Skip to content

पटकन भावनिक होणाऱ्या माणसांना नातं जपता येत नाही, हे खरंय का?

पटकन भावनिक होणाऱ्या माणसांना नातं जपता येत नाही, हे खरंय का?


हर्षदा पिंपळे


‘भावनिकता’….मुळातच हा आपल्या आयुष्याशी आपल्या मानसिकतेशी संबंधित असलेला एक विशिष्ट भाग.जरी मनुष्य हा बुद्धिमान असला तरी तो भावनिक दृष्टीने अनेकदा विचार करतो.कारण मनुष्य जितका बुद्धिवान आहे तितकाच तो संवेदनशीलही आहे.त्यामुळे केवळ पटकन भावनिक होणाऱ्या माणसांना नातं जपता येत नाही हे आपण मान्यच करू शकत नाही. भावनेच्या ओघात अनेकदा नातं तुटण्याची भीती असते हे जरी खरं असलं तरी याचा अर्थ अशा माणसांना नाती जपताच येत नाही असा बिलकुल होत नाही.

हां पण हेही तितकच खरं आहे की, माणसाने भावनिक असावं.भावनिक असणं ही काही वाईट गोष्ट अजिबात नाही.भावनिक असणं चांगलच आहे. परंतु माणसाने अतिभावनिक असू नये. ते अतिभावनिक असणं कित्येकदा घातकच ठरू शकतं.एखादं नातं सांभाळताना सातत्याने पटकन भावनिक होत असाल तर याचा परिणाम नक्कीच होऊ शकतो.तुमच्या नात्यावर,आणि उरलेल्या बाकी नात्यांवरही.

नाती म्हणजे आपल्या आयुष्याचा एक विशिष्ट भाग.याच नात्यांमध्ये कितीतरी नाती येतात. नात्यांचे विविध पैलू उलगडताना अनेकदा आपली दमछाक होते. किती नी कोणती नाती लक्षात ठेवावी हेही कळत नाही. नातीच इतकी असतात की कधी कधी नातं नसलेल्या व्यक्तीशीही आपण एखादं नातं असल्यासारखं वागतो.आणि मग नकळतपणे आपण त्याच नात्यात बांधले जातो.अशाप्रकारे एकामागोमाग एक विविध नाती आपल्या आयुष्यात येतात.पण नात्यात नुसती नाती जोडून उपयोग नसतो.ती नाती जपली तर त्याला काहीतरी अर्थ असतो.पण मग सर्वांनाच ही नाती जपता येतात का…? तसच,पटकन भावनिक होणाऱ्या माणसांना नातं जपता येत नाही, हेही खरंय का…?

तर……नाती जपणं हे एखादी काचेची वस्तू हाताळण्यासारखच असतं.पण नाती म्हणजे कोणतीही काचेची वस्तू मुळीच नाही. पण ती काचेसारखीच असतात. कधी पारदर्शक…तर कधी क्षणात तडा जाऊन तुटणारी.नव्याने जोडता आली तर ती जोडता येतातही.पण कधी कधी हीच नाती जखमाही करून जातात. आणि मग पुन्हा तेच नातं जोडणं अवघड असतं.आता पटकन भावनिक होणाऱ्या माणसांना नातं जपता येत नाही, हे खरंय का? तर बिलकुल नाही. हे खरं नाही. पटकन भावनिक होणाऱ्या व्यक्तींना नातं जपता येत नाही असं बोलून चालणार नाही.

कारण इथे प्रत्येकाला प्रत्येकाच स्वतंत्र आयुष्य आहे. आणि प्रत्येकाला प्रत्येकाची स्वतंत्र मतं आहेत.तसच प्रत्येकाचा स्वभावही आगळावेगळाच आहे. कुणी फार भावनिक आहे तर कुणी फारच प्रॅक्टिकल आहे.पण याचा अर्थ असा नाही की पटकन भावनिक होणाऱ्या माणसांना नाती जपता येत नाहीत आणि नेहमीच प्रॅक्टिकल असणाऱ्या माणसांना नाती जपता येतात.नाती जपणारा माणूस कोणताही असू शकतो.तो पटकन भावनिक होणारा असू शकतो किंवा नेहमीच प्रॅक्टिकल राहणाराही असू शकतो.मुळातच ज्याला नात्यांची कदर आहे तोच मनुष्य नाती टिकवू शकतो, नाती जपू शकतो.अगदी मान्य आहे की, भावनिक असणाऱ्या किंवा पटकन भावनिक होणाऱ्या व्यक्तींना गोष्टी टचकन लागतात.

इतरांच्या तुलनेत त्या फारच हळव्या असतात.कुणी काही बोललं,ओरडल तर या व्यक्तींच्या चेहऱ्यावरच हसू कापराप्रमाणे उडून जातं.काही काळ त्यांना वाईटही वाटतं.पण कुणी असं वागलं म्हणून अशा व्यक्ती नाती जपू शकत नाही असं नाही. अशा व्यक्ती सुद्धा एखादं नातं जपूच शकतात.जर त्यांना नात्यांची कदर असेल , समजूतदारपणा असेल तर त्या व्यक्ती सर्वात आधी नाती जपण्यालाच प्राधान्य देतात. मुळातच जोडलेल नातं तुटावं असं कुणालाच वाटत नाही.

जो तो आपापल्या परीने नातं जपण्यासाठी धडपड करत असतो.अनेकदा नाती जपली जात नाहीत ती केवळ अहंकारामुळे. म्हणजे एखादा माणूस भावनिक असून तितकाच अहंकारी असेल तर तो नातं जपण्यात नक्कीच कमी पडू शकतो.नात्यांमध्ये केवळ भावनिकतेलाच महत्त्व नाही तर ते तितकच प्रॅक्टिकल असण्यालाही आहे.वेळप्रसंगी दोघांचा समतोल राखला यायला हवा.तरच नाती टिकतात.जपली जाऊ शकतात. नेहमीच भावनिक असून चालत नाही आणि नेहमीच प्रॅक्टिकल असूनही चालत नाही.

So….कोणतही नातं जपणं आपल्यावर अवलंबून असतं.आपण प्रत्येक phase कशी हाताळतो यावर नाती जिवंत राहतात. जपली जातात.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!