Skip to content

स्वतःच्या इच्छा, आकांक्षा मेल्या म्हणून दुसऱ्याच्या भावनांचा खोळंबा करू नये.

स्वतःच्या इच्छा, आकांक्षा मेल्या म्हणून दुसऱ्याच्या भावनांचा खोळंबा करू नये.


गीतांजली जगदाळे


प्रत्येक व्यक्तीला त्याच्या स्वतःच्या आशा इच्छा , आकांक्षा , स्वप्न असतात . काही माणसं त्या इच्छा, ती स्वप्ने पूर्ण करण्याचा ध्यास घेतात , ते ही इतका की त्यांचं अखंड आयुष्यदेखील त्या इच्छा , स्वप्नांसाठी अर्पित करू पाहतात .तर काही व्यक्ती आपल्या काही आशा, स्वप्न यांना पूर्ण करतात आणि काही आशा -आकांक्षांना तिलांजली देताना ही दिसतात . याला परिस्थिती , अनुभव वेगवेगळ्या गोष्टी कारणीभूत असू शकतात . यासर्व परिस्थितीनुसार अनेक आशा वेगवेगळ्या परिस्थिती , वेगवेगळं वातावरण अनुभवलेली वेगवेगळी माणसं त्यात जगत असतात..

या भूतलावर वेगवेगळे दृष्टिकोन धरून वावरणारी मंडळी आपणास आढळत असते . त्यामध्ये ‘स्वतःच्या आशा आकांक्षा , इच्छा असणारी आणि नसणारी असे दोन्ही गट आढळतात .’ इच्छा असणारी माणसे इच्छा नसणाऱ्या माणसांपेक्षा कैक पटींनी जास्तच आहेत . जर उरी इच्छा असेल तर लोकांना एक जगण्याची चैतन्यशील उमेद मिळते , ऊर्जा मिळते .

आयुष्यातील challenges स्वीकारून आपल्या इच्छा, स्वप्न पूर्ण करण्यासाठी , साकार करण्यासाठी ते स्वतःची पूर्ण ताकद पणाला लावतात , अगदी जिद्दीने प्रयत्न करतात , मेहनत घेतात .त्याचबरोबर ती स्वप्न जेव्हा पूर्ण होतात तेव्हा सुखाच्या सरी उपभोगताना दिसतात . जेव्हा काही इच्छा, स्वप्न पूर्ण होत नाहीत , आपले प्रयत्न त्यात अपयशी ठरतात त्यातून देखील एक बोध मिळालेला असतो , आलेला अनुभव अगदीच निरूपयोगी कधीच ठरत नाही , आणि अशी लोकं परत एका नव्या जोमाने पुढच्या कामाला लागलेली दिसतात .पण हे सर्व लागू होते ते मनी इच्छा , आकांक्षा असणाऱ्या आशादायी माणसांबाबतीत .

ज्यांच्या इच्छा-आकांक्षा लोप पावल्यात किंवा मेल्यात त्यांचं काय ? खरंच इच्छा-आकांक्षा मेल्यात अशी माणसे अस्तित्वात असतील का ? तर हो अशीही माणसे या जगात असतात . इच्छा नसणे आणि इच्छा मारणे यात खूप फरक आहे बरं का , यात गफलत होऊ देऊ नका .

आपल्या मनी जर इच्छा नसेल , ती लोप पावलेली असेल तर जगण्याची , आयुष्य अनुभवण्याची , त्याची मजा घेण्याची अशी चमचमती उमेदच आपल्याकडे नसेल . अशी माणसे आयुष्य एक सोपस्कार असल्यासारखे जगतात . एकदम रसविरहित असं आयुष्य ही माणसं जगताना दिसतात . म्हणजे काही मिळवायचा प्रयत्न ही लोकं करत नाहीत असं नाही , पण गरजांव्यतिरिक्त फार काही मिळवण्याची यांना इच्छाच नसते .

