Skip to content

घरांमध्ये मानसिक स्थिती बिघडण्याची प्रमुख ५ कारणे वाचा.

घरांमध्ये मानसिक स्थिती बिघडण्याची प्रमुख ५ कारणे वाचा.


मयुरी महाजन


असं म्हणतात की आर्थिक स्थिती कितीही चांगली असली, तरी जीवनाचा खरा आनंद घेण्यासाठी मानसिक स्थिती सुद्धा चांगली असायला हवी, तसं तरं आपल्या मानसिक स्थिती मध्ये सुद्धा चढ-उतार सुरू असतात, परंतु आपले जे कुटुंब आहे, घर परिवार आहे, यांच्यासोबत समायोजन करत असताना आपल्या मानसिक स्थिती मध्ये बिघाड होतो, आणि हा बिघाड होण्याच्या पाठीमागे काहीतरी कारणे असतातच, तर आपण ते प्रमुख कारणे वाचूया…

1- एकमेकांना समजून न घेणे- हे सर्वात महत्वाचे कारण आहे, की घरातील मंडळी एकमेकांना समजून न घेता एकमेकांना दोषी ठरवतात, मग त्यासाठीची कारणे शुल्लक असली तरी सुद्धा बरेचदा असे वाटते, की प्रत्येक जण आपापल्या जागी अगदी बरोबर आहे, मग असे असूनही चुकते तरी कोणाचं??? असा प्रश्न पडतो, तेव्हा त्या गोष्टीचा बारकाईने विचार केला तर कुठेतरी घरांमध्ये ज्या ज्या वयाची मंडळी असते,

या सर्वांमध्ये कुठेतरी जनरेशनचा अभाव दिसून येतो ,त्यामुळे एकमेकांना समजून घेण्यात तफावत बघायला मिळते ,आणि त्या तफावतीमुळे मानसिक स्थितीत बिघाड होतो, कारण की मीचं का समजून घ्यावं, प्रत्येक वेळेस मी जे काही म्हणते /म्हणतो तेच खरं आहे, हा विचार सोडता न आल्यामुळे समस्या वाढत जाते, त्या ठिकाणी आपण स्वतःला सांगायचे मी जरी बरोबर असलो, तरी समोरची व्यक्ती सुद्धा चुकीची नाही ,फक्त ती व्यक्ती आपल्या विचारांपेक्षा थोडी वेगळी आहे,

2-आर्थिक स्थितीच्या बाबतीत नेहमी होणारे वाद- आज प्रत्येक घरात आपल्या आर्थिक स्थितीला गरजे पेक्षाही जास्तीची दिली गेलेली एक चौकट, आणि त्यात अपेक्षांचे ओझे, माणसापेक्षा त्यांच्याकडे असणाऱ्या पैशाला दिली गेलेली किंमत ,माणूस म्हणून त्याचे घरातले अस्तित्व नाहीसे होताना दिसते ,जो कमवत नाही, त्याला घरात येणार्‍या पैशाची जाणीव नसणे,

आणि खर्चाच्या बाबतीत ऊधळमापी असणारी देवाण-घेवाण, कष्ट करून कमवून आणणार्‍या माणसाला त्या ठिकाणी त्याची विचारसरणी व इतरांच्या विचारसरणीतील तफावत यामुळे निर्माण होणारे वाद, भांडणे याचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष प्रभाव असलेला बघायला मिळतो,

3- गैरसमज व संशयाची लागलेली कीड- घराघरांमध्ये होणारी भांडण हे निव्वळ गैरसमजापोटी, उभी राहतात त्यासाठी माणसं ओळखता येणे नितांत गरजेचे आहे, कुठल्याही विषयासाठी जर कोणी तुमच्या मनात काही भरवण्याचा प्रयत्न करत असेलं, तर ते ओळखणे गरजेचे आहे, त्याच्या पाठीमागे व्यक्तिपरत्वे असणारा

हेतू पडताळून पाहणे गरजेचे आहे, अन्यथा चांगल्या चांगल्या नात्यांना गैरसमज व संशयाची कीड दिसत नसली, तरी ती या पद्धतीने पोखरू लागते, की नंतर फक्त त्याची पोकळी शिल्लक असते, नाती फक्त नावाला असतात, आणि ही गैरसमज व संशयाची पोकळी मनस्थिती बिघडवण्यात मोलाची भूमिका बजावते ,यासाठी विषयाची सत्यता तपासून आपल्या नात्यांमध्ये गैरसमज निर्माण होणार नाही, याची आपण काळजी घ्यायला हवी,

