कर्तव्याच्या ओझ्यापेक्षा मनातील दुःखाचं ओझं नेहमी अधिक असतं.”
मधूश्री देशपांडे गानू
” दुखी मन मेरे, सुन मेरा कहना
जहाँ नही चैना वहां नही रहना ”
स्व. किशोर कुमार यांनी गायलेले अत्यंत सुंदर गाणं. जिथे मनच रमत नाही, मनाला शांतता मिळत नाही तिथे राहण्यात काय अर्थ आहे? प्रत्येक दुःखी माणसाला असंच वाटत असेल ना! मानसिक ताकदच, ऊर्जाच प्रत्येक व्यक्तीला आयुष्याला सामोरे जायला भाग पाडत असते. आयुष्यात येणाऱ्या आव्हानांना, संकटांना या ताकदीने माणूस समर्थपणे तोंड देतो. अनेक वेळा पडतो आणि सावरतोही.
मनासारख्या घटना घडल्या, मनासारखी आपली प्रेमाची माणसे मिळाली तर त्याचा सारखा आनंद नाही. एक वेगळीच उर्जा, उत्साह त्या व्यक्तीला मिळतो. नवीन जोमाने तो आयुष्य समरसून जगतो.
शारीरिक स्वास्थ्य अतिशय महत्वाचं, आवश्यक आहे. पण शारीरिक कष्ट, मेहनत कितीही करावी लागली तरी मानसिक दृष्ट्या स्वस्थ, आरोग्यपूर्ण व्यक्तीला या कष्टांचं ओझं वाटत नाही. तुमची मानसिक स्थिती शांत, उत्साही, आनंदी, सकारात्मक असेल तर तुम्हीं एकाच वेळी अनेक कर्तव्यं लीलया सहजतेने निभावू शकता. जीवनात यशस्वी होऊ शकता. पण मन दुःखी निराश असेल तर मात्र दैनंदिन वैयक्तिक कामंही ओझं वाटू लागतात. काही करण्याची इच्छा होत नाही.
एक उदाहरण घेऊ. एक सुखवस्तू जोडपं. अमित आणि सुधा. अमित यशस्वी व्यावसायिक तर सुधा गृहिणी. दोन गोड मुलगे. सुखाचा संसार पण सुधाचा स्वभाव अत्यंत संशयी, भांडखोर, आक्रस्ताळा. त्यामुळे सगळं असूनही घरात सुख, शांतता नाही. मग अमित स्वतःला कामात अखंड झोकून देतो. त्याला घरी यायची इच्छा होत नाही.
याबद्दलही त्याला संशय आणि बोलणी खावी लागतात. त्याचं दुःखी मन अजून दुःखी होत जातं. कोणतीही व्यक्ती बाहेर कितीही कष्ट करू शकते, कोणतेही आव्हान पेलू शकते, संकटांना सामोरी जाऊ शकते जर तिचं कुटुंब तिच्या पाठीशी असेल. घरात शांतता, सौख्य, पाठिंबा, साथ असेल तर एक जबरदस्त मानसिक ताकद प्रत्येक सदस्याला मिळते.
पण इथे तर अमित मात्र दिवसेंदिवस खचत चालला. त्याचं दुःखी मन निराशेच्या गर्तेत ओढले जाऊ लागलं. याचा परिणाम त्याच्या व्यवसायावर होऊ लागला. त्याची निर्णयक्षमता आत्मविश्वास कमी होऊ लागला. आपलं कर्तव्य चोख बजावतानाही त्याच्या दुःखी मानसिक स्थिती मुळे त्याचे नुकसान होऊ लागलं. तरीही सुधाच्या वागण्यात समजावूनही फरक पडत नव्हता. शेवटी याची परिणती घटस्फोटात झाली.
अशी अनेक उदाहरणं आपण रोज बघत आहोत. अकस्मात, अकाली पती निधनानंतरही कित्येक स्त्रिया सासरच्या सर्व जबाबदाऱ्या हिमतीने, समर्थपणे सांभाळतात. एकाच वेळी घरातील, बाहेरची अनेक कर्तव्यं सहज निभावतात. नोकरी, व्यवसाय करून घर आणि घरातील माणसांना सांभाळतात.
