Skip to content

भूत-भानामती या गोष्टी खरंच खऱ्या असतात का ??

भानामती….


संजय घाटगे 9850964177


आज राष्ट्रीय विज्ञान दिन आहे…विज्ञानाच्या जोरावर आपण कुठल्या कुठे येऊन पोहचलो आहोत तरी देखील, काही जुन्या अंधश्दा आज देखील आपण कवटाळून आहोत.

भूत बाधा, करणी बाधा, भानामती, मूठ मारणे यावर अजूनही बर्‍याच लोकांचा विश्‍वास आहे. मी तर आजवर असल्या कुठल्याच गोष्टीला कधी बधलो नाही पण माझ्या जीवनात एक अशी अर्तक्य घटना घडून गेली की त्या वेळी माझा संयम थोडाजरी ढळला असता, तरी मी या दुष्ट चक्रात कायमचाच गुरफटलो असतो….त्याचीच ही साधारण बारा वर्षांपूर्वीची सत्य कथा !

रात्री आठ च्या दरम्यान मी घरात पाऊल टाकले अशा वेळी एरवी घरात जोरजोरात केकाटणारा टीव्ही, घरातील इतर सर्व सदस्यां प्रमाणे एकदम थिजून गेल्या सारखा एका कोपर्‍या थंड पडला होता.

त्याच्याकडे आता कोणाचेच लक्ष नव्हते. घरातील सर्वांचे उदासवाणे चेहरे मला गेल्या चार दिवसांपासून घडणारा प्रकार आज देखील पुन्हाघडून गेला हेच सांगत होता. मी येताच क्षणभर शांतता पसरली व पुन्हा चर्चेचे गुर्‍हाळ सुरु झाले व मनात नसताना देखील मला त्यात सहभागी व्हावे लागले.

आज देखील कोरम फुल्ल होता. शिवाय त्यात नव्यानेच माझ्या दुरच्या एका मावशीची भर पडली होती. आता त्यांच्या चर्चेचा सारा रोख माझ्या कडे वळणार हे मला माहीत होतेच, मीही थोडा सरसावून बसलो. बर मी काय म्हणते पोरा,तुझा नसना का या गोष्टीवर विश्‍वास पण जे घडतय ते तुझ्या डोळयांनी तू बघीतलयच की ! एक सोडून आज चौथा दिवस आहे.

रोज दिसभरात हे कधीना कधी व्हतयच. कपडे म्हनूनग, भांडी म्हनूनग, फरशी म्हनूनग आरे आज तर कहर झाला आज जेवतानी ताईन कुकर घेतला भात काढाय, त्यातून भातचं भांड भायेर काढलं…भातवाडी घुपसली तर खालचा भात पूर्ण लाल रंगान पाक माखून गेलता.

आता त्या कुकरचं झाकण यवढ गच्च असतय, त्यात आतल्या भांड्यावर झाकणी बी व्हती. तरी खालच्या भाताचा पाक सत्यानाश झाला व्हता. कुणी भाताचा एक घास सुदीक खाल्ला न्हाई. तशेच उठले जेवत्या ताटावरनं पोरा मी पुन्यांदा सांगते तुला हा भानामतीचाच प्रकार हाये….हा भानामतीचाच प्रकार हाये.

ती माझा हात हातात घेऊन कळवळून बोलत होती. आणि मी आतल्या आत चरफड आई कडे पहात होतो, तिनं हाताने शांत अस खूणावलं आणि झटदिशी मी तिथून उठून गेलो. तायडे तुझं थोरलं जरा जास्त शान हाये तेला जरा समजाव.

कसले कसले करनी आनी भानामती एक एक प्रकार बघीतल्या मी, काय सांगू ! उगीच का केसं पांढरी झाल्याती आमची… पण हे शान पोर एकडाव आयकन तर… तिच्या तोंडाचा पट्टा सुरु झाला आणि इतर जमलेल्या आज्या, काका, मावश्या, आत्यांनी पुन्हा त्याच विषयावर गदारोळ सुरु केला.

