Skip to content

समस्या व उपायही माहितीयेत..पण वळत नाहीत, असं का??

समस्या व उपायही माहितीयेत..पण वळत नाहीत, असं का??


विवेकनिष्ठ मानसोपचारशास्त्र सांगते की ‘कळून न वळणे’ ही अवस्था म्हणजे वैफल्य सहन करण्याची कमी क्षमता असणे होय. मनुष्याला सर्व सोपे, चटकन हवे असते. कळणे सोपे असते. पण वळणे वेदनादायी असते. त्यासाठी शरीराला व मनाला नवीन सवयी परिश्रमपूर्वक जडवून घ्याव्या लागतात. म्हणजेच वैफल्य सहन करण्याची क्षमता वाढविणे गरजेचे आहे.

आपल्याला कामाचा ताण जास्तच जाणवू लागलेला आहे, असे सुहासला अलीकडे वाटू लागले आहे. स्वत:च्या मानसिक आरोग्याबद्दल तो जागरूक आहे. ताण कमी करण्यासाठी त्याने ‘स्ट्रेस मॅनेजमेंट’च्या अनेक छोटय़ा-मोठय़ा कोस्रेसना हजेरी लावली. प्रत्येक कोर्समध्ये तणाव कमी करण्याच्या भिन्न मार्गावर भर दिला होता. त्यामुळे तणाव कमी करण्याचे अनेक मार्ग त्याला कळले तरी त्याचा तणाव यत्किंचितही कमी झाला नाही. अखेरीस तो समुपदेशकांना भेटावयास गेला. समुपदेशकांनी त्याच्याशी बोलण्यास सुरुवात केली तेव्हा हताश होऊन तो म्हणाला, ‘‘तुम्ही जे सांगत आहात, ते सर्व मला माहीत आहे. मला सर्व कळतंय हो, पण वळतच नाही! ’’

नुकताच पौगंडावस्थेत प्रवेश केलेला सुप्रियाचा मुलगा सतत चिडचिड करतो. पालकत्वावरची अनेक पुस्तके सुप्रिया कोळून प्यायली आहे. पालक म्हणून आपली काय भूमिका असावी, मुलाशी सुसंवाद कसा साधायचा आणि त्याचे महत्त्व तिला माहीत आहे. मुलाची चिडचिड सुरू झाली की आपण कुठल्या चुकीच्या प्रतिक्रिया देतो, याचीही तिला जाणीव आहे. परंतु त्याची चिडचिड सुरू झाली की मात्र तिला याचा नेमका विसर पडतो आणि ती पूर्वीच्याच प्रतिक्रिया देत राहते. त्यामुळे तिची अस्वस्थता अधिकच वाढली आहे. तिलाही सुहाससारखाच प्रश्न पडला आहे. मला हे सर्व कळतंय, पण वळत का नाही? माझ्यातच काहीतरी उणीव आहे, अशा कमीपणाच्या भावनेने तिला घेरले आहे.

सुहास आणि सुप्रियाच्या बाबतीत जे घडत आहे, ते आपल्या सगळ्यांच्याच बाबतीत वेगवगेगळ्या प्रसंगात कमी-अधिक प्रमाणात घडत असते. उदाहरणार्थ, रोज व्यायाम केला पाहिजे व तो केला नाही तर होणाऱ्या दुष्परिणामांची आपल्याला जाणीव असते, पण तो नियमित होत नाही. रागाला आवर घातला पाहिजे, राग कमी करण्याचे अनेक मार्ग माहीत असले तरी नेमका जेव्हा राग येतो, तेव्हा त्या माहितीचा काहीही उपयोग होत नाही. मग आपणही सुहास आणि सुप्रियासारखे हतबल होऊन म्हणतो, ‘कळतंय पण वळतच नाही!’

या अवस्थेस म्हटले जाते, ‘कळण्याचा पण वळण्याचा आभास’! यास आभास यासाठी म्हटले जाते कारण ही अवस्था अनुभवताना, ‘कळणे’ आणि ‘वळणे’ या दोन भिन्न गोष्टी आहेत, हे आपण ध्यानात घेतलेले नसते. आपण असे गृहीत धरत असतो की एखादी गोष्ट आपल्याला माहीत असेल तर त्या माहितीमुळे आपण ती आपोआपच कृतीत आणू. म्हणजेच आपली समजूत असते की कळले की आपोआपच वळेल. त्यामुळे वळण्याचा आभास निर्माण होतो. कळण्यामध्ये आपोआप वळण्याचे बळ नसते, तर स्वत:ला वळविण्यासाठी मुद्दाम वेगळे प्रयत्न करावे हे आपण लक्षात घेत नाही आणि मग सुहास आणि सुप्रियाप्रमाणे हताश होतो.

