Skip to content

मनाला शांत ठेवणं ही सर्वात मोठी ‘Super Power’ आहे !!

मनाला शांत ठेवणं ही सर्वात मोठी ‘Super Power’ आहे !!


मेराज बागवान


आजकाल आपले आयुष्य दिवसेंदिवस खूप धकाधकीचे , जिकिरीचे आणि अनियमित झाले आहे.कधीही , कोठेही काहीही होऊ शकते,अचानक आयुष्य कलाटणी घेऊ शकते.आज आपण कोणीच कोणत्याच गोष्टीची ‘हमी’ देऊ शकत नाही. सगळे कसे जणू डळमळीत झाले आहे. आणि आपण सर्वच जण थोड्या-बहुत प्रमाणात ह्या सगळ्यांमधून जात आहोत.पण जरी आपण कोणत्याही गोष्टीबद्दल पक्की हमी देऊ शकत नसू, तरी देखील आपण एक गोष्ट करू शकतो , ती म्हणजे , आहे ते स्वीकारून , पूर्ण विश्वास ठेवून ‘मन शांत ठेवणे’.

तसे पाहायला गेले तर ,कठीण परिस्थितीत मन शांत ठेवणे थोडे अवघड आहे, पण अशक्य मुळीच नाही.आपले ‘मन’ ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे.ज्यावर जणू आपले संपूर्ण आयुष्यच अवलंबून आहे.मनावर ताबा असेल तर सर्व गोष्टी साधता येतात, योग्यरीत्या हाताळता येतात.फक्त त्यासाठी गरज आहे , ती कमालीचा ‘संयम’ ठेवण्याची. आयुष्यात असे अनेक प्रसंग येतात ,जेव्हा आपल्याला असे वाटते की , ही गोष्ट मला मागे खेचू पाहत आहे , तेव्हा तीच ही वेळ असते ती , मनावर ताबा ठेवून मन शांत ठेवणे. आणि असे जर का आपण करू शकलो तर आपण ‘सुपर पॉवर’ आहोत असे समजून जा.

कधी कधी नियती आपले आयुष्य एका अशा टप्प्यावर आणून सोडते की, त्या क्षणी आपल्याला कोणतातरी एकच निर्णय घ्यावा लागतो.जणू ‘इकडे आड, तिकडे विहीर’ अशी देखील मानसिक अवस्था होते. काही वेळेस कुचंबणा होते.दोलायमान परिस्थिती निर्माण होते. परंतु, काही तरी एकच ठोस निर्णय घेणे आयुष्यात पुढे जाण्यासाठी फार जरुरीचे असते. मग अशा वेळी , सारासार विवेक बुद्धी वापरून , मन चलबिचल होऊ न देता , मन शांत ठेवणे हेच उचित असते.

जो मनुष्य मन शांत ठेवू शकतो , तोच खरा बलशाली होय. मान्य आहे , जणू वणवा पेटावा अशी धगधगती आग मनात उठलेली असते. पण त्यावेळी पूर्णपणे सकारात्मक विचार करून , काही वेळेस मनावर दगड ठेवून काही गोष्टी कराव्या लागतात. कारण, आयुष्य ‘थांबवून’ चालत नाही. आणि आपण जर का तसे करत असू , तर आपण मनाने फारच कमकुवत आहोत असे यातून दिसून येते. जो स्वतःचे मन जिंकतो तो जग जिंकू शकतो.

मनुष्य हा भावनाशीलप्राणी आहे. परंतु आजकालच्या ह्या जोखमीच्या आणि अनियमित जीवनात काही काही वेळेस भावना बाजूला सारून , किंवा काही भावना कायमच्या मनाच्या एका कप्प्यात बंद करून , ‘प्रॅक्टिकल’ निर्णय घ्यावा लागतो. आणि हे सर्व माणूस तेव्हांच करू शकतो जेव्हा मन शांत असते.

मनाला शांत ठेवणं ही सर्वात मोठी सुपर पॉवर आहे. आणि हे आपण करू शकते, हे साध्य होऊ शकते ते , रोजच्या ध्यानधारणेतून, रोज नियमित चालण्याने, मन मोकळे करण्याने , आपली भूमिका मांडण्याने, मोकळेपणाने बोलण्याने, स्वतःचे निर्णय ठामपणे घेता येण्याने आणि मुख्य म्हणजे स्वतःचा स्वतःशी प्रामाणिकपणे संवाद साधल्याने, स्वतःची स्वतःशी ओळख असण्याने.जर मनावर काबू असेल तर आपण नक्कीच सुपात पॉवर बनू शकतो. ह्या सर्व गोष्टी आपल्या स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा विकास करण्यासाठी फार उपयोगी पडतात. तसेच आपल्या ह्या वागण्यातून इतरांना देखील प्रेरणा मिळू शकते.

