अनेकदा अगदी साध्या सरळ गोष्टींना सुध्दा आपणच अवघड करतो !!
सौ. मिनल वरपे
अनेकदा आपण अगदी साध्या सरळ गोष्टींना सुध्दा आपणच अवघड करतो याच अगदी साधं उदाहरण द्यायचं झालं तर हा गणित सोडवताना काहीवेळेस एकाच स्टेप मधे जे उत्तर मिळवता येते तेच गणित आपण बऱ्याच स्टेप मधे सोडवत बसतो आणि जेव्हा कळते की हे इतकं सोप्पं होत तेव्हा आपण ते गणित सोडवायला इतका वेळ आणि ऊर्जा का घालवली याचा पच्छाताप करतो याच कारण म्हणजे ते गणित मोठ दिसतेय म्हणजे अवघडच असेल असा अंदाज लावून त्याला आपणच कठीण बनवतो..
अगदी असच आपल्या दैनंदिन जीवनात नेहमी घडत असते… ज्या. परिस्थिती आपल्यासमोर उभ्या असतात, जे प्रश्न आपल्याकडून उत्तरांची मागणी करत असतात, जे संकट नेहमीच आपल्या वाटेत येऊन ठान मांडतात त्यांच्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन इतका वेगळा असतो जिथे आपण नेहमीच त्यांना कठीण परिस्थिती समजून घाबरत असतो.. त्यांच्यापासून लांब पळत असतो तर काहीवेळेस माघार घेऊन मोकळे होतो.
काही लोक अशा परिस्थितीत स्वतःवरच नाराज होतात तर काही लोक इतरांवर अवलंबून राहतात, काहींचा स्वभाव रागीट बनतो तर काहींची मनस्थिती इतकी बिघडते की त्यांना आपण काय वागतोय काय बोलतोय याच भानच उरत नाही..
परीक्षेत कमी गुण मिळाले म्हणून त्याने शिक्षण सोडून दिलं… अपेक्षेनुसार जॉब मिळत नाही म्हणून तो डिप्रेशन मधे गेला… नापास झाली म्हणून तिने गळफास लावून जीव दिला… मनासारखा जोडीदार मिळत नाही, सतत सगळे वय वाढतेय हे ऐकून दाखवतात म्हणून तिला आता जगणं नकोस वाटतेय… परिस्थिती बिकट असल्याने हवं ते शिक्षण घेता येत नाही म्हणून तो सतत घरच्यांशी वाद करतो… नवऱ्याशी पटत नाही म्हणून ती मुलांचा सुद्धा विचार न करता घर सोडून गेली.. बायको नीट वागत नाही म्हणून त्याने भलताच मार्ग निवडला…
असे एक ना अनेक व्यक्ती, घटना आपण नेहमीच बघतो ऐकतो पण हे ऐकल्यावर आपल्या मनात त्या क्षणाला सहज येतेना… अरे कशाला अस केलं त्याने काय गरज होतीका… किती पर्याय आहेत ते सगळं सोडून अस का वागावं त्याने…
आणि खरच असच तर आहे…. कोणतेही प्रश्न इतके कठीण नसतात की ज्याचं उत्तर सापडणार नाही आणि असे सुद्धा नसतात जे आपण कठीण समजून त्या पद्धतीने त्यांचा विचार करतो..
कमी गुण मिळाले म्हणून अजून जास्त मेहनत घेऊन पुढे जास्त गुण मिळवता येतात.. नापास झालो म्हणजे सगळं संपत नाहीना नव्याने सुरवात करता येते.. नात असो नाहीतर आपण आयुष्य प्रत्येकाला आपण एक संधी दिली तर कदाचित आज जे आहे त्यामधे बदल दिसू शकतो.. वेळ, परिस्थिती सगळ्यांमध्ये सुधारणा करता येते फक्त संयम बाळगला पाहिजे आणि प्रयत्न कधीच सोडू नयेत..
आपण अनेक व्यक्ती पाहतो ज्यांनी शून्यातून जग निर्माण केलं आहे जर त्यांनी त्यांच्या आयुष्याकडे किंवा परिस्थितीकडे बघताना सगळं अवघड समजल असत किंवा पुढे जाण्याऐवजी प्रयत्न करणं सोडून आयुष्य अवघड केलं असत तर आजचा यशाचा दिवस त्यांनी पाहिला नसता.
असे अनेक आपल्या माहितीतलेच नाही तर आजूबाजूला वावरणारे सुद्धा अनेक व्यक्ती असतात जे अनेक समस्यांना तोंड देत असतात पण त्यांना अवघड समजून नाही तर सोप करून..
आपण अगदी सहजच सगळ्या गोष्टींना इतकं अवघड बनवतो की शेवटी आपल्याला आपलं जगणं सुद्धा नकोस वाटू लागते.. सगळं नीरस.. बेचव जाणवते.. आपण जिवंत तर असतो पण जगत मात्र नसतो..
म्हणजेच एकूण काय तर आपल्याला आपल्यासमोर येणाऱ्या प्रत्येक क्षणाला सहजतेने बघता आल पाहिजे.. सगळ्याच गोष्टी अवघड नसतात त्यांना बघताना आपण साध्या सरळ दृष्टीने पाहिले तर सगळच सोप करता येईल…
सगळं सोप करून जर जीवन जगल तर आयुष्य जगण्याचा आनंद लुटता येईल.. जगण्याचा अर्थ जाणवेल..
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


