Skip to content

गैरसमज इतके घट्ट झालेत की नाती तुटतात पण गैरसमज नाही.

गैरसमज इतके घट्ट झालेत की नाती तुटतात पण गैरसमज नाही.


गीतांजली जगदाळे

मानसशास्त्र विद्यार्थिनी


गैरसमज घट्ट होण्यामागचं कारण काय आहे? जेव्हा छोटे-छोटे गैरसमज होतात तेव्हा आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो आणि मग ते कधी इतके घट्ट बनतात ते लक्षातच येत नाही. ‘नात्याकडे दुर्लक्ष’ हेच सगळ्यात मुख्य कारण आहे गैरसमज होण्यामागचं.आणि मग अशावेळी बोलून गोष्टी सोडवणं खूप अवघड होऊन जातं, कारण गैरसमजांचा पगडा खूपच वजनदार असतो. अशा वेळी गैरसमज दूर करण्यापेक्षा ते नातं तोडणं जास्त सोप्प वाटायला लागतं. कारण गैरसमजांमुळे होणारा त्रास त्या नात्यात राहू नये अशीच भावना मनात आणतो.

गैरसमज हे अनेक नात्यांमध्ये संघर्षाचे मूळ आहे. किरकोळ गैरसमज कधी मोठ्या गैरसमजांत रूपांतरित होऊन नात्याला पोखरायला लागतात ते कळत ही नाही. आणि बऱ्याच वेळा गोष्टी क्लिअर करण्यासाठी प्रयत्न करण्यापेक्षा आपण टोकाची भूमिका घेतो.
नात्यात गैरसमज तेव्हा होतो जेव्हा एक किंवा दोन्ही व्यक्ती समजून घेण्यास नकार देतात. त्यामुळे नैतिक स्पष्टता नसल्याने गैरसमज निर्माण होतात कारण चुकीची छाप निर्माण झालेली असते. वेगवेगळ्या गोष्टींमुळे गैरसमज निर्माण होऊ शकतात, पण मूळ कारण सहसा परिस्थितीचे स्पष्ट चित्र मिळत नाही हेच असते.

गैरसमजांमुळे नाती तुटतात पण गैरसमज मात्र अधिकाधिक मजबूत होतात यावर तर आपण सगळेच सहमत आहोत. ते गैरसमज दूर व्हावेत यासाठी प्रयत्न करणं सोडून दिल्यावर तर ते आहेत त्यापेक्षा ही वाढतात.पण नक्की गैरसमज होतात तरी कसे? त्याची कारणं काय? हे जाणून घेणं जास्त महत्वाचं ठरतं. म्हणजे ते माहित झालं तर आपण सावध राहून वेळीच पावलं उचलून परिस्थिती हातात घेऊ, त्यावर नियंत्रण मिळवू. जेणेकरून वेळच्या वेळी, गैरसमज होतायेत हे कळलं तर ते क्लिअर करता येतील, किंवा तसा प्रयत्न तरी करता येईल.
गैरसमज होण्याची काही करणे पुढीलप्रमाणे :

१. बोलणं नीट ऐकून न घेणे-
शांतपणे ऐकून घेणं हे एक कौशल्य असतं. प्रत्युत्तर देण्यासाठी ऐकण्यापेक्षा समजून घेण्यासाठी ऐकलं तर नक्कीच गैरसमज होण्याची शक्यता कमी होईल. नातेसंबंधात गैरसमज होण्याचे एक कारण हे आहे की जेव्हा दोन्ही पक्ष त्यांचा संभाषण करत असताना ते ऐकण्याचे चांगले कौशल्य दाखवू शकत नाहीत. जेव्हा दोन लोक चर्चा करत असतात, त्यापैकी एक व्यक्ती जेव्हा ऐकून घेण्याच्या पलीकडे जाते तेव्हा परिस्थिती बिकट होते, जर असे वरचे वर घडत राहिले तर गैरसमज होऊ लागतात. त्यामुळे जो काय निर्णय घ्यायचा असेल तो समोरच्याच पूर्ण म्हणणं शांतपणे ऐकून घेतल्यावर विचार करून घ्यावा. म्हणजे आपले ही निर्णय चुकत नाहीत, आणि नीट ऐकून घेत नसल्याचा आळ आपल्यावर येणार नाही, आणि आपलं नातं ही खराब होणार नाही.

