Skip to content

एखाद्याला ओळखण्यात चूक करताय का तुम्ही ??

ओळख आणि ओळखणं..


सौ.अर्चना रौंधळ


मी चुकले.. सारे कर्तव्य केले..
तरी.. अनेक गोष्टींना मुकले..
कारण.. ओळखताना मी चुकले..

एखादी व्यक्ती आधी व आत्ता अगदी टोकाची भिन्न वाटू लागतात. कारण या अनोळखी जगात ओळख व्हायला वेळ लागत नाही. वेळ लागतो तो ओळखायला. ओळखणं म्हणजे समुद्राचा तळ शोधणं.

वर्षानुवर्ष सोबत राहिल्यानंतर माणूस कळु लागतो. व्यक्तींसोबत चांगल्या किंवा वाईट अनुभवातून मग माणूस ओळखायला सुरुवात होते. ओळख होणे हे बाह्य गोष्टींवरून ठरते.

जसे की; चेहरा पैसा स्टेटस समाज शिक्षण नोकरी वैगरे. पण ओळखणे हे फार मर्यादित असते. वैचारिक जडण-घडण व देवाण-घेवाण यावरुन होतं ओळखणं.

एखादा शांत भोळा चेहरा कपटी व स्वार्थी असतो. चेहऱ्यावर आनंद व उत्साह असणारा माणूस आतून वेगळेच द्वंद्व करीत असतो. देहबोली रागीट संतापी असणारा माणूस मनातून फार प्रेमळ असतो.

थोडक्यात काय तर हुशार चालाख बुद्धिमान शहाणी अति शहाणी लोकही ओळखण्यात चुका करू शकतात. एखादी व्यक्ती स्वतःची स्तुती करते, आपल्याच स्वभावाचा बडेजाव करते. दुसऱ्यांना कमीपणा दाखवते. भावना दुखावते. अपमान करते.

दुसऱ्याचे मन दुसर्‍याचं दुःख याच्याशी त्यांना फरक पडत नसतो. स्व सोडून दुसर्‍याचं म्हणणं ऐकायला त्यांना वेळच नसतो. एकदा का स्वतःचे काम झाले की त्यांना गरज नसताना त्यांचे वागणेच बदलून जाते. थोड्याफार प्रमाणात या किंवा अशा इतर गोष्टी आपल्यातही असू शकतात.

पण अतिरेक झाला की त्याचा नात्यांवर परिणाम होऊ लागतो. ओळख व ओळखणे यात जमीन-अस्मानाचे अंतर आहे. या प्रवासातले आपण वाटसरू आहोत. कारणाशिवाय ओळख होत नाही आणि अनुभवाशिवाय ओळखता येत नाही.

म्हणून बदलत्या परिस्थितीत कमीत कमी त्रास करून जास्तीत जास्त जुळवून घेतले तरच जीवन जगता येईल. कारण जितके तंत्रज्ञान बदलु लागले‌ आहे तितका माणुस बदलु‌ लागला आहे. ओळख सोप्पी पण ओळखणं अवघड झालं आहे.



Online Counseling साठी !

क्लिक करा



“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!