“त्याने मला दुःख दिलं, म्हणून मी सुद्धा त्याला दुःख द्यायलाच हवं का??”

“त्याने मला दुःख दिलं, म्हणून मी सुद्धा त्याला दुःख द्यायलाच हवं का??”


मधुश्री देशपांडे गानू


“भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाच्या माथी हाणू काठी”

संत तुकाराम यांच्या या ओळी सगळ्यांनाच परिचित आहेत. याचा अर्थ माझ्या दृष्टीने एखादी व्यक्ती चूक असेल तर काठी हाणू असा होत नाही तर नाठाळ म्हणजे ज्या व्यक्तीमध्ये दुर्गुण आहेत दोष आहेत त्याच्याशी वेळ प्रसंगी कठोर वागून त्याला सुधारण्याचा प्रयत्न करु.

माणसाचे भावविश्‍व मोठे विचित्र, गुंतागुंतीचे असते. रोजचे आयुष्य, दैनंदिनी जगताना त्याच्या छोट्या मोठ्या अपेक्षा, स्वप्नं, आशा, सुखाच्या कल्पना याबरोबरच तो जगत असतो. त्याचं स्वतःचं छोटेसे जग, त्याची प्रेमाची जवळची माणसं, मित्र-मैत्रिणी नोकरी धंद्यातले व्यावसायिक, सहकारी या सगळ्यांशी त्याचा रोजचा संबंध येत असतो. यातूनच प्रत्येक नात्याच्या अपेक्षा निर्माण होतात. कधी या आशा अपेक्षा पूर्ण होतात, तर कधी नाही.

मानवी जीवन अपेक्षांच्या, स्वप्नांच्या हिंदोळ्यावर झुलत असते. आपल्या मनाप्रमाणे, ठरवल्याप्रमाणे घटना, प्रसंग घडले नाहीत, माणसं अपेक्षेनुसार वागली नाहीत की आपल्याला दुःख होतं. राग येतो. कितीतरी अशा छोट्या मोठ्या घटना घडतात त्यात आपली काहीही चूक नसतानाही आपल्याला दुःख भोगावं लागतं. ते सहन करावं लागतं. सगळीच माणसं मनाने धैर्यवान, सक्षम नसतात. जी असतात ती शक्य तितक्या लवकर मार्ग काढून पुढे जातात. पण ज्यांना हे दुःख पेलवत नाही ते मात्र या दुःखाच्या फेऱ्यात मनाने अडकतात. त्यांना नैराश्य येतं, चिडचिड होते, झोप येत नाही. मनावर, शरीरावर वाईट परिणाम होतात.

जीवन म्हंटलं की सुखा मागून दुःख, दुःखामागून सुख हे ठरलेलंच आहे. कधी आकस्मिक घटनांना तोंड द्यावं लागतं, कधी जवळची प्रेमाची माणसं कायमची सोडून जातात, कधी आपलीच माणसे आपल्या मनाविरुद्ध वागतात, कधी ठरवलेली, योजलेली कामं होत नाहीत अशा आणि इतर अनेक कारणांनी आपण हताश होतो. दुःखी होतो. इथे आपण रोजच्या जगण्यातल्या मनोव्यापारांबद्दल, मानसिकतेबद्दल बोलणार आहोत.

सोपे उदाहरण घेऊ. “प्रियकर-प्रेयसी”. कोणतही नातं असू द्या, त्या नात्याच्या  मूलभूत अपेक्षा असतातच. त्याशिवाय ते नातं फुलत नाही. आणि मर्यादाही असतात. त्याही लक्षात घ्यायला हव्यात. एकाने जीव तोडून दुसऱ्यासाठी त्याला खुश करण्याकरता काहीतरी केलं आणि खुश होण्याऐवजी ती व्यक्ती मात्र विनाकारण चिडली तर पहिल्या व्यक्तीला दुःख होणारच ना! आपल्या प्रेमाच्या माणसाची जी प्रतिक्रिया अपेक्षित होती ती मिळाली नाही. मग अपेक्षाभंगाचे दुःख झालं.

“आपण पण त्याच्याशी असेच कधीतरी वागू म्हणजे त्याला कळेल मला किती दुःख झालं होतं ते!”. असा विचार करणार का आपण? आणि जर असा विचार मनात आला तर हे खरंच प्रेम आहे का? आपण नेहमी “कोण चुकलं?” यावर आपले लक्ष केंद्रित करतो. आणि त्या व्यक्तीशी वाईट वागू लागतो किंवा संबंध तोडतो. हे कोणत्याही दुःखावर औषध नाही ना! “कोण चुकलं?” यापेक्षा “काय चुकलं?” यावर जर आपण लक्ष केंद्रित केलं तर आपण शांतपणे यातून मार्ग काढू शकतो. त्या व्यक्तीच्या रागामागचं कारण शोधता येईल. तुमची त्याच्या कडून काय अपेक्षा होती ती शांतपणे सांगता येईल. जेणेकरून तुमचं नातं अबाधित राहील.

