Skip to content

पुष्कळ वेळेस आपणच वेदनांना सोडायला तयार नसतो !!

पुष्कळ वेळेस आपणच वेदनांना सोडायला तयार नसतो !!


मेराज बागवान


आयुष्य हे सुख-दुःखाने भरलेले असते.कधी इतके सुख आपल्या पदरात येऊन पडते तर कधी दुःखाचे डोंगर च्या डोंगर उभे राहतात.मग हे दुःखाचे डोंगर आपल्या जीवनात वेदना, त्रास घेऊन येतात. कधी ह्या वेदना शारीरिक असतात तर कधी मानसिक.पण कोणत्याही प्रकारच्या वेदना असल्या तरी त्रास ,दुःख हे ठरलेलेच असते. पण कधी कधी वेदना संपत आलेल्या असतात, पण आपणच त्यांना चिकटून बसतो.

जसे की, एखाद्या व्यक्तीची अचानक कुठलीतरी शस्त्रक्रिया होते.कालांतराने ती व्यक्ती त्यातून बरी देखील होते.पण मनातून मात्र ती व्यक्ती बरी होत नाही.म्हणजे, मनातून कित्येकदा ती असा विचार करते, “अरे बाप रे, मला किती त्रास झाला याचा, कोणाला सांगून काय उपयोग? डोळ्यासमोरून जात च नाही ते सगळे”.असे म्हणत ती व्यक्ती पुन्हा त्या वेदनांना जवळ करते आणि त्यामुळे त्यातून ती बाहेरच येऊ शकत नाही.

अनेकदा मनावर मानसिक आघात होतात.कोणाकडून तरी लग्नाला नकार येतो.किंवा कधी जवळची व्यक्ती आपल्याला न सांगता सोडून जाते, आपल्याशी कसलाच संपर्क ठेवत नाही. कधी घरातील जवळच्या व्यक्तीचा अकाली मृत्यू होतो. कधी कोणीतरी आर्थिक फसवणूक करते.तर कधी नातेसंबंध कायमचे तुटतात.ह्या झाल्या सगळ्या मानसिक वेदना. पण जस जसा काळ पुढे सरकत असतो, तस तसे ह्या वेदना, त्रास कमी होत होत जातात आणि लुप्त देखील होतात.पण बरेचदा काही जण ह्याच सर्व वेदनांना सोडू इच्छित नाहीत.त्यातच त्यात गुंतून पडतात. विनाकारण वारंवार रडत-कुढत बसतात.काळाने ह्या वेदनांवर उत्तर दिलेले असते.पण आपण पुन्हा पुन्हा भूतकाळात जाऊन , त्या कटू आठवणी उगाळत बसतो.

जसे की ,काही जण भूतकाळात घडून गेलेल्या गोष्टींविषयी असे म्हणतात की, ‘तिने मला धोका दिला, ती माझ्याशी खोटे बोलली’.’ तो मला सोडून का गेला? असं झालंच नसत तर…’ अशा प्रकारची अनेक वाक्ये आपण आजूबाजूच्या व्यक्तींकडून ऐकत असतो, आणि स्वतः देखील अनुभवत असतो.पण इथे आपल्या हे लक्षात येत नाही की, होणारी, घडणारी गोष्ट तर घडून गेली.

आणि आपण त्यातच अडकून पडल्याने , ती गोष्ट, ती व्यक्ती, काळ पुन्हा बदलणार आहे का? तर नाही.काळ कोणासाठीच थांबत नाही.मग आपण का ह्या वेदना सोडायच्या नहीत? आणि यामुळे आपले आयुष्य आपण का थांबवायचे?

एक गोष्ट कायम लक्षात असू द्यावी, जे होते ते चांगल्यासाठीच.मग ती वेदना दुःखदायक असली म्हणून काय झाले ? त्या वेदनेतुन आपण काय शिकतो हे महत्वाचे असते ना की त्या वेदनेतच अडकून राहणे. एखादी व्यक्ती आपल्याला जेव्हा फसवते, तेव्हा आपण ह्यातून हे शिकले पाहिजे की, ‘मी का फसले/फसलो, इतका अतिविश्वास देखील योग्य नाही.इथून पुढे स्वतः च्या भल्यासाठी मी नीट , पूर्णपणे विचार करूनच इतरांवर विश्वास ठेवेन.