आणि जे मिळतं किंवा मिळवलं जातं , त्याचा फक्त गरज म्हणून वापर यांच्याकडून केला जातो , त्याचा आनंद घेणं यांना कधी जमत नाही . आता लहानपणापासून या व्यक्ती अशा असतात असं नाही , पण काही अनुभव , काही निराशा , काही कठोरता जेव्हा यांच्या वाट्याला येते आणि ती जेव्हा त्यांच्या सहनशीलतेपलीकडे जाते तेव्हा मात्र यांचा आयुष्यावरून विश्वास उठतो .

दर वेळी आशा , इच्छा मनात ठेवायच्या आणि पदरी मात्र हे सगळं असं निराशादायीच येणार असेल तर का बरं स्वप्न पाहायची ? आणि मनी आशा बाळगायच्या ? असा प्रश्न पडून ही माणसे इच्छा नसल्यासारखी जगू लागतात . त्या इच्छा पूर्ण न झाल्याने म्हणा किंवा त्या पूर्ण करत असताना असा काही अनुभव त्यांच्या पदरी पडतो की त्याचा खोलवर मनात कुठेतरी परिणाम झालेला असतो . आणि त्यामुळे आयुष्यात पुढे नवीन आशा -आकांक्षा, इच्छा , स्वप्न यांना जन्म घालण्यातला रस आटतो . अशावेळी दाटसर निराशा त्यांचा भोवती दाटून आलेली असते . आणि निराशेत जगण्याची अशी सवय होऊन जाते की नवीन काहीतरी आशा , स्वप्न त्यासाठीचा उत्साह याची त्यांना जास्त भीती वाटून जाते . कधी चुकून एखादी इच्छा आली तरी देखील मागचे अनुभव , त्यांचे परिणाम यांमुळे पाऊल उचलून परत अपयश आलं तर ते पचवण्याची शक्ती आपल्यात आहे का असा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण होतो .

मानव हा सामाजिक प्राणी आहे . त्यामुळे तो एकटा असा न राहता इतर माणसांमध्ये राहताना दिसतो . जेव्हा एखादी उमेदशील व्यक्ती , एखाद्या भ्रमनिरास , इच्छाविरहित आयुष्य जगणाऱ्या माणसाच्या संपर्कात येते , किंवा जेव्हा त्यांना एकमेकांचा सहवास लाभतो तेव्हा त्याचे विविध पद्धतीने पडसाद उमटलेले दिसून येतात . आणि दोन विरुद्ध विचारधारांच्या व्यक्ती एकत्र आल्या तर काय होऊ शकतं तेच यांच्याबाबतीत ही होत . पण ते ही ज्याच्या त्याच्या स्वभावावर अवलंबून असत म्हणा – म्हणजेच काही माणसे स्वतःचे दृष्टिकोन समोरच्याला पटवून द्यायला बघतात , तर काही माणसे माझा दृष्टिकोन माझ्यापाशी तुझा तुझ्यापाशी अशा धोरणाने शांत ही बसतात . पण आपली मते , विचार हे मांडले तरी देखील त्यांचा परिणाम इतरांवर होत असतो , आणि आपण ते मांडत नाही तेव्हा देखील आपल्या कृतीतून , वागण्यातून ते इतरांना दिसत राहतात त्यामुळेच त्याचा ही परिणाम जाणवल्याखेरीज राहत नाही .

काही वेळासाठी कल्पना करा की , तुम्ही एक उत्साही , आयुष्य भरभरून जगणारे व्यक्ती आहात . आणि तुम्ही एका अशा माणसासोबत राहता , ज्याच्या स्वतःच्या इच्छा, आशा -आकांक्षा मेल्यात . तेव्हा तुम्हाला जाणवेल की कळत -नकळत या माणसाच्या वागण्याचा आपल्यावर किती आणि कसा परिणाम होतो ते . भले ती व्यक्ती तुम्हाला हे करू नको ते करू नको म्हणत नसेल तरीदेखील जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी excited असता आणि तुम्ही त्या माणसाला ती विशिष्ट गोष्ट दाखवायला जाता तेव्हा त्या व्यक्तीची reaction एकदम कोरडी , पाषाण हृदयी असल्यासारखी जाणवते तेव्हा तुमचा असलेला उत्साह आणि आनंद देखील मावळून जातो .

