हेच खरं जीवन आहे, जे आपल्याला मिळालेलं आहे, याचा आनंद घेऊया.

हेच खरं जीवन आहे, जे आपल्याला मिळालेलं आहे, याचा आनंद घेऊया.


गीतांजली जगदाळे


जीवन खरंच खूप सुंदर आहे !! असं म्हणल्यास किती लोकांना हे पटेल? आजवर खूप थोर- महान लेखक, कवी यांनी जीवनाची महती आपल्याला वेळोवेळी सांगितली, ती ऐकून, वाचून आपण ही कितीदा भारावून जातो. पण जेव्हा आपण आपलं जीवन जगतो, काही गोष्टी अनुभवतो, तेव्हा किती वेळा आपल्याला ते, त्या कवितेतील किंवा एखाद्या गोष्टीप्रमाणे अगदी मनोरंजक आणि हवेहवेसे वाटते?

ते खरंच खूप सुंदर आहे आणि आपण त्याचा खरंच आनंद घेत आहोत असं किती जण खात्रीने सांगू शकतील? तर असो. याची उत्तर ज्यांनी त्यांनीच आपापली शोधावीत. पण नीट लक्ष दिल असता आपल्याला खूप गोष्टी अशा दिसतील ज्या जीवन सुंदर बनवण्यात खरंच मोठा हातभार लावतात.

जीवन हे अनेक प्रकारच्या भिन्न-भिन्न गोष्टींनी व्यापलेलं असत. आपले आई-वडील, बालपण,शाळेचे दिवस, सहली,मित्र, महाविद्यालयीन दिवस, नोकरी, लग्न, जीवनसाथी इत्यादी. मोजता येणार नाहीत एवढी माणसं आणि घडामोडी आपल्या आयुष्यात असतात. आयुष्य सुंदर बनवणाऱ्या गोष्टींमध्ये यातल्या बऱ्याच गोष्टी कारणीभूत असतात.

प्रत्येकाचे अनुभव या संदर्भात कटू किंवा गोड असू शकतात. सगळ्याच माणसांच्या सगळ्या गोष्टींमध्ये, अनुभवांमध्ये भिन्नता आढळते, आणि तरी देखील एक साम्य हे असतंच ते म्हणजे कोणत्या ना कोणत्या प्रकारचं आयुष्य सुंदर आहे याची जाणीव करून देणार साधन. ते कोणत्या रूपात, कोणा मार्फत येईल हे सांगता येत नाही पण ते अनेक रूपांत , माध्यमांतून आपल्याला मिळत हे नक्की.

आयुष्याचा आनंद घेणं म्हणजे नक्की काय? तर छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घेणं. आनंद फक्त बक्षीस मिळवतानाच होतो का? ज्याला ते बक्षीस मिळवण्याच्या प्रवासात ही आनंद अनुभवता येतो तो खरं तर खरा आनंद म्हणू शकतो. कुठेतरी पोहचण्यासाठी, काहीतरी मिळवण्यासाठी केलेल्या प्रामाणिक मेहनतीतून देखील जेव्हा आनंद घेता येतो तेव्हा म्हणायचं आयुष्य एक अंशी तरी आपण आनंदाने जगतोय.

जे आपल्या आयुष्यात नाही त्याची खंत वाटणं, ते आपल्याला मिळावं असा विचार करणं यात चुकीचं असं काहीच नाही. पण या विचारांनी आपल्याकडे जे आहे त्याची किंमत कमी होता कामा नये. ज्याप्रमाणे जे नाही त्याच आपल्याला वाईट वाटत, दुःख होत त्याचप्रमाणे जे आहे त्याबद्दल आनंदी आणि समाधानी राहणं म्हणजेच या जीवनाचा एक प्रकारे केलेला सन्मान होय.

कधी कधी दुःखाचा डोंगर असा काही कोसळतो की मन अगदीच खचून जात, सारं जीवनच निरर्थक वाटू लागत. अशाने कोणी जगणं सोडून देत नाही पण अशा मनस्थितीत जगणं हे फक्त श्वास घेण्यापुरतं मर्यादित राहत. ‘Life है, चलता है’ असं म्हणून पुढं तर जावंच लागत. लहान असताना खेळताना आपण पडायचो मग दोन्ही गुडघे मस्त सडकून निघायचे खूप वेदना व्हायच्या, आताच्या मानाने त्या कमी असल्या तरी लहानपणीच्या मानाने ते खरंच खूप मोठ्या असायच्या, मग आपण रडायचो, घर डोक्यावर घ्यायचो पण त्यानंतर उठून चालणं आणि परत त्याच आनंदाने खेळायला जाणं हे ही व्हायचच . पडलो, लागलं आणि ते दुखतंय म्हणून आपण खेळ कधी बंद केला नाही.

पण हीच गोष्ट आपण जेव्हा मोठे होतो तेव्हा मात्र बदलते. आयुष्यात येणारी दुःख,समस्या, त्रास यांना सामोरे जाऊन आपण एकदा घडून गेल्यावर पूर्णपणे सोडून का देत नाही? खेळ आणि आयुष्य यात फार फरक नाहीए. कारणं लहान असतानाच्या समस्या जरी लहान असल्या तरी आपली क्षमता ते सहन करून, पचवून पुढे जाण्याची असते आणि ते करून आपण नव्या उत्साहाने पुढच्या खेळांचं स्वागत करत असतो.

त्याच प्रमाणे आता आपण मोठे आणि त्यामुळेच आपल्या क्षमते प्रमाणे आपली संकटे आणि दुःख देखील मोठी. मग त्यांना सामोरं जाऊन आपल्याला काही काळाने का होईना नव्या उमेदीने आयुष्याचं स्वागत करता यायला हवं!

गरजुंची मदत करण्यातला आनंद, ज्येष्ठ नागरिकांचे अनुभव ऐकण्यातलं समाधान, निरागस-निष्पाप लहान मुलांसमवेत घालविलेले सुंदर क्षण, खरंच आपल्या आयुष्याचा आनंद घेणं आणि इतरांना आपल्या छोट्याश्या कृतीमुळे क्षणाच का होईना समाधान देणं हेच खरं जीवन आहे. जे आपल्याला मिळालेलं आहे आणि जे मिळवण्यासाठी आपण एवढे कष्ट करत राहतो त्या सगळ्यांचीच आपण मजा घेऊ शकतो, आनंद मिळवू शकतो.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

Leave a Reply

Your email address will not be published.