Skip to content

अतिविचार करून-करून मिळवलेल्या वेदना आपल्या संवेदना नष्ट करतात.

अतिविचार करून-करून मिळवलेल्या वेदना आपल्या संवेदना नष्ट करतात.


कु.हर्षदा नंदकुमार पिंपळे


गच्च दाटून आलेलं आभाळ आज फाटलं आणि
दुःखाच्या सरींनी हसत हसत बरसायला सुरुवात केली……

दुःख हसायला लागलं हे पाहून मनात असंख्य प्रश्न घोळू लागले.दुःख हसू तरी कसं शकतं…? खरं तर विचार करण्यासारखीच ही गोष्ट होती.दुःखात आपल्याला हसवणारे दहाजण असले तरीही आपण सहजासहजी लवकर हसत नाही. मी अजूनही दुःखातच आहे हे आपल्या वागण्यातून स्पष्ट होत असतं.पण इथे तर दुःखच स्वतःहून हसतय म्हणजे काहीतरी गडबड नक्की असणार हा विचार मनाला खात रहाणारा होता.

मन विचाराच्या पलिकडे जाऊन विचार करायला लागणार इतक्यात जाणवलं की अरेच्चा…..!

आपण आत्ता फक्त या आत्ता घडलेल्या गोष्टीचा क्षणात कितीतरी विचार करणार होतो….आणि ही तर आत्ता घडलेली गोष्ट आहे. पण आपण तर आयुष्यात रोज घडणाऱ्या गोष्टींवरही किती विचार करतो.त्याला काही मर्यादाच नसतात.कधीकधी विचार करण्याचे त्राणही आपल्या शरीरात नी बुद्धीत नसतात.पण कधीकधी मात्र आपण किती विचार करतो याच काही भानच राहिलेलं नसतं.”अतिविचार” हा नेहमीच घातक असतो.हे त्यावेळी मात्र आपल्या लक्षात येत नाही.

आपण अतिविचार करणं सोडतच नाही. विचार करून करून मेंदूचा चुरा होतो तरीही आपण अजून खोलात शिरून विचार करतच रहातो.पण ह्या अतिविचार करण्याने त्रास हा स्वतःलाच होत असतो.डोळ्यासमोर अक्षरशः अंधारी येते या अतिविचाराने…!

माणूस हा विचार करणारा प्राणी आहे.तो क्षणक्षणाला कोणत्या ना कोणत्या विचारात गुंग झालेला असतो. त्याची विचार करण्याची शक्ती जरी अफाट असली तरीही तो एका गोष्टीचा विचार करायला मात्र विसरतो.ती गोष्ट म्हणजे अतिविचार करणं किती घातक असतं…हे माणसाला लक्षात येत नाही.

तो विचार करून करून अतिविचार करायला लागतो.आणि मग नंतर अतिविचार करून करून त्यालाच वेदना होतात. कारण आधीच वेदना कमी नसतात.त्यात एखाद्या गोष्टीचा अतिविचार करुन करून वेदना अजूनच माणसाला कवटाळतात.त्याच वेदना खूप त्रासदायक असतात.आणि सतत होणाऱ्या या वेदनांमुळे आपल्या संवेदना केव्हा नष्ट होतात कळतही नाही.

पहा माणसाच मन हे फार संवेदनशील असतं.आणि जोपर्यंत ते संवेदनशील असतं तोपर्यंत ते जागं असतं.त्याला प्रत्येक गोष्टीची जाणीव होत असते.प्रत्येक गोष्ट त्याला प्रकर्षाने जाणवत असते.पण एकदा का ते संवेदनशील मन शांत झालं नं…त्याला काहीच कळेनासं होतं.त्याला सतत जाणीव करून द्यावी लागते हे होतय ते होतय…असं झालय , तसं झालय…वगैरे वगैरे…!

एखाद्या गोष्टीचा जितका विचार करू तितका त्रास होतो. त्या त्रासामुळे वेदनांच प्रमाणही वाढत जातं. कालांतराने वेदनांच प्रमाण इतकं वाढत जातं की नंतर होणाऱ्या कोणत्याही वेदना या जाणवतच नाही. जसा त्वचेचा “sens” कधी कधी निघून जातो अगदी तसच मनाला वेदना जाणवतच नाहीत. आपण काय करतोय , आपल्याला काय होतय ह्याची जाणीव मन विसरून जातं.मन मेलेल्या अवस्थेत जायला लागतं.

अतिविचार करणं हा मानसिक आजार नसला तरी या अतिविचाराने मानसिक आजार नक्कीच उद्भवतात.नैराश्य , अस्वस्थता तसेच वेगवेगळे शारीरिक आजारही या अतिविचाराने उद्भवतात. अतिविचार खरच खूप घातकच असतो.या अतिविचारानेच आपण वेदना स्वतःवर ओढवून घेत असतो.एखाद्या गोष्टीचा अतिरेक झाला तर ती घातक ठरते हे आपल्याला माहीतच आहे. कित्येकांना तर याचा अनुभव असेलच यात शंका नाही.

एखाद्या मनावर सतत आघात झाले तर ते नेहमीसारख कधीच व्यक्त होत नाही. ते कोपऱ्यात निपचित पडून राहतं.वर एका ठिकाणी डोळे लावून फक्त पाहत असतं.संवेदनशील असलेलं मन या अशा अतिरेकामुळे असंवेदनशील बनू पाहतं.ते रडतही नाही आणि हसतही नाही. कुणी ओरडलं , मारलं तरी त्या व्यक्तीला ते जाणवत नाही.

प्रेम , पैसा , करिअर किंवा वेगवेगळ्या प्रकारची संकटं आल्यावर माणसाची जी अवस्था होते ती बिकटच असते.अशा प्रकारची संकटं आल्यावर माणूस कृतीपेक्षा विचारातच जास्त गुरफटून जातो.विचार करणं अगदी स्वाभाविक आहे पण अतिविचार करणं हे स्वाभाविक नाही. ते शारीरिक आणि मानसिक आजारांना निमंत्रण देण्याच एक निमीत्तच आहे.

सततच्या वेदनांमुळे मेंदू थकतो.तो ताणला जातो.खरतर त्याला विश्रांतीची गरज असते.पण आपल्याला ते कळत नाही. आपण अतिविचार करणं काही थांबवत नाही. आणि त्याच अतिविचारामुळे आपम काही वेदना स्वतःच ओढून घेतो.आणि याच वेदनांमुळे आपल्या संवेदना सहज नष्ट व्हायला लागतात.

आणि एकदा का संवेदना नष्ट झाल्या तर माणूस माणसासारखा वाटतच नाही. तो सरळ सरळ एखाद्या वस्तूसारखा भासतो.त्यामुळे अतिविचार करायच टाळा.आणि इतरांनाही अतिविचार करू देऊ नका.कारण अतिविचार हा केव्हाही , कधीही , कुठेही घातकच…!


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “अतिविचार करून-करून मिळवलेल्या वेदना आपल्या संवेदना नष्ट करतात.”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!