सोपं आयुष्य आपण का कठीण करून ठेवतो!
टीम आपलं मानसशास्त्र
आयुष्य जितकं साधेपणाने जगाल तितकं ते तुम्हाला साथ देत राहील. अनिवार्य विचार, विनाकारण डिमांडिंग आपलं आयुष्य संकुचित करून टाकतात.
हेमांगी ही तिच्या प्रियकरासोबत अशाच अवास्तव अपेक्षा नेहमी ठेवत असे. महिन्याला २ ड्रेस, आठवड्याला एकदा हॉटेलिंग, आऊट डोर ट्रॅव्हलिंग, सिनेमा ह्या गोष्टी जणू प्रेम संबंधातल्या गरजेच्या गोष्टी आहेत असे तिला वाटे. पण राहुल तिच्या या सवयींना फार वैतागला होता.
ती चिडू नये, रागावू नये, उगाच नात्यामध्ये कटुता निर्माण होऊ नये म्हणून तो त्या-त्या वेळी जमेल तसं तिचे लाड पुरवत होता. पण हे असं आणखीन किती दिवस चालणार…
त्यामुळे त्याने तिच्यापासून कायमचा दूर जाण्याचा निर्णय घेतला. आपल्या दोघांचीही परिस्थिती न पाहता, भविष्याचं कोणतंही नियोजन न करता नुसतं अतार्किक लाईफस्टाईलच्या प्रेमाला तो वैतागला होता.
परंतु राहुलच्या या वागण्याचा हेमांगीच्या मनावर खोल परिणाम झाला. तिला केवळ साधेपणाने जगता न आल्याने.
असे आपण असंख्य जोडपी पाहतो, जे केवळ पैसे उडविण्यातच धन्यता मानतात. त्यांच्यासाठी छान ब्रँडेड कपडे घालणे, हॉटेलिंगची चटक, शॉपिंग ह्याच गोष्टी नात्यांमधला कणा असल्यासारखे असतात.
पुढे जेव्हा खऱ्या-खुऱ्या जबाबदाऱ्या अंगावर पडतात, तेव्हा मात्र एकमेकांवर दोषारोपन केले जाते. कारण या आधी कधी वास्तव गोष्टींबाबत अभ्यासच झालेला नसतो.
मिताली सुद्धा कुठल्याही गोष्टींमध्ये कमीपणा घेत नव्हती. तडजोड करायला लागूच नये, म्हणून ती अत्यंत शिस्तबद्ध आणि काटेकोरपणे अनेक गोष्टींचे पालन करीत असे.
आपल्या मागच्या पिढ्यांनी खूप तडजोड केली, पण आपल्यावर ती वेळ कधीच येऊ नये. हे विचार ती कायम बोलून दाखवत असे. एखाद्या दिवशी समजा घरातली काम करणारी बाई आली नाही किंवा रेशन यायला उशीर झाला तर ती प्रचंड हायपर होत होती.
तुमच्या चुकीच्या सवयींमुळे माझं आयुष्य का बरबाद करता. या तीक्ष्ण शब्दात ती समोरच्याचा पाणउतारा करत असे. तो व्यक्ती पुन्हा तिच्याकडे जाईल, याची काहीही शाश्वती नसे.
परंतु ही व्यक्ती बरबाद झाली पाहिजे, इथून कुठेतरी दूर गेली पाहिजे अशा पद्धतीचा वाईटपणा ती स्वतःवर ओढवून घेत होती.
यामागचं प्रमुख कारण म्हणजे, स्वतःला तडजोड करता येऊ नये म्हणून ती इतरांवर जबरदस्ती करत होती. इतरांचा वापर करून घेत होती. अश्याने जवळची माणसंही तिच्यापासून तुटत होती.
जगण्याचे नियमच आपण बदलून टाकले आहेत. समोरचा हा कायम आपली मदत करेल, मी अजिबात तडजोड करणार नाही ही अपेक्षा आपल्याला रसातळाकडे घेऊन जात आहे.
म्हणून साधं जगा, जे कठीण आहे त्याला सोपं करून जगा!!