यासच त्याला त्याच्या ध्येयापर्यंत पोहोचवतो.
पण या आशा अपेक्षांमध्ये बदलतात. मान्य आहे, माणूस म्हटलं की अपेक्षा आल्याच. अगदी नोकरी-व्यवसाय, नातीगोती अपेक्षा आल्याच. अपेक्षा नाहीत असा माणूसच सापडणार नाही. आता खूप सांगितलं जातं, कोणाकडून अपेक्षा ठेवू नका म्हणजे अपेक्षाभंग होणार नाही. पण प्रत्येक दोन माणसांच्या कोणत्याही देवाणघेवाणीत मग तो व्यवहार असू दे किंवा नातं मूलभूत अपेक्षा असतातच आणि राहणारच. नाहीतर ते नातं व्यावसायिक असू दे, प्रेमाचं असुदे, रक्ताचं असू दे पुढे कसे जाणार?? निभावणार कसं??
पण या अपेक्षा जेव्हा अवास्तव होतात तेव्हा मात्र अपेक्षा करणाऱ्याला आणि समोरच्या व्यक्तीला ते जाचक वाटू लागतं. अपेक्षांच्या अटी होतात. आता आपण उदाहरण घेऊ. सध्या लग्न संस्था अनेक स्थित्यंतरातून जात आहे. मुली मुलांइतक्यात शिकलेल्या किंबहुना जास्तच. त्यामुळे त्यांच्या अपेक्षा प्रचंड वाढल्या आहेत. स्त्री स्वातंत्र्याच्या अचाट कल्पनांनी ही अपेक्षा वाढल्या आहेत.
पण या अपेक्षा जेव्हा अटी होतात तेव्हा सगळंच अवघड होतं. पुण्याच्या मुलीला पुण्याचाच नवरा हवा. घरात आई-वडील नकोत. आर्थिक स्थिती लाही पद्धतशीर अटी असतात. मुलांनाही गोरी, सुंदर, नोकरी करणारी, गृहकृत्यदक्ष अशी बायको हवी. किती अवास्तव अपेक्षा! मग यातूनच वास्तव प्रश्न उभे राहतात. तडजोड करण्याची वृत्ती नसते. त्यामुळे लग्नाची वयं वाढत राहतात.
आज माझ्या पाहण्यात चाळीशी ओलांडलेली अनेक मुलं-मुली लग्नाविना राहिले आहेत. उशिरा लग्न झाली तरी मग संततीबाबत प्रश्न उपस्थित होतात. कारण शारीरिक, मानसिक ताकद उरत नाही. अर्ध्यापेक्षा आयुष्य संपलेलं असतं. आता तुम्ही म्हणाल, लग्न हीच इतिकर्तव्यता आहे का? तर अशांबद्दल आपण बोलतच नाही आहोत. हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे.
जीवघेण्या फक्त पैसे कमावण्याच्या शर्यतीत आपण स्वतः बद्दल ही अवास्तव अपेक्षा, प्रश्न निर्माण करत आहोत. उद्याची चिंता इतकी पोखरून निघते की आपला आज आपण जगायचं विसरून गेलो आहोत. कोणीतरी मोठा फ्लॅट घेतला मग मलाही हवा. गाडी घेतली मग त्याच्यापेक्षा मोठी गाडी मला हवी.
आपली ताकद आहे की नाही याचा विचारही करत नाही आपण. मग जुनी म्हण आहेच “ऋण काढून सण साजरे करणे”. आज-काल कशासाठीही ऋण काढले जाते. हे अवास्तव प्रश्नच आहेत ना! स्वप्न जरुर बघावीत आणि ती पूर्ण करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्नही करावेत. पण अवास्तव आणि वास्तव यातला फरक कळला पाहिजे. सगळेच टाटा, बिर्ला, अंबानी नाही होत ना!