आपण एकूणच समोरच्या व्यक्तीबद्दल खूपच जजमेंटल असतो. कोणत्याही नात्यात आपल्या अपेक्षाही अवास्तव आणि जास्त असतात. खूप पटकन आपण एखाद्या बद्दल गैरसमज करून घेतो. आणि आपल्याच दुःखाला आमंत्रण देतो. खरं म्हणजे आपल्या विचार करण्याच्या पद्धतीत सगळे सामावलेलं आहे. कधीकधी खूप क्षुल्लक गोष्ट असते पण आपण “राई का पहाड” करतो. कारण कुठेतरी आपला अहंकार दुखावला गेलेला असतो. आपण अतीविचारांनी छोटसं दुःख मोठं करून ठेवतो. मानसिक, शारीरिक स्वास्थ्य गमावतो. नीट विचार केला तर आपण सहज यातून बाहेर पडू शकतो.

कधी कधी गंभीर प्रसंगही घडतात. आपलीच विश्वासाची माणसं किंवा नातलग हे आपली आर्थिक फसवणूक करतात. विश्वासघात करतात. हा धक्का जबरदस्त असतो. अशावेळी नुसते कोरडे उपदेश नको असतात. मार्ग हवा असतो. अशा कोणत्याही गंभीर प्रसंगी तीव्र दुःखाने खचून जाऊन एक तर चिडून बदला घेण्याची भाषा केली जाते किंवा निराश होऊन आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले जाऊ शकते.

दोन्हीकडे फक्त सर्वनाश आहे. एखादी व्यक्ती तुमच्याशी वाईट लागली म्हणून तुम्हाला दुःखाला सामोरे जावं लागतं. मग तुम्ही पण त्याच व्यक्तीच्या हीन, खालच्या पातळीवर उतरणार का?बहुतेक लोकांना दुःख कुरवाळत बसायची सवय असते. सतत स्वतः बद्दल नकारात्मक, मी किती दुःखी आहे हेच ते सगळ्यांना सांगत असतात. याने खरच त्यांच्या आयुष्यातले प्रश्न सुटतात का? दुःखाला गोंजारण्यात आपली ऊर्जा खर्च करण्यापेक्षा तीच ऊर्जा या दुःखातून बाहेर पडण्यासाठी वापरू शकता ना! याचा विचार नक्की करा.

तुम्हांला दुःख देण्याची माणसांची हीन मानसिकता आणि दुःखाची परिस्थिती हे तुम्ही लगेच बदलू शकत नाही कारण यावर तुमचे कोणतेही नियंत्रण नाही. पण यावर काय प्रतिक्रिया द्यायची आणि त्याला कसं सामोरं जायचं हे तुम्ही नक्कीच ठरवू शकता. आपल्याकडे जुनी म्हण आहे, “जे पेराल, तेच उगवेल.” याचप्रमाणे दुःख देणाऱ्या व्यक्तीला स्वतःलाही याची परतफेड करावी लागते. पण त्यासाठी आपण कारण बनू नये.

प्रत्येकाला आपल्या कर्माचे फळ मिळतेच. “जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर” हे तर सर्वांच्या आवडीचं गाणं आहे ना! म्हणून आपण चांगलं कर्म करण्यावर विश्वास ठेवून आयुष्यात पुढे जाण्याचा प्रयत्न करायचा.

आकर्षणाचा सिद्धांत तर आपण पाहिला आहेच. आपल्याला दुःख देणाऱ्या व्यक्तीला परत दुःख देण्याची भाषा करून आपण हीच सगळी नकारात्मकता परत ओढवून घेत नाही का??

सर्वात महत्त्वाचं म्हणजे “क्षमा”. एखाद्या व्यक्तीने तुम्हाला दुःख दिलं, विशेषत: प्रेमाच्या व्यक्तीने तर हे दुःख मनाला जास्तच लागतं. मन हळवं होतं. नक्कीच काही काळ जाऊ दिला तर ही दुःखाची टोचणी कमी होते. नातं महत्त्वाचं असेल तर तुम्ही बोलून, समजावून त्या व्यक्तीला मनापासून माफ करा. म्हणजे तुमच्या मनावरचं दडपण नाहीसं होईल. स्वानुभवाने सांगते हे नक्की करून बघा.

मनात कोणताही सल ठेवू नका. आणि जर एखाद्या नात्यात सातत्याने तुमचा अपेक्षाभंग होत असेल, तर अशा नात्यातून शांतपणे बाहेर पडा. “तुमचा स्वाभिमान तेवढाच महत्त्वाचा आहे” हे लक्षात असू द्या. तरीही माफ करायला विसरू नका. कोणतेही ओझे मनावर ठेवून पुढे चालू नका.

या आयुष्यात काहीच शाश्वत नाही. मग दुःख तरी कसं असेल? सुखाचे दिवस येणारच. पण त्यासाठी तुम्ही कोणालाही दोष न देता स्वच्छ, निर्मळ मनाने, सकारात्मक वृत्तीने हा सुखाचा मार्ग तुम्हीच शोधायला हवा. “मी आनंदी आहे आणि मला आनंदी व्हायचंय” एवढं लक्षात ठेवा म्हणजे कोणाला दुःख देण्याचा विचार तुमच्या मनात येणारच नाही. तुमचा स्वतःचा प्रवास छान, आनंदी, यशस्वी व्हावा ही खूणगाठ मनाशी बांधा. आणि त्यासाठी मनमोकळे, प्रामाणिक प्रयत्न करा…..

 


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

Leave a Reply

Your email address will not be published.