Skip to content

आयुष्य म्हणजे आरसा… जेव्हा तुम्ही हसाल तेव्हाच ते सुद्धा हसेल.

आयुष्य म्हणजे आरसा… जेव्हा तुम्ही हसाल तेव्हाच ते सुद्धा हसेल.


अपर्णा कुलकर्णी


मनीषा ताई आज खूपच आनंदात होत्या. आज कितीतरी वर्षांनी त्यांची भाची घरी येणार होती. त्यामुळे किचनमध्ये लगबग होती. आज सगळेच पदार्थ त्या विभावरीच्या आवडीचे बनवणार होत्या. त्यामुळेच त्यांचा मुलगा मनोज त्यांना चिडवत म्हणत होता, आज कीती उत्साहाने स्वयंपाक करतेस आई, आणि चेहऱ्यावर काय आनंद पसरला आहे ना तुझ्या ?? असा उत्साह कधी माझ्यासाठी जेवण बनवताना दिसत नाही तुझ्या चेहऱ्यावर. त्याचे हे खोचक बोलणे ऐकून त्यांनी सरळ लाटणे घेऊन त्याच्या मागे धावायला सुरुवात केली. तेवढ्यात मनोजचा फोन वाजला, त्याने पाहिले तर विभावरीचा फोन होता. त्याने फोन ठेवत मनीषा ताईंना सांगितले, आई अर्ध्या तासात उतरतीय विभा स्टेशनवर. मी तिला घेऊन येतो, तोपर्यंत तू सगळा स्वयंपाक तयार ठेव. मनीषा ताई आनंदाने होकार देत किचनमध्ये निघून गेल्या.

मनोज गाडीवरून जात असताना त्याला त्याच्या अतिशय घट्ट मित्राचा म्हणजे, वेदांतचा फोन आला. त्याला ही स्टेशन रस्त्यावरच साईटच काम असल्याने त्याने फोन केला होता. त्याची गाडी रस्त्यावरच बंद पडली होती आणि उशीर होत असल्याने त्याने मनोजला फोन केला आणि योगायोगाने तो ही तिकडेच निघाला होता. मनोजने वेदांतला पिक केले आणि दोघेही स्टेशनकडे निघाले. रस्त्यात वेदांतची साईट व्हिझिट पुढे ढकलली गेल्याचा त्याला फोन आला त्यामुळे तो ही स्टेशनवर मनोज सोबत आला होता. थोड्याच वेळात विभावरी बस मधून उतरली आणि मनोज सामान घेण्यासाठी पुढे गेला.

वेदांतने विभावरीला पाहिले आणि तो तिच्याकडे बघतच राहिला. कमनीय बांधा, बारीक पण बोलके डोळे, गाल म्हणजे जणू गुलाबाच्या पाकळ्या, लांब पण आकर्षक ओठ, पाठीवर स्थिरावलेली केसांची लांब वेणी आणि अंगावर पिवळ्या शेडचा कुर्ता. हा कुर्ता तिच्या गोऱ्यापान अंगावर चांगलाच शोभून दिसत होता. विभा हा माझा मित्र, सखा, भाऊ, सोबती, सगळ्याच गोष्टींचा साक्षीदार माझा यार वेदांत आणि वेदांत ही विभावरी. माझी मावस बहिण.

विभाने त्याच्याकडे बघून छोटी स्माईल दिली आणि तिचे हसरे रुप बघून तर वेदांत उडालाच. मनोजच्या आवाजाने तो भानावर येत म्हणाला, नाइस टू मीट यू. मी वेदांत सिव्हील इंजिनियर आहे. मनोजचा मित्र म्हणत त्याने शेक हॅण्ड करण्यासाठी हात पुढे केला पण विभाने सरळ दोन्ही हातांनी नमस्कार केला. त्यामुळे त्याचा चेहरा पडला पण लगेच स्वतःला सावरत त्याने ही हात पुढे नमस्कार केला.

विभा घरी आली तसे, मनीषा ताईंनी पटकन भाकरी तुकडा ओवाळून टाकला आणि तिचे स्वागत केले. तिच्या आवडीचे केलेले सगळेच पदार्थ सगळ्यांनी आवडीने खाल्ले आणि विभा आराम करण्यासाठी रूममध्ये आली.

आई, अजूनही विभा पहिल्यासारखी हसून खेळून रहात नाही का ?? एवढी शिकलेली, सवरलेली विभा पण एका घटनेने तिचे आयुष्य किती बदलून गेले ना ?? आधी किती हसून खेळून रहात होती विभा. पण आता ती कोणाच्या हातात सहज औपचारिकता म्हणून हात द्यायला ही घाबरते आहे. असे म्हणत मनोजने स्टेशनवर वेदांत आणि विभावरीच्या भेटीचा किस्सा सांगितला. त्यावर मनीषा ताई म्हणाल्या, खरंय तुझ. जॉब करणारी, हसून खेळून राहणारी आपली विभा पहायला नाही मिळाली. म्हणूनच मंजिरीने तिचं दुःख कमी व्हावं म्हणून इथे पाठवले ना तिला. मनोजने मोठा श्वास घेतला आणि म्हणाला मी प्रत्येक प्रयत्न करेन तिच दुःख विसरण्यासाठी.