मी फ्रेश होऊन आरशा समोर उभा होतो. आणि एकदम जोरदार धक्का बसला गळाच्या खाली लालभडक पाण्याचे थेंब निथळत होते. हातातील टॉवेल पाहिला तर त्याचाही एक कोपरा लालेलाल झाला होता. मी गुपचूप तो टॉवेल धुण्याच्या कपड्या टाकून दिला. व विचार करु लागलो.

गेल्या चार दिवसात अनेक वेळा असा प्रकार घडला होता. कपडे, फरशी, इतकेच काय साबण देखील अचानक लालेलाल होत होते. आणि घरातील कुणाकडेच हे अस का होतय याचे उत्तर नव्हते.

दुसर्‍या कुठल्या कुटूंबात असा प्रकार घडला असता तर लगेच घरी देवऋषी, भगत, मांत्रीक बाबा यांचा राबता सुरु झाला असता पण मुळात माझी आई जरी देव भोळी असली तरी अंधश्रध्दाळू अजिबात नाही. ती एकदम आधुनिक विचारांची आहे.

कोणत्याच बुवा-बाबांवर तिनं कधीच विश्‍वास ठेवला नाही. दारावर एकादा भविष्यवाला आला तर ती हसून म्हणायची याला जर दुसर्‍याच भविष्य सांगण्या इतक ज्ञान असतं तर हा, असा दारोदार पोपट घेऊन फिरला असता का ? ना तिनं कधी आमच्या जन्म पत्रिका बनवल्या, ना कधी कुठली ग्रहशांती, नागबली असा विधी केला. पण घरचे सगळे सणवार, उत्सव आम्ही धुमधडाक्यात करत असतो.

आजदेखील माझ्या सर्व आरत्या चांगल्या तोंडपाठ आहेत. (मी कधीच संकष्टी पावावे म्हणत नाही.)त्यामुळे सहाजीकच सार्‍या घरादारावर तिच्याच विचारांचा पगडा आहे. संपदा, माझा लहान भाऊ, वहिनी आणि बाबा या पैकी कोणाचाही भानामती, करणीबाधा या विषयावर काडीमात्र विश्‍वास नव्हता.

त्यामुळे असे अचानक सारे लालेला होणार्‍या घटना सतत घडून देखील आम्ही मंत्र तंत्र यांना लांब ठेवले होते. या मागचे नक्की कारण काय आहे हे शोधण्याचा सर्वांचाच प्रयत्न होता. पण त्यावेळी वॉटस्पवर कोणताही फॅमीला ग्रुप नसताना बघता बघता ही बातमी आमच्या पंचक्रोशीतील सर्व नातेवाईकांना समजली होती.

मग प्रत्येक जण घरी येऊन नको नको ते सल्ले देण्याचे परम कर्तव्य बजाऊ लागला. शिवाय प्रत्यक्ष स्वत:च्या…स्वत:च्या डोळ्यांनी बघितलेल्या (जसे की आम्ही दुसर्‍याच्या डोळ्यांनी बघतो.)

भानामतीच्या घटना, प्रवचना प्रमाणे रंगवून सांगू लागला. आम्ही मात्र हे सर्व अगदी लाईटली घेत होतो. आज उद्या थांबेल हो आपोआप अस उगीचच बोलायचो पण त्यावर ते म्हणायचे आहो थांबेल काय आता कपडे लाल होतायेत, थोड्या दिवसांनी कपडे पेटू लागलतील, घरातील भांडी आपोआप हवेत उडू लागतील (अर्थात गुरुत्वाकर्षणाचा नियम मोडून हं.) वेळीच यावर तोड काढा, मांत्रीकाला बोलवा तुमच्यातील नक्की कुठल झाड पकडलय ते तो वेळीच ओळखून त्याला पळवून लावेल पण एकदा का त्याचा मुक्काम वाढला की ते कधी सहजा सहजी झाड सोडत नाही.

