Skip to content

समोर असलेल्या समस्या सोडवण्याऐवजी आपण मागच्या समस्यांचा विचार का करतो?

समोर असलेल्या समस्या सोडवण्याऐवजी आपण मागच्या समस्यांचा विचार का करतो?


अपर्णा कुलकर्णी


विनायक कुलकर्णी यांना तीन मुले. अभय, अनघा आणि अर्पिता. विनायक कुलकर्णी स्वभावाने अत्यंत कड़क. मुलांकडून जराही चूक झाली तरी त्यांना चालत नसे. कधी मुलांना उपाशी ठेव, कधी बेदम मारहाण कर तर कधी शिवीगाळ कर असा त्यांचा स्वभाव होता. त्यांची पत्नी अंजली आणि तीनही मुले त्यांना खूप घाबरत असत. त्यांचा दराराच होता तसा. त्यामुळे घरातील बऱ्याचशा गोष्टी विनायक रावांपासून लपून छपून केल्या जायच्या.

अशातच तिन्ही मुले शिकली आणि मोठी झाली. तशी विनायकरावांची आर्थिक परिस्थिती खूपच नाजूक होती. विनायकराव शेती बघत असल्याने निसर्ग पावला तर घरात सगळे अलबेल चालायचे नाहीतर आहे त्यात आणि तेवढ्यातच भागवावे लागे. त्यामुळे मुलांचे हट्ट, अपेक्षा कधी त्यांनी बोलून दाखवल्याच नाहीत आणि विनायक रावांपर्यंत त्या कधी पोहचल्याच नाहीत.

अनघा आता लग्नाला आली होती, घरात सगळेच तिच्या लग्नासाठी मुलगा बघण्याच्या तयारीत असताना अनघा मात्र एका मुलासोबत पळून गेली आणि जाताना चिठ्ठी ठेवून गेली.

बाबा, तुम्ही आजवर आम्हाला खूप त्रास दिला, छोट्या छोट्या गोष्टीची खूप मोठी शिक्षा दिली. त्यामुळेच तुमचा स्वभाव पाहता मी कोणाशी तरी प्रेम विवाह करावा हे कधीच तुम्ही मान्य केले नसते. म्हणूनच मी निघून जात आहे असा उल्लेख त्यात होता.

विनायकराव हे सगळं पाहून खूपच चिडले होते आणि पर्यायाने सगळा राग अंजली आणि मुलांवर काढला होता. अर्पिता आणि अनघाच्या वयात एकाच वर्षाचे अंतर असल्याने विनायकरावांनी ठरवून टाकले होते की अर्पिताचेही लग्न उरकून टाकायचे. आधीच अनघाचा झालेला प्रेम विवाह त्यात अर्पिताची इच्छा विचारात न घेता केलेली नाव नोंदणी आणि त्यातून तीन वर्षे दाखवण्याचा कार्यक्रम करण्याचा केलेला बाजार. यामुळे अर्पिता वैतागून गेली आणि येईल त्या स्थळाला होकार देऊन मोकळी झाली.

तिचे लग्न झाले आणि विनायक रावांनी सुटकेचा श्वास घेतला. त्यानंतर दोन वर्षे निघून गेली आणि एक दिवस अर्पिता तिच्या मुलीला घेऊन कायमची माहेरी आली. तिचा नवरा एक नंबरचा फ्रौड माणूस होता. लग्न झाल्यावर काहीच दिवसात अर्पिताच्या लक्षात येऊनही ती निमूटपणाने सहन करत राहिली होती. तिच्या नवऱ्याचे दुसऱ्याच बाई बरोबर अनैतिक संबंध होते.

रात्री अपरात्री कधीही घरी यायचे, अर्पितावर चिडचिड करायची, कधी कधी मारहाणपण व्हायची. पण आता अर्पिताला सहन होईना कारण तिच्या नवऱ्याने रागाच्या भरात मुलीला पण उचलून फेकून दिले होते. त्यामुळे घरी आल्यावर जेंव्हा विनायकरावांना सगळे सांगितले तेंव्हा मात्र ते कोलमडून पडले. काय करावे ते त्यांना सुचेना. राहून राहून त्यांना एकच वाटे की सुरुवातीला मी अर्पितासाठी तीन वर्षे चांगली चांगली स्थळे आणली होती पण हिने ती नाकारली.

कधी मुलाच्या शिक्षणावरून, कधी दिसण्यावरून तर कधी नोकरीवरून. त्यातील एखाद्या स्थळाला हिने होकार दिला असता तर परिस्थिती वेगळी असली असती. पण आता हे सगळं बोलून काय उपयोग होता ?? जरी विनायकराव अर्पिताच्या काळजी पोटी बोलत असले तरीही त्यातून निष्पन्न काहीच होणार नव्हते. म्हणूनच अर्पिताला प्रश्न पडला होता समोर असलेल्या समस्या सोडवण्या ऐवजी आपण मागच्या चुकांचा विचार का करतो ???


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!