Skip to content

अतिचंचल मुलांना पालकांनी कसे हाताळावे….

अतिचंचल मुलांना पालकांनी कसे हाताळावे….


डॉ.सुमेधा मनीष हर्षे I 9922477041

(Special Child Counselor)


आजच्या स्मार्ट युगाची ही स्मार्ट पिढी आहे. अत्यंत चाणाक्ष मुलांची ही पिढी. पण आजचे पालक मुलांच्या अनेक समस्यांमुळे त्रस्त आहेत. त्यातली खूप जास्त प्रमाणात आढळणारी समस्या म्हणजे मुलांमधे असलेली अतिचंचलता.

साधारणपणे मूल चालायला लागल्यापासून (एक- दीड वर्षापासून) ही समस्या पालकांना सतावते. मुलं एका जागी शांत बसतच नाहीत. ती अतिचंचल असतात. त्यांच्यात खूप ऊर्जा ( energy) असते. अखंड बडबडत रहतात. अशा मुलांना सांभाळणं म्हणजे पालकांसाठी एक आव्हानच असतं.

अशा मुलांमध्ये अतिप्रमाणात ऊर्जा असल्याने त्या ऊर्जेला योग्य वाट करून देणं खूप जरुरी असतं. अशी मुले अत्यंत हुशार असतात, चाणाक्ष असतात. त्यांची बौद्धिक भूक, भावनिक भूक पण खूप जास्त असते. आणि ती जर पालकांकडून पुरवली गेली नाही तर मग त्यांची उर्जा नकारात्मक गोष्टींकडे वळते. ही मुलं मग प्रचंड आततायी होतात. घर विस्कळीत करणे, घरातल्या वस्तू इतस्ततः फेकणे, खेळणी तोडणे इ. थोडक्यात काय तर मोडतोड करण्याचा त्यांचा स्वभाव बनतो. ती अत्यंत जिद्दी पण होतात.

वेळीच ह्या गोष्टींना लगाम घातला नाही तर तो त्यांचा स्वभाव बनत जातो. अशा अतिचंचल मुलांना कसे हाताळावे –

* रोज जमत नसेल तर आठवड्यातून किमान तीन वेळा तरी मुलांना गार्डन मध्ये घेऊन जावं. तिथल्या हिरवळीवर त्यांना खेळू द्यावे, खूप धावू द्यावे. घसरगुंड्या, झुल्यांवर मनसोक्त खेळू द्यावे ( outdoor games). जेणेकरून ती थकतील, त्यांच्यातली उर्जा योग्य रीतिने वापरल्या जाईल.

 

* शक्य असल्यास समवयस्क मुलांना घरी जमवून खेळू द्यावे. जर हे शक्य नसेल तर पालकांनी ( मुख्यत्वेकरून आईने) स्वतः मुलांबरोबर काही खेळ खेळावेत. (Indoor games) जसं फिंगर पेंटिंग, चिकन मातीचे खेळणे बनवणे, व्हेजिटेबल पेंटिंग ( भाज्यांच्या मदतीने), हस्तकलेच्या गोष्टी बनवणे ( craft activities), चित्ररूपी गोष्टी सांगणे इ. वयापरत्वे मुलांना विविध ‌कोडी ( age appropriate puzzle games), त्यांची सर्जनशीलता वाढवणारे विविध खेळ खेळावे.

* कन्सट्रक्टिव्ह खेळ खेळावेत. जसे ब्लाॅक्स/ मेकॅनोज् पासून घर, इमारती, शाळा इ.बनवणे

* वाळूत भरपूर खेळू द्यावे.

* मुलं थोडी मोठी झाल्यावर बागकामात त्यांची मदत घ्यावी. झाडांना पाणी टाकणे किंवा तुमच्या मदतीने झाडं लावणे, त्यांची काळजी घेणे इ.
घरातल्या कामातही त्यांची मदत घ्यावी.

