Skip to content

अजूनही तो माझ्या मागे आहे. असे भास होतात……

अजूनही तो माझ्या मागे आहे. असे भास होतात……


कु.हर्षदा नंदकुमार पिंपळे


“बटांचा गुंता फार झाला सये….गालातल्या गालात अशी लाजू नकोस…तूच सावर हलकेच तुझ्या हाताने त्या विस्कटलेल्या बटा…उगा सख्याची वाट पाहू नकोस……..”

कित्येक वर्षे लोटली या कवितेला… पण आठवण आली की डोळे मात्र पाण्याने डबडबतात. मला सोडून जायच्या आधी त्याने या ओळी रचल्या होत्या.खरं तर या ओळींमधूनच त्याने त्याच्या निरोपाची पूर्वकल्पना दिली होती. पण त्याच्या हृदयाशी हळूवारपणे गुंफलेल्या माझ्या मनाला ते लवकर उमजलच नाही…..

मला साहित्यात लहानपणापासूच रस होता. नाटक , संगीत , कथा-कादंबऱ्या-कविता नी बरच काही………. माझ्या अगदी जवळचे विषय होते.असचं एकदा कॉलेजमध्ये असताना मी ग्रंथालयात पुस्तक आणायला गेले होते.तेव्हा तिथे मला अचानक “अश्वत्थ” भेटला.आणि म्हणाला,तुम्ही घेतलेल पुस्तक आजच्या दिवस मला वाचायला द्या.मला काही महत्त्वाच्या नोट्स काढायच्या आहेत. मला माझी स्क्रिप्ट सादर करायची आहे.

प्लीज प्लीज म्हणून त्याने कितीतरी विनवण्या केल्या. पण मी काही मृदू नी मधाळ स्वभावाची मुळीच नव्हते.क्षणात विरघळणारी…!! म्हणून मी माझा नाहीचा पाढा सुरु केला.आणि पुस्तक घेऊन भरभर पायऱ्या उतरत खाली आले. आभाळ दाटून आलं होतं आणि लेक्चर्ससुद्धा संपले होते. त्यामुळे मी माझ धोपटं घेऊन घरी निघाले.

कॉलेजच्या गेटमधून बाहेर पडले नी दाटलेल ते आभाळ अचानक धोधो बरसू लागलं.मला पाऊस प्रंचड आवडतो म्हणून तशीच मनसोक्त भिजत भिजत मी घरच्या वाटेवर निघाले.घर तस कॉलेजपासून दहा बारा किलोमीटरच्या अंतरावर होतं.पण पावसाळी वातावरणात तासनतास भटकताना माझा पाय कधीच अडखळायचा नाही.

अशातच मी केव्हा घराजवळ पोहोचले मलाच कळल नाही.मी स्कूटी पार्क करणार इतक्यातच मला कुणीतरी “ओ…ओ मिस जुई…….” अशी साद घातली. मी मागे वळून पाहिलं आणि बघते तर काय….. “अश्वत्थ” माझ्यामागे इतक्या लांब भिजत भिजत आला होता. केवळ त्या पुस्तकासाठी….!!

का कोणास ठाऊक पण मला त्याच्या जिद्दी स्वभावाने ते पुस्तक द्यायला भाग पाडलं.मी अगदी हसत हसत ते पुस्तक त्याला दिलं.चिंब भिजला होता तो.त्याला पाहून कधीच न विरघळणार माझ मन क्षणात विरघळलं.मी त्याला आल्याचा गरमागरम वाफाळलेला एक कप चहा दिला. आणि चहा प्यायल्यावर तो पुस्तक घेऊन निघून गेला. आणि जाताजाता माझ्या डोक्यात विचारांची फुलपाखरं सोडून गेला……..!!

फुलपाखरं पिंगा घालतच होती डोक्यात. वाटलं अश्शी निघून जातील. पण कसलं काय….ते  coincidence का काय म्हणतात न अगदी तसच…आमची योगायोगाने आठवड्यातून दोनदा तीनदा भेट घडायचीच.कधी कधी तर कुठेही केव्हाही त्याचाच भास व्हायचा.आणि मग असच भेटण हळूहळू वाढतच राहीलं .

गप्पांची सुरेल मैफिल रंगत गेली.मैत्रीची कोवळी पालवी स्नेहसुमनांनी केव्हा बहरली काहीच कळालं नाही.किती किती धमाल केली होती आम्ही…एकत्र लेक्चर्स, कट्ट्यावरचा चहा , कधी पावसात कणीस,नाटकाची तालीम,लायब्ररीमध्ये पुस्तंकावरून केलेली भांडणं…..ते अगदी तुटलेल्या हृदयाला जोडणं…आणि बरच काही…!!

तु पुढे हो….आधी तू कर…अस म्हणत सतत माझ्या मागे मागे फिरणाऱ्या अश्वत्थने समोरून कोसळणाऱ्या डोंगराला हसत-हसत कसं झेलायच हे शिकवलं.

असं म्हणतात कोवळ प्रेम…किती काळ टिकायच…??तर हो आमची ही कोवळी पालवी अगदी कल्पवृक्ष होईपर्यंत बहरली…!! एका पुस्तकापासून सुरु झालेल्या ह्या प्रवासाचा शेवट मात्र एका कवितेने झाला…….. हो नऊ वर्षे झाली त्याला जाऊन.

तो गेला नी माझी दृष्टीही गेली.पण त्याचे  भास पावलोपावली मला जाणवतात. कारण माझ्या हर एक वेदनांना शांतीचा पाझर फुटेपर्यंत अश्वत्थने खूप सहन केलय. मला गोष्टी घट्ट पकडून ठेवायला आवडत नाही म्हणून माझ्या पावलांवर पावलं टाकत आयुष्य जगला. माझ्यातील उणीवा शोधून जाणीवा समृद्ध केल्या. त्याच्या या पावलांचे ठसे इतके खोलवर उमटले की….चालताना सतत अजूनही “तो” माझ्या मागे आहे असे सुखद भास मला भंडावून सोडतात.*कळत नाही तो गेल्यानंतरही त्याचे भास का होतात………..??


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!