Skip to content

तात्पुरत्या सुरक्षिततेसाठी तुमच्यातल्या अभिनव क्षमता जाळू नका.

तात्पुरत्या सुरक्षिततेसाठी तुमच्यातल्या अभिनव क्षमता जाळू नका.


हर्षदा नंदकुमार पिंपळे


एका सामान्य कुटुंबात जन्माला आलेली ‘मुक्ता’ म्हणजे एक असामान्य क्षमता असलेली मुलगी होती.लहानपणापासून अगदी हरहुन्नरी अशी चंचल आणि हुशार.शाळेतील अभ्यासात ती हुशार होती पण त्याहीपेक्षा ती शाळेतील ईतर गोष्टींमध्ये कैक पटीने अधिक पारंगत होती.

तिला अभ्यासापेक्षा त्या कला-क्रीडा क्षेत्रात कमालीचा रस होता.एक दहावीपर्यंत तिने शाळेत व्यवस्थित अभ्यासही केला.पण दहावी म्हणजे करिअरच्या टप्प्याची सुरुवात असं म्हणतात.दहावीनंतर तिला चित्रकलेच शिक्षण घ्यायची खूप इच्छा होती. कारण तिला चित्रकलेत तर प्रचंड रस होता.आणि ती खूप सुंदर अशी चित्रही रेखाटायची.पण आजुबाजूची लोकं आणि घरातील व्यक्तींनी मात्र तिच्या या निर्णयाला कोणताही पाठिंबा दिला नाही.

याऊलट त्यांनी ‘चित्र काढून कुणाच आणि किती पोट भरणार ..? असा प्रश्न तिच्यासमोर मांडला. त्यापेक्षा आत्ता कॉमर्सला प्रवेश घेऊन पदवी पूर्ण करून लगेच नोकरीला लाग.एखाद्या बँकेत तुला सहज दहा-पंधरा हजाराची नोकरी मिळेल.अशा अनेक गोष्टी तिला इतरांनी सांगितल्या.

खरं तर दहावी म्हणजे काही खूप मोठ वय नव्हतच तिचं. पण अवघी पंधरा वर्षाची ती खूप समजुतदार होती. आपलं Passion आणि Profession एकच असावं असं वाटत असतानाही ‘आर्थिक दृष्टीने विचार करून बघ’ असं तिला सांगितल्याप्रमाणे ती मुक्ता मनावर दगड ठेवून कॉमर्सला प्रवेश घ्यायला तयारही झाली.नंतर बारावी झाली आणि पदवीही पूर्ण झाली. तिला चांगली नोकरीही मिळाली.

पण तिचं मन काही त्यात रमत नव्हतं.कॉलेजला असताना तशी अधूनमधून ती चित्र काढायची. पण जे चोवीस तास करावं असं वाटायच तेच ती चोवीस तासातून एकदा करायची.(अर्थात चित्र काढणे)

एखाद्याला पाहताक्षणी त्याचं स्केच काढणं , निसर्ग जसा दिसतोय तसाच अगदी कागदावर रेखाटणं म्हणजे तिच्यासाठी काही क्षणांचा खेळ असायचा.कोणतही चित्र ती सहजपणे काढायची. तिच्या हातात वेगळीच जादू होती. जादू म्हणण्यापेक्षा तिच्यात असणारी ती एक अभिनव अशी क्षमता होती.

पुढे जाऊन ती एखादी मोठी चित्रकारही झाली असती.तिने नाविन्यपूर्ण असं चित्रांच जग दाखवलं असतं.पण हे सगळं तसच राहिलं.तात्पुरती सुरक्षा ,तात्पुरती गरज लक्षात घेऊन तिच्या सभोवताली असणाऱ्या लोकांनी तिला तो सल्ला दिला.

पण त्यावेळी त्यांनी तात्पुरती सुरक्षा लक्षात घेऊन तिच्यात असणारी चित्र काढण्याची क्षमता कळत नकळतपणे कुठेतरी दडवून ठेवली.म्हणजे ती काय करू शकत होती आणि ती काय करत होती यामध्ये खरच खूप मोठा फरक होता.आर्थिक दृष्ट्या ते योग्य होतं परंतु त्या तात्पुरत्या सुरक्षेसाठी तिने तिच्यात असणाऱ्या अभिनव क्षमता मात्र जाळल्या होत्या.आपल्यात असणारी क्षमता काय करू शकते याची तिला आणि इतरांनाही जाणीव नव्हती.त्यामुळे तिच्यातील तो एक कलाकार अनभिज्ञच राहिला.अर्थात जगापासून आणि स्वतःपासून दूरच राहिला.