* ही मुलं बोलून व्यक्त होतात. त्यांच्या मनात असंख्य प्रश्न असतात, ती चौकस असतात. त्यांची बडबड शांतपणे ऐकून घ्यावी. त्यांच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तर द्यायचा प्रयत्न करावा. त्यांना तुमच्याकडून उत्तरं हवी असतात. त्यांची उत्सुकता शमवल्या गेली पाहिजे.

* ही मुलं खूप भावनिक ( emotional) असतात. या मुलांना प्रेमाने, गोड बोलण्याने नियंत्रित ठेवता येतं. जर तुम्ही त्यांना ओरडून बोलले, मारलं तर ही मुलं उद्धटपणाकडे झुकतात बंड करून उठतात आणि अजून आततायी होतात. त्यामुळे शांतपणे,समजूतदारपणे, गोड बोलून त्यांना हाताळायला हवं.

* मुलांना लहानपणापासून मोबाईल हातात देऊ नये. मुलं पालकांमुळेच स्क्रिन ॲडिक्ट होतात. मुलगा जेवत नाही म्हणून मोबाईल दाखवणं, आपले काम होतं आहे तोपर्यंत मोबाईल देऊन देणं, आपल्याला आराम करतांना त्यांचा त्रास नको म्हणून मोबाईल देणं हे अत्यंत चुकीचं आहे. मग वेळ हातातून निघून गेल्यानंतर आपण रडत बसतो आणि तक्रारी करतो.

मोबाईल किंवा स्क्रीन जास्त प्रमाणात बघितल्यामुळे मूलं आभासी जगात जगायला लागतात आणि मग खऱ्या जगाशी जुळवून घ्यायला त्यांना कठीण जातं. मग फावल्या वेळात ह्या जास्तीच्या उर्जेला ते अशा पद्धतीने वाट करून देतात.

तसेच मोबाईलच्या रेजमुळे( किरणांमुळे) सुद्धा मेंदूमधील काही संप्रेरकांचे ( hormones) प्रमाण वाढल्याने मुलं अतिचंचल होतात, हे संशोधकांनी सिद्ध केले आहे. म्हणून मुलांना अगदी लहानपणापासून मोबाईलच्या जितके दूर ठेवता येईल तेवढे ठेवावे. (तसंच एका संशोधनातून असंही निष्पन्न झालं की, आईने गर्भारपणात जर जास्त प्रमाणात मोबाईल हाताळला( मोबाईल बघण्यात वेळ घालवला) तर मुलं अतिचंचल होतात.)

* मुलांना इतर छंदांची गोडी लावावी, वाचनाची गोडी लावावी. जेवढं तुम्ही त्यांना स्वतः ज्ञान द्याल तेवढं चांगलं.
अशा मुलांना वळण लावताना नकारार्थी शब्द कमी वापरावे. वेगळ्या पद्धतीने त्यांना समजावून सांगता येतं.

तुमची मुलं ही अतिचंचल आहेत. ही काही विकृती नाही. फक्त त्यांच्यात असलेल्या अमाप उर्जेला योग्य वळण देण जरूरी आहे. हे सगळं जर आपण पाळलं तर ह्या अतिचंचल मुलाचं अत्यंत हुषार विद्यार्थ्यांमधे रुपांतर होतं आणि त्यांच्या ऊर्जेला योग्य वाट दिली तर ही मुलं
समाजासाठी भरपूर योगदान देऊ शकतात.


आजच मुलांचं योग्य करीअर कॉउन्सिलिंग करून घ्या. यासंदर्भात खालीलप्रमाणे संपूर्ण माहिती नमूद करण्यात आलेली आहे. Online Career Counseling द्वारे निरनिराळ्या मानसशास्त्रीय किंवा करिअर चाचण्या घेऊन मुलांची योग्य करिअरची दिशा ठरवूया. Online असल्याने पालकांना आणि मुलांना कोठेही यायची-जायची गरज नाही.


Online Career Counseling साठी !

👇👇

क्लिक करा



करीअर काउंन्सिलिंगचा नेमका अर्थ समजून घ्या!


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!