काही वेळ द्या वेळेला..वेळ बदलण्यासाठी !!

काही वेळ द्या वेळेला..वेळ बदलण्यासाठी !!


जागृती सारंग


टॅम्प्लिस!!! डिजिटल क्रांतीच्या आधीची जी पिढी पकडा पकडी, लगोरी, आबादुबी, लंगडी, भोवरा, कांचा, लपाछपी, डोंगर-पाणी, विष-अमृत, तळ्यात-मळ्यात, छप्पापाणी असे खेळ खेळली आहे त्या बहुतेकांना हे टॅम्प्लिस त्यांच्या बालपणात घेऊन जाईल. खेळता खेळता जेव्हा मधेच ब्रेक हवा असायचा तेव्हा हे टॅम्प्लिस म्हटलं जायचं. अगदी असंच टॅम्प्लिस आयुष्य जगताना म्हणता यायला हवं.

तर हे टॅम्प्लिस म्हणजे दुसरं तिसरं काही नसून टाईम प्लिज असं आहे. हे झालं बालपणातलं. मोठं झाल्यावर बहुतेकदा वेळ पाळणं शिकतो, वेळ देणं, वेळेवर सर्व गोष्टी करणं हे सर्व शिकतात. आपण वेळेनुसार चालतो पण आपल्याला वेळेवर ताबा ठेवता येणं किंवा हुकूमत करणं कधीच शक्य नाही.

बऱ्याचदा काही माणसं म्हणतात वेळेत सर्व झालेलं बरं असतं पण काही माणसं म्हणतात वेळ आली कि होईल सर्व नीट. म्हणून वेळेत सर्व होण्यासाठी आपण प्रयत्न करत रहायचे आणि सर्व काही करूनही जर प्रयत्नांना यश मिळत नसेल तर वेळेची वाट पहावी. परंतू चांगली किंवा योग्य वेळ येईल तेव्हा बघू असं म्हणत फक्त हातावर हात ठेवून योग्य वेळेची वाट पाहत बसू नये.

कारण पापण्यांच्या उघडझाप होणाऱ्या क्षणात सुद्धा बऱ्याच गोष्टी बदलतात. बाळाच्या जन्माची वेळ किंवा मानवाच्या मृत्यूची वेळ कधीही आधीच सांगता येत नाही. त्या नेमक्या वेळेसाठी जन्म आणि मृत्यू घडावा लागतो. अशी हि वेळ प्रत्येकाच्या आयुष्यात सतत बदलत असते. फक्त बदल हा स्थिर असतो पण वेळ कधीच स्थिर नसते. अणू रेणूच्या कणाएवढ्या क्षणापासून, सेकंद, मिनिट, तास, दिवस, रात्र, आठवडे, महिने, वर्षे, दशक, शतक ते युगानुयुगापर्यंत वेळ बदलत रहाते.

म्हणूनच काही वेळा आपल्याला सुखद अनुभवही येतात आणि काहीवेळेस खोल दुःखाच्या गर्तेत आपण सापडतो. काही माणसं त्यांच्या गरजा पूर्ण झाल्या तरी त्यांच्या इच्छा पूर्ण होत नाहीत म्हणून दुःखी असतात. तर काहीजणांना बऱ्याचदा त्यांच्या मुलभूत गरजा पूर्ण करण्यासाठीच इतका संघर्ष करत रहावा लागतो की कधी कधी हि माणसं पूर्णतः खचून जातात.

एकंदरीत सध्या तसं पहायला गेलं तर या कोरोनाच्या महामारीमुळे गोरगरीबांपासून ते व्यावसायिकांपर्यंत बरेच जणं भिती, अपयश, संघर्ष, संकटं, नकारात्मकता, नैराश्य या सर्वातून गेले आहेत किंवा अजूनही जात आहेत. या सर्वातून जात असताना सगळ्यात जास्त महत्वाचं काय असेल तर प्रयत्न आणि संयम!