माझ्या ओळखीचे आहेत एकजण बोलवू का ? असे हळूच विचारत आणि आम्ही ठामपणे नकार दिला की बघा बाबा पुन्हा म्हणू नका सांगीतल नाही म्हणून असे म्हणायचे आणि चालू लागायचे….

अरे बाहेर येतोस का जरा माझ्या त्या दूरच्या मावाशीचा आवाज आला आणि मी एकदम भानावर आलो. त्या सरशी एक विचार माझ्या डोक्यात चमकून गेला. मी अनिसचा वर्गणीदार सभासद होतो. माझ्या घरी न चुकता त्यांचे मासिक यायचे त्यात अशा भानामती प्रकरणाचा भांडाफोड केलेल्या सत्यघटना असायच्या.

शिवाय अनिसच्या अनेक कार्यशाळांना देखील मी या पूर्वी हजेरी लावली होती. त्यात बर्‍याचदा घरातीलच कुणीतरी व्यक्ती या मागे असल्याचे सिध्द झाल्याचे मला माहिती होते. घरातील एखादी गांजलेली, दुर्लक्षीत, किंवा काही कारणाने अडचणीत आलेली व्यक्तीच असे प्रकार मुद्दमहून घडवून आणण्याच्या मानसिकते मध्ये येते. व त्यातूनच मग हा भानामतीचा खेळ सुरु होतो.

माझी विचार चक्रे वेगाने फिरु लागली. आत्ता माझ्याबाबतीत नुकताच हा प्रकार घडला. त्या आधिचा सर्व घटना क्रम आठवला मी ऑफिस मधून थेट इतरत्र कुठेच न जाता घरीच आलो होतो. घरी आल्यावर मावशी जवळ सोफ्यावर बसलो होतो त्यानंतर थेट बेडरुम तिथून बाथरुम व पुन्हा बेडरुम आणि सारं लालेलाल म्हणजे या मागे मावशी तर…….पण लगेच लक्षात आलं की ती तर आत्ता दोनच दिवस झालेत येऊन मग कोण असेल ?

विचार करुन करुन माझं डोकं भणभणायला लागलं होतं ऑफिस मध्ये येऊन कॉम्पयुटरच्या स्क्रीनवर डोळे लावून चक्क तासभर निघून गेला होता. एका जोरदार वार्‍यासरशी रस्त्यावरचा बराचासा फुफाटा आत आला आणि माझी तंद्री भंगपावली. मार्चच्या उन्हाचा तडाखा आता जाणवू लागला होता.

मी फॅनचा स्पिड वाढवला आणि घरी पून्हा काय घडले असेल? त्याचा छडा कसा लावावा याच विचारात गढून गेलो. काही झालं तरी मी या प्रकरणाचा विज्ञानाच्या दृष्टिकोनातूनच विचार करत होतो. बुवा बाजी मला एकदम निषिध्द होती. भूत खेत यावर मी आजवर कधीच विश्‍वास ठेवला नव्हता.

भूताचा सामना होतो का बघण्यासाठी अगदी भर आमावस्येच्या रात्री आम्ही काही मित्रमंडळी मुद्दामहूम सातार्‍याजवळ असणार्‍या कास तलावाकडे असणार्‍या ब्रिटीश कालीन बंगल्यात उघड्यावर रात्र काढून आलो होतो.

(सातार्‍या जवळील कास तलावात आजवरच्या अनेक दुर्घटनांमध्ये काही लोकांनी आपले प्राण गमावले असल्याने रात्रीच्या वेळी तिथे हमखास एखाद्या भूताशी नक्की सामना होतो अशी अनेकांची मान्यता आहे. तो म्हणायलाच बंगला त्याचे लाकडी दरवाजे, खिडक्या कधीच लोकांनी पार्ट्यांसाठी सरपण म्हणून उपयोगात आणले होते. सध्या त्याला लोखंडी दारवाजे असून तो कुलूप बंद आहे.)

