Skip to content

अतीचांगुलपणा ठेवाल तर गोड बोलून विकत घेतलं जाईल.

अतीचांगुलपणा ठेवाल तर गोड बोलून विकत घेतलं जाईल.


सोनाली चेवले


चांगुलपणा हा माणसाला खऱ्या अर्थाने माणूस बनवत असतो.. आणि म्हणूनच माणसाने तो कधीच सोडायचा नसतो. पण जसं कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा चांगला नसतो, तसंच चांगुलपणाचा देखील अतिरेक हा चांगला नसतोच.

एखाद्याने आपल्याला काही मदत मागितली, काही काम सांगितलं, कशाची मागणी केली; तर ह्या चांगुलपणामुळेच आपण नाही म्हणू शकत नाही. एखादा खरंच अडचणीत असेल, आणि आपल्याला झेपत असेल तर त्याला मदत करायलाच हवी.. देवालाही देवाच्या दारी जावं लागतं मदतीसाठी, तिथे आपली काय गोष्ट. आपल्याला एकमेकांच्या मदतीची गरज ही भासतेच.

पण काही माणसं अडचणीत नसतानाही, अडचणीत आहोत असं भासवतात.. कारण त्यांना माहित असतं आपण नाही म्हणू शकत नाही ते.. आणि मग अशा लोकांचा सुरू होतो आपला वापर करणं.. आपल्या चांगुलपणाचा गैरफायदा घेणं.

आजकाल जास्त तर वस्तूंवर प्रेम आणि माणसांचा वापर होताना दिसत आहे. जे की ह्याच्या उलट व्हायला हवं. पण हेच सध्याचं वास्तव आहे. त्यामुळं आपला वस्तुसारखा वापर होऊ नये ह्याची काळजी आपणच घ्यायचीय.

अशामुळे एकतर आपण स्वतःच स्वतःची फसगत करत असतो आणि आपला अनमोल वेळ आणि शक्ती व्यर्थ घालत असतो. बरं अशा लोकांना फक्त मदत मागायचं कळतं, करायचं नाही! बरं मदत नाही तर नाही, आपण केलेल्या मदतीची जाणीवही नसते अशा लोकांना. फक्त तेवढ्यापुरतं तेवढं!

मग नंतर पश्र्चाताप करण्यापेक्षा अगोदरच जागरूक राहिलेलं बरं, नाही का?जे खिळे वाकडे आहेत त्यांना सोडून सरळ खिळ्यांनाच जसं ठोकलं जातं तसंच माणसांसोबतही होतं. एखाद्याच्या चांगुलपणाचा गैरवापर काय एकाच पद्धतीने होत नाही. अनेक मार्गांनी एकप्रकारे त्यांचं शोषणच होतं.

जर आपण ठरवलं, आता नाही म्हणायचं.. तरी अशी लोकं इमोशनल ब्लॅकमेल करू लागतात. मग तुमचं संवेदनशील आणि हळवं मन परत तोच पाढा गिरवायला लागतो. मग योग्य, अयोग्य ह्या गोष्टी बाजूला पडतात आणि आपण भावनेच्या आहारी जातो.

तुमचा रिमोट कंट्रोलच तुम्ही इतरांच्या हाती दिल्यास ते हवं तसं आणि हवं तेव्हा तुम्हाला नियंत्रित करतील. त्यामुळं इतरांच्या हातचं खेळणं बनायचं नसेल तर आपला रिमोट आपल्याच हाती ठेवायचा.

जिथे फक्त बुध्दीचा किंवा भावनेचा विचार करून निर्णय घेतले जातात, ते चुकण्याचीच शक्यता जास्त असते. आणि जेव्हा ह्या दोन्हींचा विचार करून निर्णय घेतले जातात ते योग्य असण्याची शक्यता जास्त असते. बुध्दी आणि भावना ह्यात समतोल हवा. नाही म्हणायला शिकायला हवं तसंच कुठे हो म्हणायचं ही समज पण असायला हवी.

चांगल्या व्यक्तीत काहीच दोष नसतात असंही नाही. आपणही कोणाच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतोय का हे पाहायला हवं. आत्मपरीक्षण करायला हवं. आपण काय करतोय हे त्रयस्थपणे पाहिलं की समजायला सोप्पं जातं.

कधीकधी कळत असूनही माणूस स्वतःला मदत करण्यापासून रोखू शकत नाही. पहिले आपण स्वतः चांगले आहोत म्हणून मदत करायचं आणि नंतर त्या चांगुलपणाला गालबोट लागू नये म्हणून!एक लक्षात घ्यायला हवं, आपण कितीही चांगलं वागलं तरी आपल्याला नावं ठेवणारी लोकं ही असतातच. ते त्यांचं काम आहे. त्यात आपण हस्तक्षेप करू नये!

पण त्यांच्या दबावाखाली येऊन आपलंच नुकसान मात्र करून घेऊ नये. बस. आणि जर का तुमच्यातला चांगुलपणा तुम्हाला गप्प बसूच देत नसेल तर त्याला योग्य वळण द्या. दुनियेत खूप सारी दुर्लक्षित लोकं आहेत, ज्यांना खरंच तुमच्या मदतीची खुप गरज आहे. त्यांना मदत करा. एकाच्याही जीवनाचा दर्जा जर तुमच्यामुळे वाढला तर त्या आत्मिक समाधानाची जोड नाही.

जो निसर्ग आपल्याला फक्त आणि फक्त देतच राहतो त्या निसर्गाला तर आपण काही देऊ शकत नाही पण त्याच्या होणाऱ्या -हासाला थांबवण्यासाठी प्रयत्न नक्कीच करू शकतो. इथे तुमच्या चांगुलपणाला मर्यादा नसायला हरकत नाही.

शेवटी चांगलं किंवा वाईट बनण्यापेक्षा समजदार आणि जागरूक बना. मग जे गरजेचं असेल तेच होईल.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

2 thoughts on “अतीचांगुलपणा ठेवाल तर गोड बोलून विकत घेतलं जाईल.”

  1. राऊत अरुण

    खूपच सुंदर प्रकाराने समजून
    सांगितले खुप छान.

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!