Skip to content

“स्वत:ला सुधारण्याची कला ही स्वतःकडून शिकण्यासाठी या गोष्टी फॉलो करा.”

“स्वत:ला सुधारण्याची कला ही स्वतःकडून शिकण्यासाठी या गोष्टी फॉलो करा.”


मधुश्री देशपांडे गानू


मी जेंव्हा ब्रह्मविद्येचा “श्वास हेच जीवन” हा अभ्यासक्रम शिकत होते, तेव्हा आम्हांला अगदी सुंदर उदाहरण देण्यात आलं. इंग्रजी मुळाक्षरांमध्ये B____D यांच्यामध्ये C असतो. याचा अर्थ BIRTH __TO__DEATH या प्रवासामध्ये C–CHOICE हा खूप महत्त्वाचा असतो. जो आपल्या हातात असतो. हे मिळालेलं सुंदर जीवन कसं जगायचं? याचा CHOICE आपण करायचा असतो. आपल्या जीवनाची जबाबदारी संपूर्णपणे आपलीच असते. हो ना!!

मानव म्हणजे आपण परमेश्वराची सर्वात सुंदर निर्मिती.. अतिशय गुंतागुंतीचं पण अचूक शरीर, प्रगत बुद्धिमत्ता आणि वाणी आपल्याला लाभले आहे. सामर्थ्यशाली तरीही संवेदनशील मन दिलं आहे. या सगळ्यांची जेंव्हा आपल्याला योग्य जाणीव होते, त्याच वेळी आपल्या हातून योग्य वर्तन घडतं. याच योग्य जाणिवेने, सद्सद्विवेक बुद्धीने, सकारात्मक विचारांनी, कृतीने आपण स्वतःला सुधारण्याची कला अवगत करू शकतो. आपलं जीवन आनंदी होण्यासाठी प्रयत्न करू शकतो. उदाहरणार्थ, आपली पंचेंद्रियं.. आपले डोळे. आपण डोळ्यांना किती गृहीत धरतो ना! कितीवेळा “दिसतं तसं नसतं”. पण आपण सारासार विचार करतच नाही. पटकन गैरसमज, पूर्वग्रहदूषित मतं करून घेतो. आपल्या मनात पक्क्या बसलेल्या कल्पनांनीच आपण जग बघतो. खरंतर काय पाहायचं? काय वाचायचं? हे आपण ठरवू शकतो. टीव्हीवरील टुकार दर्जाहीन मालिका पाहायच्या की एखादं उत्तम पुस्तक वाचायचं, हे आपल्या हातात आहे ना! अशा छोट्या-छोट्या निर्णयांनी, कृतींनी आपण स्वतः कडूनच स्वतःला सुधारायची कला अंगी बाणवू शकतो.

शिक्षण अत्यावश्यक आहेच. माणसाचा सर्वांगीण विकास होतो त्यामुळे. मग कोणतंही असो.. शालेय, वैद्यकीय, शास्त्रीय, नृत्य, गायन इत्यादी. शिकताना गुरु आदरस्थानी आहेतच. त्यांनी शिकवलेलं नम्रपणे आणि संपूर्ण एकाग्रतेने, सातत्याने अंमलात आणणं ही मात्र सर्वस्वी आपली जबाबदारी आहे. म्हणजेच कितीही बाह्य संस्कार झाले तरीही आपली इच्छाच नसली, तर आपण कधीच काहीच शिकणार नाही. आणि आपल्यात सुधारणा ही होणार नाही. स्वतःला सुधारायचं असेल तर स्वतः कडूनच शिकायची तयारी हवी. “मीच शहाणा, मला सगळं येतं, मला कोणी शिकवू नका..” असा उद्दामपणा आणि अहंकार फक्त विनाश घडवू शकतो.

कोणीही इथे परिपूर्ण नाही. प्रत्येक व्यक्ती ही गुणदोषांसहित असते. पण स्वतःचे गुण ओळखता यायला हवेत. त्यावर अधिक चांगलं काम करता यायला हवं. त्याचप्रमाणे स्वतःमधले दोषही ओळखता यायला हवेत. त्यावरही नेटाने मेहनत घ्यायला हवी. हे सगळं फक्त आपण स्वतःच स्वतः साठी करू शकतो. दुसरं कोणीही करायला येणार नाही. यासाठी उत्तम मानसिकता हवी. घोड्याला पाणी पाजायला ओढ्याजवळ नेलं तरी पाणी घोड्यालाच प्यावं लागतं ना!! अगदी तसंच..

आता स्वतःला सुधारण्याची ही कला स्वतः कडूनच शिकण्यासाठी काय करता येईल ते पाहू.

