Skip to content

आयुष्य खूप गंमतीदार आहे, ते समजायला अक्खी हयात कमीच!

आयुष्य खूप गंमतीदार आहे, ते समजायला अक्खी हयात कमीच!


तेजस पालकर.


आज मी माझे काम उरकून लवकर घरी येत होतो वेळ हातात खुपसा शिल्लक होता त्यामुळे विचार केला आज घरी चालत जावे शगुन चौकातून पाचपीर चौक पर्यंतचा प्रवास पायीच करण्याचे ठरवले परंतु आजचा हा प्रवास माझ्यासाठी लक्षात राहील असाच राहिला, कारण त्यामध्ये मी आज दोन प्रसंग अनुभवले.

खूप दिवसांनी मी आज चालत प्रवास करत होतो आणि शगुन चौकातून जाताना रस्त्याच्या एका बाजूला रोषणाईने उजळून गेलेली दुकाने दुसऱ्या बाजूला फटाक्यांचे स्टॉल अशातच वाहनांची गर्दी लोकांची दिवाळीची खरेदी पाहत चाललो होतो हे पाहून क्षणभर असेच वाटले की कोरोना काही संपलाच आहे. परंतु एक गोष्ट नक्की खुप दिवसानंतर ची अशी गर्दी पाहून एखादा सण नक्कीच आहे याचं जाणीव मनाला झाली.

आज वेळ खूप असल्यामुळे मी रस्त्याने अगदी रेंगाळत इकडे तिकडे पाहत चाललो होतो आणि हे सर्व पहात असताना माझी नजर रस्त्यावरती एका बाजूला एक सात ते आठ वर्षाचा मुलगा अंगावरती जुनापुराणा टी-शर्ट घालून हातामध्ये एक बॅग घेऊन तो रस्त्यावर कचऱ्याच्या पिशव्या विकण्यासाठी उभा होता कोणीच त्याच्याकडे पाहत नव्हते. सगळे दिवाळीच्या खरेदीमध्ये व्यस्त होते. तो बिचारा प्रत्येक माणसाला जाऊन ती बॅग घेण्यासाठी विचारत होता अशातच त्यामुलाने मला सुद्धा विचारले आणि मी ही इतरांप्रमाणेच त्या मुलाकडे दुर्लक्ष करून पुढे निघून गेलो.

परंतु पुन्हा विचार केल्यानंतर त्या मुलाकडे जाऊन मी ती कचऱ्याची पिशवी विकत घेतली त्या मुलाला खूप आनंद झाला. कदाचित त्याची आज ती पहिलीच पिशवी विकली गेलेली होती. आणि क्षणभरातच मला माझे बालपण आठवले. त्या वयाचा असताना माझं आयुष्य कसे होते आणि त्या मुलासाठी कसे आहे याचा विचार मनात येऊन गेला.

त्या मुलालाही वाटत असेल आपल्यालाही दिवाळीत छान कपडे, फटाके ,खायला गोड वस्तू मिळाव्यात.. परंतु ती परिस्थिती पाहता तर हे नक्की आहे की त्याला हे मिळत नसेल,आणि असा विचार मनात आल्यानंतर प्रत्येकालाच त्याचं वाईट वाटेल सहाजिकच मलाही वाटलं.

परंतु मी काही त्या मुलाला त्याच्या त्या परिस्थितीतून कायमस्वरूपी बाहेर काढू शकत नाही पण त्या क्षणापुरता त्याच्या चेहऱ्यावर एक हास्य नक्कीच आणू शकतो. त्यामुळेच मला जे योग्य वाटले ते मी त्याच्यासाठी केले, मनाला थोडावेळ का होईना पण मला खूप समाधान मिळाले. माहित नाही जे मी पाहिलं ते किती सत्य होत पण मनातून आज वाटलं की काहीतरी केलं पाहिजे आणि मी माझ्या बुध्दीला जे योग्य वाटलं ते केलच.

पण त्यानंतर मी त्याला त्याचं नाव विचारलं त्याच्या आई-वडिलांबद्दल विचारल त्याने सांगितले त्याचे बाबा तिथेच मार्केटमध्ये कचरा उचलायचं आणि तो विकायचा काम करतात त्याची आई तिथेच एका बाजूला भिंतीला लागून एका लहान मुलाला घेऊन लोकांकडे पैसे मागत होती, खूप वाईट होत ते ,परंतु मला हे समजत नव्हते नक्की दोष कोणाचा आहे त्याच्या आई-वडिलांचा जे त्या लहान मुलाला पिशव्या विकण्यासाठी रस्त्यावर उभा करतात की त्या मुलाचाच तो त्याच्या आईवडिलांसाठी तिथे उभा होता?की परिस्थितीचा जी त्याच्या वर आज आली आहे.

असं नाही की रस्त्यावर हाच एक मुलगा आहे असे असंख्य लहान मूल असतील आणि त्याच्यापुढे पण अशीच परिस्थिती असेल.

बघा ना आयुष्य पण किती गंमतीदार आहे ज्याला जे हवं आहे त्याला ते मिळत नाही,आपल्याकडे भरपूर काही गोष्टी आहेत परंतु आपण त्यात समाधानी नाही.

अजूनही असं वाटतं की आपल्याला काहीतरी हवंय आपल्याकडे काहीतरी कमी आहे परंतु जे काही आपल्याकडे आहे ते सुद्धा काही लोकांकडे नाही आपण जे जगतोय त्याहीपेक्षा भयानक अवस्थेत काही लोक जगतात.

आपण उद्याचा विचार करून जगतोय परंतु काही लोक आत्ता काय याचा विचार करत ते खूप मोठं प्रश्न चिन्ह घेऊन जगत आहेत.आणि काय हो शेवटी जे पण काही आपण मिळवणार,कमवणार ते सर्व काही घेऊन जाता येत नाहीच.

शेवटी ते ईथेच राहणार त्यामुळे जेवढं शक्य आहे तेवढं तर नक्कीच आपण एकद्या गरजू व्यक्तीला पुढे येऊन मदत करूच शकतो.त्यासाठी पैसेच लागतात असं नाही त्यासाठी आपले विचार आणि आपलं मन मोठं असल की झालं.



Online Counseling साठी !

क्लिक करा



“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया!

1 thought on “आयुष्य खूप गंमतीदार आहे, ते समजायला अक्खी हयात कमीच!”

  1. Nilesh Baban Shinde

    I really like this story
    the same story and the like same people seen on Highway at Chakan area near pune.
    I feel the same feeling as the writer wrote in above story.
    bt I can not help them
    very sad …

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!