Skip to content

प्रत्येक वेळी मूग गिळून गप्प बसलं की बोलणाऱ्यांच तितकच फावतं.

प्रत्येक वेळी मूग गिळून गप्प बसलं की बोलणाऱ्यांच तितकच फावतं.


हर्षदा पिंपळे


“मूग गिळून गप्प बसणं” ही गोष्ट इथे प्रत्येकालाच माहीत असेल.आपल्या जगण्यातील तशी ही रोजचीच गोष्ट आहे. कारण बोलणं म्हणजे आपल्या जगण्याचाच एक भाग आहे. आणि बोलणारी व्यक्ती दिवसभर अजिबात शांत राहूच शकत नाही.तिला बोलल्याशिवाय स्वस्थ वाटतच नाही.आता बोलणाऱ्यांचेही अनेक प्रकार आपल्याला आपल्या आजुबाजूला दिसतात. कुणी कामापुरतं गोड बोलतं तर कुणी नेहमीच तिखट बोलतं.तर कुणी मनात एक दाखवतात आणि ओठावर मात्र भलतच काही दाखवतात.

कुणी आपल्या मागे चांगलं बोलतं तर कुणी वाईट बोलतं.इतकच नाही तर अनेकदा दोन व्यक्तींमध्ये वादविवाद हे होतात.आता वादविवाद होतात म्हणजे नेहमीच शीतयुद्ध असतं असं नाही. काही व्यक्ती जितकं बोलता येईल तितकं बोलतच राहतात. अगदी जिभेवरचा ताबा सुटेपर्यंत….! आणि काही वेळेस काय होतं तर एखादा खूप बोलत असतो तर दुसरा अगदी थंड पडलेला असतो. तो मूग गिळून गप्प राहणं पसंत करतो.शब्दाने शब्द वाढत राहतो हे काही लोकांना अचूक माहीत असतं.

इतकच नाही तर बोलून बोलून घसा दुखतो,स्वतःची ऊर्जा खर्च होते या गोष्टींचा सारासार विचार करून काही लोकं गप्पच राहतात. आणि मग समोरचा मात्र बोलतच राहतो.समोरची व्यक्ती काहीच बोलत नाही हे पाहून बोलणाऱ्याचा पारा अजूनच चढत जातो. बोलणारा क्षणभरही थांबायच नाव घेत नाही. उलट ‘आता का गप्प बसलाय,बोलना काहीतरी… मी काय उगाच बडबड करतेय का…? ‘वगैरे वगैरे बोलत राहतात.

कधी कधी समोरचा गप्प बसलाय हे पाहून दुसरी व्यक्ती बऱ्याचदा फायदाच घेते.होतं-नव्हतं सगळं बोलून टाकते ती व्यक्ती. समोरचा काही बोलत नाही म्हणजे त्याला काही फरकच पडत नाही असा गैरसमज बोलणारी व्यक्ती करून घेते.समोरच्या व्यक्तीमध्ये बोलायची हिम्मतच नाही, ही व्यक्ती आपल्यावर आवाज चढवू शकत नाही असे कितीतरी समज बोलणारी व्यक्ती करून घेते.पण अनेकदा समोरची गप्प राहिल्यामुळे बोलणाऱ्यांच तितकच फावतं.त्यांना काहीही बोलायला रान मोकळच मिळतं.अनेकदा आपल्याला सांगितले जातं ‘एखादा आपल्याला काही बोलत असेल तर त्याला फार काही बोलू नये.शब्दाने शब्द वाढतात, वाद टोकाला जातात. त्यापेक्षा आपलं मूग गिळून गप्प बसायचं.’

आता हे आजकाल तर कितीदिवस टिकायच…?? असं सातत्याने मूग गिळून एखादा माणूस बसला तर कित्येकांना रान मोकळं होईल बरं….??? गोष्ट कोणतीही असुद्या, काही चुकत असेल ,काही चुकीच आपल्या समोर घडताना दिसत असेल तरीही आपण मूग गिळून किती दिवस गप्प बसायचं….??? केवळ नात्यांमधील वादविवादाशीच याचा संबंध आहे असं नाही. तर आपल्या समोर जे जे वाईट घडतं,वाईट पेरलं जातं , चुकीचं वक्तव्य केलं जातं तेव्हा तेव्हा याचा संबंध येतो.आणि अनेकदा अशा काही गोष्टी घडतानाही आपण गप्प बसतो.अशा या गप्प बसण्याला काय अर्थ आहे….?

आता “मूग गिळून गप्प बसणे” या अर्थाची काही उदाहरणं पाहूयात—–

१) श्रेया आणि श्रेयस दोघांचही एक दिवस अचानक कोणत्या तरी गोष्टीवरून भांडण होतं.श्रेयस तसा स्वभावाला शांतच होता.पण श्रेया मात्र जराशी तापटच होती.बोलता बोलता ती श्रेयसशी जरा चढत्या आवाजातच बोलत होती.श्रेयसला मात्र चढत्या आवाजात बोलायची सवय नव्हती.इतकच नाही तर त्याला असा चढता आवाज ऐकायचीही सवय नव्हती. त्याच्या कानांना तो चढता आवाज सहन होत नव्हता.काय करू नी काय नको अशी त्याची अवस्था झाली होती.त्याला उलटून बोलायची सवय नव्हती. तो जितकं जमेल तितकं शांततेत बोलत होता. परंतु श्रेयाचा पारा इतका चढला होता की श्रेयसला त्यावेळी शांत बसण्याखेरीज दुसरं काहीही सुचलं नाही. तो मूग गिळून गप्प बसला. त्याने श्रेयाकडे दुर्लक्ष केले. परंतु या सगळ्यात श्रेया तोंडाला येईल ते बोलतच राहिली.श्रेयसविषयी ती इतरांचे कान फुंकू लागली.

२) खरं तर एका दुकानात एकदा चोरी होते. एक मनुष्य ही चोरी होताना पाहतो.सगळे चोरी झाली चोरी झाली असे ओरडत असतात.चोराला शोधत असतात.पण इतकं सगळं होत असताना ज्याने चोरी होताना पाहीलं असतं तो काहीच बोलत नाही.उगाचच आपल्यावरच चोरीचा आळ येईल या भीतीने तो मूग गिळून गप्प बसतो.आणि यामुळे चोरी करणाऱ्याच चांगलच फावतं.

अशी काही उदाहरणं आपण रोजच अनुभवतो. आता आपण कितीवेळा आणि कुठे कुठे मूग गिळून गप्प रहायच हे आपलं आपण ठरवावं. आपल्या मूग गिळून गप्प बसण्याने समोरचा गैरफायदा घेतो.अनेक चुकीच्या गोष्टींना यामुळे रान मोकळं होतं.लोकं बोलत सुटतात. इतरांचे कान फुंकत बसतात. जितका स्वतःचा स्वार्थ साधता येईल तितका तो साधून घेतात.

So….नेहमीच मूग गिळून गप्प बसण्यापेक्षा थोडं बोलायलाही शिका.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!