पण त्या अमावस्येच्या रात्री देखील आम्हाल काही भूत दिसले नाही मी आणि एक मित्र तर रात्री 2 वाजता उठून तलाजवळून चक्कर मारुन आलो होतो. निरव शांततेत लुकलुकणार्‍या चांदण्यांच्या प्रकाशात चमकणारे ते मनमोहक पाणी आणि स्तब्ध निसर्ग व एखाद्या पाखराच्या फडफडण्या खेरीज तेथे काहीच जाणवले नव्हते.

त्याच बरोबर बेळगाव मध्ये असताना बेननस्मीथ शाळेच्या मागे एक वापरात नसलेले कब्रस्थान होते. तिथे गर्द अशी चिंचेची झाडे (प्रेतात्म्यांचे राहण्याचे आवडते लॉजींग) होती. क्रिकेट खेळून झाल्यावर आम्ही तिथल्या थडग्यावर जाऊन खुशाल चिंचा खात झोपायचो.

अगदी गुप्प अंधारपडे पर्यंत. पण तेव्हापासून ते बेळगाव सोडेपर्यंत त्या कब्रस्थानातील भूत कुणाच्या मानगुटीवर बसलेलं कधीच ऐकल नाही.
माझ्या लहान पणीची तर गंमत वेगळीच आहे. माझी आजी अगदी टिपीकल जुन्या वळणाची होती. ती दर आमवस्येला घरी येताना पदराखाली शेरनी झाकून आणयची.

(शेरनी म्हणजे चिरमुरे, त्यात फरसाण व एखाद भजं अस एकत्रीत असायचं जे लहान मुलांवरुन अमावस्येच्या संध्याकाळी उतरुन, तिकाटण्यावर टाकायची पध्द होती.)

मला आणि माझ्या लहान भावाला एकत्र उभं करुन आमच्यावरुन उतरुन स्वत: टाकून यायची. पण जसा मी थोडा मोठा झालो तसे, आजीने शेरनी टाकण्याचे काम माझ्याकडे सोपवले. शेरनी टाकायला जाताना त्या भज्या चिरमुर्‍याच्या वासाने माझ्या तोंडाला पाणी सुटायच, थोड अंतर चालून गेलो की मागे आज्जी बघत नाही ना याची खात्री करुन एक भल्ला मोठ्ठा बोकणा तोंडात भरायचो.

आणि मग माझे तोंड खवळायचे कारण त्या वेळी बेळगावला आमच्या भल्या मोठया कुटूंबात असलं काही खायला वाट्याला येणं दुर्मिळच होतं. कधी कुणा पावण्यानं काही आणलंच तर ते व्हटाला ना पोटाला अशी गत होती. मग अशा वेळी तो अख्खा पुडा माझ्या हातून वाचणे शक्यच नसायचे.

त्या तिकाटण्या जवळ पोहचे पर्यंत त्या पुड्यात केळव चारदाणे चिरमुरे उरलेले असायचे, ते देखील खाऊन मी रिकामा कागद तिथं टाकून धुमचकाट घर गाठत असे. (ती शेरनी योग्य भूताच्या पोटात पोहचल्या मुळे असेल कदाचित पण आजवर कधी कुठलीच कसली भूत बाधा झाली नाही.)

त्याचबरोबर रस्त्याने जाता येता अशी कित्ते मंतरुन टाकलेले लींबू लाथेन उडवत लांबपर्यंत नेणे हा माझा आवडा खेळ होता. तर सांगायचा विषय हा की त्यावेळी अशा एक ना अनेक गोष्टी करुन देखील त्यावेळी कधी कसली बाधा झाली नाही मग सध्या जे घरी घडतय तो प्रकार काय असावा….?

बघता बघता आता आठ दिवस होऊन गेले पण या आठ दिवसात एखाद्या दिवसाचा अपवाद वगळता रोज किमान एकदा तरी कपडे, भांडे कींवा इतर वस्तू लाल रंगाने माखून निघायच्या आणि घरातील हसते खेळते वातावरण एकदम तणावपूर्ण बनायचे.