मन शांत असेल तर आपण दैनंदिन कामे यशस्विरित्या पार पाडू शकतो.स्वतःमध्ये एक नवीन ऊर्जा निर्माण होते.ज्यामुळे आपल्या आजूबाजूचे वातावरण आपसूकच शांत आणि सकारात्मक राहते. एखादी गोष्ट जर मनाला पटत नसेल तर ती गोष्ट जबरदस्तीने करणे अत्यंत चुकीचे आहे.आणि जर का आपण असे केले तर विनाकारण मनात कचरा साठत जातो. आयुष्यात काय करायचे आहे, आयुष्य कसे जगायचे आहे ह्या सगळ्याचा विसर पडतो आणि मन कायम अशांत राहते.

माणसाच्या आयुष्यात अनेक नाती असतात. कधी नाती टिकविण्यासाठी मनाला मुरड घालावी लागते. ते काही पातळीवरती गरजेचे देखील असते. कारण कोणत्याच दोन व्यक्ती सारख्या स्वभावाच्या नसतात. कुठे ना कुठे जुळवून हे घ्यावे लागते. पण कधी कधी याचा अतिरेक झाला की मनाची शांतता भंग पावते आणि स्वतःचे अस्तित्वच जणू विसरल्यासारखे होते.मग अशा वेळी मन शांत ठेवून , स्वतःच्या स्वाभिमानासाठी आणि समतोल साधण्यासाठी आपल्याला जे वाटते तसे जगणे गरजेचे बनते.

आपण आयुष्यात कोणत्याही क्षेत्रांत यश तेव्हाच खेचून आणू शकतो जेव्हा आपण स्वतःच्या मनावर ताबा ठेवू शकतो. कधी कधी ‘काही गोष्टी मिळविण्यासाठी , काही गोष्टींचा त्याग हा करावाच लागतो’. आयुष्याचे एक सोपे गणित आहे. ते म्हणजे, ‘ बस वही करो, जो वक्त की मांग है’.
कोणी माझ्याशी कसे वागले, कोण मला स्वतःहून विचारत नाही , कोण माझ्याकडे सतत दुर्लक्ष करते, मी अमुक एका व्यक्तीसाठी किती केले तरी देखील त्याचे माझ्याकडे लक्ष नाही असे विचार करून कित्येकदा आपण आपले मन अशांत करून घेत असतो आणि आपली ‘पॉवर’ कमी करत असतो. पण असे सर्व गरजेचे नसलेले विचार सोडून ,आपण फक्त आपले कर्म फळाची अपेक्षा न धरता करीत राहिलो तरच आपण खऱ्या अर्थाने इतरांसाठी काही तरी , खूप काही तरी करतो असे होईल.

मन ही तसे पाहिले तर खूप ‘नाजूक’ आणि तितकीच ‘कणखर’ गोष्ट आहे. मग आता , आपण ठरवायचे की , मनाला आपली ‘कमकुवत बाजू’ बनवायचे की ‘ ताकद’ बनवायचे? कारण,मनाला शांत ठेवणं ही सर्वात मोठी सुपर पॉवर आहे.म्हणूनच स्वतःला ओळखा, अगदी प्रामाणिकपणाने ओळखा, स्वतःची स्वतःशी भेट घडवून आणा. स्वतःशी मोकळेपणाने बोला. स्वतःचा आनंद ,सुख नेहमी इतरांवर अवलंबून ठेवण्यापेक्षा स्वतःच स्वतः मध्ये आनंद शोधा , स्वतःचे एक चांगले मित्र म्हणून जगा. मग बघा, तुमच्याकडे ‘सुख सोयीच्या वस्तू’ जरी नसल्या तरी देखील तुम्ही सर्वात जास्त ‘सुपर पॉवर’ असाल.

या सगळ्यासाठी गरज आहे ती फक्त संयमाची, मन शांत ठेवण्याची…बाकी अशक्य असे काहीच नाही…..


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

3 thoughts on “मनाला शांत ठेवणं ही सर्वात मोठी ‘Super Power’ आहे !!”

  1. प्रा. डॉ. शशिकांत पाटील

    खूपच प्रेरणादायी लेखन आणि खरच जर आपण आत्मपरीक्षण करून या विचारांची अमलबजावणी केली तर आयुष्य अतिशय सुंदर होऊ शकते हा माझा वैयक्तिक अनुभव आहे

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!