Skip to content

सक्षम निर्णय घेणारी व्यक्ती दुःख दुःख करत बसत नाही.

सक्षम निर्णय घेणारी व्यक्ती दुःख दुःख करत बसत नाही.


गीतांजली जगदाळे


आपल्याला आयुष्यात अनेक प्रकारचे निर्णय घ्यावे लागतात त्यातले काही मनापासून घेतले जातात तर काही नाईलाजास्तव, काही ठराविक वेळेला बळी पडून तर काही अगदीच मनाविरुद्ध. पण निर्णय कोणते ही का असेनात त्याचे परिणाम मात्र आपल्यालाच भोगावे लागतात.

निर्णय जेव्हा बरोबर म्हणून सिद्ध होतात तेव्हा परिणाम ही चांगलेच असतात पण ते जेव्हा चुकतात तेव्हा मात्र परिणाम भोगताना नाकीनऊ येतात आणि मग मात्र आपण स्वतःला किंवा काही वेळा नशिबाला दोष देत बसतो, दुःख करत बसतो. पण दुःख इथेच संपत नाही, काही निर्णयांचे परिणाम खूप काळ सहन करावे लागतात पण कधी कधी त्या परिणामांपेक्षा निर्णय चुकल्याची खंत माणसाला जास्त बोचत राहते आणि त्या निर्णयाने होणार नुकसान एक वेळी जरी थांबलं तरी माणूस ते आठवून आठवून दुःख करत बसताना दिसतो.

आयुष्य आहे म्हंटल्यावर काही निर्णय हे चुकणार तर काही बरोबर येणार. ज्याचा प्रत्येक निर्णय योग्य निघालेला किंवा प्रत्येक निर्णय अयोग्य निघालेला अशी माणसे शोधून सापडणार नाहीत. फक्त प्रत्येकाच्या योग्य-अयोग्य निर्णयाचं प्रमाण मात्र कमी जास्त असू शकत.पण यातून ही काही व्यक्ती अशा असतात ज्या भावनेच्या भरात किंवा परिस्थितीला बळी न पडता सक्षम निर्णय घेतात आणि त्याचे परिणाम काही का असेनात त्याच दुःख करत बसत नाहीत.

खरं तर एकदा बाण कमानीतून निघाला असता आपण तो परत आणू शकत नाही, त्याचप्रमाणे निर्णयाचं ही तसंच असत. एकदा निर्णय घेतला की तो मागे घेणं किंवा बदलणं अवघड जात. पण सक्षम निर्णय घेताना मनातील भावना आणि व्यावहारिकता याचा समतोल राखून किंवा बॅलन्स करून ते घेणं गरजेचं असत.

सक्षम निर्णय घेणाऱ्या व्यक्तीची मानसिकताच काही और असते, ती निर्णय घेण्याच्या आधी पूर्णतः सगळ्या बाजूने विचार करते पण एकदा का निर्णय घेऊन झाला तर मग मात्र त्याचे परिणाम भोगायला सज्ज असते , आपण हा निर्णय घ्यायला नको होता किंवा असा निर्णय आपण का घेतला असे विचार करीत बसत नाही.

किंवा आपल्या निर्णयाचा दोष इतर लोकांच्या माथी मारण्याच्या कामात वेळ व्यर्थ न घालवता ती आहे त्या परिस्थितीला सामोरी जाते आणि त्याच गोष्टीचा पुन्हा पुन्हा नव्याने त्रास करून घेत बसत नाही. कारण जो काही निर्णय घ्यायचा आहे तो घ्यायच्या आधीच आपल्याकडे विचार करायची संधी असते आणि एकदा निर्णय झाला की त्यानंतर विचार करण्यात काही अर्थ नसतो याची त्या व्यक्तीला पूर्णपणे जाणीव असते. त्यामुळेच तो होईल त्या परिणामांना समोर जाण्याची तयारी ठेवतो. आणि निर्णय हे आपलेच असल्यामुळे परिणाम भोगून, दुःख दुःख करत न बसता आयुष्यात पुढे सरकतो.

पण मुळातच सक्षम निर्णय घेणाऱ्या व्यक्तींच्या वाटेला दुःख करत बसण्याची वेळ फार येत नाही कारण त्यांचे निर्णय हे कोणत्या एकाच विचारावर आधारलेले नसतात,त्यासाठी त्यांनी खोलवर विचार केलेला असतो आणि परिणामांचा देखील विचार केलेला असतो त्यामुळे कोणतेच परिणाम त्यांना माहित नसताना झालेले नसतात त्यामुळे आपोआप च त्यांच्यावर या सकारात्मक किंवा नकारात्मक परिणामांचा फार प्रभाव पडलेला दिसत नाही. कारण हा निर्णय घेतल्याने काय काय होऊ शकत याचा कुठेतरी त्यांना आधीच अंदाज असतो.

पण ज्या व्यक्तींना असे निर्णय घेता येत नाहीत त्यांना मात्र याचा फार त्रास होतो. काही निर्णय चुकल्याने त्यांचा कधी-कधी आत्मविश्वास ही डळमळीत होतो आणि त्याचा परिणाम त्यांच्या पुढच्या निर्णयावर होतो. सक्षम निर्णय घेणाऱ्या व्यक्ती ह्या सहसा भूतकाळात जगत नसतात, आणि दुःख दुःख करत बसण्याची सवय असणारी माणसे ही भूतकाळात रमतात आणि जुन्या चुकलेल्या निर्णयांना आठवून दुःख दुःख करत बसतात आणि आपला वर्तमान खराब करतात.

त्यामुळे निर्णय घेताना आधी कोणत्या ही भावनेच्या आहारी न जाता भावना आणि वस्तुस्थिती यांचा बॅलन्स करून शांत डोक्याने परिणामाचा देखील विचार करून बिनधास्तपणे निर्णय घ्या आणि आत्मविश्वासाने येईल त्या परिस्थितीला सामोरे जा. याने निर्णय बरोबरच असतील याची खात्री देता येत नाही पण कमीतकमी संपूर्ण विचार केल्याने, शांत डोकं ठेवून विचार केल्याने एक मानसिक तयारी झालेली असते जेणेकरून आपण परिणामांना सामोरे जायला तयार असतो आणि त्याचा बाऊ करत न बसता दुःख करत राहत नाही.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “सक्षम निर्णय घेणारी व्यक्ती दुःख दुःख करत बसत नाही.”

  1. Nandkishor Hitendra Nimgade

    Life is beautiful and we will make it beautiful. If we can change ourself to look after the life.so enjoy your life to give someone happiness. If you live for yourself, you will be finished. But if you will live for others you will be recollect for after the end of life. Be happy and smile every time in the life because smile is the electricity of life..

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!