कोणत्याही प्रकारच्या संकटाने वा नकारात्मकतेने खचून न जाता संयमानं प्रयत्न करत राहणं अत्यंत महत्वाचं असतं. बहुतेकदा एखाद्या गोष्टीची भितीच सर्वांना नकारात्मकता देऊन नैराश्याकडे नेत असते. एकदा का नैराश्यातून खचलं गेलं कि मग परतीचा प्रवास कठीण हेऊन बसतो. भिती असावी पण जोडीला धमक सुद्धा असावी. आत्मपरीक्षणाची तयारी असावी. वास्तविकता स्विकारावी. आयुष्य कितीही भकास झालं, काहिच चांगलं घडत नसलं, कोणीच तुम्हाला साथ देत नसलं तरीही कोणत्याही परिस्थितीत आत्मविश्वास गमावता कामा नये.

आपण इतर मोठमोठ्या माणसांची उदाहरणं घेण्यापेक्षा आपलंच उदाहरण घेऊया ना! आपण जन्माला येतो तेव्हा सर्वच काही पोटातून शिकून येत नाही. जन्माला येताच रडणं, हसणं, खाणं, झोपणं इतकंच सुरू असतं. हळूहळू बाळ पोटावर फिरायला शिकतं, मग रांगायला, मग धरून धरून उभं रहायला शिकतं, नंतर आधाराशिवाय उभं राहतं आणि मग एक एक पाऊल टाकत नंतर दुडुदुडु धावत त्याच्या आई बाबांना त्याच्या मागे धावायला लावतं. हे सर्व करत करतच प्रत्येकजण मोठा होतो.

काही बाळं लवकर चालायला शिकतात तर काही लवकर स्वतःच्या हाताने जेवायला शिकतात. हे असंच असतं आयुष्याच्या पुढच्या प्रवासातही. काहींना लवकर यश मिळतं तर काहींना उशिरा. काहींच्या वाट्याला सुरूवातीला संघर्ष कमी असतो तर काहींचं अर्ध्याहून अधिक आयुष्य संघर्षातच जातं. पण वेळ नक्की बदलते आणि फासे फिरतात, प्रत्येकाचे. कधीकधी परिस्थिती साथ देत नाही तर कधी माणसं. मी आहे म्हणणारी माणसंच नेमकी गरजेवेळी सोबत नसतात.

कधीकधी तोंडावर चांगली असणारी माणसंच आपल्याबद्दल मनात असूया धरून असतात. अशांना आपल्याला दूर सारताही येत नाही पण त्यांच्यापासून तुम्ही अंतर ठेऊन राहू शकता. कुठल्याही प्रकारच्या कामाला सुरूवात करताना ते कराल तेव्हा ते लोकांना दिसू द्या आधीच त्याचा गाजावाजा करू नका. कारण शुभचिंतक फार कमी असतात पण आपल्या आयुष्याचा खेळ मोडण्यासाठी दबा धरून बसलेली माणसं अवतीभवती खूप जास्त असतात.

या कोरोनाकाळात कित्तेक कुटुंबं संपुष्टात आली आहेत, कित्तेकांची नोकरी सुटली, व्यावसायिक नुकसान झालं, नाती तुटली, जवळची – हक्काची माणसं देवाघरी गेली. कित्येकांचा विश्वास तोडला गेला, फसवणूक झाली, कित्तेकांनी आपल्या माणसांना वाचवण्यासाठी आयुष्यभराची कमाई खर्च करुन कर्जबाजारीही झाले, पुन्हा शून्यात आले किंवा अजून काही नकारात्मक घडलं असेल वा घडत असेल तर दुःख होणं, रडू येणं, चिडचिड होणं, तीळ तीळ तुटल्यासारखं वाटणं अगदी साहजिक आहे.

