Skip to content

काही असेही असतात, जे आपल्या समोरच आपले असतात.

काही असेही असतात, जे आपल्या समोरच आपले असतात.


गीतांजली जगदाळे

(मानसशास्त्र विद्यार्थिनी)


आयुष्यात खऱ्या अर्थाने आपली माणसे कोण आणि आपलं असण्याचा दिखावा करणारी माणसं कोण हे ओळखणं अवघड होऊन जात. तसं लक्ष दिल्यास आपण ओळखू शकतो की, आपली माणसं कोण आहेत, आणि फक्त आपली असण्याचा दिखावा करणारी कोण? खऱ्या अर्थाने आपली असणारी माणसं ही त्यांच्या कृतीतून ओळखू येतात.

फक्त गोड बोलणारी, आपली उगाचच प्रशंसा करणारी आणि मदतीला येऊ असं फक्त आश्वासन देणारी आणि वेळ येताच काही कारण देऊन त्या परिस्थितीतून माघार घेणारी माणसं कधीच आपली असू शकत नाहीत.

त्या उलट आपली असणारी माणसं कधीच बढाया मारत नाही, कसलीही आश्वासनं देण्यापेक्षा वेळेवर मदत करण्यावर त्यांचं जास्त लक्ष असत. आपली माणसं चांगल्या मनाने, आणि आपल्या चांगल्यासाठी आपल्या सोबत असतात. आणि जी माणसं फक्त आपली असण्याचा दिखावा करतात ही माणसं काहीतरी अपेक्षा बाळगून आपल्याला मदत करतात. त्यामुळे ती नेहमीच मदत करतील असंही नाही.

त्यांना आपल्यापासून काहीच फायदा नसल्यास ते बरोबर काहीतरी कारण काढून आपल्याला मदत करण्यास नकार देतात. पण एवढं सगळं असून देखील आपल्याला अशी माणसं ओळखताना प्रॉब्लेम कसा बरं येतो? कारण ही माणसं अतिशय गोड बोली वापरून आपल्याला प्रत्येक गोष्ट पटवून द्यायला बघतात.

ती आपल्याला समजून घेतात असं फक्त भासवत असतात. प्रत्येक अशी गोष्ट जिने सामान्य माणसाला बरं फील होत , अशा पद्धतीचं गोड बोलून ती आपल्याला रिझवत राहतात. आणि आपण ही नकळत त्यांच्या गोड बोलण्याला भूलून त्यांच्यावर विश्वास ठेवतो.

अशी माणसे नेहमी आपल्या समोर चांगली वागतात, आपल्या हो मध्ये हो मिसळतात, कारण आपल्या विरुद्ध मत देऊन त्यांना आपल्याला दुखवायचं नसत. त्यांना आपल्या ‘good books’ मध्ये राहायचं असत, म्हणजे लवकरात लवकर आपण त्यांच्यावर विश्वास ठेवायला सुरुवात करू आणि त्यांना जवळच समजू.

कारण त्या समजानेच त्यांना हवी असलेली गोष्ट साध्य होऊ शकत असते. काही काही लोक तर अगदी अशीही असतात की खरा हेतू असा त्यांचा काहीच नसतो, पण सगळ्या लोकांनी आपल्याला चांगलं समजावं अशी गरज त्यांना जाणवत असते, अशा लोकांना आपल्याबद्दल लोकं काय विचार करतात, याने खूप फरक पडत असतो. आणि त्यामुळे ते सगळ्यांशीच अशा पद्धतीने वागतात की प्रत्येकाला ते आवडले पाहिजेत.

आपलं असण्याचं नाटक , त्यांना आपली काळजी असण्याचं नाटक हे ते त्यांच्या काही स्वार्थी हेतूमुळे करत असतात. त्यामुळे आपण सावध राहणं गरजेचं असत. कारण त्यांच्या स्वार्थी हेतूसाठी ते आपलंही नुकसान करायला मागे पुढे पाहत नाहीत.

आपल्याला बऱ्याच वेळा काही नात्यांमध्ये ही दिसून येत की, एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला आपल्या स्वार्थासाठी वापरत असतो पण तरी देखील त्या व्यक्तीला वेळेत या गोष्टीची जाणीव कधीच होत नाही. आणि जर तिला जाणीव झालीच तरी त्यांच्या नात्यावर आणि त्यांच्या व्यक्तीवर असलेला विश्वास त्यांना संशय घेण्यापासून थांबवत राहतात.

आणि कधी चुकून जर या व्यक्तींनी त्यांचा वापर होतोय अशी तक्रार त्या दुसऱ्या व्यक्तीला केलीच तरी त्या व्यक्ती, गोष्टी अशा पद्धतीने manipulate करतात की संशय घेणाऱ्या व्यक्तीलाच आपण संशय घेतल्याबद्दल अपराधी वाटावं.

खऱ्या अर्थाने आपली असणारी माणसं आपण चुकत असल्यास आपल्याला योग्य मार्ग दाखवतात, भले त्याने आपल्यात भांडणं होणार असली तरी त्यांना ते मतभेद झालेले मान्य असतात, पण आपलं नुकसान होऊ नये अशीच त्यांची इच्छा असते. प्रत्येक माणूस जो आपली हेल्प करतो तो नेहमीच चांगल्या हेतूने करतो असं नसत.

कधी-कधी एक मदत करून तो बऱ्याच गोष्टी अशा करून जातो की ज्याने आपलं नुकसान होत. काही माणसे नक्कीच निस्वार्थी हेतूने मदत करतात, पण तरीदेखील आपण सावध राहून कोणावर विश्वास ठेवायचा आणि कोणावर नाही हे जरा वेळ घेऊन सगळ्या गोष्टींचं निरीक्षण करून मगच ठरवावं.

इंग्लिश मध्ये एक म्हण आहे, actions speaks louder than words! म्हणजेच माणसाची कृती ही त्याच्या वाणीपेक्षा जास्त काही , आणि खरं सांगून जाते. त्यामुळे त्यांच्या शब्दांपेक्षा त्यांच्या कृतीकडे लक्ष दिल्यास माणसांची पारख करणं सोप्प होऊन जातं.

अशा माणसांनी आपल्या मनात जवळच माणूस म्हणून जरी स्वतःची प्रतिमा बनवली तरी कुठेतरी मनाचा एक कोपरा नेहमी आपल्याला त्यांच्यापासून सावध राहण्याचा इशारा देत असतो, पण आपल्यावर त्यांच्या विश्वासाचा एवढा पगडा असतो की तो कोपऱ्यातील आवाज आपल्या पर्यंत पोहचून ही पोहचत नाही.

पण ज्यावेळी आपल्याला त्यांचं खरं रूप कळत तेव्हा आपल्या लक्षात येत की तो मनाचा आवाज खरा होता, आणि आपण ते ऐकलं असत तर बरं झालं असत.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!