Skip to content

अज्ञानाने होत नाहीत इतके नुकसान आपण अहंकाराने करून घेतो.

अज्ञानाने होत नाहीत इतके नुकसान आपण अहंकाराने करून घेतो.


गीतांजली जगदाळे

(मानसशास्त्र विद्यार्थिनी)


अज्ञानाचा व्यक्ती आणि समाजावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो, परंतु त्याच्यामध्ये अधिक ज्ञान मिळवण्याची, जाणून घेण्याची इच्छा निर्माण करून परिस्थिती बदलता येऊ शकते. उदाहरणार्थ, विज्ञानातील अज्ञान, हे ज्ञान शोधण्याची आणि नवीन प्रश्न विचारून शोध घेण्याची संधी उघडते.

वाईट गोष्टींना सामोरे बऱ्याच वेळा अज्ञानामुळे जावे लागते. आणि चांगला हेतू सुद्धा वाईट काहीतरी करून जातो जेव्हा आपल्याला एखाद्या विशिष्ठ गोष्टीबद्दल अज्ञान असतं. अज्ञान म्हणजे नक्की काय, तर एखाद्या गोष्टीबद्दल ज्ञान नसणे म्हणजेच अज्ञान होय.पण अज्ञानाचा स्वीकार जेवढ्या इसिली केला जातो तेवढ्या इसिली अहंकाराचा स्वीकार करताना लोक आपल्याला दिसत नाहीत. किंबहुना अहंकारी व्यक्तीला तो अहंकारी आहे असं कधीच वाटत नाही। कोणतीही गोष्ट आपल्यात आहे असं स्वीकारली असता ती बदलणं शक्य असतं. पण जिथे आपण ते स्वीकारतच नाही, तिथे ती बदलणं अशक्य होऊन जातं. अज्ञानाचा अंधःकार ज्ञान मिळवून, ते वाढवून दूर केला जाऊ शकतो. पण अहंकाराचं काय ?

संशोधनात असे दिसून आले आहे की इतरांवर टीका करणे , judge करणे , manipulate करणे, गरज नसताना कठोर वागणे , स्वतःचा दोष इतरांवर ढकलणे, आपण कसे बरोबरच असतो आणि समोरची माणसं कशी चुकतात हे सिद्ध करण्याच्या मागे असणे , तीव्र मूड स्विंग असणे, स्तुती आणि मंजूरीची सतत आवश्यकता असणे, यासह अनेक नकारात्मक मानवी वैशिष्ट्यांसाठी अहंकार जबाबदार धरला जाऊ शकतो. अहंकारी व्यक्ती आजूबाजूच्या प्रत्येकापेक्षा स्वतःला श्रेष्ठ समजत असते. तिला नेहमी आपले इतरांवर नियंत्रण असावे असे वाटत असते.

व्यक्ति कोणत्या वातावरणात वाढतो आणि त्याच्यात कोणती मूल्ये रुजवली जातात आणि संस्कार कसे केले जातात या आधारे अहंकाराची तीव्रता ठरते. साहजिकच अंहकार हा एकदम अचानक तयार होत नाही तर हळू-हळू वृद्धिंगत होतो. अहंकाराचा उगम हा अगदी लहानपणात होतो. लहान सहान गोष्टी, अजूबाजूच्या घडणाऱ्या घडामोडी, आई-वडील यांचे वर्तन, नातेवाईक आणि आप्तेष्ट यांचा दृष्टीकोण इत्यादि बाबी अहंकाराला खतपाणी घालून तो मोठा करतात.

बऱ्याच वेळा आपण पाहतो की अहंकार आणि संपत्ती असे समप्रमाण दाखवले जाते. जो जास्त श्रीमंत तो अधिक अहंकारी आणि जो अधिक गरीब तो कमी अहंकारी अशीही सर्वसाधारण व्याख्या दाखवली जाते.पण खरंच तसं असतं का? वास्तविक एका वर्गाला दुसऱ्या वर्गाबाबत असलेली असूया आणि तिरस्कार हीच भावना अहंकाराला जन्म देते. अहंकार हा मदतीची भावना हळू हळू लोप करतो. अहंकारी वृती ही इतर सकारात्मक आणि सामाजिक कामांना बाजूला करून वैयक्तिक स्वार्थाला पुढे ढकलते.

काही प्रमाणात स्व-विकासासाठी स्वार्थ असणे गैर नाही मात्र इतरांना कमी लेखणारा, त्यांचं नुकसान करून आपलं भलं करणारा आणि अडचणीत आणणारा स्वार्थ काही कामाचा नसतो. शेवटी नशिबाचे चक्र वर्तुळाकार फिरत असते. आजचा राव उद्या रंक आणि आजचा रंक उद्याचा राव होतो तो यामुळेच.