२. आपल्या जोडीदाराच्या किंवा जवळच्या माणसाच्या भावनांचा अनादर करणे-

नातेसंबंधात, तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या भावना आणि भावनांचा आदर करणे आवश्यक आहे. आणि त्यावर तोडगा काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणे आवश्यक आहे.

जेव्हा तुम्हाला समोरच्या माणसाचं वागणं कळत नाही, त्याच्या भावना समजत नाहीत तेव्हा तो असा का वागतोय, तो काही वेळा असा ठराविक पद्धतीनेच का रिऍक्ट होतो यावर विचार करा जेणेकरून तुम्हाला त्यांच्या भावना समजायला मदत होईल. भावना समजून घेणे याचा अर्थ त्यांच्या भावनेशी सहमत असणे असा होत नाही. पण समोरची व्यक्ती काय फील करतीये हे जाणून घेणं महत्वाचं आहे. आणि ते जाणून किंवा समजून घेण्यासाठी थोडा वेळ देणे आवश्यक आहे.

तसेच, जेव्हा तुमचा जोडीदार तुमच्याकडे एखाद्या गोष्टीबद्दल तक्रार करतो, तेव्हा ते काहीही नसल्यासारखे टाळू नका किंवा “याला सवयच आहे”, किंवा “हे काय कारण आहे का तक्रार करण्याचं” असा विचार करण्यापेक्षा ते कशाबद्दल बोलत आहेत हे तुम्ही समजून घ्या. प्रत्येक गोष्ट बरोबर की चुकीची अशा दृष्टीने न बघता आधी भावना , विचार समजून घ्यायचे असतात. नंतर चूक आणि बरोबर च लेबल आपण आपापल्या विचारांनुसार लावतच असतो. आणि कधी-कधी समजून न घेता ते लेबल लावले गेल्याने आणि त्यात तफावत असल्याने गैरसमज होतात, आणि वाढतात.

३. आपल्या माणसांची इतर माणसांसोबत तुलना करणे-

प्रत्येक माणूस वेगळा असतो, unique असतो ही गोष्ट लक्षात घेऊन माणसांची तुलना करणे बंद करायला हवे. कितीही वाटलं तरी एक माणूस दुसऱ्यासारखा वागू शकत नाही. अशी अपेक्षाच मुळी चुकीची आहे. आणि याने ही गैरसमजांत वाढ होते. एखाद्याला एखादी गोष्ट करणं जमत नसेल, पण तीच गोष्ट तुमच्यासाठी दुसरं कोणी करत असेल याचा अर्थ ज्याला जमत नाही त्याला ती करायचीच नव्हती असं नव्हतं, आणि अशावेळी “याने बघ कसं केलं नाहीतर तू बघ” , असं म्हणून तुलना करत बसण्यापेक्षा कितीतरी गोष्टी तुम्हाला ही जमत नाहीत तेव्हा तुमची तुलना कोणाशी केली गेली तर तुम्हाला आवडेल का याचा विचार करा.

४. समोरच्याबद्दल काही गोष्टी गृहीत धरणे-

स्वतः त्या माणसाने बोलून न दाखवलेल्या किंवा कदाचित विचार ही न केलेल्या गोष्टी आपण त्याच्यावर लादणे (असं समजून की तो असाच विचार करत असेल) म्हणजेच गृहीतके बनवणे. तुम्हाला हे माहित असणे आवश्यक आहे की जोपर्यंत तुमचा जोडीदार तुम्हाला काहीतरी स्वतः सांगत नाही, तुम्हाला स्पष्टता देत नाही, तोपर्यंत त्याच्याबद्दलचे तुम्हाला वाटणारे विचार त्याच्यावर लादू नका. आणि तुम्ही देखील त्याला जे वाटतंय ते तुम्हाला माहित आहे ते ही त्याने न सांगता असा आव आणू नका, कारण कोणाच्याही मनातलं कोणीही ऐकू शकत नाही. त्यामुळे गृहीतके बनवणे थांबवा आणि गैरसमज मनात ठेवण्यापेक्षा ते ओळखा आणि जे वाटतंय ते बोलून क्लिअर करा.

