Skip to content

जेव्हा आपले निर्णय स्थिर नसतात, तेव्हा आपण फक्त विचारात गुरफटत जातो.

जेव्हा आपले निर्णय स्थिर नसतात, तेव्हा आपण फक्त विचारात गुरफटत जातो.


काव्या धनंजय गगनग्रास

(समुपदेशक)


“साहिल तू किती वेळा स्वतःचे निर्णय बदलत राहणारेस? शिक्षण संपवून इतकी वर्ष झाली तरी अजून तुला समजत नाही की आपल्याला नेमकं काय करायचं आहे? याला काय म्हणावं? यात तू तुझा वेळ, शक्ती वाया घालवतो आहेस अस वाटत नाही का तुला? मी तुला इतक्या वेळा विचारलं, तुला कशाची आवड आहे ते सांग, तश्या दृष्टीने तू काही करणार असशील तर आम्ही तुला मदत करतो, तेही तू सांगत नाहीस.”

बाबा खूप कळकळीने त्याच्याशी बोलत होते. पण खरच साहिलला त्यांची ती काळजी, कळकळ जाणवत होती की नाही माहीत नव्हते. कारण तो स्वतःच्याच विचारांमध्ये गुरफटत चालला होता. पदवीचे शिक्षण घेऊन त्याला आता चार वर्ष होत आली होती. पण या टप्प्याला कामाच्या बाबतीत असेल, आयुष्याच्या बाबतीत असेल जी काही थोडीफार स्थिरता यायला हवी ती मात्र आली नव्हती.

कारण त्याच मन, त्याने घेतलेले निर्णय एका जागी स्थिर राहत नव्हते. आज एखादी गोष्ट आवडली ती करायचा विचार केला, काही दिवसांनी ते सर्व नको वाटू लागलं म्हणून सोडून दिलं अस तो करत होता. आई बाबांनी त्याला किती वेळा समजावून पाहिलं, जर त्याला नोकरी करायची नसेल, स्वतःच काहीतरी निर्माण करायचं असेल तर त्यासाठी मदत करायला देखील ते तयार होते. पण मदत घेण्यासाठी आपल्याला नक्की काय हवं आहे हे माणसाला माहीत असावं लागतं.

साहिलला अजून हि गोष्ट उमगली नव्हती की त्याला काय मनापासून काय आवडतं, काय करायला जमतं. त्याने पदवीचे शिक्षण घेतले होते ही गोष्ट खरी होती, पण त्यात त्याची आवड कमी आणि इतर मित्रांचा प्रभाव जास्त होता. बाकीच्या मित्रांनी तिथे जायचा निर्णय घेतला म्हणून मी पण गेलो हे त्याने स्वतः देखील मान्य केलं होतं. त्यामुळे तो निर्णय देखील त्याचा स्वतःचा होता अस म्हणता येत नव्हतं.

आता तो अश्या टप्प्यात होता जिथे त्याने एक स्वतंत्र व्यक्तीमत्व म्हणून स्वतःला घडवणं अपेक्षित होतं. पण त्याचे कोणतेच निर्णय स्थिर नसल्याने तो अडकून पडला होता. अजून कोणत्याच गोष्टीत स्थिरता आली नव्हती. तो पण याच विचारात असे की मी आता काय केलं पाहिजे? कोणती गोष्ट आहे ज्यात मी आनंदी राहीन? कोणता निर्णय माझ्यासाठी योग्य असेल? हे विचार चक्र चालूच राहायचं.

निर्णय क्षमता हे एक महत्त्वाचं जीवन कौशल्य आहे. आपल्या जीवनाशी जोडलेलं आहे. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला वेगवेगळे छोटे मोठे निर्णय हे घ्यावेच लागतात. अश्या वेळी आपल्याला ते घेता येत नसतील, त्यात आपण कमी पडत असू, किंवा गोंधळून जात असू तर आपण अडकून पडतो. याच कारण एका निर्णयातून अनेकदा कितीतरी गोष्टी सुटत असतात, त्यांची उत्तरं मिळत असतात. तोच जर नाही घेता आला तर आपण उत्तरापर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे योग्य वेळी योग्य तो निर्णय घेता आला पाहिजे, त्यावर टिकून राहता आलं पाहिजे.

यासाठी स्वतःबद्दल पूर्णपणे माहीत असणं, परिस्थितीची, आजूबाजूच्या माणसांची जाणीव असणं, ज्या गोष्टीबाबत निर्णय घ्यायचे आहेत त्याची माहीत असणं खूप आवश्यक आहे. आणि सरावातून हे आपल्याला हळू हळू जमत. जितकं आपण आपल्याला समजून घेण्याचा प्रयत्न करू तितकं आपल्याला नेमकं काय केली पाहिजे याची जाणीव होते. त्यावेळी घेतलेले आपले निर्णय विचार करून घेतलेले असतात. म्हणूनच मन स्थिर ठेवा आणि स्वतःला जास्तीत जास्त जाणून घ्यायचा प्रयत्न करा.

2 thoughts on “जेव्हा आपले निर्णय स्थिर नसतात, तेव्हा आपण फक्त विचारात गुरफटत जातो.”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!