तणाव कमी करण्याचा एखादा कोर्स जेव्हा सुहास करतो, तेव्हा त्याला वाटत राहते की आता मला तणाव कमी करण्याचे ज्ञान मिळाले आहे, म्हणजे तो आपोआपच कमी होईल. तसे झाले नाही तर त्याला वाटते की हा कोर्सच योग्य नव्हता. सखोल माहिती देणारा आणखी एक कोर्स मी निवडला पाहिजे. तो करूनही तणाव कमी झाला नाही तर तो अजून तिसऱ्या कोर्सच्या पाठी लागतो. तिथेही तीच पुनरावृत्ती झाली की तो इतके भरमसाट कोस्रेस करत राहतो की त्यातील अनेक मार्ग परस्परविरोधी आहेत, हे त्याच्या लक्षातही येत नाही. त्यामुळे ताण कमी करण्याची एखादी ठोस विचारसरणी अमलात आणण्याऐवजी परस्परविरोधी भूमिकांचा गोंधळ त्याच्या मनात होत राहतो. आता तो समुपदेशकाकडे गेला आहे खरा, पण कुठलाही समुपदेशक जादूची कांडी फिरवल्याप्रमाणे त्याच्या तणावात आपोआप कायापालट घडवून आणू शकणार नाही. मग हा समुपदेशकच योग्य नाही असे म्हणून तो नवनवीन समुपदेशकांच्या शोधात राहील आणि हे चक्र असेच चालू राहील.

‘कळतं पण वळत नाही’, या अवस्थेचा दुष्परिणाम सुप्रियाही अनुभवत आहे. तिला वाटते की सुसंवाद कसा असला पाहिजे, याची आपल्याला जाणीवच नसती आणि आपण तो मुलाशी साधू शकत नसलो, तर आपल्या मनात एवढा सल राहिला नसता. पण आपल्याला सुसंवाद कसा असतो, हे माहीत आहे, तरीही आपण तो साधू शकत नाही, म्हणजेच आपल्याला ‘कळतंय पण वळत नाही’, यामुळे तिच्या मनातील सल अधिकच तीव्र होतो. तिला अपराधी वाटत राहते. पालकत्वावरील कुठलेही पुस्तक वाचले की मी त्याचा उपयोग करीत नाही, याची बोच तिचे मन कुरतडत राहते आणि वाचलेल्या प्रत्येक पुस्तकानंतर अपराधीपणाचा नवीन थर तिच्या मनावर साचत राहतो. परिणामी, इतकं कळतंय पण वळत नाही, म्हणजे आपल्यातच तेवढी इच्छाशक्ती नाही किंवा आपल्यात वळण्याचे पुरेसे बळ नाही, असे वाटून न्यूनगंडाची भावना तिला घेरून टाकते.

‘कळतं पण वळत नाही’ या अवस्थेची मीमांसा मानसशास्त्रात वेगवेगळ्या प्रकारे केली आहे. मनोविश्लेषक म्हणतात, की आपल्या वर्तनाचे कारण अबोध मनातील दमन केलेल्या गोष्टींत असते. या गोष्टी कळल्या म्हणजे अंतर्दृष्टी आली की वर्तन आपोआप सुधारते. अर्थात गोष्टी कळूनही समस्या निराकरणासाठी तिची मदत होतेच असे नाही, म्हणजेच कळूनही वळत नाही, अशी टीका त्यावर झाली. यावर मनोविश्लेषक म्हणतात, की कळूनही वळत नसेल तर तुमची अंतर्दृष्टीच कमकुवत आहे. ती प्रगल्भ करायला हवी. खरे ज्ञान हे कृतीत झिरपतेच.

वर्तनवाद्यांची भूमिका याच्या नेमकी उलटी आहे. ते म्हणतात, आधी कळण्याच्या भानगडीत पडूच नका. थेट वळाच. तसे वळलात की आपोआप कळेल. पोहायचे असेल तर पोहण्याची नुसती माहिती घेऊन उपयोग काय? थेट उडीच मारा. मग पोहणे आपोआप कळेल. कृती म्हणजेच कळणे. कळण्यासाठी वेगळे प्रयत्न करण्याची गरज नाही. विवेकनिष्ठ मानसोपचारशास्त्र म्हणते की कळून न वळण्याची अवस्था म्हणजे वैफल्य सहन करण्याची कमी क्षमता असणे होय. मनुष्याला सर्व सोपे, चटकन हवे असते. कळणे सोपे असते. थोडा विचार केला की कळू शकते. पण वळणे वेदनानदायी असते. त्यासाठी शरीराला आणि मनाला नवीन सवयी परिश्रमपूर्वक जडवून घ्याव्या लागतात. म्हणजेच वैफल्य सहन करण्याची क्षमता वाढविणे गरजेचे आहे.

