हळव्या मुली ढोंगी व्यक्तीच्या शारीरिक आकर्षणाला कसे बळी पडतात, वाचा !
कु.हर्षदा नंदकुमार पिंपळे
शारीरिक आकर्षण…..खरतरं आपल्याकडे अजूनही या विषयांवर खूप कमी प्रमाणात चर्चा होते.आणि घराघरातही या विषयांवर फारशी चर्चा होत नाही. का कोणास ठाऊक ? खूप कमी घरांमध्ये या अशा विषयांवर चर्चा केली जाते. अनेकदा या विषयांवर बोलण्याऐवजी लोकं हाच विषय कटाक्षाने टाळतात. या विषयावर बोलणं किती महत्वाच आहे हे कुणाच्या लक्षात येत नाही.
या गोष्टींच शिक्षण , ज्ञान व्यवस्थितरित्या पोहोचत नाही म्हणूनच कितीतरी प्रकारचे चुकीचे गैरसमज इतरत्र पसरतात.आणि त्यातूनच वाईट गोष्टी उद्भवतात. इतकं होऊनही या विषयाच महत्त्व लक्षातच येत नाही.शारीरिक गरज , वासना , आकर्षण यातला फरक जाणून घेणे किती आवश्यक आहे हे प्रत्येकाला समजण ‘must’ आहे. यातील फरक एकदा का स्पष्ट झाला तरी बऱ्याच गोष्टींमध्ये सुधारणा होण्यास साहाय्य होईल.
प्रत्येकाने गरज , वासना , आकर्षण यातला फरक समजून घ्यायला हवा. यातला फरक माहीत नसल्यामुळे कित्येकजण केवळ शारीरिक आकर्षणाला बळी पडतात.विशेषतः हळव्या मुली या ढोंगी व्यक्तीच्या शारीरिक आकर्षणाला बळी पडतात.हळवं असणं चांगल नाही असं नाही. पण हाच हळवेपणा एखाद्या गोष्टीला बळी पाडत असेल तर….?
किंवा या हळवेपणामुळे कुणी बळी पडत असेल तर…? तर..कुठेतरी या हळवेपणाला आवर घालणे गरजेचे आहे. त्या हळवेपणावर विचार करणे प्रत्येकाला भाग आहे.
आपण पाहतोय सध्याची परिस्थिती नाही म्हंटल तरी फारशी योग्य वाटत नाही. एकीकडे मुली कणखर होताना पाहतोय तर एकीकडे हेच चित्र फार वेगळ आहे. कितीतरी मुली या शारीरिक आकर्षणाला बळी पडताना दिसत आहेत. यामध्ये तर हळव्या मुलींच प्रमाण कदाचित जास्त असण्याची शक्यता आहे. कारण हळवेपणामुळे त्या अशा जाळ्यात अडकतात.आणि त्या अनावधानाने फसल्या जातात. त्यांची फसवणूक होते.काही मुली इतक्या हळव्या असतात की सहज साखरेसारख्या त्या विरघळून जातात.
एखाद्यासाठी काही करताना त्या मागेपुढे पहातच नाहीत. की आपलं काय होईल…?? फार फार तर त्या असा विचार करतात की दुसऱ्यांच नाही ऐकल तर काय होईल…? खरच कधीकधी खूप कठीण असतो हा हळवेपणा…! अशा मुली शारीरिक आकर्षणाला बळी पडतात. कसं ते जाणून घेऊयात——
*आयुष्यात साक्षरता महत्वाची आहे.आणि साक्षर म्हणजे केवळ शैक्षणिक दृष्टीने साक्षर नाही तर भावनिक , मानसिक दृष्टीने देखील प्रत्येकाने साक्षर होणे गरजेचे आहे.काही मुलींमध्ये भावनिक साक्षरता ही कमी प्रमाणात असते.आणि या भावनिक साक्षरतेच्या अभावामुळे या मुली अशा ढोंगी व्यक्तीच्या शारीरिक आकर्षणाला बळी पडतात.
