घरातल्या चिडचिडे वातावरणाचा परिणाम आपल्या करिअरवर कसा होतो पहा.

घरातल्या चिडचिडे वातावरणाचा परिणाम आपल्या करिअरवर कसा होतो पहा.


कु.हर्षदा नंदकुमार पिंपळे


घरातील चिडचिडं वातावरण आणि करिअर या दोन्ही गोष्टींचा समतोल साधणं फार अवघड आहे. पण याला काही अपवादही आहेत. घरातील चिडचिड्या वातावरणाचा आपल्या करिअरवर होणारा परिणाम व्यवस्थितरीत्या हाताळणं क्वचितच काही जणांना जमतं.आणि काही असेही अपवाद आहेत जे की घरात जास्तीत जास्त आनंदी आणि सकारात्मक वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करतात. पण तरीही घर म्हंटल की वादविवाद ,चिडचिडेपणा हा आलाच..! कितीही नाही म्हंटल तरी घरातल्या चिडचिड्या वातावरणाचा परिणाम हा आपल्या करिअरवर कळत नकळतपणे निश्चितच होत असतो.कसा तो पाहुयात……

माणसाला कुठलीही एखादी गोष्ट करायची झाली तर त्याला त्यासाठी हवी असते ती ‘मानसिक शांतता’.मानसिक शांतता नसेल तर माणसाच्या अनेक गोष्टी चुकतात , बिघडतात किंवा त्या साध्य होत नाहीत. खरतर एखाद्या जिद्दीपुढे ही मानसिक शांतता हरेलही…..पण हे किती जणांना शक्य आहे?? आपल्या कानांना कर्कश्श आवाज मुळीच सहन होत नाही.आणि त्यात तर एखाद्याची चिडचिड झाली असेल तर काही विचारायलाच नको.पण आपल्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा म्हणजे आपलं करिअर….!

आपलं करिअर चांगल घडलं पाहिजे असं सर्वांनाच वाटत असतं.आणि मुलांच्या पालकांनाही ते चांगलच घडावं असं वाटत असतं.पण मग घरातील अशा चिडचिड्या वातावरणात करिअर कसं घडत असेल…??या अशा वातावरणाचा करिअरवर काय परिणाम होत असेल..??याचा विचार कधी आपल्या मनात येतो का…??मान्य आहे की , चिडचिड होणं अगदी स्वाभाविक आहे.पण याच चिडचिडीमुळे घरातलं वातावरण आनंदी राहत नाही.

आणि त्याचा परिणाम आपल्या करिअरवर होताना दिसून येतो. रोजरोजची कटकट ,भांडणं आणि चिडचिड यांनी नकोनकोस होतं.अशा चिडचिडीत काय करिअर घडणार….??असं बऱ्याचदा वाटतं.कधी कधी तर वाटतं की करिअर करायच म्हणून करतोय.त्यात काही असा मला आता विशेष गंध राहीलाच नाही. अशा चिडचिड्या वातावरणात काही करायची इच्छाही नाही.घरात अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचीच कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरून चिडचिड होत असते.आणि ही चिडचिड अगदी रोजची झालेली असते.

लाल सिग्नल या चिडचिडेला बहुधा नसावाच…!म्हणून अशा चिडचिड्या वातावरणात मानसिक स्वास्थ्य बिघडते. आणि त्याचाच परिणाम करिअरवर होतो.कशातच लक्ष लागत नाही. सतत त्या चिडचिड्या वातावरणामुळे आपण स्वतः सुद्धा चिडचिड करायला लागतो.त्या चिडचिडीपासून लांब जावसं वाटतं.घरापासून काही काळ तरी दूर जावसं वाटतं.निसर्गाच्या सानिध्यात कुठेतरी स्वतंत्र खोलीत शांत वातावरणात त्यांना आपल्या करिअरवर फोकस करावासा वाटतो.

परिणाम नकारात्मक आणि सकारात्मक दोन्ही प्रकारचे असतात. अगदी तसच या चिडचिड्या वातावरणामुळे काही नकारात्मक परिणामही आपल्या करिअरवर होत असतात. आपला करिअरवरचा फोकस नकळतपणे हलायला लागतो.सतत त्या घरातल्या वातावरणाचा आपण विचार करायला लागतो.आणि त्याच्यातच कायमचे गुंतत जातो.आपल्याला आपलं करिअर सुद्धा घडवायचय हे आपण त्या विचारांच्या नादात विसरतो.