५. नात्याला पुरेसा वेळ न देणे-

सगळ्यात महत्वाचं कारण तर हेच असतं, की आपण नात्याला पुरेसा वेळ देत नाही आणि समोरच्यांकडून समजून घेण्याची अपेक्षा करत राहतो. कधीतरी वेळ न देणं समजून घेतलं जाऊ शकत पण नेहमीच काही ना काही कारण असेल तर ते मात्र समजून घेण्यापलीकडचं आहे. तिथेच तुम्हाला तुमच्या priorities कळतात, किंवा कोणाला काय महत्वाचं आहे हे कळत.

सगळ्यात आधी हे लक्षात घ्यायला हवं की आपण वेळ जरी त्या माणसासोबत घालवत असलो तरी त्याला ‘त्या माणसाला वेळ देणे’ असं म्हणत नाही, त्या नात्याला वेळ देणे असंच म्हणतात. हे लक्षात घेतल्याने तुला वेळ देतो /देते अशी वाक्य आपण बोलणार नाही. आणि आपल्याला जर नाती महत्वाची असतील तर त्यांना टिकवण्यासाठी, मजबूत करण्यासाठी आणि आणखी फुलवण्यासाठी त्यांना वेळ देणं महत्वाचं आहे. म्हणजे नाती healthy राहायला मदत होते. आयुष्यात बाकी सगळ्या गोष्टीही महत्वाच्या असतात, पण त्याचबरोबर चांगली नाती टिकवणं ही तितकंच महत्वाचं असत. त्यामुळे इतर महत्वाच्या कामांप्रमाणे नात्याला ही पुरेसा वेळ द्या जेणेकरून गैरसमजाची वेळच येणार नाही.

६. नेहमी आपणच बरोबर असल्याचा दावा करणे-

कदाचित हे लोकांना लक्षात येत नाही की आपल्याला नेहमी आपणच बरोबर वाटत असतो. पण आपण सगळी माणसे आहोत, आणि माणसं ही चुकतच शिकत असतात. त्यामुळे नेहमी बरोबर असणारा माणूस शोधून ही सापडणार नाही. आणि प्रत्येक वेळी चूक करेल असाही माणूस सापडणार नाही. त्यामुळे खरंच आपण बरोबर आहोत का आणि प्रत्येक वेळी आपणच कसे बरोबर याचा ही विचार करून पहा.

आपल्यामध्ये गैरसमज का होतात अगदी याची कारण शोधून काढताना ही तुमच्यात एकानेही असा आव आणता कामा नये की, ‘नाही माझंच बरोबर’, जरा ओपन माईंड ठेवून बाकी विचार ही समजून घेणे गरजेचे असते, म्हणजे कोण बरोबर आहे यापेक्षा काय बरोबर आहे याकडे लक्ष देता येते.

अनेक पती-पत्नींना न सोडवता येणार्‍या संघर्षांचा अनुभव येतो कारण ते गैरसमजाचे मूळ कारण शोधण्यासाठी पुरेसे धीर धरत नाहीत.गैरसमज हाताबाहेर गेल्यास, जेव्हा एक किंवा दोन्ही पक्ष योग्यरित्या समजून घेण्यास नकार देतात तेव्हा तुम्ही व्यावसायिक किंवा विश्वासू आणि अनुभवी मित्रांची मदत घेऊ शकता.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “गैरसमज इतके घट्ट झालेत की नाती तुटतात पण गैरसमज नाही.”

  1. खूप छान बरोबर माहिती आहे सत्याला धरून सांगितले आहे.

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!