*अनेकदा असं होतं की , घरातील वातावरण त्यांना सहन होत नाही. घरात घुसमट झाल्यासारखं वाटत असतं.कुणी समजून घेत नाही असं वाटत असतं.आपल्याला कुणी प्रेमाने जवळ घेत नाही असही त्यांना वाटतं. आणि अशातच हे वाटणं कधी कधी शारीरिक आकर्षणाला बळी पडतं.तो आपल्याला जवळ घेतोय , कुशीत घेतोय जे की घरी कुणी करत नाही अशी भावना मनात निर्माण होऊन या मुली शारीरिक आकर्षणाला बळी पडतात. त्यांचा शारीरिक सहवास म्हणजे सगळ काही असा त्या समज करून घेतात.
*अगं काही नाही , मला हवहवसं वाटत हे सगळं तसच तुलाही हवहवस वाटतय माहिती आहे मला , तु घाबरतेस पण घाबरू नको मी आहे नं तुझ्यासोबत , तुझ्याबरोबर ….चल चल असं म्हणून तिला विरघळून टाकतात. आणि तीसुद्धा विरघळून जाते.माझ्यासोबत आहे तो असं म्हणालाय…वगैरे वगैरे गोष्टींना या मुली सहज फसतात.
*अनेकदा तर…तु माझी आहेस , माझं तुझ्यावर प्रेम आहे , मग एवढ करायला काय हरकत आहे…? थोड जवळ यायला काय हरकत आहे…?आपण लग्न करू..वगैरे वगैरे गोड बोलून तिला या शारीरिक जाळ्यात ओढतात.
*यात वाईट काहीच नसतं , आणि बघ तु नाही म्हणालीस तर मी सोडून जाईल…तुला वाटतय का मी सोडून जावं…?? तुला माझ्याबद्दल काही वाटतच नाही… जाऊदे मी जातो……असं हे बोलणं हळव्या मुलींना सहजपणे घेरून टाकतं.
*आणि हे फक्त प्रेमाच्या ठिकाणी नाहीच तर इतरत्र सुद्धा अशा गोष्टी घडतात.भावनिक दृष्टया त्यांना कमजोर करून जाळ्यात अडकवणारी काही माणसं सुद्धा या जगात कमी नाहीत.
बघा , अशा प्रकारे विविध तऱ्हेने अशा ढोंगी व्यक्तीच्या शारीरिक आकर्षणाला हळव्या मुली बळी पडतात.आता तुम्ही म्हणाल त्यांना साधी सोपी गोष्ट कळत नाही का..?? त्यांना अक्कल नसते का वगैरे वगैरे…. पण अशा अनेक हळव्या मुली या भावनिक दृष्टीने साक्षर नसतात. हळव्या मनामुळे त्या कावऱ्याबावऱ्या होऊन या आकर्षणाला बळी पडतात. हळव्या मनात भीती जास्त असते आणि ती भीतीसुद्धा याला कारणीभूत ठरते. हळव मन नाईलाजाने सहज सगळं स्विकारायला तयार होतं.कारण पुढे काय होईल….. हा प्रश्न मनात गोंधळाची स्थिती निर्माण करतो.अशा गोंधळात काय करावं त्यांना काही कळत नाही. आणि म्हणूनच हळव्या मुली अशा ढोंगी व्यक्तीच्या शारीरिक आकर्षणाला बळी पडतात.
त्यामुळे प्रत्येक मुलीने जितकं ‘strong’ बनता येईल तितकं ‘strong’ बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अशा शारीरिक आकर्षणाला त्यांनी बळी पडता कामा नये.हळवं होऊन कधीच पाघळून जाऊ नका.सगळ्या गोष्टीतला फरक , ज्ञान समजून घ्या आणि विचार करा.तेव्हा… हळव्या मुलींनो जरा जपून….!
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