4- जबाबदाऱ्यांची जाणीव नसणे- घर बनत ते घरातल्या प्रेमळ माणसांनी आणि त्याच घराचे घरपण टिकून असतं, जिथे प्रत्येक जण आपल्या हक्कापेक्षा आपली कर्तव्य आणि जबाबदारी पार पाडण्यासाठी प्रयत्न करतो, ज्या घरातील मंडळी आपल्या जबाबदाऱ्या ओळखत नाही, किंवा आपल्या जबाबदाऱ्यां प्रति जागरूक नाही ,तिथे कोणाला तरी एकाला जबाबदारी स्वीकारावी लागते ,

आणि एका व्यक्तीवर जबाबदाऱ्यांचे असलेले ओझे पेलत असताना होणारी दमछाक नक्कीच वादाचे कारण ठरते, व त्याचा परिणाम घरातील माणसांची मनस्थिती एकमेकांप्रती सलोख्याची व प्रेमाची राहत नाही, त्यामध्ये एक प्रकारची दरी निर्माण होत जाते, त्यामुळे आयुष्याचा खरा आनंद उपभोगता येत नाही,

5- दुसऱ्याच्या मताला प्राधान्य न देणे -आपल्या प्रत्येकालाच वाटत असते, आपण आपल्या प्रमाणे जगायला हवे ,अगदी स्वतंत्रपणे, परंतु ते करत असताना आपण कुठेही चुकू नये, चुकीच्या वाटेवर आपले पाऊल पडू नये, यासाठी आपल्याला लावलेली बंधन मर्यादा, हे स्वीकारता न आल्याने आपण नकळतपणे दुसर्याच्या मताला प्राधान्य देत नाही, आपल्याचं मताने, आपल्या दृष्टीने, वागण्याचा ,जगण्याचा प्रयत्न करतो ,त्यामुळे आपल्यात आपापसात मनमुटाव वाढीस लागतात,

एकाच गोष्टीकडे बघण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा असतो, त्यामुळे आपल्याला जसे वाटते, तसेचं इतरांनाही वाटत असेल, हे सर्वस्वी स्वीकारता येत नाही, त्यामुळे आपण आपल्याचं विचारांचा डंका मिरवतो, असे वाटत राहते, त्यासाठी आपले विचार मांडताना आपण आपल्या बुद्धीने व आपल्याला ज्ञात असलेल्या माहितीने ते मांडत असतो,

परंतु फक्त माझेच खरे आहे, बाकी चुकीचे, हे विचारसरणी मात्र एकमेकांमध्ये कलह निर्माण करते, व त्यामुळे ही सर्व प्रक्रिया प्रत्येकाच्या विचारसरणीतून जन्माला येते, त्यासाठी आपण माणूस आहोत, तसेच समोरची व्यक्ती सुद्धा मानव आहे ,आपण आपल्या चुकांमधून शिकायला हवे, व इतरांच्या चुकांना तितक्याच मोठ्या मनाने माफ करायला हवे, तरच आपल्या घरात शांतता, समृद्धी नांदेल, एकमेकांची काळजी घ्या, एकमेकांना जपा, कितीही भांडणं झाली, तरी संध्याकाळी एका ताटात जेवा, त्याची खरी गरज आहे,

ज्या घरात एकमेकांना समजून घेतात, गैरसमज व संशय याला कधीही फिरकू देत नाही, जेथे प्रत्येक जण आपापली जबाबदारी आनंदाने निभावतो, आपल्या मताबरोबर दुसऱ्याच्या मतालाही प्राधान्य दिले जाते, व या संपूर्ण घराला चालवताना, आपली आर्थिक बाजू अगदी अचूकपणे निभवण्याचे कसब ज्या घरातील प्रत्येक व्यक्ती जाणतो, अशा घरात प्रत्येक व्यक्ती आपली मानसिक स्थिती स्थिर ठेवून आनंदाने जीवन जगत असतो….


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!