कधी कुठली वस्तू कशी रंगून जाईल याचा नेम नसायचा यातून आमच्या छोट्या कच्च्या, बच्च्यांची खेळणीही सुटली नाहीत. त्या दोघांचे हातही अचानक लाल व्हायचे मग मात्र जीव कासावीस व्हायचा. आपण बुवाबाजीला विरोध करुन, मांत्रीकाकडून उपाय शोधण्यास कडाडून विरोध करतोय खरा पण आपल्या तत्वांपायी या तिन चार वर्षांच्या लहानग्यांना कोणत्या संकटात तर टाकत नाहीना? असा विचार चमकून जायचा.

काल संध्याकाळी तर सरु आज्जीने कुण्या मांत्राकाला घरी आणले देखील होते. अस्ताव्यस्त पिंजारलेले कुरळे केस, दाढीचे वाढलेल खुंट, चुरगळलेला पांढरा शर्ट व पायजमा, गळ्यात निरनिराळ्या रंगाच्या मण्यांच्या माळा, कपाळावर लालभडक कुंकवाचा नाम ओढलेला, त्याचे निबर,जाड काळसर ओठ आजपर्यंत किती बिड्या ओढल्यात याची साक्ष देत होत्या. तो तंद्री लागल्यासारखा आपल्या लालभडक तारवटलेल्या डोळ्यांनी माझ्याकडे एकटक पहात होता.

मला काही कळायच्या आत त्याने त्याच्या हळद कुंकवाचे असंख्य डाग पडलेल्या व तेलाने माखलेल्या कळकट पिशवीतून अचानक अंगारा काढून त्याचा मारा माझ्यावर सुरु केला. माझा संताप अनावर झाला मी त्याच्या अंगावर धावून गेलो एका मिनिटाच्या आत घराबाहेर व्हायचं…आऊट…सरु आज्जी बगं माझा अंदाज बराबर हाय का.

हीथच पानी मुरतय गं…. बोल तुझ नाव काय….बोल….ए सोड हे झाड… सोड हे झाड….असं मोठ्यांदा म्हणत त्याने पुन्हा माझ्यावर तो अंगारा फुकला, त्यासरशी मी माझे नियंत्रण गमावून बसलो आणि त्यावेळी हातात जे काही मिळालं ते घेऊन त्याच्या आंगावर धावून गेलो

. एका हाताने त्याची कॉलर पकडली त्यावेळी त्याने हाणलेल्या चपटीचा उग्रदर्प जाणवला त्या तिरमीरीत मी त्याला एकच जोरदार हिसडा दिला तसा तो भोंदू उंबर्‍याबाहेर कोलमडला. त्याची गलीच्छ पीशवी त्याच्या अंगावर भिरकावली व अतिशय थंडपणे तंबी दिली. पुन्हा जर या घराचा उंबरा ओलांडलाशील तर स्वत:च्या पायाने घरी जाणार नाहीस, निघ इथून म्हणत मी जोरात दार बंद केले.

सरु मावशीऽऽऽ लई जालीम लागीर हाये. वेळीच उतरलं न्हाईतर समद्या घरादारीची राखरांगोळी नक्की समज गऽऽऽऽ अस काहीसं बरळत होता मग मात्र मी पुन्हा बाहेर झेपावलो, पण तोवर मात्र त्याने थेट ग्राउंड फ्लोअर गाठला होता. माझा हा अवतार बघून घरातील सर्व आज्या,पंज्या व मावश्यांची बोबडीच वळाली होती.

