Skip to content

अर्थहीन वादविवादापेक्षा अर्थपूर्ण शांतता केव्हाही चांगली.

अर्थहीन वादविवादापेक्षा अर्थपूर्ण शांतता केव्हाही चांगली.


मिनल वरपे


असं कोणत नात,घर मिळेल का….अशी कोणती माणसं मिळतील का जिथे अजिबात वादविवाद नाहीत. .. नक्कीच अस घर अशी नाती आणि अशी माणसं मिळणे अवघड आहे. वादविवाद म्हणजे नक्की काय हो…???

जिथे एकमेकांची मते पटत नाहीत, म्हणणं वेगळं असते, विचार जुळत नाही अशा वेळी अर्थात शब्दाला शब्द देत राहिल्यावर वादशिवाय काही उरतच नाही.

आता बघाना भांडण होते नवरा बायकोमधे आणि त्यांच्यामध्ये जे कोणी बोलतील, समजावतील काही दिवसांनी किंवा अगदी पुढच्या काही क्षणातच जे समजावतात त्यांनाच प्रश्न पडतो की आपण यांच्या भांडणात उगाच पडलो… कारण जो मधे बोलतो, बाजू घेतो, समजावतो त्यालाच दोष द्यायला वेळ लावत नाही. जर असे वाद नेहमीच होत असतील तर अशा ठिकाणी शांतच राहिलेलं उत्तम.

नंतर पश्चाताप करण्यापेक्षा, मनाला लावून घेण्यापेक्षा, नाराज होण्यापेक्षा त्यावेळीच आपण शांत राहिलेलं केव्हाही चांगलंच. कारण आपण त्यावेळी जरी काही बोललो तरी वाद होतच असतील आणि आपल्या समजवण्याचा काहीच उपयोग होत नसेल आणि नंतर आपल्यालाच दोष लागत असेल तर तिथे शांत राहणे हाच एक योग्य निर्णय घ्यावा.

काही ठिकाणी वाद तेव्हाच होतात जेव्हा समोरची व्यक्ती ऐकण्याच्या मनःस्थितीत नसते. आपण एक सांगण्याचा प्रयत्न करतो , आपला उद्देश वेगळा असतो आणि समोरचा मनस्थिती नसल्यामुळे त्याचा काहीही चुकीचा अर्थ घेऊन वाद वाढवतो. मग अशावेळी आपण कितीही चांगल्या पद्धतीने बाजू मांडण्याचा समजवण्याचा प्रयत्न केला तरी ते सगळं व्यर्थ ठरते.

म्हणून त्यावेळी शांत राहायचं समोरच्या व्यक्तीला सुद्धा शांत होऊ द्यायचं. थोडा वेळ निघून गेल्यानंतर आपोआपच ती व्यक्तीसुद्धा ऐकण्याच्या आणि बोलण्याच्या स्थितीत येते तेव्हा तिच्याशी सर्व पद्धतशीर बोलून वाद न वाढवता समजवायच.म्हणून योग्य त्यावेळी शांत राहायचं आपल्याला जमलं पाहिजे.

ऐकून अजिबात घ्यायचं नाही आणि फक्त शब्दाला शब्द लावायचा.. समोरच्याच म्हणणं खोटं ठरवायचचं , मी म्हणेल तेच खर किंवा स्वतःच म्हणणं खर करून घ्यायचं असा एखाद्या व्यक्तीचा स्वभाव असेल आणि त्या व्यक्तीशी आपली मतं जुळत नसतील, विचार पटत नसतील तर त्यांच्याशी वाद घालून आपल्या हातात काहीच लागणार नाही.

उलट आपणच स्वतःला अजून त्रास करून घेणार अशी वेळ आपल्यावर येईल. म्हणून असल्या स्वभावाच्या व्यक्तीशी कधीच वाद घालत बसायचं नाही शांत राहायचं त्यांची उत्तरं त्यांना मिळतीलच. जिथे आपण शांत राहणार म्हणजे आपल्याला त्या व्यक्तीचं काही पटत नाहीये हा मेसेज त्या व्यक्तीला आपल्या शांततेतून मिळणार.

असे वादविवाद आपल्या घरी, कामाच्या ठिकाणी, शेजारी होतातच.हे तर नेहमीचे माणसं असतात पण आजकाल कामावर जाताना बस मधे, ट्रेन मधे अगदी रिक्षा मधे सुद्धा छोट्याशा कारणाने सुद्धां वाद घालण्याची एकेकाला सवय असते मग अशावेळी आपण भांडून, बडबड करून काय उपयोग असतो सांगा..??? ती व्यक्ती पुन्हा तर आपल्याला मिळत नाही.. आपल्यासोबत राहणार नाही मग अशा व्यक्तीसोबत वाद घालून मूड बिघडवण्यापेक्षा शांत राहून दुर्लक्ष करणे सोयीचे.

आपल्या घरात, कामाच्या ठिकाणी,आपण जिथे जाऊ तिथे सगळीकडे सारख्या विचारांची, शांत स्वभावाची,. आपल्याशी मत जुळवून घेणारी माणसं भेटतीलच अस नाही. मग त्यावेळी जर स्वभाव, विचार, मते वेगळी असतील आणि वाद होत असतील तर उगाच आपली ऊर्जा वाया घालवण्याची चूक आपण करू नये… कारण निरर्थक वादापेक्षा अर्थपूर्ण शांतता केव्हाही उत्तमच…



तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!