Skip to content

काही व्यक्तींनी आपली नजर फक्त सगळ्या गोष्टीत चूक काढण्यासाठीच तयार केलेली असते.

काही व्यक्तींनी आपली नजर फक्त सगळ्या गोष्टीत चूक काढण्यासाठीच तयार केलेली असते.


काव्या धनंजय गगनग्रास

(समुपदेशक)


“लीना ऐकलस का? ताई येणार आहे उद्या आपल्याकडे चार दिवसांसाठी. दुपारी कॉल आला होता मला तिचा. तिने आठवणीने तुला निरोप द्यायला सांगितला आहे.” मयुरेश हॉलमध्ये बसल्या बसल्याच लीनाला सांगू लागला. लीना आत मध्ये त्याला पाणी आणायला गेली होती. ताई येणार हे ऐकल्यावर ती लगेच बाहेर आली. त्याला पाणी देत ती म्हणाली, अचानक कसं काय येत आहेत त्या? म्हणजे या बाजूला काही काम काढलय का?

लीनाच्या चेहऱ्यावर टेन्शन साफ दिसत होत. तिच्याकडे पाहून मयुरेश हसू लागला व म्हणाला, अग तु का टेन्शन घेत आहेस इतकी? काही काम नाहीये तिचं सहज आपल्याला भेटायला म्हणून येत आहे. “भेटायला की माझ्या चुका काढायला.” लीना तोंडातल्या तोंडात कुजबुजत म्हणाली. “काय काय म्हटलस तू?” मयुरेशच्या प्रश्नावर लीना काही नाही म्हणत तिथून निघून गेली. का नाही येणार लीनाला टेन्शन? ताईच वागणं तसच होत. घरात पाऊल ठेवल्या बरोबर त्यांची नजर पहिल्यांदा काय शोधत असेल तर त्या चुका.

जे इतर कोणाला दिसणारही नाही अश्या गोष्टी त्यांच्या नजरेत येत. किंबहुना त्या त्यांना तितकं महत्व देऊन चुकीचं ठरवत. लीना ने कितीही नीट व्यवस्था केली असली तरी त्या बोलायला काहीतरी शोधून काढतच. मागच्या खेपेस जेव्हा त्या आल्या होत्या तेव्हा त्यांनी लीनाला रडायचं तेव्हढ बाकी ठेवलं होत. दिवाळीचा सण म्हणून मयुरेशने त्यांना घरी जाऊन आमंत्रण दिलं होत. मोठी आणि एकुलती एक बहिण. एरवी दोघांच्या संसारात आणि कामाच्या व्यापात भेटी फारश्या व्ह्यायच्या नाहीत. सणाच्या निमित्ताने तेव्हढ्या भेटीगाठी होत असत.

म्हणून मयुरेशने तिला बोलवलं. आल्यासारखी भाऊबीज करून गेली असती. दिवाळी किंवा कोणताही सण हा आनंद, उत्साह आणत असतो. आपण कितीही आजारी असू, थकलेले असू सण आपल्यामध्ये चैतन्य आणतात. प्रत्येक गोष्ट आपण हौसेने आवडीने करतो. लीना पण खूप हौशी होती. तिने यावर्षी दिवाळीची सजावट, फराळ सर्व स्वतःच करायचं ठरवलं होत आणि ताई येणार होत्या त्यामुळे तिला वाटलं त्याची मदत होईल. पण तिला वाटलं त्याच्या बरोबर उलट सर्व होत गेलं.

कारण आल्यापासून जाईपर्यंत ताईंनी कोणत काम अगदी मनापासून केल असेल तर ते चुका काढण्याचं. अगदी घरात पाऊल टाकल्यावर त्या बोलल्या, मयूर घरात दिवाळी आहे आणि ही काय अवस्था करून ठेवली आहे घराची. नुसता पसारा काय साफ सफाई करता की नाही दोघं? मयुरेश आणि लीना दोघंही त्यावेळी नोकरी करत होते. घरी दोघांपैकी कोणीही जास्त नसे. तरी दिवाळी म्हणून लीनाने कसबस सर्व मैनेज करून घर नीट केल होत.