कारण जेव्हा आपण प्रश्न स्वतःसाठी निर्माण करतो, त्याला साजेशी ताकद, परिस्थिती, मेहनत करण्याची जिद्द, आत्मविश्वास हे सगळेच गरजेचं असतं. आणि नशिबाचा भागही असतोच की. या सगळ्या अवास्तव अपेक्षांनी, प्रश्नांनी होतं काय की आपण फक्त ऊर फुटेस्तोवर त्याच्या मागे धावत सुटतो.
भौतिक सुखांची गोळाबेरीज करताना मनाला, शरीराला स्वास्थ्य मिळतंय की नाही याचा विचारही करत नाही. अगदी तिशी-पस्तिशीत रक्तदाब, मधुमेह अशा अनेक व्याधींना बळी पडतो. कायमचं मागे लावून घेतो. आणि हे जेव्हा लक्षात येतं तेव्हा निम्मे आयुष्य संपलेलं असतं. पैसा महत्वाचा आहेच पण तो किती मिळवायचा आणि तो उपभोगायला आपल्याला वेळ आणि शारीरिक ताकद उरली आहे का? हेही महत्त्वाचं आहे ना! नाहीतर नुसत्या इस्टेटी उभारून काय उपयोग?? माणसाला आज कुठे थांबायचं हे कळत नाहीये. त्यामुळे सुख अंगी कसं लागणार??
वैश्विक ऊर्जे बद्दल आपण बोललो होतोच. आकर्षणाचा सिद्धांत ही सगळ्यांना माहित असेलच. आपण सकारात्मकतेने जे बोलतो तेच आपल्याकडे परत येते. आपण एखाद्या गोष्टी साठी मनापासून एकाग्रचित्त केले तर ती गोष्ट नक्कीच घडते. आपल्या आई वडिलांनी सांगितलेलं आठवत असेलच, “चांगलं बोलावं वास्तु तथास्तु म्हणते.” याचा अर्थ जे चांगलं बोलाल तेच तुमच्याकडे परत येतं.
संपूर्ण वैश्विक ऊर्जा यासाठी काम करते. पण आपल्या आईवडिलांनी अजून एक सांगून ठेवले आहे. “अंथरूण पाहून पाय पसरावे” हे तर सगळ्यात गरजेचे आहे. म्हणजे मी अवास्तव मागणी केली तर आकर्षणाचा सिद्धांत काम करत नाही. माझी ऐपत, योग्यता पाहून मागितलं आणि त्यासाठी प्रयत्न केले तरच त्याचा उपयोग होतो.
पण आजच्या धावपळीच्या जीवनात मानवाने स्वतःच स्वतःसाठी अवास्तव प्रश्न निर्माण केले आहेत. आज आपण वैयक्तिक स्वरूपात पाहिले आहेत. पण याचाच एकत्रित परिणाम समाजावर होत असतोच. कोणीही परिपूर्ण नाही इथे. अपेक्षा ठेवल्या तरीही तडजोडीचे धोरण योग्य वेळी अंमलात आणले तर आयुष्य सोपं व्हायला मदत होते. नातेसंबंध टिकून राहतात.
हळूहळू पण तुमची प्रगती होत राहते. आहे ते स्वीकारून, नाही त्याची खंत न बाळगता, स्वतःला मानसिक शारीरिक त्रास न देता आयुष्य सुखाने, समाधानाने जगता येतं. शेवटी प्रत्येकाला हेच हवं असतं ना! पण ते आपल्या मानसिकतेवर अवलंबून आहे. अवास्तव प्रश्नांच्या मागे धावून तुमचा आज गमावू नका.
उद्याची अवास्तव, अकारण चिंता करू नका. आज जे तुमच्याकडे आहे त्याबरोबर आजचा क्षण भरभरून जगा. नंतर लक्षात येऊन पश्चात्ताप करून काही उपयोग नाही. असं अर्थहीन आयुष्य संपवू नका. रोजचा दिवस नव्याने साजरा करा. समाधानी वृत्ती महत्त्वाची आहे हे लक्षात असू द्या. आनंदी राहा..
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