बरेच दिवस झाले होते विभावरीला आपल्या मावशीकडे येऊन पण ती अजूनही स्वतःला विसरून कोणात मिसळत नव्हती. दरम्यान वेदांतचे येणे जाणे वाढले होते. तो पहिल्याच नजरेत विभावरीच्या प्रेमात पडला होता. मनोज आणि मनीषाताई परोपरीने तिला एकटीला न राहू देता सगळ्यात मिसळायला भाग पाडत होते. मनोज काम सांभाळून तिला फिरायला, शॉपिंगला, मूव्ही बघायला घेऊन जात होता तर मनीषा ताई मंदिरात, त्यांच्या मैत्रिणीकडे घेऊन जात होत्या. पण अजूनही फारसा परिणाम दिसून येत नव्हता.

एके दिवशी वेदांत घरी आला आणि त्याने त्याच्या मनाच्या भावना मनीषा ताई आणि मनोजला सांगून टाकल्या. त्याचे बोलणे ऐकून मनोज आणि मनीषा ताईला काय बोलावे कळेना. पण आता खरे सांगण्याची वेळ आली आहे म्हणून मनोजने सांगायला सुरुवात केली तेवढ्यात विभावरी सामान घेऊन आली आणि सगळेच गप्प झाले. मनीषा ताई तिला घेऊन किचनमध्ये गेल्या आणि मनोज वेदांतला घेऊन बाहेर आला आणि म्हणाला, तुला विभाचा भूतकाळ माहीत नाही. तो आधी ऐकून घे आणि विचार करून योग्य तो निर्णय घे.

विभाज्या ऑफिसमध्ये काम करत होती तिथे एका मुलाच्या प्रेमात होती. तिने त्याच्यावर इतका विश्वास ठेवला की लग्नाआधीच सर्वस्व देऊन बसली आणि त्या मुलाने लग्नाचे नाव काढताच तिला नकार देऊन मोकळा झाला आणि शहर सोडून निघून गेला. त्यामुळे ती अशी शांत झाली आहे. तू नीट विचार कर आणि निर्णय घे. वेदांत हे ऐकून शॉक झाला आणि काहीच न बोलता निघून गेला. चार पाच दिवस होऊन गेले पण वेदांतने मनोज सोबत कसलाच कॉन्टॅक्ट ठेवला नाही.

मनीषा ताई आणि मनोज पुन्हा खचले. पण थोड्याच दिवसात वेदांत घरी आला ते ही आईला घेऊन आणि सगळेच असताना त्याने विभाला सरळ लग्नाची मागणी घातली. पण विभा मात्र काहीच न बोलता निघून गेली आणि तिच्या मागे मनोज आणि वेदांत खोलीत आले. विभा खूप रडत होती, तेंव्हा वेदांत तिला म्हणाला, तुझ्या भूतकाळात काय घडले याची कल्पना दिली मला मनोजने. एक व्यक्ती चुकला म्हणून सगळेच तसे असतील किंवा आता कोणावरही विश्वास ठेवायचा नाही असे ठरवणे धरणे चुकीचे होईल ना विभावरी ??

मला मान्यच आहे की जे काही झालं त्याचा तुला खूपच मनस्ताप झाला आहे. कदाचित ही सल आयुष्यभर राहील पण म्हणून आयुष्य इथेच थांबून राहणार आहे का ?? किंवा तू पूर्ण आयुष्य एकटीनेच काढणार आहेस का ?? कधी ना कधी पुढे पाऊल टाकावेच लागेल. तुला हवा तितका वेळ तू घे पण सकारात्मक विचार करून निर्णय घे. तुझ्या निर्णयाचा मी मान ठेवीन. वेदांतचे हे बोलणे ऐकून मनोज म्हणाला, आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात बरेच चढ उतार येतात.

अनेकदा विश्वास घात होतो, मानसिक खच्चीकरण होते पण म्हणून आपण जगणे सोडत नाही, हार मानून बसत नाही. आलेल्या अनुभवातून शिकवण घेऊन पुन्हा नव्याने उभ राहण्याचा प्रयत्न करतोच. शेवटी आपलं आयुष्य म्हणजे आरसा… आहे, जेव्हा तुम्ही हसाल तेव्हाच ते सुद्धा हसेल. त्यामुळे निराश न होता सकारात्मक राहून आरशात पाहून हसायचं म्हणजे ते ही हसेल. हो ना ?? मनोजच्या या बोलण्यावर विभा पहिल्यांदा मनापासून हसली आणि मनोजने तिचा हात वेदांतच्या हातात दिला.


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!