कळून न वळण्याच्या अवस्थेची मीमांसा वेगवेगळी असली तरी यातून बाहेर पडणे नक्कीच फलदायी असते. त्यासाठी काय करावयाचे ते सुहास आणि सुप्रियाच्या उदाहरणांतून पाहू.

कृतीसाठी मुद्दाम प्रयत्न करा- सुहास आणि सुप्रिया सध्या ‘कळण्या’मध्येच अडकून पडल्यामुळे त्यांचे कृतीवरील लक्ष उडाले आहे. स्वत:च्या वर्तनात परिवर्तन करण्यासाठी त्यांनी ठोस पावले उचलली पाहिजेत. उदाहरणार्थ, सुहासने तणाव कमी करण्याचा एखादा तरी मार्ग एखाद्या प्रसंगात जाणीवपूर्वक वापरण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तसेच काही स्मरणक्लृप्त्या, मानसचित्रे इत्यादी मार्गाचा वापर करून योग्य प्रतिक्रिया लक्षात ठेवण्यासाठी सुप्रियाने नेटाने प्रयत्न केले पाहिजेत.

खूप मोठे उद्दिष्ट ठेवू नका. ते पायऱ्यापायऱ्यांत विभागा- माझा तणाव संपूर्णत: नष्ट होईल असे उद्दिष्ट सुहासने ठेवले किंवा माझ्या सर्व प्रतिक्रियांत संपूर्ण कायापालट होईल, असे उद्दिष्ट सुप्रियाने ठेवले तर ही उद्दिष्टे फार मोठी वाटून ती अशक्यप्राय वाटतील आणि कितीही प्रयत्न केले तरी ती साध्य करणे जमणार नाही असे वाटून दोघेही प्रयत्नच सोडून देतील. त्याऐवजी सुहासने तणाव कमी होणे किंवा सुप्रियाने मी केवळ एकाच प्रतिक्रियेत बदल घडवेन, अशा छोटय़ा पायऱ्या सुरुवातीला समोर ठेवल्या तर टप्प्याटप्प्याने ते मोठे उद्दिष्ट गाठू शकतील. पायरी छोटी असली तरीही ती आपोआप जमेल असे नाही. तर ती गाठण्यासाठी त्यांनी स्वत:ला सातत्याने उत्तेजन आणि प्रोत्साहन देत राहिले पाहिजे.

परिपूर्णतेचा अट्टहास सोडा- सुहास आणि सुप्रियाने कृतीसाठी पाचले उचलली तरी ती करताना आपल्या हातून काही चुका घडतील किंवा एखाददुसरा दिवस त्यानुसार कृती होणारही नाही, याची मानसिक तयारी ठेवणे आवश्यक आहे. स्वत:ला थोडी सवलत देणे किंवा माफ करणे याचा अर्थ उद्दिष्टापासून ढळणे असा नव्हे तर आपण प्रमादशील असणे, असा आहे, हे त्यांनी लक्षात घेतले तर परिपूर्णतेचे ओझे ते बाळगणार नाहीत.

एका वेळी एकाच मार्गावर लक्ष केंद्रित करा भारंभार मार्ग अवलंबण्यापेक्षा स्वत:स जास्तीतजास्त पटणाऱ्या एका मार्गावर सुहास आणि सुप्रियाने लक्ष केंद्रित केले पाहिजे. समजा सुहासला तणाव कमी करण्यासाठी योगासनांचा मार्ग चांगला वाटला असेल किंवा सुप्रियाला एखाद्या पुस्तकातील प्रतिक्रिया स्वत:साठी सुयोग्य वाटली असेल, तर ते मार्ग कृतीत आणण्यासाठी काही काळ त्या एकाच मार्गाचा सातत्याने पाठपुरावा करणे गरजेचे आहे. सुहास आणि सुप्रियाप्रमाणे तुम्हीही हे मार्ग आचरणात आणले तर ‘कळून न वळण्याचा’ संभ्रम संपेल आणि नव्या वर्षांच्या संकल्पात तुम्ही फक्त ‘कळणे’ नाही तर ‘वळण्याचाही’ समावेश कराल.


सदर लेख हा सोशल मीडियावर कॉपी-पेस्ट असून आम्ही आमच्या पातळीवर या लेखाचा खरा चेहरा शोधण्याचा प्रयत्नही केला. शेवटी उत्तमोत्तम लेख आणि सेवा वाचक रसिकांपर्यंत पोहोचावी यासाठी नाईलाजाने असा मार्ग अवलंबावा लागत आहे. वाचकांपैकी जर कोणाला खरा लेखक समजल्यास कृपया माहिती द्यावी. धन्यवाद!



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

2 thoughts on “समस्या व उपायही माहितीयेत..पण वळत नाहीत, असं का??”

  1. हा लेख आजच्या लोकसत्ता मधील आहे
    डॉ अंजली जोशी यांचा

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!