त्या सर्वजणी भेदरुन चिडीचूप झाल्या होत्या. त्यांच्याकडे बघून मला त्याही अवस्थेत अचानक हसू फुटले. मी हसतच म्हणालो अगं कशाला असले प्रकार करताय कुठल्या भूत-पिशाच्याने सहज चढून बसाव इतक हे झाड सोप्प नाही. खुळचट प्रकार सगळे असं म्हणत उपस्थित सिनिअर सिटीझन्स्चे माझ्यापरीने थोडे बौध्दी घेऊन मग आत गेलो.
माझ्या पाठोपाठ आई देखील आता आली…

तू तयार तरी कशी झालीस त्या बुवाला बोलवायला ती आत येताच मी तिच्यावर थोडं वैतागूनच म्हणालो. तर ती म्हणाली अरे दुपारी आपल्या बाळांचे दुध तापवायला ठेवले होते. दुध उतू जाईल म्हणून मी गडबडीन आत गेले तर पूर्ण दूधाचा रंग बदलला होता आणि हे किचन मध्ये आलेल्या सरु आज्जीने बघीतल की लगेच तिचा दंगा सुरु झाला.

तुम्हाला मुलांची काळजी नाही, लै आधुनिक झालाय, रित भात काय ठेवली नाही…आणि बाकिच्या होत्याच तिच्या सुरात सुर मिसळायला. मग काय मला बापडीला बाजूला सारुन तुझ्या रेखा आत्यानं आणि सरु आज्जीने केला पुढचा कारभार. तरी मी त्यांना बजावत होते असलं काही करु नका.

आमचा कुणाचा या गोष्टींवर आजीबात विश्‍वास नाही. त्या सर्वजणी एक होऊन तुटून पडल्या माझ्यावर ! आपल्या पोरीही नेमक्या त्याच वेळी घरी नव्हत्या, त्या गेल्या होत्या पोरांना शाळेतून आणायला. मी एकटी पडले माझं काहीच चालू दिलं नाही. आता हे खूपच होतय तेव्हा तूच काय तो या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावून टाक बाबा एकदाचा. तिनं काळजी भरल्या नजरेने माझ्याकडे पहात म्हटलं.

रात्री किती तरी उशीरापर्यंत माझा डोळा लागत नव्हता. अमानवीय गोष्टी ठामपणे नाकारणार मी, विचार करता करता अचानक शक्य-अक्यतेच्या सीमारेषवर नकळत कधी पोहचलो माझे मलाच कळाले नाही. आणि एकदम खडबडून जागा झालो. इक्या कठीण प्रसंगात देखील मनातील विवेक शाबूत होता. उद्या सकाळ उठल्याबरोबर या घटनेचा सोक्षमोक्ष लावायचाच या निर्धाने माझे डोळे मिटले.

या घटना घरात घडतायेत म्हणजे याचे मुळ इथेच कुठे तरी असणार या सुत्रानुसार सकाळी उठून मी सर्व प्रथम 5 खोल्यांचा तो प्रशस्त फ्लॅट अक्षरश: उलथा पालथा केला. घरातील कोपरानं कोपरा तपासून घेतला पण हात काहीच ठोस मिळाले नाही. एव्हाना दुपारचे 2 वाजले होते.

एकंदरीत घडणार्‍या या अर्तक्य घटना पाहता आता याची सोडवणूूक करण्याकरीता दुपारी जेवण झाले की तातडीने अनिस चे कार्यालय गाठण्याचे मनोमन पक्के केले. व जेवण झाल्यावर थोडावेळ बेडरुमच्या खिडकीत उभा असताना, तिथं कोणाला भेटायचे, काय सांगायचे हे विचार डोक्यात सुरु झाले.

भर दुपारची वेळ होती उन्हाळ्याचे दिवस असल्याने रस्त्यावर वर्दळही तशी कमीच होती. अजून अर्ध्यातासाने निघावे असे ठरवले व तसाच खिडकीत थांबून राहीलो. शेजारच्या हॉस्पिटल मध्ये धावपळ चालू होती. रिक्षातून पेशंट जाणे, नविन पेशंट अ‍ॅम्ब्युलन्स मधू आणणे, चिंताक्रांत नातेवाईकांचे चेहरे सारं काही नेहमी प्रमाणे सुरु होतं.