अशा अनेक मुक्ता आपल्या आजूबाजूला असतात. किंवा कधी कधी आपणही त्या मुक्तासारख्या अवस्थेतून जात असतो.आपण अशी अनेक उदाहरणं आपल्या अवतीभवती पाहतो.कुणाला मेडिकल किंवा इंजिनिअरिंग ला जाण्यात अजिबात रस नसतो.कुणाला चित्र काढण्यात, नृत्य करण्यात रस असतो.आपले छंदच आपलं काम असावं असं कित्येकांना वाटतं.

परंतु काहींची आर्थिक परिस्थिती तितकीशी चांगली नसते तर काहींना ती गोष्ट पटतच नसते.पण यामध्ये अनेकदा आपण आपल्यातील असणाऱ्या अभिनव क्षमतांकडे मात्र दुर्लक्ष करतो.आपणच आपल्यातील क्षमता मारून टाकतो.

आपल्याकडे अनेकदा सृजनशील आणि नाविन्यपूर्ण अशा कल्पना असतात. तशा क्षमता असतात. आपण काहीतरी वेगळं करू इच्छित असतो.पण सहज समोर दिसणारी आणि तात्पुरती तीच योग्य वाटणारी परिस्थिती आपल्याला आपल्या क्षमतांपासून अनाकर्षित करत असते.

पण नेहमीच असा एकाच चौकटीतला विचार करून चालत नाही. स्वतःतील क्षमतांना जर ‘grow up’ करायच असेल तर असलेल्या क्षमतांची आधी जोपासना करणं गरजेचं असतं.तात्पुरता विचार करून त्याच क्षमतांना कायमच छाटायच नसतं.’think out of the box’ हे कधीतरी आपल्या आयुष्याला लागू करणं गरजेच असतं.

कारण मुळातच आपल्याकडे क्षमता असताना आपण त्यांचा योग्य वेळी उपयोग केला नाही तर त्या क्षमतांचा काय उपयोग….?
केवळ क्षणिक सुरक्षितता लक्षात न घेता मुळातच असलेल्या क्षमतांसाठी आपणच आपल्या मनाची दारं उघडली पाहिजेत.चाकोरीबद्ध जीवन जगण्यापेक्षा चौकटीपलीकडे जाऊन जीवन जगलात तर ते अधिकाधिक समृद्ध होईल.

तात्पुरत्या सुरक्षेने आयुष्यभराचा त्रास कमी होणार असतो का…? तर नाही.पण तरीही त्याच तात्पुरत्या हेतूसाठी आपण आपल्या क्षमतांना एका कोपऱ्यात गुंडाळून ठेवतो.त्यावेळी आपण आपल्यातील क्षमतांना वाव दिला तर काय होईल याचा विचार काही करत नाही. आत्ताची गरज भागतेय नं असा विचार करून आपण खरं तर जे करायला नको ते करतो./करायला लावतो.पण क्षमता ओळखून पावलं उचलली तर पुढील संपूर्ण आयुष्यभराची गरज भागू शकते , आयुष्य अधिकाधिक परिपूर्ण नी समृद्ध होऊ शकतं हा विचारच आपण करत नाही.

तर पहा.., आपल्याकडील क्षमतांचा योग्य वेळी योग्य ठिकाणी वापर करायला विसरू नका. तात्पुरत्या सुरक्षिततेचा विचार करण्याऐवजी क्षमतांचा थोडा विचार केला तर फार फार सुरवातीला थोडा त्रास होईल पण नंतर मात्र सगळं सुलभ आणि सुंदर होईल यात शंका नाही.

आपल्यातील अभिनव क्षमताच जगणं अधिक सुंदर आणि वळणदार करत असतात.म्हणूनतात्पुरत्या सुरक्षिततेसाठी तुमच्यातल्या अभिनव क्षमता कधीच जाळू नका.

बाकी जगणं सुंदर आहे त्याला नव्या दृष्टिकोनातून पहायला शिका…!


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!