अपेक्षांचं ओझं बाजूला सारून समाधानाची दोरी घट्ट पकडूया..
सौ. मिनल वरपे
रस्त्याने जाताना किती मोठमोठे बंगले दिसतात.. बाहेरून पाहिल्यावर अस वाटते किती सुंदर बंगला आहे.. कित्ती मज्जा येत असेल तिकडे राहणाऱ्यांना.. त्या बंगल्यामध्ये सगळ्या सुख सोयी असतील.. प्रत्येकाला ज्याची त्याची खोली असणार.. जेवायला डायनिंग टेबल तर बाथरूम सुद्धा अगदी आपल्या घरापेक्षा भारी असणार…
पण जेव्हा आपल्याला कळते की या एवढ्या मोठ्या बंगल्यात फक्त तीन चार माणसं राहतात त्यावेळी अजून आश्चर्य वाटते की बापरे इतका मोठा बंगला आणि त्यामधे फक्त एवढीच माणसं.. त्यांना कस करमत असेल.. काय काम एवढ्या मोठ्या बंगल्याच..
खरचं आजच जगच अस झालंय ना.. माणसाच्या आयुष्यात माणसं कमी असतील तर चालेल पण सुख सोयी भरभरून पाहिजे असतात त्याला.. आज महिन्याला ३००० रुपये जरी मिळाले आणि त्यामधे घर चालत जरी असेल तरी अजून जास्त मिळावेत अशी आशा वाढीस लागते आणि आपल्या गरजा वाढत जातात खर तर गरजा आपणच निर्माण करतो.. आणि त्या पूर्ण झाल्याच पाहिजेत हा आपला हट्ट आपल्यालाच त्रास देण्याचं काम करतो..
प्रत्येकाने नक्कीच चांगल जगावं.. उत्तम राहणीमान मिळाव प्रत्येकाला पण या सगळ्यात आपल्या जितक्या अपेक्षा वाढतात त्यांच्या जोडीला आपल्यातील समाधानाची पातळी कमी होत जाते.. आणि एक वेळ अशी येते की ते समाधान कुठे हरवते कळतच नाही..
पूर्वी किती छान राहायचे जुनी माणसं.. घर छोट असेल पण घर माणसांनी भरलेलं असायचं.. पगार कमी असेल पण आनंद भरभरून असायचा.. एका घरात तीस चाळीस जण अगदी गुण्यागोविंदाने नांदत असायचे… भावाची मुलं आणि आपली मुलं यात काहीच फरक नसायचा.. जेवण बनवताना एकत्र येऊन काम केली जायची..
सण साजरा करण्यासाठी नवीन कपडे दागदागिने घेतलेच पाहिजे असा अट्टाहास नसायचा तर सगळे एकत्रित असल्याने प्रत्येक दिवस सणासारखा असायचा..कारण तेव्हा समाधान भरभरून होत.. समाधान असल्याने आशा अपेक्षांचं ओझं घेऊन कोणीच सुख शोधत नव्हत.. जे काही आहे त्यामधेच गोड मानून आनंदी राहण्याची वृत्ती प्रत्येकामध्ये असायची..
पण आज मात्र सगळ असून सुद्धा काहीच नसल्यासारखं प्रत्येकजण वागतो.. बँक खात्यात कितीही पैसे असले,जवळ दागदागिने कितीही असले, स्वतःच घर असेल तरीसुद्धा अजून जास्त पैसा, दागदागिने, प्रॉपर्टी कशी मिळवता येईल याकडेच लक्ष देण्यात आयुष्याचं खर सुख आपण गमावतो..
घरात माणस कमी राहतात.. एकत्र राहण्याची पध्दत तर आता फक्त ऐकायला मिळते.. पण या कमी माणसात सुद्धा किती ती भांडण, नकोते वाद याच कारण म्हणजे एकमेकांशी केली जाणारी तुलना.. जे त्याच्याकडे आहे ते माझ्याकडे नाही.. मीच का हे करायचं त्यानेपण करायला पाहिजे.. त्याला हे मिळालंय मग मला सुद्धा मिळालंच पाहिजे..
सगळं असताना सुद्धा काहीच नसल्याची तक्रार आपल्याला जे आहे त्यात आनंद मिळवण्याच्या समाधानातून जे सुख मिळते त्यापासून लांब ठेवते..
आज ज्याच्याकडे पैसा, प्रॉपर्टी, गाडी, बंगला आहे तो व्यक्ती आनंदात जगत नाही आणि शांत झोपत नाही आणि त्याच्या आयुष्याबद्दल असलेल्या तक्रारी कधीच कमी होत नाहीत. रोजची भाकरी मिळवून रस्त्यावर राहणारे तरी शांत झोपतात.. कसलीच तक्रार करत नाही.. ऊन पाऊस वारा सगळं सहन करून आयुष्य जगतात पण त्यांच्या अपेक्षा वाढत नाही कारण जे मिळतेय त्याच्यात समाधान मानण्याची वृत्ती त्यांच्यात असते….
म्हणून आनंदाने राहायचं असेल… येणारा प्रत्येक क्षण जगायचा असेल तर अपेक्षांचं ओझं बाजूला सारून समाधानाची दोरी घट्ट पकडली तर नक्कीच खर सुख कशात आहे आणि ते सुख मिळवून येणारा प्रत्येक क्षण स्वतःही जगून इतरांना जगण्याची प्रेरणा मिळेल अस उत्तम आयुष्य आपण जगू शकतो….
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!