तुम्ही पुरूष असा वा स्त्री, शेवटी आपण माणसंच आहोत, भावनिक आणि हळवे तर असणारच ना! मग हे जेव्हा तीळ तीळ तुटल्यासारखं वाटतं ना तेव्हा अगदी मनापासून रडून घ्यावं, लहान मुलासारखं हमसून हमसून रडता आलं तर तेही करावं. जवळ हक्काचा खांदा असेल तर त्या खांद्यावर डोकं ठेऊन रडा. हक्काचा काय किंवा परका काय जर डोकं टेकायला खांदाच नसेल किंवा नको असेल तर काय करायचं?

सोप्पं आहे, तुम्ही इतरांसाठी खांदा बनता ना, इतरांना समजून घेता ना, इतरांना समजावून सांगता ना मग स्वतःच स्वतःचा खांदा बना. डोकं टेकता येणार नाही पण स्वतःला समजून घेऊ शकता आणि समजावून सांगू शकता. अशावेळी एकांतात रडून घ्या पण खचून जाऊ नका. जे झालं ते बदलता येत नाही पण आलेला लाखमोलाचा अनुभव गाठीशी घेऊन पुढे काय करता येईल याच्यावर विचार आणि कृती करा.

भले तुमच्या कृतीला किंवा प्रयत्नांना वारंवार अपयश येईल, पुन्हा पुन्हा पाय खेचले जातील, पुन्हा पुन्हा विश्वास तोडला जाईल, पुन्हा तुमची फसवणूक केली जाईल पण किती वेळा हे घडेल? सभोवारची परिस्थिती असो वा माणसं जर आपल्याला हरवण्यासाठी दमत नाहीत तर आपण त्यांना ते दमेपर्यंत आपले जिंकण्यासाठीचे प्रयत्न करतच राहायचे.

आभाळात झेप घ्यायची आहे तर पंखांची फडफड तर करतच रहावी लागणार आणि ते करत असताना कधीतरी पंखात बळ तर येणारच ना. हे बळ येण्यासाठी सृष्टीच्या नियमाप्रमाणेच थोडा वेळ जाऊ द्यावा लागतो. तेव्हा कुठे परिस्थितीवर मात करता येते. आपल्या सर्वांना एक वाक्य ठाऊक आहे कि “हि वेळही निघून जाईल”, हे वाक्य कोणत्याही परिस्थितीत म्हणजेच आनंदाच्या आणि दुःखाच्या काळातही आपण स्वतःला आठवण करून देत रहायला हवे. कारण वेळेलाही वेळ हवा असतो वेळ बदलण्यासाठी!

आता हे सगळं झालं आपण कसं बाहेर पडायचं यावर. पण हल्ली कुठल्याही कारणाने आलेल्या नैराश्यातून आत्महत्येच्या विचारांकडे जाण्याचं प्रमाणही काही कमी नाही.

आईवडीलांचे प्रेशर, पिअर प्रेशर, प्रेमासाठी वा लग्नासाठी नकार, वर्षानुवर्षे रिलेशनशिपमध्ये राहून नेमक्यावेळी माघार, एखाद्याचे लग्न न जुळणे त्यामुळे नातेवाईकांमध्ये सततची चर्चा, टोमणे, प्रेमात वा लग्नानंतर फसगत, सत्य परिस्थिती लपवून खोटारडेपणाने लग्न जुळवणे आणि करणे, लग्नानंतर समजून न घेता कुणाच्या तरी सांगण्यावरून शुल्लक कारणांवरून संसार मोडणे, प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे हुंडाबळीचा शिकार होणे, डोमेस्टिक व्हायलन्स, नोकरीत अपयश, कॉर्पोरेटमधील स्पर्धात्मक वातावरण, नोकरी-व्यवसायातील राजकारण, पति किंवा पत्नीचे विवाहबाह्य संबंध या आणि अशा अनेक गोष्टी तरुणाईला नैराश्याच्या जाळ्यात ढकलत असतात.