कारण आपण जेव्हा आपल्या एखाद्या जवळच्या व्यक्तीला अशी छानशी बातमी उत्साहाने सांगायला जातो , आपल्या इच्छा किंवा स्वप्न देखील आपण एका आशेने share करतो तेव्हा आपली व्यक्ती जेव्हा तिला चांगला प्रतिसाद देते तेव्हा त्या गोष्टीचा आनंद हा द्विगुणित झालेला असतो . पण जेव्हा अशी थंड प्रतिक्रिया जाणवते तेव्हा मात्र आपल्याच स्वप्नांवर प्रश्न निर्माण व्हायला सुरुवात होते . आणि थोड्या वेळासाठी का होईना त्या आनंदाचे , उत्साहाचे रूपांतर हे गंभीरतेत होऊन जाते . ज्यांना स्वतःच्या आशा, इच्छा नाहीत त्यांच्याकडे त्याबद्दल तक्रार काहीच नाही, शेवटी तुमचं आयुष्य तुम्हालाच जास्त चांगलं माहित .

पण याचा अर्थ ज्यांना आपल्या जीवनाकडून काही अपेक्षा आहेत, ज्यांची स्वप्न , इच्छा आहेत, ज्यांना जगण्यातील मजा अनुभवायची आहे त्यांच्यासोबत राहताना तुम्ही तुम्हाला कटू अनुभव म्हणा, किंवा तुमचे त्याबद्दल असलेले विचार निदान समोरचा माणूस स्वतःच्या स्वप्नांबद्दल ecxited असताना, आशावादी असताना तरी दूर ठेवायचा प्रयत्न करा. जेणेकरून त्याची सावली त्यांच्या आनंदावर पडणार नाही. आणि शेवटी त्यांना आनंदात बघून तुम्हालाही आनंद नक्कीच मिळेल . आपली स्वप्न , इच्छा मेल्या याचा अर्थ इतरांनीही आयुष्याकडे त्याच दृष्टीने बघावं असं तर होत नाही ना !

शेवटी ज्याचे त्याचे अनुभव ज्यांनी त्यांनी अनुभवायचे आणि आयुष्य कसं जगायचं हे ठरवायचं असतं. पण आपल्याला आयुष्यात रस नसल्याने किंवा आपल्या इच्छा-आकांक्षा नाही याचा अर्थ आपण इतरांच्या इच्छेवर त्यांच्या असणाऱ्या उत्साहावर , आनंदरूपी डोहात मीठ टाकावं असा तर त्याचा अर्थ होत नाही ना ! हेतुपूर्वक असं कोणीच वागत नाही. आपण आपल्याच स्वभावानुसार वागत असतो. पण त्याचा ही कोणाला तरी त्रास होऊ शकतो. त्यामुळे आपल्याला नसल्या तरी इतरांच्या स्वप्नांचा , इच्छांचा आदर करायला शिका.

जेव्हा दोन आशादायी, उत्साही, इच्छा- आकांक्षा असणारी माणसं एकत्र असतात तेव्हा त्यांचे आनंद द्विगुणित व्हायला वेळ लागत नाही. मात्र एक इच्छा असणारा माणूस जेव्हा इच्छा मेलेल्या असणाऱ्या माणसासोबत आयुष्य काढतो तेव्हा ते खरंच दुःखदायक आणि अवघड असल्याशिवाय राहत नाही.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

3 thoughts on “स्वतःच्या इच्छा, आकांक्षा मेल्या म्हणून दुसऱ्याच्या भावनांचा खोळंबा करू नये.”

  1. आपण मानसोपचारतज्ज्ञ आहात का? लेख खूप आवडला. आपले क्लिनिक असेल तर भेट द्यायला आवडेल. शो

  2. कुमार मालगावे

    खूप चांगला आहे नकारात्मक विचार सोडून सकारात्मक बदल घडवण्यासाठी प्रेरीत करणारे आहे

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!