ह्या ५ वाक्यांमुळे आपल्याला सर्वाधिक मानसिक त्रास होतो.
टीम आपलं मानसशास्त्र
भावना व्यक्त करणे हे आदान-प्रदानाचे मूळ आणि मुख्य असे स्वरूप आहे. सामान्यपणे भावना व्यक्त होत असतील तर समोरचा सुद्धा आपल्या बोलण्याकडे आकर्षित होतो. तसेच अतिप्रमाणात भावना व्यक्त होत असतील तर समोरचा व्यक्ती वैतागून जातो आणि मग तो आपल्याला दुर्लक्ष करायला लागतो.
योग्य ठिकाणी योग्य भावना व्यक्त करणे जरुरीचे जरी असले तरी आपल्यामार्फत अशी काही वाक्य आपल्याही नकळत निघू शकतात, ज्याचा नंतर आपल्याला प्रचंड मनस्ताप आणि पच्छाताप होऊ शकतो.
म्हणजेच ही वाक्ये चुकून किंवा अनावधानाने जरी निघत असली तरी आपले मोठे नुकसान होऊ शकते.
ती वाक्ये पुढीलप्रमाणे..
१) मला कोणाचीच गरज नाहीये.
भावनांचा उद्रेक होण्याची जेव्हा वेळ येते, त्यावेळी हे वाक्य सर्रासपणे वापरले जाते. खरंतर त्यावेळी आपण काय बोलतोय याचे भान नसल्याने हे टोकाकडचे वाक्य प्रकट होतात.
कालांतराने भावना शांत झाल्या की आपल्याला सगळ्यांचीच गरज होती, आहे आणि पुढेही असेल याचा साक्षात्कार होऊ लागतो.
परंतु हे वाक्य जर अति प्रमाणात वापरले तर जवळची माणसे आणखीन दूर जातील, हे मात्र नक्की. म्हणून अशाप्रकारचे विधान शक्यतो टाळावे.
२) जास्त शहाणपणा केलास, तर बघून घेईल.
या वाक्यात सुद्धा असा काही वास्तव अर्थ दडलेला नसतो. समोरच्याला काहीतरी भांबावून सोडण्यासाठी अशी वाक्ये वापरली जातात. पण ऐकणाऱ्यांना ही एकप्रकारची धमकी वाटू शकते.
ज्यामुळे तुम्ही आणखीन गोत्यात येऊ शकता. अशा कुठल्याही वाक्यांचा नंतर त्रास होईल, अशी वाक्य शक्यतो टाळावीत. किंवा कालांतराने माफी मागून तो मुद्दा तेथेच मिटवून ही घेता येऊ शकतो.
अर्थात हे सर्व त्या प्रसंगांवर अवलंबून असेल. परंतु विचका अजून वाढेल असे कुठलेही वर्तन नसावे.
३) जर तू हे काम नाही केलंस तर..
अशी वाक्ये पुष्कळवेळेस समोरच्याला ब्लॅकमेल करण्यासाठी वापरली जातात. अमुक एक गोष्ट मिळविण्यासाठी समोरच्याने सर्वतोपरी प्रयत्न करावे, नाहीतरी काही खरं नाही, अशा पद्धतीने ब्लॅकमेलिंग केले जाते.
एखादा मुद्दा लहान जरी असला तरी असे केल्याने समोरच्याकडून निश्चित गोष्ट प्राप्त होते, म्हणून ब्लॅकमेलिंगचे व्यसन व्यक्तीला जडते.
अशी वाक्ये सर्रास वापरल्यास आपण कायद्याच्या कचाट्यात येऊ शकतो. याचे भान राखून ही वाक्ये वापरू नयेत.
४) हे जग स्वार्थी आहे.
सर्रास पणे वापरण्याच्या यादीत हे वाक्य सुद्धा अव्वल म्हणता येईल. अशा प्रकारच्या व्याक्यांच्या सततच्या वापरामुळे तुमच्याप्रती नकारार्थी छाप इतरांच्या मनात पडते.
तुमच्याकडून अशा पद्धतीची नकारार्थी ऊर्जा पसरत असल्याने तुमची अनेक होणारी कामे थांबतात. लोकं तुमच्यापासून स्वतःला दूर सारतात. तुमचा जगण्याविषयीचा एकंदरीत दृष्टिकोन नकारार्थीच आहे, अशा प्रकारचे लेबल तुम्हाला लागू शकतात.
एकंदरीत पाहता तुमच्या आयुष्यात कोणत्याच चांगल्या गोष्टी घडण्याची शक्यता ही मंदावते. त्यामुळे मग आणखीन तुम्ही जगालाच याबाबत दोषी धरता. हे वर्तुळ थांबवायचं असेल तर हा नकारार्थी चष्मा उतरावा लागेल.
५) उघडपणे शिव्या देऊ नका!
शिव्या देणे हे भावनांचं निचरा करण्याचं माध्यम जरी असलं तरी आजूबाजूचं भान न ठेवता, जर एखाद्याला भावना दुखावणारी शिवीगाळ झाली तर तुम्हांला शारीरिक आणि मानसिक दुखापत होऊ शकते.
कोणत्याही नात्याशी संबंधित उल्लेख त्या शिव्यांमध्ये नसायला हवं. नाहीतर ऐकणाऱ्या लोकांकडून किंवा महिलांकडून तुम्हांला चोप मिळू शकतो.
म्हणून उघडपणे सर्रास शिव्या देताना सामाजिक भान, जाणीव ठेवायला हवी.