Skip to content

माणसे बदलण्याची ५ प्रमुख कारणे!

माणसे बदलण्याची ५ प्रमुख कारणे!


काव्या धनंजय गगनग्रास

(समुपदेशक)


बदल, ही एक अशी गोष्ट आहे जी कधीही न बदलणारी आहे. साध्या भाषेत सांगायचं झालं तर एक अपरिहार्य गोष्ट. जी कोणाच्याही हातात नाही, अगदी निसर्गाच्या देखील. कारण त्यात देखील बदल हे होतच असतात. आज रुजत घातलेलं बी, काही दिवसांनी त्याला एक छोटासा अंकुर फुटलेला दिसतो. वर वर अगदी छोटा असला तरी जमिनीच्या खाली त्यात कितीतरी बदल होत असतात. यामुळेच तर आपल्याला निसर्गाची वेगवेगळी रूप जी विलोभनीय देखील असतात आणि घाबरवून टाकणारी देखील. वर वर दिसणार हे दृश्य मागे होत असलेल्या बदलाचाच तर परिणाम असत.

जसं निसर्गाचं तसच वेळेचं, परिस्थितीच. ती देखील कधीच एकसारखी रहात नाही. चिरकाल टिकत नाही. म्हणून तर त्याच इतकं महत्त्व आहे. अगदी हवेत गेलेल्या माणसाला खाली आणायची ताकत, आयुष्याची किंमत शिकवायची ताकत वेळेत आहे. कारण ती सारखी बदलत राहते. आपण एखाद्याला धीर द्यायचा असला तरी हेच म्हणतो की हे वेळ फार काळ राहणार नाही, दिवस बदलतील, चांगले दिवस येतील. याउलट गर्वाने फुललेल्या माणसाला पण हेच सांगितल जात की, वेळ सर्वांवर येते. त्याचा इतका गर्व करू नये. माणूस कोणत्या आधारावर या गोष्टी बोलतो? कारण बदल हाच सृष्टीचा नियम आहे.

जर सर्व बाबतीत बदल होतच असेल तर माणूस तरी त्याला अपवाद बनून कसा राहील? अस कधीच होत नाही की माणूस जसा जन्माला आला तसाच तो आयुष्यभर राहिला किंवा जगला. एक माणूस म्हणून आपण स्वतः हे अनुभवलं असेल. आठवून पहा आपल्या लहानपणीचे दिवस आणि आताचे आपण. आपल्यात झालेला बदल लगेच लक्षात येईल. आपल्या आजूबाजूची माणसं आपण बदलताना पाहिलेली आहेत. इतकी की आपण त्यांना ओळखू शकणार नाही. त्यांच्यामध्ये अंतर्बाह्य बदल झालेला असतो आणि आपण मात्र आश्चर्य करत राहतो की आपल्याला भेटलेली किंवा आपण ज्या व्यक्तीला कोणे एके काळी ओळखत होतो ती हीच का? पण अस होत.

जसं आधी म्हटल, आपल्याला दिसताना झालेला बदल दिसला असला तरी तो काही एका दिवसात झालेला नसतो. त्यामागे अनेक कारण असतात जी खूप कमी वेळा समजतात आणि जी त्या व्यक्तीलाच माहीत असतात. म्हणूनच पाहणाऱ्याला त्याच आश्चर्य वाटत राहतं. प्रत्येक माणूसच वेगळा आहे त्यामुळे बदलण्याची कारणं देखील माणसानुसार बदलत जातात. त्यातलीच पाच कारण आपण पाहणार आहोत.

१. परिस्थिती: परिस्थिती, आपल्याला येणारे अनुभव आपल्याला खूप काही शिकवून जातात. आपल्या आयुष्यात एकदातरी असा काळ येऊन जातो जो आपल्याला आतून बाहेरून बदलून टाकतो. मग तो चांगला पण असू शकतो किंवा वाईट पण. कोरोनाच्या आधी लोक स्वतःची काळजी घेत नव्हते का? तर हो! पण ह्या आजारादरम्यान लोक स्वतः बद्दल अधिक जागरूक झाले, आयुष्याबद्दल जागरूक झाली, जगण्याची किंमत त्यांना समजली. या लॉकडाऊनमधून, आजारामधून जी लोक बाहेर पडली ती स्वतःच एक नवीन व्यक्तिमत्त्व घेऊन बाहेर पडली. हा देखील एक बदलच आहे.

आयुष्याला हलक्यात घेणे, गृहीत धरणे हे कमी झालं. इथे झालेला बदल हा सकारात्मक आहे. काही लोक मनाने कठोर वाटतात, तुटक वागतात. ज्यांनी त्यांना आधीपासून पाहिलेलं असत त्यांना त्यांच्यातील हा बदल लगेच जाणवतो. पण त्यामागे आलेले अनुभव असतात. सुरुवातीच्या आयुष्यात अस काही भोगले असत की जे आता असा माणूस बनायला भाग पाडत.

त्यामुळे परिस्थिती हे सर्वात मोठं कारण आहे माणूस बदलण्याचं.

२. काळानुसार होणारा बदल: ज्या बी ला रुजवलं तिचा जसा अंकुर उगवतो, तस तिचं कधी रोपात तर कधी मोठ्या झाडात रूपांतर होणारच आहे आणि हे निश्चित आहे. आता हे सर्व होत असताना त्यात बदल हे होतातच. जसं जसं ते मोठ होणार तस ते अधिक परिपक्व होत जाणार. माणसाचं पण तसच आहे. जसं जसं वय वाढत, अनुभव विश्व वाढत तसा माणूस बदलत जातो. मी जशी दहा वर्षांपूर्वी होते तशीच मी आता असणार नाही आणि पुढील दहा वर्षात देखील असणार नाही. त्यात बदल हा होणारच.

