अतिभावनिक माणसांमुळे आपली मानसिक ऊर्जा वाया जाते.
मनीषा उगले
सतत दुःखी राहणं हा सुद्धा छंद असतो काही माणसांचा! नीट निरीक्षण केलं तर आपल्या आजूबाजूला अशी काही माणसं तुम्हाला सापडतीलच. (सकारण दुःखी असणं वेगळं आणि सगळं काही सुशेगात असताना देखील तोंड उतरवून बसणं यातला फरक सुज्ञांच्या लक्षात आला असेलच.)
नाती, नोकरी किंवा इतर सामाजिक कोणत्याही सामाजिक गटांत फार काळ स्थिर राहता न येणं, कशाबद्दल तरी सतत तक्रार करत राहणं, कोणावरच प्रेम करता न येणं, माणसं जपता न येणं आणि मिळालेल्या आयुष्याबद्दल कृतज्ञ नसणं ही यांची काही ठळक लक्षणं.
तुम्ही त्यांच्याशी कितीही आपुलकीने वागा, त्यांना खुश ठेवण्यासाठी आटापिटा करा, ते असंतुष्टच असतात, प्रत्येक गोष्टीत छोटीशी का होईना खोड काढून स्वतः दुःखी व्हायचं आणि समोरच्या माणसाला देखील डिस्टर्ब करायचं अशी त्यांची सवय असते.
दुःखाचा वटवृक्ष विशाल आहे, हात कितीही लांबवले तरी त्याला मारलेली मिठी पुरत नाही, मग कशासाठी अट्टहास त्याला पकडून ठेवण्याचा?
पण यांच्या ते गावीच नसतं. ही माणसं घडाघडा सांगत नाहीत काय होतंय ते, लाखदा विचारून सुद्धा बोलत नाहीत, कोड्यात किंवा तिरकस बोलतात कायम. बोलून सुटत नाही असा जगात एकही प्रश्न नसतो.
काहीना काहीतरी उत्तर त्यावर असतंच. पण यांना कोणाला काही सांगायचंच नसतं, कारण आपले उरीपोटी बाळगलेले भ्रमाचे भोपळे फुटतील की काय अशी यांना भीती असते. ही मेनघुणी माणसं आपल्या भवतालाबद्दल, आजूबाजूच्या माणसांबद्दल सतत छोटे मोठे गैरसमज करून घेत असतात, मनातलं काहीच बोलून दाखवलेलं नसल्याने त्यांचे गैरसमज दूर होण्याचा प्रश्नही नसतो.
या सगळ्याच्या जोडीला त्यांच्याकडे अजून एक गमतीदार गोष्ट असते ‘भ्रम’ नावाची. एखाद्या गोष्टीबद्दल मनात काहीतरी विचित्र कल्पना निर्माण करून घ्यायची आणि दिवसेंदिवस स्वप्नरंजन करून ती फुलवत न्यायची! प्रत्यक्षात तसं काही नसतं देखील.
अशा निरुपयोगी गोष्टी साठवून साठवून त्यांची पोटं इतकी फुगतात की बस्स! एखादे दिवशी उलसंक बोट लागायचा अवकाश, मनात साठवलेला मैला प्रपातासारखा वाहू लागतो मग. कितीतरी चांगल्या भावना आणि नाती त्यात अक्षरशः वाहून जातात. काही म्हणता काहिही हाती लागत नाही त्यावेळी.
ही माणसं वाईट नसतात, पण ‘भान’ नावाची गोष्ट कमी पडते त्यांच्याकडे. त्यांना कोणाशीही जुळवून घेता येत नाही. संपर्कात येणाऱ्या प्रत्येक माणसात ते खोट शोधत राहतात, इतकंच नव्हे तर मनातली कल्पनासृष्टी खरीच आहे असं समजून ते माणसांना वाट्टेल तसं बोलून दुखवत राहतात.
लहरी तर इतकी असतात की क्षणात एखाद्याला मायेने पोटाशी धरतील, तर दुसऱ्याच क्षणी पायदळी घेतील. आपल्या अशा वर्तनाने आपल्या जिवलगांच्या आयुष्याचा नरक होत असतो हे देखील त्यांच्या लक्षात येत नाही.
प्रत्येकाच्या आयुष्यात अशी काही माणसं असतात आणि ती ‘आपली’ आहेत म्हणून जपावी सुद्धा लागतात. पण त्यांना जपणाऱ्यांना अनेकदा सत्वपरिक्षेला सामोरं जावं लागतं, कारण त्यांच्यावर सर्वात जास्त प्रेम करणाऱ्या आणि त्यांची काळजी घेणाऱ्या माणसाचं देखील मन:स्वास्थ्य बिघडवल्याशिवाय ते राहत नाहीत.
त्यांच्या शक्य तितक्या गोष्टी सोडून द्यायला आणि त्यांच्या किरकिऱ्या स्वभावाकडे दुर्लक्ष करायला शिकणं हा यावरचा एकमेव उपाय असतो. प्रत्येक माणसाला आपण नाही बदलू शकत. माणसं बदलली तरी ते बदल तात्पुरते असतात, चटकन आपल्या मूळपदावर येण्याची वृत्ती असते माणसांची.
कालांतराने या लोकांचा राग देखील येईनासा होतो, त्यांच्यावरच्या रागाचं रूपांतर हळूहळू करुणेत व्हायला लागतं.
