Skip to content

डिजिटल आयुष्य आणि त्यातून निर्माण झालेल्या मनाच्या समस्या!!

डिजिटल आयुष्य आणि त्यातून निर्माण झालेल्या मानसिक समस्या!!


टीम आपलं मानसशास्त्र


आपल्या गरजा ह्या आपणच वाढून ठेवल्या आहेत, हे आपण ऐकले आहे आणि प्रत्यक्ष अनुभवले सुद्धा आहे. परंतु यामागे आपली जी काही मानसिक अवस्था आपण निर्माण केलेली असते त्यामध्ये आपल्याला कोणीही सहज फसवू शकतं. त्यामुळे अवास्तव गरजा आणि त्यातून निर्माण होणारी अपेक्षा या एकंदरीत समजून घेण्याची वेळ आलेली आहे.

सामाजिक आयुष्य जगताना कित्येकदा त्या लोकांचा आणि त्यांच्या जीवनशैलीचा आपल्यावर सुद्धा परिणाम होताना दिसतो. म्हणजेच घरातून ५ मिनिटे अंतरावर जायला सुद्धा गाडीच हवी, हे जेव्हा आपण पाहतो तेव्हा नकळतपणे ती गोष्ट सुद्धा आपल्यामध्ये केव्हा येते हे कळतंच नाही.

म्हणजेच जो काही ५ मिनिटे का होईना आपल्या चालण्याचा सराव होत होता तो सामाजिक जीवनशैलीमुळे बंद झाला आणि ५ मिनिटे गाडीवर पटकन जाऊन येता येते हि गरज निर्माण झाली. अशा आणखीन असंख्य बारीक-सारीक अवास्तव, निरर्थक गोष्टींना जीवनशैली म्हणून आपण स्वीकारले आहे.

तसेच त्याचे तोटे आणि दुष्परिणाम सुद्धा आपण अनुभवत आहोतच. चालणं पूर्ण बंद झाल्यामुळे थकवा वाढला. थकवा वाढल्यामुळे दवाखान्याच्या फेऱ्या वाढल्या. दवाखान्याच्या फेऱ्या वाढल्यामुळे गोळ्यांचं आयुष्य सुरु झालं आणि गोळ्या सुरु झाल्यामुळे आयुष्य अत्यंत लिमिटेड झालं.

हे जेव्हा लक्षात आलं तेव्हा पुन्हा सकाळचं चालणं सुरु झालं किंवा जिमन्यास्टिक, एरोबिक क्लासेस, योगा क्लासेस, डान्स थेरपी हि जीवनशैलीसुद्धा आपण सहजच स्वीकारली. कारण गरज निर्माण झाली ना…

इतर लोकं करत आहेत, म्हणजेच आपण सुद्धा केलं पाहिजे अशा जाहिरातींचा भडीमार सुरु झाला. आपण सुरुवातीला चालण्याचं उदाहरण घेतलं. अशी कित्येक उदाहरणं देता येतील कि जी न केल्यामुळे पुढे आपल्याला एक जीवनशैली म्हणून ती बाब स्वीकारावी लागली.

आयुष्य सध्या खूपच डिजिटल झालेलं आहे. केवळ एका जागी बसून आपल्याला मोबाईलवर हवी ती गोष्ट सहज उपलब्ध होते. त्यामुळे २४ तासापैकी सरासरी १५ ते १६ तास मोबाईलवर जायला लागले आहेत.

सतत मोबाईलच्या स्क्रीनवर डोळे खुपसून बसनं आणि सर्व शारीरिक हालचाली मंदावनं ही आपण स्वीकारलेली जीवनशैली आपल्या पुढच्या पिढीला कोणत्या दिशेने घेऊन जाईल, अशी कल्पना करणेच अवघड आहे.

डिजिटल जीवनशैली याचा आपण नक्की अनुभव घ्यायला हवा, पण बाकीच्या मूलभूत गोष्टी सोडून आणि त्या दूर बाजूला सारून नव्हे. डिजिटल आयुष्य लिमिटेड आणि नैसर्गिक आयुष्य ब्रॉडकास्टवर असायला हवं.

आजकाल मित्र-मैत्रिणी, नातेवाईक यांना आपण मोबाईलवरच भेटतोय. काहींना आपण टाळतोय तर काहींनी आपल्याला टाळलंय यात डिजिटल हेवेदावे यांची सीमा फार मोठी झालेली आहे. शेवटचं कधी आपण प्रत्यक्ष मित्रांना भेटलोय हे आठवत नाही. ज्याच्याशी भरभरून गप्पा आधी होत होत्या, त्याच्याशी भेटूनही उल्हासदायक असं काही वाटतंच नाहीये. सगळं काही डिप्लोमॅटिक (कृत्रिम) वाटतंय.

भावनांचे आदानप्रदान होण्याऐवजी एकमेकांपेक्षा वरचढ कसे याचीच सिद्धता जरा जास्तीच वाढलीये. याला कारण आहे डिजिटल आयुष्याचा केलेला अतिरेक आणि त्याचा बेजबाबदारपणे केलेला वापर.

चॅटिंग, कॉलिंग, मिटिंग, सेमिनार यांचं प्राबल्य वाढल्याने प्रत्यक्ष आपली झालेली पर्सनॅलिटी डेव्हलोपमेंटच आपण हरवून बसलोय कि काय ? या प्रश्नाचं उत्तर सुद्धा छातीठोकपणे ‘नाही’ असं देता येत नाही.

आपली जीवनशैली अपडेट नक्कीच व्हायला हवी. पण त्याचा आपल्याकडून जो काही अतिरेक होतोय, यावर जर आत्ताच आपण ती गोष्ट सांभाळली नाही तर पुढे आपण आणखीन खोलात जाणार.

सध्या आपल्यात निर्माण होणारी प्रचंड चिडचिड, नैराश्य, डिप्रेशन, वाढलेली भिती याचं जेव्हा अवतीभवती आपल्याला कारणच सापडत नाही, तेव्हा डिजिटल गोष्टींचा होणार अतिरेक हे तर कारण नसेल ना ?

याचा नक्की विचार करा!



तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!