Skip to content

मनातील भावना जास्त व्यक्त केल्या तर त्यांना किंमत उरत नाही. 

मनातील भावना जास्त व्यक्त केल्या तर त्यांना किंमत उरत नाही.


हर्षदा पिंपळे


“अगं कधीतरी तुझ्या भावना व्यक्त करत जा.किती काळ असं त्यांना मनामध्ये दडवून ठेवणार आहेस ?चांगलं नसतं असं सगळं मनात साठवून ठेवणं.”

“तो कधीही बोलत नाही. त्याला काही सांगताच येत नाही. मनातलं घडाघडा आजपर्यंत कधी बोललाय तो.”

“अरे कधीतरी व्यक्त व्हावं रे.सारखं असं मनात कुढत बसून काय होणार ?तु बोललाच नाही तर तुझ्या मनातील घालमेल कळणार तरी कशी?”

असे संवाद आपल्याला नवीन नाही. असे संवाद आपण नेहमीच ऐकत असतो.आता आपल्या आजुबाजूला वेगवेगळ्या प्रकारची लोकं असतात.आणि प्रत्येकाचे स्वभाव हे वेगवेगळे असतात. कुणी मनातील भावना सहजपणे व्यक्त करतं तर कुणी मनातील भावना व्यक्त करत नाही. आता प्रत्येकाची यामागची कारणं ही निरनिराळी असतात. कुणाला शेअरींग करणं आवडतं तर कुणाला आवडत नाही. कुणाला वाटतं शेअरींग केल्याने इतरांनाही त्रास होतो तर कुणाला वाटतं शेअरींग केल्याने त्रास कमी होतो.मन मोकळं होतं.पण तरीही मनातील भावना व्यक्त करायच्या की नाही हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे.

पण हल्ली असही म्हंटलं जातं की, मनातील भावना जास्त व्यक्त केल्या तर त्यांना किंमत उरत नाही.म्हणून भावना व्यक्त न केलेल्याच बऱ्या!

खरचं असं काही असतं का ?

तर अर्थात, सध्याची परिस्थिती पाहता तर खरचं मनातील भावना व्यक्त करताना अनेकदा विचार करावा लागतो.हल्ली कोण कोणाशीही कशाप्रकारे वागेल काही सांगता येत नाही.त्यामुळेच कित्येकजण मनातील भावना व्यक्त करण्यासाठी घाबरतात.किंवा त्या व्यक्त करण्याचं टाळतात.एकतर हल्ली धकाधकीच्या जीवनात लोकं इतकी व्यस्त झाली की काही विचारायलाच नको.इतरांकडे तर नाहीच पण माणसाचं स्वतःकडेही फारसं लक्ष नाही.(तो फक्त पैशाच्या मागे धावत सुटला आहे.)

तर अनेकदा या भावना व्यक्त न करण्यामागे हेच कारण आहे. वारंवार जर एखादी व्यक्ती मनातील भावना शेअर करत असेल तर कालांतराने त्याला काही अर्थच राहत नाही. त्या चांगल्या असो वा नकारात्मक.”बस् कर रे कंटाळा आला तुझं हे ऐकून. नेहमी काय रडत असतोस.” “ती नं तशीच आहे. सारखं आपलं तिचं रडगाणं तरी ऐकवते किंवा मग कौतुक तरी ऐकवत असते.” अशी वाक्यही आपल्या कानावर आल्याशिवाय राहत नाही.कधी कधी तर “अच्छा, बरं” असं म्हणून सरळ सरळ इग्नोर केलं जातं.साहजिकच समोरच्याला आपल्या गोष्टी ऐकण्यात आणि आपल्यात काहीही रस उरलेला नसतो.परंतु या गोष्टी सहजासहजी आपल्या लक्षात येत नाहीत.आपण आपलं माणूस म्हणून भावना व्यक्त करायला जातो.हक्काने आपल्या मनातील कोंडलेलं,साठलेलं सगळं त्यांच्याकडे व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो.अनेकदा सगळे समजून घेतात. आपलं म्हणनं मनापासून ऐकून घेतात.पण कालांतराने त्यांना या सगळ्यापासून सुटका हवे असते.आपली सततची रडगाणी/फिलॉसॉफी ऐकून वैतागत असावीत ती,कदाचित!

मित्रांनो आपण पाहतो की,कोणत्याही गोष्टीचा अतिरेक झाला की नकोसं होतं.एखादी गोष्ट एका मर्यादेपर्यंत आपण सहन करू शकतो.इतकच नव्हे तर आपण कुणासाठी सातत्याने अवेलेबल असलो तर आपल्याला गृहीतच धरलं जातं.आपली किंमत कालांतराने कमी होत जाते.अगदी तसचं मनातील भावना जास्त व्यक्त केल्या की त्यांना सहसा काही किंमत उरत नाही.”ही काय नेहमीचच बोलतेय.कधी काय बोलावं,कुणासमोर बोलावं काहीच कळत नाही. “”ही अशीच,तो तसाच” असं म्हणून अनेकदा आपल्याला सोडून दिलं जातं.आपल्या भावनांचा त्यावेळी फारसा विचार केला जात नाही.अनेकदा तर लोकं आपल्या बोलण्यावर सर्रासपणे हसताना दिसतात. तेच तेच ऐकून माणूस शेवटी कंटाळतो.हळुहळू त्याला भावनांची किंमत कमी वाटायला लागते.

त्यामुळे भावना कुठे आणि कशा व्यक्त करायच्या हे थोडं जाणून घ्या.त्यांची एक मर्यादा ठरवून घ्या.भावना व्यक्त करणं चुकीचं नाही. परंतु त्यांना आपणच आवर घालायला हवा. आपल्या भावनांची किंमत कमी होऊ द्यायची नसेल तर जास्त बोलण्यापेक्षा मुद्देसूद बोलायला शिका.उगाचच स्वतःच्या भावनांची किंमत कमी करून घेण्यात काहीच अर्थ नसतो.

वेळप्रसंगी नक्की व्यक्त व्हा.फक्त, व्यक्त होता होता इतकेही वाहत जाऊ नका की,जिथे तुमच्या भावनांची किंमत कमी होईल.त्यापेक्षा स्वतःच्या भावनांची काळजी घ्या. स्वतःच्या मनाची काळजी घ्या.


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “मनातील भावना जास्त व्यक्त केल्या तर त्यांना किंमत उरत नाही. ”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!