Skip to content

चेहऱ्यावर फक्त आनंदीपणाचा मुखवटा लावला तर त्रास आपल्यालाच होणार.

चेहऱ्यावर फक्त आनंदीपणाचा मुखवटा लावला तर त्रास आपल्यालाच होणार.


काव्या धनंजय गगनग्रास

(समुपदेशक)


“नंदिता अग चल लवकर, आधीच आपल्याला खूप उशीर झालाय.” मीना तिला घाई करत होती. दोघही एकाच ठिकाणी काम करत होत्या. त्यामुळे त्यांची मैत्री. घरं पण तशी जवळच्या अंतरावर, त्यामुळे येताना जाताना सोबत व्हायची. मीनाचा घराचा व्याप तसा मोठा होता. घरी सासू, सासरे, तिचा मुलगा, नवरा, दिर आणि ही. सकाळी सर्व काम आवरून तिला निघाव लागे. नंदिताची गोष्ट मात्र जरा वेगळी होती. तीचदेखील लग्न झालं होत पण सध्या मात्र ती वेगळी राहत होती.

आई बाबांनी एकुलती एक लेक म्हणून लाडाने वाढवलेली. कधी कोणत्या गोष्टींमध्ये नाही म्हटले नाही. मग तिने स्वतःच्या आयुष्याचा जोडीदार निवडला तेव्हा तरी कसा नकार देतील. पण आपण घेतलेला प्रत्येक निर्णय दर वेळी बरोबरच असतो असा नाही ना! माणूस बाहेरून चांगला दिसला, शिकलेला असला, सधन असला तरी त्यावरून संस्कार थोडीच ठरतात.

लग्नाच्या काही दिवसानंतर नंदिताला याचा प्रत्यय येऊ लागला. त्याच ओव्हर पझेसीव असण, सतत संशय घेणं, तसच त्याच्या आईने यांच्या संसारात सारखी दखल देणं याचा त्यांच्या नात्यावर परिणाम झाला. नंदिताला समजून चुकलं की तिने चुकीच्या माणसाची निवड केली होती. आता तिचा जीव तिथे घुसमटू लागला होता. सतत कैद्यासारखी दिली जाणारी वागणूक असह्य होऊ लागली होती आणि म्हणून तिने त्याच्यापासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला होता.

ही प्रक्रिया पण सोप्पी नव्हती कारण अजय तिला सहजासहजी divorce देणार नव्हता. पण तोपर्यंत ती तिथे राहणार नव्हती. माहेरी तिला जायचच नव्हत. कारण लग्न तिने स्वतःच्या मर्जीने केल होत. आई बाबांनी ये म्हटल तरी ती त्यांच्याजवळ गेली नाही. तिने तिच्यासाठी एक वेगळी खोली घेतली व नोकरी शोधायला सुरुवात केली. काही दिवसांनी तिला ही नोकरी मिळाली व मीनासारखी मैत्रीण.

आई बाबांना तिची सारखी काळजी वाटे. त्यांनी आपल्या मुलीच्या आयुष्याबद्दल काय स्वप्न रंगवली होती आणि हे काय होऊन बसल होत. तिचा असा संसार मोडण त्यांच्यासाठी एक धक्काच होता. आपली मुलगी एकटी राहू शकेल का नाही? ती स्वतःला सावरू शकणार नाही अस त्यांना वाटे. म्हणून ते वरचेवर तिला भेटायला जात. तिची चौकशी करत. पण नंदिता मात्र त्यांचं हसुन स्वागत करे. कधी त्यांच्यासमोर तिने स्वतःच दुःख मांडलं नाही. जे झालं ते झालं आता पुढचं आयुष्य माझं आहे अस ती त्यांना सांगे. मुद्दाम ती दोघं आल्यावर त्यांना फिरायला घेऊन जाई, मस्त खाण्याचा बेत करत असे.