अहंकार हा बहुतांशी श्रेष्ठत्वाशी निगडीत आहे. हे श्रेष्ठत्व स्थान, दर्जा आणि वर्चस्व याच्याशी संबधित असते. साहजिकच स्थान, दर्जा आणि वर्चस्व अहंकाराला जन्म देतात. इतरांना हीन आणि कमी लेखण्याची वृत्ती अहंकार निर्माण करते. राग आणि तिरस्कार या दोन मुख्य भावना आपल्या मनातून निर्माण होतात त्या संयोग अथवा संयोजन पावल्या की अहंकार निर्माण होतो. आपल्या द्वेषकारी आणि इतरांना हीन लेखणाऱ्या स्वभावाची जोड तिरस्काराला मिळाली की अहंकार निर्माण होतो. असा अहंकार आपल्या वृत्तीत आणि कृतीत निर्माण झाल्याने आपल्या जीवनविषयक प्रवासात अनेक दोष निर्माण होतात.

वरकरणी अहंकार हा दोष नाही असे आपण गृहीत धरत असलो तरी मानवी संबंधांमध्ये कटुता आणण्यात अहंकार भूमिका बजावत असतो. अहंकार हा इतका प्रबळ होतो की व्यक्तीमध्ये असणाऱ्या इतर गुणांना तो पूर्णत: नाहीसे करून टाकतो. आणि साहजिकच असा हा अहंकार आपल्याला वागण्यात, बोलण्यात आणि कृतीत दिसून येतो.

अहंकाराला ज्यावेळी द्वेषाची किनार लागते त्यावेळी मात्र तो मानवी संबंधांची होळी साजरी करतो. वाटेत येणाऱ्या सर्वच व्यक्ति आणि कामांना त्याची झळ पोहचते. काही नातेसंबंध हे तर कायमचे संपुष्टात येतात. आणि एवढं होऊन ही अहंकारी व्यक्तीला सारे जग वाईट दिसते, पण स्वतःच्या हेतुत आणि कृतीत काही वावगे आढळत नाही. कोणाला कर्तुत्वाचा अहंकार असतो, कोणाला संपत्तीचा अहंकार असतो, कोणाला शक्तीचा अहंकार असतो, कोणाला सामर्थ्याचा अहंकार असतो, तर कोणाला सौंदर्याचा अहंकार असतो. ही अहंकाराची रुपे आपल्या अवतीभोवती आणि आजूबाजूला वेळोवेळी दिसून येतात. अभिमान असणे यात गैर नाही, मात्र त्या अभिमानाचा अंहकार होता कामा नये.

अहंकार हा फक्त नातेसंबंध नष्ट करत नाही तर तो परस्पर सहकार्य आणि समन्वय सुद्धा नष्ट करतो. अहंकारी व्यक्ती हा पाण्याच्या प्रवाहात तयार झालेला भोवरा किंवा वावटळ सदृश्य असतो. तो इतरांना त्यामध्ये लपेटुन घेतो आणि त्यांना दूर कोठे तरी सोडून देतो किंवा त्यांचा नाशही करतो. अहंकार हा संवाद सुद्धा कमी करतो. अहंकारी व्यक्ति संवाद साधण्यात सुद्धा पुढे होत नाहीत.

संवाद साधल्याने आपले काही तरी चुकेल अथवा आपल्यामधील कमतरता समोरच्याच्या लक्षात येतील अशीही भीती त्यांच्यात असते. त्यामुळे ते कधीही समान पातळीवर संवाद साधत नाहीत. व्यक्तिपरत्वे त्यांची संवाद भाषा बदलते. साहजिकच त्यांच्या वागण्यात स्वार्थीपणा कायम जाणवत राहतो. साहजिकच मानवी संबंध खराब करण्यामध्ये सर्वात अग्रेसर असणारी वृती म्हणजे अंहकार होय. अशा सर्व नकारात्मक लक्षणांचे खूप गंभीर परिणाम होतात आणि ते कोणत्याही व्यक्तीचे जीवन सहजपणे दुःखी बनवू शकतात. यामुळे दारू, तंबाखू आणि इतर पदार्थांचे व्यसन होऊ शकते.

आपल्यात अहंकार आहे का, याची पडताळणी आपण करून पाहायला हवी। समोरची व्यक्ती आपल्याला चुकीचं ठरवणार आहे असे दिसताच नक्की आपल्या मनात काय भावना येतात? आपण आपली चूक मान्य करतो का? की चूक मान्य करण्यात आपल्याला कमीपणा वाटतो? असे बरेच प्रश्न आपल्याला स्वतः ला विचारावे लागतील, थोडं आत्मपरीक्षण करावे लागेल। अशी सुरुवात केली असता ही तुम्हाला जाणवेल की आपण जेव्हा self aware होतो तेव्हा आपल्याला स्वतःला बदलणं फारसं अवघड जातं नाही।

पण आपण कसे वागतो , त्याचा आपल्या आजूबाजूच्या माणसांवर काय परिणाम होत असेल याचा विचार करणं नक्कीच गरजेचं आहे। अहंकार आपल्यात असेल तर आपल्याला आपण सोडून सगळेजण दोषी दिसत असतात। त्यामुळे अशावेळी हे लक्षात घेणं गरजेचं आहे की कोणतीच व्यक्ती प्रत्येक वेळी बरोबर किंवा चुकीची असू शकत नाही । आपण सगळेजण कधी योग्य तर कधी अयोग्य वागत असतो.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!