Skip to content

दुसऱ्यांच्या चांगल्याबद्दल आपण द्वेष का बाळगावा ??

दुसऱ्यांच्या चांगल्याबद्दल आपण द्वेष का बाळगावा ??


मेराज बागवान


जगात अनेक प्रकारची माणसे असतात. प्रत्येकाचे विभिन्न स्वभाव , प्रत्येकाची वेगवेगळी मते आणि वैचारिक दृष्टिकोन. काही जण असे असतात की इतरांचे नेहमी चांगले व्हावे असेच त्यांना वाटत असते .आणि जेव्हा जेव्हा चांगल्या घटना इतरांच्या आयुष्यात घडतात , तेव्हा ही माणसे मनापासून त्यांच्यासाठी आनंदी होतात.आणि पुढे देखील त्यांचे नेहमी भलेच व्हावे असे त्यांना वाटत असते.पण या उलट अशी देखील माणसे असतात , की त्यांना दुसऱ्यांचे चांगले पाहवत नाही.किंवा , चांगली माणसे च हे लोक स्वीकारत नाहीत.

पण ,दुसऱ्यांच्या चांगल्याबद्दल आपण द्वेष का बाळगावा? ही मानसिकता च मुळी नकारात्मक आहे. स्वतःचे सर्व काही नीटनेटके असले तरी देखील , काही जण जेव्हा कधी इतरांचे चांगले होते ,तेव्हा त्यांचा जळफळाट होतो.मग कधी नकारात्मकरित्या त्या व्यक्तीशी बोलणे, टोमणे मारणे अशा गोष्टी घडतात. तोंड भरून कौतुक करणे तर दूरच, उलट त्या व्यक्तीची निंदा च जास्त केली जाते. जसे की , ‘तीच काय बाई आधिपासूनच सगळं स्थिरस्थावर आहे, मग काय कसली कमी’ इत्यादी.

एखाद्याचे चांगले झाले की नकळत लोक त्या व्यक्तीचा द्वेष करु लागतात.कधी कधी त्या व्यक्तीशी बोलणे टाकतात किंवा त्या व्यक्तीचा उल्लेख जरी आला तरी त्यांची चिडचिड होते.पण ह्या मानसिकतेचे काय कारण असू शकते? एक तर , आपण एखाद्याचा चांगुलपणा सहजासहजी स्वीकारत नाही , तसेच त्या व्यक्तीच्या बाबतीत चांगले काही झाले तरी देखील आपण ते स्वीकारत नाही. दुसरे म्हणजे,’कोणी इतके चांगले कसे वागू शकते?’ यावर आपला विश्वासच नसतो.आणि म्हणून आपण दुसऱ्यांच्या चांगल्याबद्दल द्वेष बाळगतो.

कोणाचा शाळेत पहिला नंबर आला, कोणाला नोकरी लागली , कोणाचे लग्न जमले , कोणाला नोकरीत बढती मिळाली तरी देखील काही जण या चांगल्या गोष्टींचा द्वेष करू लागतात.यात आणखीन एक मानसिकता असू शकते ती म्हणजे, ‘तुलना करणे’.आपण प्रत्येक बाबतीत आपली इतरांशी तुलना करतो आणि नको त्या गोष्टी ओढवून घेतो.पण आपण हे विसरतो की , प्रत्येक व्यक्ती ही वेगळी असते. कोणी एका गोष्टीत हुशार असतो तर कोणी दुसऱ्या कोणत्यातरी गोष्टीत हुशार असतो.प्रत्येकाचे आयुष्य वेगवेगळे असते.आपण विनाकारण तुलना करतो , जे की व्यर्थ असते. या सगळ्यात आपली फक्त मानसिक शांतता भंग होत असते.

जे चांगले आहे त्याला चांगलेच म्हणले पाहिजे.आपण द्वेष करून ,चांगली गोष्ट बदलत नाही.जे जसे आहे तसे स्वीकारता आले पाहिजे.इतरांचा चांगुलपणा आत्मसात करता आला पाहिजे.इतरांकडून प्रेरणा घेता आली पाहिजे.पण याच्या बरोबर उलट आपण वागत असतो आणि कुढत बसत असतो. द्वेष बाळगावा तो नकारात्मक प्रवृत्तीचा, हिंसेचा.पण चांगुलपणा हा चांगुलपणा असतो.चांगल्या घटना घ्या चांगल्याच असतात.त्यामुळे ह्या चांगल्या गोष्टींसाठी द्वेष बाळगण्याची काहीच आवश्यकता नसते.

जेव्हा कधी कोणाचे चांगले होते तेव्हा नेहमी खुश रहा, इतरांसाठी आनंद बाळगा. चांगली वेळ प्रत्येकाची येते. सध्या आपल्यावर चांगली वेळ नाही , आणि नेमके त्याच वेळी कोणाच्यातरी आयुष्यात काही तरी चांगले घडते आहे म्हणून कधीच चुकून देखील द्वेष बाळगू नका. आणि जर का आपण असे वागत असू तर हे चांगल्या मानसिक आरोग्याचे लक्षण नाही.

म्हणूनच एकच गोष्ट सांगावीशी वाटते, सदृढ मानसिक आरोग्य जपण्यासाठी, दुसऱ्यांच्या प्रत्येक चांगल्या गोष्टीसाठी, त्यांच्यातील चांगुलपणावर नेहमी आनंदी राहा, सकारात्मक रहा आणि मानसिकरीत्या एक आदर्श व्यक्तिमत्त्व बनाण्याकडे आपले जीवन केंद्रित करा.

सदृढ मानसिक आरोग्यासाठी भरभरून शुभेच्छा!!!


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “दुसऱ्यांच्या चांगल्याबद्दल आपण द्वेष का बाळगावा ??”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!