कोणत्याही पद्धतीने ती त्या दोघांना तिच्या लग्नाचा विषय काढू देत नसे. तिचा तो हसरा आनंदी चेहरा पाहून आई बाबांना पण कधी वाटे की ही खरच आपल्या आयुष्यात पुढे जाऊ पाहते. त्यामुळे तेही जुना विषय काढायचा बंद करू लागले. आई बाबांच्या बाबतीत अस नाही. मीना तिची अगदी खास मैत्रीण झाली होती पण तिच्या समोर देखील नंदिताने आपलं दुःख कधी व्यक्त केलं नाही. इतरांच्या समोर तिचा वावर नेहमी हसरा आणि प्रसन्न असे. कोणाला वाटणार पण नाही की तिच्या आयुष्यात इतकी उलथापालथ चालू आहे इतकी ती मनमोकळेपणाने वागे. आणि तिचं हे असं हसर वागणं पाहून कोणीही तिला जुने विषय काढून त्रास द्यायला पाहत नसत.

पण हे तिचं हसत खेळत बोलण, हा वावर, हा प्रसन्न चेहरा हे सर्व फक्त दाखवण्यासाठी होत. हा फक्त एक मुखवटा होता जो तिने जगाला दाखण्यसाठी केला होता. खरी नंदिता अशी नव्हती. खरी नंदिता आतून पूर्ण तुटली होती. काही अर्थी स्वाभाविक होत. कोणाला वाटेल आपल्यासोबत अस व्हावं. सुखी संसाराची तिची ही काही स्वप्न होती जी धुळीला मिळाली होती. आणि याला ती स्वतःलाच जबाबदार मानत होती. कारण अजयची निवड तिची होती.

म्हणूनच तिने ठरवलेल की आपल्या दुःखात कोणाला सामील करून घ्यायचं नाही. आपल्यामुळे अजून कोणाला त्रास नको अगदी आपल्या आई बाबांनादेखील. बाहेर कितीही ती छान वावराली तरी घरी मात्र तिचं बांध फुटे. एकटीच रडत राही, स्वतः ला दोष देत राही. रात्रीच्या रात्री जागून काढल्या तिने या विचाराने की आपण असा निर्णयच का घेतला? ना खाण्यावर लक्ष असे ना स्वतःच्या तब्येतीकडे. दुसऱ्या कोणाला ते जाणवलं कोण काही बोललं तर तिचं ठरलेल उत्तर असे की वातावरणामुळे होत अस कधी कधी, त्यात कामाचा व्याप.

दुःख सांगायला, मन मोकळं करायला कोण नसे, त्यामुळे आतल्या आत जीव घुसमटत असे. हे सर्व आपण सुरू केलं त्यामुळे याचे परिणाम आपणच भोगले पाहिजेत अशी मनस्थिती तिने केली होती आणि याचा तिला खूप त्रास होत होता. हे अस दुहेरी वागणं तिला कठीण जाऊ लागलं पण तरीही तिने हेच मान्य केलं होत आणि ती असच वागणार होती.

आपलं आयुष्य हे अनिश्चित घटनांनी भरलेले आहे. त्यामुळे कधी काय होईल कोणालाही सांगता येत नसत. पण म्हणून झाल्या घटनांना स्वतः ला दोषी ठरवून हे अस खोटं आयुष्य जगण्यात काही अर्थ नसतो. घटना कितीही त्रासदायक असल्या तरी त्या एका वेळेनंतर सोडवता येतात. त्याचा आतल्या आत त्रास करून घेऊन काहीही होत नाही. उलट आपला त्रास वाढतो. आपल्याला वाटत असत की आपल्या त्रासाने इतरांना अजून मनस्ताप होईल आपण क आपलं दुःख सांगा? पण अस नसत. कोणी सांगावं,

आपलं दुःख शेअर केल्याने कदाचित कमी होणार असेल, त्यात जर आपलीच माणसं असतील तर त्याचा एक वेगळाच आधार मिळतो. त्यामुळे फक्त बाहेरून आनंदाचा मुखवटा दाखवून काही होत नाही. महत्त्वाचा असतो तो आंतरिक आनंद, आंतरिक शांती. ती मिळवण्यासाठी आपल्याला जे झालं त्याला स्वीकारून, त्यातून बाहेर पडायला लागत. सतत स्वतःला दोष न देता एक माणूस म्हणून माफ करून यापुढचे आपले निर्णय कसे नीट असतील, विचारी असतील यावर विचार केला पाहिजे. जेणेकरून आपल्याला कोणताही मुखवटा घालायची वेळ येणार नाही.


मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!