अशावेळी जर कुटुंबाने तिला योग्य आदर, मान, प्रेम, आपुलकी दिली नाही तर?? तिला केवढं दुःख होईल. हेच प्रेम, आदर मिळाला तर ती सगळी कर्तव्यं हसत-हसत निभावेल. तिला या जबाबदाऱ्यांचे ओझे होणार नाही. कारण तिच्या जवळ तिची हक्काची, प्रेमाची माणसं आहेत.
आपल्याला आपण आहोत तसे स्वीकारणारी, आपल्याला समजून घेणारी, सांभाळणारी अशी आपली माणसं हवी असतात. मग ते कुटुंब असो किंवा मित्र-मैत्रिणी. आपली या नात्यांमध्ये सर्वार्थाने गुंतवणूक असते.
अशावेळी दोन्हींकडून समान पातळीवर भावनिक देवाण-घेवाण असेल, तर मनाला एक समाधान, शांतता लाभते. आणि मन तृप्त असलं कि शरीरही आरोग्यपूर्ण राहतं. “मन आणि शरीर या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.” असं प्रसिद्ध मानसोपचार तज्ञ डॉक्टर राजेंद्र बर्वे नेहमी सांगतात.
म्हणजेच मनोव्यापारांवर शारीरिक स्वास्थ्य अवलंबून असतं. आणि शारीरिक स्वास्थ्य बिघडलं तर मन उदास होतं. मग मन आनंदी असतं तेव्हा आपल्याला कोणतेही काम कर्तव्य, जबाबदारी ओझं वाटत नाही. आपण मनापासून उत्साहाने ते काम करतो. याने कामाचा दर्जाही सुधारतो. आणि काम उत्तम झालं याचा वेगळं समाधानही मिळतं. म्हणजेच “मन चंगा तो कठौती में गंगा”..
शारीरिक कष्टांपेक्षा मनाला होणारे कष्ट, यातना या अधिक दुःख देणाऱ्या निराश करणार्या असतात. अनेक मानसिक, शारीरिक आजारांना आमंत्रण देणार्यां असतात.
प्रत्येक वेळी तुमचं मानसिक स्वास्थ्य, सुख, आनंद दुसऱ्या कुणावर तरी अवलंबून असतो असं मानणं, अपेक्षा करणं चुकीचं आहे. 24 तास आपण आनंदी राहू शकत नाही. परिस्थितीनुसार माणसाच्या भावना बदलत असतात.
तरीही अत्यंत सकारात्मक, वास्तववादी विचारांनी मनाला आरोग्यपूर्ण ठेवण्याचा प्रयत्न सातत्याने प्रत्येकाने करायला हवा. आपले मन आणि शरीर यांचे आरोग्य ही संपूर्ण आपली जबाबदारी आहे. अप्रिय घटनांना सामोरे जावे लागणारच. दुःख होणारच.
पण त्या घटनेपेक्षाही त्याबद्दलचे नकारात्मक विचार आपल्या मनाला अधिक दुःखी करतात. या दुःखा मध्ये किती काळ स्वतःला बांधून ठेवायचं?? की त्यातून लवकर बाहेर पडून नवा आनंद निर्माण करायचा?? हे ज्याचं त्याने ठरवायचं. तुमच्या आवडी-निवडी जपू शकता. नवीन छंद तुम्ही जोपासू शकता. नियमित ध्यानधारणा, व्यायाम अशा गोष्टीतून मन आणि शरीर उत्साही ठेवू शकता.
आयुष्यात कर्तव्यांना तर सामोरं जावे लागणारच. ती चुकणार नाहीतच. दुःखी मनाने शरीराला कष्ट देण्यापेक्षा हीच कर्तव्यं आनंदी मनाने, स्वीकार करून केलीत तर त्याचा त्रास होणार नाही. तुमचा आनंद, तुमच्या मनाचे आरोग्य, तुमच्या मनाची अफाट ताकद तुमच्या हातात आहे. ती जपण्याचा आणि कोणत्याही परिस्थितीत मन स्वस्थ, आरोग्यपूर्ण ठेवण्याचा नक्की प्रयत्न करा. माझ्या शुभेच्छा..
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!

लेख खुप छान आहे
Nice
Best