आचार्य रजनीश एक गोष्ट सांगतात. अत्यंत रागात असलेला एक इसम एकदा गौतम बुद्धांवर थुंकला. तर बुद्ध त्याला म्हणाले, “तुला आणखी काही सांगायचं आहे का?” त्यांचा शिष्य आनंद अतिशय चिडून विचारू लागला, “तो तर थुंकला आहे, त्यात कुठे काय सांगितलं त्याने?”
बुद्ध म्हणाले, “त्या माणसाला इतका क्रोध आलेला आहे की त्याला तो शब्दांत मांडता येत नाहीय, म्हणून तो थुंकला. केवढं मोठं दुःख आहे त्याचं की त्याला राग व्यक्त करण्यासाठी शब्दही सापडू नयेत! अजून त्याच्या मनात काही सांगायला शिल्लक आहे का हे त्याला मी विचारतो आहे.”
केवढी ही करुणा! बुद्ध किंवा संत एकनाथांइतकी करुणा आपल्यात येण्याइतके आपण मोठे नाही, पण ‘माणूस’ म्हणून तिचा काही एक अंश आपल्यात नक्की आहे, तो प्रकट करण्याची संधी आयुष्य आपल्यासमोर असं वेळोवेळी ठेवत असतं. कोणताही माणूस पूर्णतः चांगला किंवा वाईट नसतो कधीच.
माणसं ‘ग्रे’ शेडसारखी असतात, फक्त त्या शेड्स कमी अधिक प्रमाणात डार्क असतात इतकंच. म्हणूनच माणसं समजून घेताना संयम बाळगावा लागतो.
काही नाती इतकी वर्षे तुम्ही निगुतीने जपलेली असतात, त्यात एके दिवशी कोणीतरी तुम्हाला काही चमत्कारिक गोष्ट सांगतं आणि तुम्ही चक्क विश्वास ठेवता? तुम्ही इतकं छान अनुभवलेल्या माणसावरचा तुमचा विश्वास उडतो तेवढ्याने? कोणतीही खातरजमा न करताच? इतका तकलादू असतो तुमचा विश्वास?
“Try the crazy method of asking before you assume.’ असा एक छान इंग्रजी विचार आहे. प्रश्न विचारा माणसांना, समोरचं जिव्हाळ्याचं माणूस चुकतं आहे असं वाटत असेल तर कान पकडा त्याचा.
एकदा उत्तर नाही आलं तरी दरवाजा ठोठावत रहा. कधीतरी तर उत्तर मिळेलच. परस्पर निष्कर्ष काढून कशी काय नाती संपवू शकता तुम्ही? कोणत्याही परिस्थितीला अनेक बाजू असतात, शक्य तितक्या बाजू आपण समजून घेतल्याशिवाय इतरांच्या हवाल्याने आपले निष्कर्ष बनवणं टाळायला हवं. त्यासाठी स्वतःचे कान, डोळे आणि मेंदू वापरायला हवा.
हत्ती आणि सात आंधळ्यांची गोष्ट कोणी आपल्याला नव्याने सांगायला हवी का?
वाळवंटात मृगजळ दिसतं, ते दिसतं हे खरं, पण प्रत्यक्षात ते असत नाही.
भिंतीवर लटकलेली दोरी सापासारखी दिसते, म्हणून तो साप असतो का खरा?
गोष्टी दिसतात किंवा ऐकू येतात तशा नसतात, अनुभवल्याशिवाय त्यातलं सत्य आपल्याला समजत नाही.
प्रत्यक्ष अनुभव घ्या, पुरेसे प्रश्न विचारा, समर्पक उत्तरं आपोआप मिळतील, अन्यथा या अंदाजपंचेच्या खेळात तुम्ही आयुष्यातल्या मोलाच्या गोष्टी गमावून बसाल.
वर्षानुवर्षे तुमच्याबद्दल फक्त सांगोवांगी माहितीच्या आधारावर मतं बनवून बसलेली काही माणसं असतात, तुमच्या कठीण काळात तुम्ही कसं निभावून नेलंत, तुम्ही जगलात की मेलात याबद्दल त्यांना काही घेणंदेणं नसतं.
तुमच्या सुखदुःखांबद्दल त्यांना काही पडलेलं नसतं. त्यांना फक्त तुम्हाला सल्ले द्यायचे असतात. मग ते तुम्हाला आदर्श जीवनपाठ शिकवणारे व्हिडीओ आणि मेसेजेस व्हाट्सपवर नित्यनेमाने पाठवत राहतील, पण फोन करून तुमची चौकशी करणार नाहीत, तुम्हाला समजून घेणार नाहीत. अशांकडे दुर्लक्ष करायला शिकतोच आपण अनुभवाने.
त्यापेक्षा माणसं वेळोवेळी बोलत का नाहीत? बोला, मोकळे व्हा, सांगा की मला आत्ता तुझ्याबद्दल हे अमुकअमुक वाटलेलं आहे, तुझी बाजू कायय यावर? आपल्या माणसांवर हक्काने भले चिडा, रागवा, कान पकडा पण त्यांना समजून घ्या. गप्प राहून भलभलती अनुमानं काढू नका.
सत्य सूर्यप्रकाशाइतकं तेजस्वी असतं, ते लपवूनही लपत नाही, कधीतरी समोर येतंच. मग पश्चाताप होतो, आपले अंदाज चुकीचे ठरल्याचा! पण वेळ गेलेली असते. जिवाभावाची माणसं हातून निसटून गेलेली असतात.
म्हणूनच वेळ जाण्याआधी बोलायला लागा, बोलते व्हा, बोलते रहा.
कदाचित नंतर फार उशीर झालेला असेल!


