Skip to content

अतिचिंता केल्याने बिघडलेल्या गोष्टी कधीच चांगल्या होत नाही.

अतिचिंता केल्याने बिघडलेल्या गोष्टी कधीच चांगल्या होत नाही.


कु.हर्षदा नंदकुमार पिंपळे


आपलं आयुष्य आपण स्वतःची आणि इतरांची काळजी केल्याशिवाय जगतच नाही. आपल्याला स्वतःबरोबर सतत इतरांची काळजी घेण्याचीही सवय झालेली असते.पण कधी कधी असं होतं की आपल्याला वाटतं की आपण त्यांच्यापासून दूर जातोय मग त्यांची काळजी कोण घेणार अशी चिंता मात्र त्यावेळी अकारण सतावत राहते.ते स्वतःची काळजी घेऊ शकतात हे आपण चिंता करण्याच्या नादात क्षणभर विसरून जातो.

आणि साधीसुधी सरळ चिंता नाही तर आपण अतिचिंता करत राहतो.आता तिची काळजी कोण घेणार? ती तिची व्यवस्थित काळजी घेईल न..??तिला कसला त्रास तर होणार नाही न..?? नीट राहील न..? अशी चिंता वाढत जाते आणि प्रश्नांची सरबत्ती सुद्धा चालुच राहते.मन चिंतेने अगदी ग्रासून जातं.म्हणजे किती त्या चिंतेचा अतिरेक….!!

आता हे झालं साधसोपं आपल्या जगण्यातील उदाहरण..असच काहीसं आपल्या आयुष्यात बऱ्याचदा घडत असतं.गोष्टी घडतात, बिघडतात… आणि मग आपल्याला सवय लागलेली असते की कोणत्याही गोष्टीवर सतत विचार करण्याची , काळजी-चिंता करण्याची.आणि कधी कधी ही चिंता अतिचिंतेमध्ये केव्हा रूपांतरित होते काही कळतही नाही. अशातच एखादी गोष्ट बिघडते ,आणि ति गोष्ट बिघडली म्हणून आपण तिच्यावर विचार न करता अनेकदा ति बिघडली याचीच जास्त चिंता करत असतो.

चिंता करण्यातच बराचसा वेळ घालवतो.मग अशा या अतिचिंता करण्यामुळे बिघडलेल्या गोष्टी व्यवस्थित करायला आपल्याला वेळच मिळत नाही. किंवा आपण अतिचिंता करण्यातच जास्त वेळ घालवतो.मग अशाने बिघडलेल्या गोष्टी कधीच चांगल्या होणार नाहीत.चिंता करणं , चिंता वाटणं अगदी स्वाभाविक आहे.पण अतिचिंता मात्र आपलं मानसिक ,शारीरिक संतुलन केव्हाही बिघडवू शकते. अतिचिंता ही केव्हाही घातकच..!

ती स्वतःला आणि इतरांनाही जाळते.अतिचिंता केल्याने बिघडलेल्या गोष्टी चांगल्या होत नाहीत. याचा अनुभव आपण प्रत्येकाने अनेकदा घेतलाही असेल.आणि अतिचिंता म्हणजे ‘panic attack’ ना आमंत्रण देणे…यामुळे असे ‘attacks’ येण्याची शक्यता असते. आणि त्यामुळे गोष्टी अजूनच बिघडू शकतात.म्हणजे बिघडलेली गोष्ट तर बाजूलाच राहते पण त्याचबरोबर दुसऱ्या गोष्टीही कळत नकळतपणे बिघडतात. त्यामुळे अतिचिंता करायची की टाळायची याचा विचार आपण करणं गरजेचं आहे. अतिचिंता किती घातक ठरू शकते ते पहायच झालं तर एक छोटसं उदाहरण पाहुयात——

परिक्षा —- आता परिक्षा म्हंटल तर अनेकांना घामच फुटतो.कित्येकांना परिक्षा हवीहवीशी वाटते तर कित्येकांना हीच परिक्षा नकोनकोशी वाटते.कोणाला अभ्यास न झाल्यामुळे टेन्शन येतं तर कोणाला कमी अभ्यास झाल्यामुळे टेन्शन येतं.आणि कुणाला तर अभ्यास झाला असुनही असुरक्षित वाटत असतं.दडपण येणं साहजिकच आहे. पण आपण परिक्षेला जाण्याआधीच इतका विचार इतकी चिंता करत असतो की त्याला काही मर्यादा नसतात.

आधीच आपण पुरते बिघडलेलो असतो , गोंधळलेले असतो.त्यातच आपण अतिचिंता करायला लागतो.पेपर कसा जाईल..? सोपा असेल की अवघड असेल..?? मला नीट लिहीता येईल न..?? नाही लिहीता आलं तर शिक्षक ओरडतील , घरचे ओरडतील अशा भीतीने तीव्र चिंता वाढत जाते.किंवा मग काही स्पर्धा परीक्षा देणारेही असतात.आपलं करिअर यावर घडणार असतं.मग ही परीक्षा कठीण गेली तर कस होणार…?? या भीतीने चिंतातुर झालेले आपण आपल्याच गोष्टी अजून बिघडवतो.

कारण त्या तीव्र चिंतेमुळे हातपाय आणि मन थरथर कापायला लागलेलं असतं.बुद्धी आणि मन दोन्ही थाऱ्यावर नसतं.आणि मग आपण परीक्षेला जातो.कधीकधी पेपर सोपा असूनही केवळ आपल्या चिंतेमुळे घाबऱ्याघुबऱ्या झालेल्या आपल्याच अवस्थेमुळे आपण पेपर लिहीताना गडबडतो , सोप्या पेपरला केव्हा अवघड करून बसतो कळतही नाही. गोष्टी बिघडतात आणि मग अजून त्रास होतो.एकामागून एक गोष्टी बिघडतच जातात. म्हणजे अतिचिंता किती परिणाम करु शकते हे आपल्याला समजु शकतं.

त्यामुळे अतिचिंता करू नये.यामुळे दुसरेही चिंतेत पडतात. एकामागोमाग एकमेकांच्या चिंता वाढतच जातात.अतिचिंता मनुष्याला जिवंतपणीच जाळत असते.एखादा अपवाद वगळता , अतिचिंतेमुळे बिघडलेल्या गोष्टी तर चांगल्या होत नाहीत तर दुसरे व्याप हे वाढतच राहतात. इतकच नाही तर मानसिक , शारीरिक दोन्ही गोष्टींचा समतोल अतिचिंतेमुळे ढासळतो.त्यामुळे चिंता करावी पण अतिचिंता करू नये.आपल्या चिंतेवर आपणच नियंत्रण ठेवायला हवं. तरच गोष्टी सुधारतील , चांगल्या होतील.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

2 thoughts on “अतिचिंता केल्याने बिघडलेल्या गोष्टी कधीच चांगल्या होत नाही.”

  1. Mi aka company che kam ghetale rate chukka mule maze mate arthik nuksan samor jave lavkar ahe mala roj nukasan shan karve lagta company rate vadhun deth na hi work order madhe tace namut kele ahe

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!