हा फ्लॅट घेतानाही आम्हाला बर्‍याच जणांनी सांगीतल होतं, शेजारी हॉस्पिटल आहे हो, काही वेळा तिथेे पेशंट दगावतातही, शिवाय या जागेत पूर्वी कोणा बुवाची समाधी होती. ही बाधीक जागा आहे इथलं घर घेऊ नका. फलानं आणि फलानं बरचसं ऐकून घेतल होतं.

पण आम्ही आमच्या निर्णयावर ठाम होतो. कारण असल्या अंधश्रध्दांना आम्ही कुणीच कधीच थारा दिला नव्हता. मी विचारात गढून गेलो होतो, इतक्यात जोराचा वारा आला आणि अचानक माझं लक्ष किचनच्या खिडकी खाली असणार्‍या रुफकडे गेलं….

त्यावर पडलेलं एक पाकीट एकदम चमकून गेलं आणि मला माझ्या समस्यचे 100% उत्तर मला मिळाले. मी विजेच्या वेगाने बाथरुम मध्ये गेलो, तिथून एक लांब काठी घेतली व खिडकीतून हात बाहेर काढून काठीने ते चकाकणार पाकीट ढकलत, ढकलत खाली पाडलं व त्या सरशी जिन्यातून घावत तळ मजला गाठला. अरे अरे काय झालं? माझ्या मागे सार्‍यांनीच काळजी युक्त गलका केला. पण आत्ता या क्षणी मला खाली पोहचायच होतं…

मी खाली पडलेले ते पाकीट मी उचलून घेतले. आणि अत्यानंदाने बेभान झालो होतो. माझा विज्ञानवादी दृष्टीकोन अगदी योग्य होता. आता माझ्या घरातील समस्या पूर्णपणे संपली होती. त्याचे मूळ माझ्या हातत मी घट्ट पकडले होते. या जगामध्ये कोणत्याही अ तार्किक भोंदूगीरीला, अंधश्रध्देला कोणी कधीच थारा देवूनये हे आता अधिक ठामपणे मी सर्वांनाच पटवून देवू शकणार होतो.

मी समाधानाने पायर्‍या चढून घरात आलो. घरातील सर्व गोतावळा माझ्याकडे अधिरपणे पहात होता मी हात पुढे केला आणि तिला सांगीतले की हातावर थोडे पाणी टाक. तिने तत्परतेने देवघरातील गडूतील थोडे पाणी माझ्या हातावर शिंपडले आणि क्षणात माझे हात लालेलाल झाले.

घरातल्यांची उत्सुकता अधिक न ताणता मी माझा दुसरा हात पुढे केला. व ते 501 टक्का रंगाचे पाकीट सगळ्यांना दाखवले. आणि सांगीतलं कि नुकत्याच झालेल्या रंगपंचमीच्या वेळी आपल्या दोन शेंडेफळांना घरातील सर्वांनीच वेगवेगळ्या रंगांची पाकीटं आणून दिली होती. लहान थोर सर्वांनीच जोरात रंगपंचमी साजरी केली होती.

या सर्व गोंधळात त्यातील एक फोडलेले 501 टक्का रंगाचे पाकीट खाली पडले व ते नेमके खालच्या रुफवर तसेच राहीले. मग काही दिवसांनी जोरात वाहणार्‍या वार्‍यासोबत त्यातील काही कण उडून लगतच्या खिडक्यांमधून घरात येत होते व सहाजीकच तो 501 टक्का रंग एकदम कडक असल्याने त्याचा पाणी कींवा ओलसर वस्तूसोबत थोडा जरी संपर्क झाला तरी सर्व काही लाले लाल व्हायचे. माझ्या बोलणे संपले आणि अक्षरश: सर्वांना जोर जोरात टाळ्या वाजवल्या.

मला देखील आपण आपल्या विचारांशी ठाम राहून स्वत:च या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावल्याचे अभूतपूर्व समाधान लाभले (इथे भूत शब्द आला काय?)



Online Counseling साठी !

क्लिक करा



“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!