आता घरात माणसं राहतात म्हटल्यावर वस्तू जरा इकडच्या तिकडे होणारच. त्यात काय आणि कसली चूक काढणार? पण ताईना सर्व परफेक्ट लागे. तिला स्वछतेची आवड होती त्यामुळे ती अस बोलली अस वाटून त्या दोघांनी विषय सोडून दिला. पण नंतर जेव्हा लीना सजावटीच्या वस्तू बनवू लागली तेव्हा पण हे फुल असच नसत बनवायचं, तो कंदील कसा वेगळाच झाला आहे. याचा रंग खूप भडक आहे अस त्या म्हणू लागल्या. लीना खूप आवडीने हे सर्व करत होती.

मदत, कौतुक नको पण निदान वारंवार अस बोलून तिला demotivate केल जाऊ नये अशी तिची इच्छा असायची. ताईंच्या या बोलण्याच तिला खूप वाईट वाटायचं. पण मयुरेश तिला समजावून सांगायचा. ताई काही जास्त दिवस राहणार नाही, तिचा स्वभाव तसा आहे. तु मनाला लावून घेऊ नको. तुझ तू सर्व करत रहा अस तो लीनाला सांगायचा. सजावटीपर्यंत ठीक होत पण ताई लीनाच्या फराळावर पण काही ना काही बोलू लागल्या. हे असे लाडू असतात का? धड गोड नाही, तूप नाही नुसते कोरडे. करंजीमध्ये तर पुरणच नाही.

लीना काही अगदी सुगरण नव्हती. तिला जसं जमत होत तस ती करत होती. बर एखाद्याकडून चुका होऊ शकतात. पण त्या सांगायची पण एक पद्धत असते. जेणेकरून तो पुढच्या वेळी ती चूक सुधारेल. पण ताईंच तस नव्हत. त्या समोरच्या माणसाला काय वाटेल याचा विचार न करता पटकन बोलून जात. बर खरच त्या गोष्टी चुका काढण्यासारख्या होत्या अस नाही. लीनाने तिच्याप्रमाणे त्या नीट केल्या होत्या. निदान तिच्या प्रयत्नांना तरी ताईंनी दाद द्यायला हवी होती.

आपण जेव्हा मनापासून काही करतो तेव्हा त्याने समोरच्या माणसाला निदान थोडातरी आनंद व्हावा अस आपल्याला वाटत असत. नाहीच झाला तरी त्याने निदान आपल्या प्रयत्नांना तरी पाहावं अशी आपली इच्छा असते. पण ताईंनी जायच्या दिवसापर्यंत तस काही केल नाही. फक्त चुका काढून आणि लीनाला नको तितके सल्ले देऊन मात्र गेल्या. त्यानंतर त्या उद्या येत होत्या. लीनाला मागच्या सर्व घटना आठवून भरून आल्यासारखं झाल. पण ती काही त्यांना येऊ नका म्हणू शकत नव्हती की त्यांच्या बोलण्यावर तिचा कंट्रोल होता. तिच्या हातात फक्त जितकं सर्व नीट ठेवता येईल तितकं ठेवयाच इतकंच होत.

पण तरी व्हायचं ते झालं असत अशी तिच्या मनात भीती होतीच. आपल्या आयुष्यात, आजूबाजूला पण अशी माणसं असतात ज्यांना फक्त चुका काढायची सवय असते. अस करताना समोरच्या व्यक्तीने किती मेहनत केली असेल, त्याचे काय कष्ट असतील याकडे त्यांचं लक्ष जात नाही. तसच आपण ज्यामध्ये चुका काढत आहोत त्यात काही चांगल्या गोष्टी पण असू शकतील असा पण विचार त्यांच्या डोक्यात येत नाही. कारण त्या नजरेने पाहिलच जात नाही. जेव्हा माणूस या दोन्ही बाजूंचा विचार करेल तेव्हाच ही जिथं तिथे चुका काढायची सवय कमी होईल.


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!