घरात अगदी कशावरूनही चिडचिड चालू असते.कुणाच्या घरात पैशावरून तर कुणाच्या घरात रूढी , परंपरा यांवरून वाद चाललेले असतात.एकमेकांची मत एकमेकांना पटत नाहीत आणि मग चिडचिड सुरू होते.पैशावरून चिडचिड होत असेल तर आपण थेट करिअरचा विचार बदलायला पाहतो.करिअर घडता घडता किती वेळ असाच जाईल.

त्यापेक्षा मिळेल ती नोकरी करून पैशाची चणचण दूर करतो.करिअर काय नंतरही करता येईल असा विचार आपल्या मनात घर करून बसतो. पण नोकरीत गढून गेल्यानंतर अनेकदा करिअर बाजूलाच राहतं.आता नोकरीच माझं करिअर असं म्हणून आपण नोकरीच्या ठिकाणी फोकस करतो.आवड -निवड सगळं गुंडाळून ठेवून देतो.

घरातील चिडचिड म्हणजे एक प्रकारची डोकेदुखी वाटायला लागते. आणि हो याने डोकही प्रचंड दुखतं.ताण येतो ,मानसिक स्वास्थ्य हलायला लागतं.आणि मनात वेगवेगळे न्युनगंड निर्माण व्हायला लागतात.

आपण म्हणतो इच्छा असेल तर आपण एखादी गोष्ट करायला मागे पुढे पाहत नाही. पण अशा वातावरणामुळे काही करायची इच्छाच मरुन जाते.आपण आपलं करिअर घडवू शकत नाही असाही समज होतो.किंवा आता कसलं आलय करिअर…रोजच्या चिडचिडीला अक्षरशः वैतागून जातात ही मुलं….कधी कधी आता सगळं संपल….माझं करिअर काही घडू शकत नाही. आणि करिअर घडलं नाही तर लोकं काय म्हणतील….घरचे काय म्हणतील या विचाराने बऱ्याचदा नैराश्यात जाऊन टोकाची भूमिका घेणारे काही कमी नाहीत. असाही परिणाम होऊ शकतो. थोडक्यात काय तर….

*अशांत वातावरणापासून दूर जावसं वाटणे
*स्वतंत्र राहून स्वतःचं करिअर घडवावस वाटणे.

*मानसिक स्वास्थ्य बिघडून करिअरवरचा फोकस हलणे.
*करिअर सोडावस वाटणे.

*मनात वेगळाच न्युनगंड निर्माण होणे.
*करिअर म्हणजे केवळ पैसा कमविणे किंवा नोकरी करणे असा समज करून घेणे.

*नंतर कधीतरी करिअर करू असा विचार करणे.
*आधी घर नंतर करिअर असं समीकरण मनात निर्माण होणे.

यांसारखे अनेक परिणाम करिअरवर होताना दिसून येतात.त्यामुळे घरातील वातावरण कसं ठेवायच हे आपणच ठरवल पाहिजे. आयुष्यातील एक सुंदर प्रवास म्हणजे करिअर आहे. तो करायचा की अर्धवट सोडायचा ?हे योग्य निर्णय घेऊन ठरवता आलं पाहिजे. पण त्यासाठी घरातील वातावरण त्या करिअरला तितकच पोषक आणि सोयीस्कर हवं.

मुलांना किंवा करिअर करणाऱ्या कोणालाही तिथे अशांत , अवघड , अडचणीच वाटणार नाही याचा काळजी आपणच घ्यायला हवी. आणि मी वर सांगितल्याप्रमाणे काही अपवाद आहेत याला….जे की चिडचिड बाजूला ठेवून करिअर घडवतात…. आपली स्वप्न काहीही करून साकार करतात.पण मित्रांनो , सगळे सारखे नसतात…म्हणून काही गोष्टी खरच गरजेच्या असतात.

म्हणून घरातील वातावरण चिडचिडं ठेवण्यापेक्षा आनंदी आणि सकारात्मक कसं ठेवता येईल याचा विचार करा.त्याने करिअर करायला नवं बळ मिळेल…….!


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

One Reply to “घरातल्या चिडचिडे वातावरणाचा परिणाम आपल्या करिअरवर कसा होतो पहा.”

  1. माझ्या घरी सुद्धा असेच वातावरण आहे. आईच्या ‌आजारपणामुळे घरातील खूप सारया जबाबदाऱ्या पार पाडता-पाडता माझं करिअर दूर गेलं आहे. घर, काम, जबाबदाऱ्या ही पहिली प्रायॉरिटी आणि ‌‌‌‌मग माझ्यात काही त्राण‌उरले तर स्वतःच्या आयुष्याकडे पहायचं….असं झालं‌आहे.
    खूप छान मार्गदर्शन मिळाले. धन्यवाद
    🙏🏻.
    मी प्रयत्नशील राहीन.

Leave a Reply

Your email address will not be published.