Skip to content

“मृत्यू ही आयुष्याची शोकांतिका नव्हे, तर मेल्यासारखं जगणं ही शोकांतिका आहे…”

“मृत्यू ही आयुष्याची शोकांतिका नव्हे, तर मेल्यासारखं जगणं ही शोकांतिका आहे…”


मधुश्री देशपांडे गानू


“मौत आनी है आएगी इक दिन,

जान जानी है जाएगी इक दिन,

ऐसी बातों से क्या घबराना

यहाँ कल क्या हो किसने जाना??

जिंदगी एक सफर है सुहाना…”

“अंदाज” या हिंदी चित्रपटातलं हे गीत. आद. किशोरकुमार  यांनी सुंदर गाऊन अजरामर केलंय. जीवन अतिशय सुंदर प्रवास आहे. उद्या काय होईल हे सांगता येत नाही. कधीतरी मृत्यू हा येणारच, पण त्यामुळे घाबरून आज जगणं का सोडायचं?? किती सुंदर अर्थ आहे. मृत्यूनंतर एका क्षणात सुटका होते माणसाची. पण जगत राहणं आणि तेही आनंदाने भरभरून यातच तर खरं कौशल्य, कसोटी, माणूसपण आहे.. हो ना!

या जगात दोनच सत्यं आहेत. जन्म आणि मृत्यू. जन्माला आलेला प्रत्येक जीव कधीतरी मृत्यू पावणारच. त्यामध्येच आयुष्याचा प्रवास आहे. संपूर्ण विश्वाचा पसारा पाहता आपलं जीवन अगदीच छोटासं आहे. पण आपल्यासाठी ते अमूल्य, सुंदर , प्रत्येक क्षण भरभरून जगणं असायलाच हवं.

जगात सभोवताली जे घडतंय, गेल्या दीड-दोन वर्षांपासून आपण जी महामारी अनुभवतोय, त्यावरून तर अजूनच अधोरेखित होतंय हे. काल पाहिलेली सुदृढ हसरी व्यक्ती आज या जगातच नाही. मृत्यू मग तो कोणाचाही असो, अगदी परक्या व्यक्तीबाबत ही असं ऐकताना आपण हळहळतो. मग घरातील कुटुंबातील प्रेमाची व्यक्ती अशी मृत्यूने अचानक हिरावून घेतली तर आभाळच कोसळतं.

हे दुःख भलेभले पचवू शकत नाहीत. आपलं माणूस आता कधीच दिसणार नाही आणि ही घटना आपण कधीच बदलू शकत नाही हे भयंकर सत्य आहे. अगदी असहाय्य करणारं! पण तरीही गतिमान काळाप्रमाणे आपण यातून बाहेर पडतो. आपल्या स्वतःसाठी आणि आपल्या इतर प्रेमाच्या माणसांसाठी पुन्हा जगण्याची उभारी धरतो.

आनंद शोधू पाहतो. जाणारा तर जातो पण मागे राहिलेल्यांना मात्र जगावंच लागतं. त्याच घटनेपाशी थांबून अडकून नाही जगता येत. आयुष्य खरच खूप सुंदर आहे आणि कोणाच्या जाण्याने ते थांबतही नाही. पण आपण जगायचे थांबलो, मेल्यासारखे जगायला लागलो, आपला आयुष्य जगण्याचा रस जर संपला तर मात्र आपण जिवंतपणीच एक शोकांतिका होऊन बसतो.

आजच्या जीवघेण्या स्पर्धात्मक युगात माणूस माणसाला पारखा होतोयं. कुटुंबातील व्यक्तींसाठीही त्याला वेळ नाहीयं. फक्त पैसा कमवायचं यंत्र बनला आहे. सर्व सुखसोयींनी सुसज्ज घर, गाड्या, बंगले, बँक बॅलन्स, यश, नाव सगळं आहे. पण स्वतःच्या प्रेमाच्या माणसांबरोबर निवांत वेळ काढून फक्त गप्पा कधी मारल्या होत्या हे त्याला आठवतही नाही. हे मेल्यासारखं जगणंच आहे की!