१) मी नेहमी सांगते त्याप्रमाणे सर्वात प्रथम स्वतःला संपूर्ण मनापासून स्वीकारा. शारीरिक, मानसिक, बौद्धिक जसे आहात तसे. स्वतःवर भरभरून प्रेम करा. एकदा acceptance आला की सुधारणेला वाव मिळतोच.

२) स्वतःला पूर्ण ओळखायला शिका. स्वतःची सामर्थ्य स्थळं आणि दोषही. त्यावर सातत्याने काम करा.

३) तुमचे पालक, गुरु, सुहृद यांचं तुमच्या विषयीचे मत सकारात्मकतेने विचारात घ्या. नकारात्मक लोकांपासून दूर रहा.

४) स्वतःबद्दल सकारात्मक लिहिण्याची सवय लावून घ्या. रोजनिशी लिहा.

५) स्वतःची कोणाशीही तुलना करू नका. कालच्यापेक्षा आज स्वतःमध्ये काय सकारात्मक बदल झाला तो लिहून काढा.

६) स्वतःच्या छोट्याशा यशासाठीही स्वतःचे कौतुक करा. स्वतःला योग्य श्रेय द्या.

७) आपण सामान्य माणसे आहोत आपल्या हातून चुका होणारच. पण म्हणून सतत स्वतःला दोष देणं थांबवा. भूतकाळाचा अति विचार करू नका.

८) आपली पंचेंद्रिये, आपली ऊर्जा योग्य ठिकाणी योग्य प्रमाणात वापरा. उदाहरणार्थ, वाणी मार्दवपूर्ण, नम्र असू द्या. उगाचच गॉसिप, वाद, भांडणं यामध्ये आपली ऊर्जा व्यर्थ दवडू नका.

९) आर्थिक नियोजन अतिशय परखडपणे करा.

१०) कुटुंबियांना, प्रेमाच्या माणसांना दुखवू नका. त्यांना जपा.

११) प्रेमाच्या माणसांबरोबर quality time हा घालवायलाच हवा. यामुळे तुम्ही फ्रेश होताच आणि नाती अधिक घट्ट, उबदार, प्रेमळ होतात.

१२) स्वतःच्या आवडीनिवडी, छंद जाणीवपूर्वक जोपासा. त्यासाठी वेळ काढाच.

१३) कर्तव्य व जबाबदाऱ्या कोणालाच चुकले नाहीत. मग त्या करायच्याच आहेत तर मनापासून, आनंदाने करा. म्हणजे त्याचं ओझं वाटत नाही.

१४) स्वतःचा Me Time जपा. स्वतः शी स्वसंवाद करण्यासाठी काही वेळ एकांतात घालवा. हे फार गरजेचं आहे.

१५) शारीरिक, मानसिक स्वास्थ्य उत्तम ठेवणे ही तुमची स्वतःची जबाबदारी आहे. त्यासाठी व्यायाम, योगासने, ध्यान इत्यादी नियमित करा.

१६) स्वतःला सुधारण्यासाठी स्वतः सातत्याने प्रयत्न करत राहा, स्वतःवर पूर्ण लक्ष केंद्रित करून.

१७) ऊर्जेचे, वेळेचे, विचारांचे सुनियोजन महत्त्वाचं आहे.

अशा अनेक कृतींनी तुम्ही स्वतःला सुधारण्याची कला स्वतःकडूनच शिकू शकता. स्वतःलाच विचारा की, तुम्हीसुद्धा अनेक उपाय सुचवू शकता. सुप्रसिद्ध मानसोपचारतज्ञ डॉक्टर राजेंद्र बर्वे म्हणतात,” तुमचे शरीर आणि मन एकावेळी एकाच ठिकाणी हवं.” अशी मनाची एकाग्रता कोणतीही गोष्ट करताना तुम्ही प्रयत्नांनी, मेहनतीने साध्य करू शकता.

आपल्याला मिळालेलं हे सुंदर आयुष्य आपण स्वतःलाच सुधारून आनंदाने जगू शकतो. योग्य जाणीव आणि योग्य वर्तनाने तुम्हांला ही कला स्वतःकडूनच छान शिकता येईल. मीही प्रयत्न करते आहे. तुम्हीही करून बघा. आणि आपल्या CHOICE प्रमाणे आपलं आयुष्य सुंदर जगा….


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

9 thoughts on ““स्वत:ला सुधारण्याची कला ही स्वतःकडून शिकण्यासाठी या गोष्टी फॉलो करा.””

  1. Dr.Vaibhavi Sanjay Kolte

    खरंच अशा सकारात्मक विचारांची नितांत गरज आहे

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!