Skip to content

आपला अपघात तर होणार नाही ना ?? ही चिंता का सतावत राहते ??

आपला अपघात तर होणार नाही ना ?? ही चिंता का सतावत राहते ??


गीत वाळवेकर

(निवृत्त, मानसशास्त्र शिक्षिका)


सुमाताईना एकाच काळजीनं सारखं ग्रासलेलं असतं. त्यांना सारखं वाटत असतं, आपल्या मुलांचा अपघात तर होणार नाही ना ? मग रोज मुलांना त्या शाळेत सोडायला जातात. दुपारी मधल्या सुट्टीत त्याच्यासाठी डब्बा घेऊन जातात. संध्याकाळी त्याला घरी यायला पाच मिनिटे जरी उशीर झाला तरी त्या सैरभैर होतात आणि त्याला शोधायला बाहेर पडतात.

त्यामुळे त्या कायम अस्वस्थ चिंताग्रस्थच असतात. त्यांच्या अशा वर्तनाचा परिणाम त्यांच्या एकूण कुटुंबावर विपरीत झालाय.

मालुताईच्या बाबतीत तर त्यांना अनेक गोष्टींची चिंताच. ‘कसं काय चाललंय मालुताई ? दिवस छान आहेत ना ?’ असं म्हटलं कि त्या लगेच म्हणणार, ‘छान बिन सगळं तुमच्याकडे आमच्याकडे कसलं आलंय छान ? मग त्यांचा तक्रारींचा पाढाच सुरु होतो.

आम्हाला बघा, सगळं भर आमच्यावरच. कामवालीबाई दांड्या मारते, पाणी एकवेळेलाच येते, कचरागाडी वेळेवर येत नाही, शेजारचे लोक नीट वागत नाहीत, टीव्ही सारखा नादुरुस्त होतोय. मी सगळ्यांसाठी धडपडतेय पण त्याचं चीज कधीच होत नाही.

आमचं नाणंच खोटं. मुलगा सुनेचा विषय निघाल्यावर तर तक्रारीला आणखीनच जोर. माझा मुलगा आधी मला खूप विचारायचा पण लग्न झाल्यानंतर बघा. ‘अगं अगं बायले, तुला सारं काही वाहिले.’ मग तब्येतीच्या तक्रारी सांगू लागतात.

आता माझ्याच्याने होत नाही, कंबर दुखते, डोकं दुखतं, अन्नावर वासनाच नाही, झोपही नीट लागत नाही… अनेक खऱ्या खोट्या दुःखांची गाथा त्या अशा उलगडत असतात.

अतिवर्षण होऊन शहरात महापुरांनी हाहाःकार उडवला. अपरिमित हानी झाली. कित्येक दिवस घरातही वीज नाही. पाणी नाही. मालुताईच्या तक्रारी आणखीनच वाढल्या. ‘आज आंघोळीलाही पाणी नाही’ म्हटल्यावर समोरच्या विकीने दूरवरून कुठूनतरी चार बदल्या पाणी त्यांना आणून दिले.

पाण्याच्या थेंबही मोल होते. पण ते काहीच न जाणता मालुताईनी आभाराचे शब्द तर दूरच, पण उलट तो प्लॅस्टिकचा मग कुठे गेलाय ? म्हणून कटकट सुरु केली. पूर्वीचा एक विनोद लेखकांनी लिहिलेला किस्सा आठवतो. एका माणसाने एका छोट्या मुलाला विहिरीतून बुडताना वाचवले व त्याच्या आईकडे आणले. आई म्हणाली कि त्याला वाचवले बरे झाले, पण त्याची टोपी कुठेय ??

प्रसंग कोणता याचेही भान न ठेवता सतत तक्रार चालूच. अशा व्यक्ती सतत खऱ्या खोट्या चिंतेतच कायम बुडालेल्या असतात. काही चिंता नैसर्गिक असतात त्यामुळे सावधगिरी बाळगून धोक्यापासून बचावही करून घेता येतो. अकारण चिंता करण्याची सतत सवय लागली कि विकृत चिंतेत रूपांतर होते.

मग अशा व्यक्तींना अनेक प्रकारचे मनोशारीरिक आजारही होऊ लागतात. जसे डोके दुखणे, पोटाचे विकार, हातापायात मुंग्या येणे, त्वचेचे विकार, उच्च रक्तदाब इत्यादी.

अशा व्यक्ती कोणत्याच गोष्टीचा आनंदी घेऊन शकत नाहीत. इतर लोकंही त्यांना टाळू लागतात. फक्त स्वतःचाच विचार आणि स्वतःकडे लक्ष खेचून घेण्याची वृत्ती हे अशा चिंतेचे एक महत्वाचे कारण आहे. त्यामुळे आपल्या अडचणी जितक्या आहेत, त्यापेक्षाही त्यांना ते मोठ्या वाटू लागतात.

आपल्या सुख-दुःखाशिवाय बाहेर कितीतरी घडामोडी चालल्यात याचे भान त्यांना नसते. खरंतर प्रत्येकाच्याच आयुष्यात थोडंफार काहीतरी चांगलंवाईट चालूच असतं. पण दृष्टिकोनातल्या फरकानुसार ते वेगळं होतं. एका चित्रपट दीपिका रणबीरला म्हणते, ‘कुठेतरी काहीतरी हरवणारच, सगळंच मिळण्याचा अट्टाहास कशाला ?त्यापेक्षा जे आहे ते एन्जॉय करूया कि.’ किती साधा पण चांगला विचार.

जीवनात मिळालेले चांगले क्षण विचारात घ्यावेत. नकारात्मक विचाराने विवेकबुद्धी हरवून विकृत वर्तन होते. सकारात्मक विचाराने प्रात्साहं मिळते. विविध छंदांतून आनंद घ्यावा. आपल्या अभिवृत्तीत जाणीवपूर्वक बदल करून दुसऱ्या व्यक्तीला विशिष्ट परिस्थितीत काय वाटत असेल याचाही विचार केला पाहिजे.

दुसऱ्याला मदत केल्याने स्वतःच्या मनातील नकारात्मक भावना कमी होतात. म्हणून आपल्या क्षमतांचा उपयोग समाजालाही व्हावा हे पहिले पाहिजे. आंबेवाडीतील पुष्पा महापुराच्या त्या आठवणी सांगताना म्हणतात, ‘घरात आराध्याच्या पहिल्या वाढदिवसाची तयारी चालू होती. बघता बघता पाणी गळ्यापर्यंत आलं. घरात पाच लहान मुलं.

जीव वाचेल असंही वाटत नव्हतं. पण जवानांनी वाचवलं. जैन मठात सोया केली गेली आणि मुलीचा वाढदिवस शेकडो अनोळखी लोकांत साजरा झाला. त्या आनंदाला दुःखाची किनार असली तरी त्या दुखातही आम्ही आनंद घेतला.

अशाप्रकारे चिंतेतून निर्माण झालेली ऊर्जा नैसर्गिक प्रक्रियेने काही ठराविक ठिकाणी परावर्तित होत असते आणि काही ठिकाणी आपल्याला जाणीवपूर्वक परावर्तित करायची असते. हि ऊर्जा एकदा का योग्य ठिकाणी परावर्तित झाली कि ती साचून साचून कधीतरी विकृत स्वरूपात बाहेर येण्याचा मग प्रश्नच उरत नाही.



तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!