अशा वेळी जर समजा तुमच्याकडे अशी पूर्णपणे खचलेली व्यक्ती खांदा मागायला आली जी तुम्हाला त्यांच्या आयुष्यातील हक्काची व्यक्ती मानत असेल, खास मित्र मानत असेल किंवा तुम्ही सांगितलेल्या चार गोष्टी ऐकून त्यांना बरं वाटत असेल, तर अशांना बाहेर कसं काढायचं. त्यांना बाहेर काढण्यासाठी पुढील काही गोष्टी करायला सांगा, किंवा तुम्ही करा…

▪️जे मनात आहे, जे वाटतंय ते सर्व ओकायला सांगा, म्हणजेच मन पूर्णपणे मोकळं करायला सांगा.
▪️हत्ती, मुंगीचे जोक्स, कोडी किंवा कापूस कोंड्याची गोष्ट, इत्यादी जे लहान मुले करतात ते करा किंवा त्यांच्या नकळत त्यांना करायला भाग पाडा.

▪️लहान मुलांसोबत त्यांना मिसळून द्या.
▪️अनाथालय किंवा वृद्धाश्रमात त्यांना घेऊन जा किंवा भेट द्यायला सांगा.

▪️कॉमेडी शोज, कॉमेडी मूव्ही, कॉमेडी व्हिडिओज, मोटिवेशनल व्हिडिओ पहायला सांगा किंवा तुम्ही त्यांना फॉरवर्ड करा.
▪️शक्य असल्यास तुम्ही स्वतः काही क्षणासाठी त्यांचे जोकर बना.

▪️सकारात्मक, एनर्जेटिक किंवा आवडीची गाणी ऐकायला सांगा.
▪️आवडीचं वाचन करायला, आवडीचे खेळ खेळायला सांगा.

▪️सतत सकारात्मक राहणाऱ्या, हसत खेळत राहणाऱ्या, मोटिवेट करणाऱ्या वा सेल्फमोटिवेटेड लोकांच्या संपर्कात रहायला सांगा.
▪️छंद जोपासण्यासोबत, व्यायाम, योगा, डान्स किंवा मेडिटेशन करायला सांगा.
▪️आजवरचे चांगले दिवस, चांगल्या घटना आठवायला सांगा.

सर्वात महत्वाचं म्हणजे आपलं दुःख, तुमच्या वैयक्तीक गोष्टी हे सर्वांना सांगू नका. ज्या व्यक्तीजवळ शेअर कराल ती व्यक्ती विश्वासू, प्रामाणिक आणि चांगल्या मनाची असावी. कारण हल्ली सोशल मिडीयावर अन् आपल्या अवतीभवती सुद्धा बरीच जणं असतात जे म्हणतात कि मन मोकळं करावं वाटलं, आत्महत्या करावी वाटली तर मला एक कॉल करा, माझ्यासह बोला. पण बऱ्याचदा हि माणसं तुमचं दुःख रडून, खिन्न मनाने ऐकतात पण तुमच्या पाठीमागून हसून हसून त्यांच्या खास मित्र मैत्रीणींना सांगतात.

किंवा काही दिवसांनी सोशल मिडीयावरच तुमच्या भावनांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे टोमणे मारत बाजार मांडतात. तर तुमच्या वाईट काळात जर तुम्ही काही वेळासाठी संयम राखून प्रयत्न करत राहिलात तर एक दिवस बाजी पलटून यश, आनंद, सुख तुमचंच आहे.

अगर वक्त बुरा चल रहा है तो बस कोशीशे जारी रख्खो। थोडा थोडा सबर करो अच्छी अच्छी खबर मिलेगी.

उंच भरारी घेण्यासाठी
उसंत जरा घेऊया ना,
वेळेलाही थोडासा
वेळ आपण देऊया ना….!


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

2 Replies to “काही वेळ द्या वेळेला..वेळ बदलण्यासाठी !!

  1. Really great…I need this ….at least one …..where I can cry from bottom of heart…just to releave from current situation and bounce back again

  2. एकच नंबर👌👌👌👌जागृती मॅडम तुमचं लिखाण खरच खूप काही शिकवून जातं. एकदम भारी👌👌👍👍👍👍

Leave a Reply

Your email address will not be published.