“जीवन म्हणजे भौतिक सुखांचा भडिमार” अशी व्याख्या झाली आहे आपली. एकमेकांवर निर्व्याज प्रेम, निर्मळ सुंदर नातेसंबंध, जीवाला जीव देणारी माणसं हे दुर्मिळ होत चाललं आहे. अगदीच अस्तित्वातच नाही असं म्हणायचं नाहीयं. अजूनही माणुसकी जिवंत आहे म्हणून हे जग चालू आहे. तरीही पराकोटीची अप्पलपोटी, स्वार्थी वृत्ती, अहंकारी वृत्ती, हिंसक वृत्ती मात्र प्रमाणाबाहेर वाढली आहे हे खरंच…

आज कोणत्याही वयोगटातील माणसांना फार लवकर नैराश्य येत आहे. अगदी क्षुल्लक कारणाने जगण्याची इच्छा मरतेयं. आलेल्या दुःखद, वाईट प्रसंगाला समर्थपणे तोंड देण्याची शक्ती क्षीण होत आहे. प्रेमभंग, कार्यालयीन हेवेदावे, स्पर्धा, चढाओढ, मत्सर, असूया, अहंकार, अविश्वास, संशय, आपल्या प्रेमाच्या माणसाचा मृत्यू एक ना अनेक.. यातूनच रोजचं जगणं ही मुश्कील होत आहे. आज समुपदेशक आणि मानसोपचार तज्ञ यांचं काम कमालीचं वाढलं आहे. कारण मानसिक आरोग्याबद्दल आम्ही बोलतच नाही आहोत.

शरीराला अपाय झाला तर आम्ही लगेच डॉक्टरकडे जातो. पण मनाला अपाय झालेला आम्ही मान्यच करत नाही. आसपासच्या लोकांनाही त्याचे गांभीर्य लक्षात येत नाही. त्याचे व्हायचे तेच परिणाम होतात. प्रचंड नैराश्य, निद्रानाश, अतिविचार, चिंता, दैनंदिन काम करण्याचा अभाव, आळस, इच्छाशक्तीचा अभाव, कशाची तरी प्रचंड भीती अशा अनेक समस्या उद्भवतात आणि शेवटी आत्महत्येसारखे टोकाचे मार्ग स्वीकारले जातात. ही जीवनाची केवढी मोठी शोकांतिका आहे!!

मान्य आहे प्रत्येक व्यक्ती वेगळी असते. सगळेच मनाने खंबीर नसतात. पण आपणच आपल्या आयुष्याला, त्यातील आनंदाला, दु:खाला ही जबाबदार असतो. जीवन एकदाच मिळतं. उद्या, अगदी पुढच्या क्षणाला काय होईल हे आपण सांगू शकत नाही. कशाचीही शाश्वती नाही. मग अशावेळी “माझं आयुष्य, माझा आत्ताचा क्षण, माझा वर्तमान मी भरभरून आनंदाने जगेन आणि माझ्या माणसांनाही भरभरून आनंद देईन”

हा विचार प्रत्येकाने करायला हवा. कारण हा आनंद आणि तुमचं मानसिक समाधान हेच फक्त शाश्वत आहे. येणाऱ्या सुखद आणि दुःखदही प्रसंगांसाठी दोन हात करण्याचं सामर्थ्य फक्त आपणच स्वतःमध्ये निर्माण करू शकतो आणि जीवनाला यशस्वीपणे सामोरे जाऊ शकतो.

भूतकाळाचं ओझं न बाळगता, भविष्याची चिंता न करता, वर्तमान यशस्वी, सुखमय ,आनंदी करण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्नशील असायलाच हवं. उमलणारं फूल पाहा. अगदी एक ते दीड दिवसाचंच आयुष्य असतं त्याचं.. परत ते देवाच्या चरणी वाहणार की गजर्यात माळलं जाणार की असंच गळून पडणार हे त्याला कुठे माहित असतं??? पण नैसर्गिक रित्या ते खूप छान पूर्णपणे विकसित होतं.

सगळ्या जगाला आपल्या छोट्याशा आयुष्यातही भरभरून सुगंध देऊन जातं. आपलंही आयुष्य या फुलांप्रमाणे हवं. जे काही आयुष्य आपल्याला परमेश्वराने दिलं आहे ते भरभरून पूर्णपणे आनंदाने जगायलाच हवं. जिवंतपणी मेल्यासारखं जगून शोकांतिका न होता, असं  आयुष्य जगा की तुमच्या मृत्यूनंतरही लोकांच्या स्मरणात तुम्ही सतत जिवंत असायला हवं.. हो ना!


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

2 thoughts on ““मृत्यू ही आयुष्याची शोकांतिका नव्हे, तर मेल्यासारखं जगणं ही शोकांतिका आहे…””

  1. जगण्यात नाही मजा,, जीवन तर आहे सजा.
    भय असताना हो निर्भय, कर फक्त नकली अभिनय.
    मृत्यू तर मुक्ति, मृत्यु तर मोक्ष, एकदाचा सोक्षमोक्ष..
    जीव शिव भेट, एकदम थेट.

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!