शारीरिक वेदानांच्या बाबतीत सांगायचे झाले तर, आपण स्वतःला असे म्हणले पाहिजे, ‘जो आजार होता तो आता निघून गेला आहे.मी पूर्णपणे बरी/बरा आहे.आता मी स्वतः च्या आरोग्याची योग्य रित्या काळजी घेईन.”

जितका आपण वेदनांचा विचार करू तितके आपण खचत जात असतो.हे आयुष्य आहे.आयुष्याच्या प्रत्येक वळणावरती नवीन एक वेदना भेटत जाणारच आहे.त्यामुळे प्रत्येक वेदनेतून लवकर बाहेर पडता आले पाहिजे. कोणतीच गोष्ट आयुष्यात कायम नसते.ना दुःख ना सुख. म्हणून’वेदनेला सोडता आले पाहिजे’.दुःख, वेदना किती जरी मोठी असली तरी देखील प्रत्येक दुःखावर, वेदनेवर उपाय हा असतोच असतो.उपाय नाही अशी कोणतीच समस्या नाही.फक्त मन तसेच डोके शांत ठेवून योग्य तो निर्णय आयुष्यात घेता आला पाहिजे आणि स्वतःचे आणि इतरांचे देखील आयुष्य आपण सुंदर केले पाहिजे.

आयुष्यात नाती, माणसे जरूर जपावीत. पण जीवनाच्या कोण्या एका टप्प्यावर काही माणसे आपली साथ सोडून जातात.पण ती व्यक्ती ,आपल्याला सोडून गेली,सोडून गेली असे म्हणत वेदना वाढविण्यात काहीच अर्थ नसतो.कोणतीच व्यक्ती आपल्यासोबत कायमची नसते.मग ती कितीही जवळची व्यक्ती असली तरी देखील.म्हणून कोणीही आपल्या आयुष्यातून कोणत्याही कारणाने का असेना जर निघून गेले असेल , तर आहे त्या परिस्थितीचा मोठ्या मनाने स्वीकार करता आला पाहिजे आणि आयुष्यात पुढे जात राहिले पाहिजे.

आयुष्यात माणसे जरी गरजेची असली तरी देखील ‘कोणा वाचून कोणाचे कधीच अडत नाही’.हे वाक्य कितीही कठीण ,अतिस्पष्ट वाटत असले तरी वास्तव हेच आहे.एक व्यक्ती निघून गेली तरी दुसरी कोणीतरी व्यक्ती आपल्या आयुष्यात येतेच.मग गेलेल्या व्यक्तीचाच विचार करत बसायचे की नवीन आलेल्या व्यक्तीला आपल्या आयुष्यात स्थान द्यायचे हे आपण ठरवायचे असते. हे थोडे व्यावहारिक वाटत असले , तरी देखील मनावर दगड ठेवून आयुष्यात काही गोष्टी कराव्या लागतात, किंबहुना त्या गरजेच्या असतात.

कारण वेदनेत विव्हळत पडल्याने , परिस्थिती बदलत नसते, दुःख , वेदना कमी होत नसते.तर उलट ते आणखीनच वाढत असते.कोणाचीतरी सहानुभूती मिळविण्यासाठी , कोणाचे तरी लक्ष वेधून घेण्यासाठी जर आपण त्या वेदनेला सोडायला तयार नसू तर आपली आयुष्याची गाडी चुकीच्या रुळावर चालली आहे हे लक्षात ठेवा.

म्हणून चला स्वतःला म्हणूयात,

“जे व्हायचे होते, ते झाले.जे घडणार होते, ते घडून गेले.आता मी त्या सर्व वेदनांतून पूर्णपणे बाहेर पडलो / पडले आहे. आणि आता मी माझे आयुष्य नव्याने सुरू करीत आहे”.

खरेच, हा विचार आयुष्याविषयीची आपली विचारसरणी नक्की बदलवू शकतो.करून पाहा…..!


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!