कारण लहानपणीच अनुभव विश्व वेगळं होत, लहान होत. वय वाढेल तस आजूबाजूची परिस्थिती, माणसं त्या अनुषंगाने अनुभव बदलतात आणि त्यानुसार स्वतः मध्ये योग्य तसा बदल करण हे समायोजन क्षमता चांगली असल्याचं लक्षण आहे. जितकं आपण नवीन परिस्थितीला, अनुभवांना अडाप्ट होऊ तितकं आपल्याला कमी त्रास होतो.

३. जाणीवपूर्वक केलेलं बदल: आपल्या बाबतीत अस कधी झालं आहे का की आपल्याला समजलं आहे आतापर्यंत आपण ज्या पद्धतीचे आयुष्य जगत होतो, किंवा जश्या आपल्या सवयी होत्या त्या चुकीच्या आहेत. त्यातून आपलं नुकसानच झालं आहे आणि आता हीच ती वेळ आहे की आपण स्वतःमध्ये बदल केला पाहिजे. हा एक प्रकारचा साक्षात्कार असतो ज्यातून आपण प्रेरित होऊन स्वतःमध्ये बदल करायचं ठरवतो. हा बदल कोणी आपल्यावर जबरदस्तीने थोपवलेला नसतो तर हा आपण आपल्या निवडीने करायचा ठरवलेला असतो. कारण यातून आपलं चांगलच होणार आहे हे आपल्याला ठाऊक असत. माणूस कधीही बदलू शकत नाही हे इथे लागू होत नाही. आयुष्याचा कुठल्यातरी एका टप्प्यावर आपण बदलातोच. वाल्याचा वाल्मिकी झाला याहून मोठ उदाहरण आपल्यासाठी काय असू शकेल?

४. जबरदस्तीने केलेला बदल: जसं आपण स्वतःच्या मर्जीने म्हणजेच ज्याला आपण आंतरिक प्रेरणा म्हणतो त्याने बदलतो त्याच प्रमाणे आपण बाह्य प्रेरणेने देखील अनेकदा स्वतः मध्ये बदल करतो. त्या काळापुरत का होईना आपण बदलून जातो. हा बदल मनापासून केलेला असतोच अस नाही. तर त्यातून काहीतरी मोबदला आपल्याला मिळणार असतो.

मुलांना गप्प करण्यासाठी अनेकदा खाऊच तसच खेळण्याचं आमिष दाखवल जात. त्यामुळे मनात नसताना देखील ती गप्प बसतात. जरी त्यांचा तो मुल स्वभाव नसला तरीही. आयुष्यात देखील अश्या काही गोष्टी घडतात आपल्याला अनेकदा अस काही मिळवायचं असत जे मिळवण्यासाठी स्वतःला जबरदस्तीने बदलाव लागत. हा बदल त्या वेळेसाठी केलेला नसून त्यानंतर जे काही मिळणार आहे त्यासाठी केलेला असतो. पण हेही तितकच खर आहे की आंतरिक प्रेरणेने केलेला बदल जितका जास्त काळ टिकतो तितका हा टिकत नाही.

५. गरज सरो वैद्य मरो: ही म्हण आपल्या सगळ्यांना चांगलीच परिचयाची असेल. गरज सरो वैद्य मरो म्हणजे काय? तर आपल्याला जेव्हा गरज असेल, निकड असेल तेव्हाच आठवण काढायची, किंवा नात ठेवायच. आपली गरज जेव्हा पूर्ण होते तेव्हा सोयीस्कर रित्या विसरुन जायचं. असे अनुभव आपल्याला अनेकदा येतात तेव्हाच आपण विचार करतो या माणसाचं कोणत वागणं खर होत? जेव्हा ती माझ्यासोबत होती तेव्हाच की आताच? माणसं ओळखायला शिका म्हटल जात ते ह्यासाठी. कारण आपल्याला सर्व प्रकारची, सर्व स्वभावाची माणसं भेटत असतात. अश्या वेळी गरजेचं नाही एक माणूस चांगला निघाला म्हणून दुसरा पण तसाच असेल. गरजेपोटी फायदा घेणारेही बरेच जण असतात. त्यांनी स्वतःमध्ये केलेला हा बदल कोणत्या तरी गरज पूर्तीसाठी असतो. ती जेव्हा पूर्ण होते तेव्हा ते आपल्या मूळ रूपात येतात. जे पचवणं आपल्याला जड जात.

बदल हा कधी एकाच पद्धतीचा असत नाही. तो चांगलाही असतो आणि वाईटही. ते आपल्या हातात आहे आपण कोणत्या हेतूने हा बदल करत आहोत.


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “माणसे बदलण्याची ५ प्रमुख कारणे!”

  1. लेख छान पण हे सगळे कॉमन बदल, याला ग्राह्य धरून, वैवाहिक जीवनातले बदल मग ती स्त्री असो अथवा पुरुष. आजच्या घडीला चाललेले बदल. त्यामुळे भारतीय संस्कृती बदल काय, आता चे लिखाण ग्राह्य धरून काही लिहा

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!