Skip to content

“टीकाकारांना बोंबलू द्या.. नाहीतर तुमचा फुकटचा प्रचार बंद होईल!!”

“टीकाकारांना बोंबलू द्या.. नाहीतर तुमचा फुकटचा प्रचार बंद होईल!!”


मधुश्री देशपांडे गानू


” निंदकाचे घर असावे शेजारी ”

ही म्हण सगळ्यांना माहीत आहेच. माणूस म्हटलं की तो गुणदोषांसकट आला. कोणीही इथे परफेक्ट नाही. प्रत्येकाचा स्वतःचा असा स्वभाव असतो. त्यांच्यावरचे संस्कार, परिस्थिती, त्याचा दृष्टिकोन, त्याची व्यक्त होण्याची पद्धत, त्याची विचारधारा यावर त्याचा स्वभाव अवलंबून असतो. प्रत्येकालाच असं वाटत असतं, मी खूपच चांगला/ चांगली आहे.

आणि त्याच्या पुरतं ते खरंही असतं. पण म्हणून त्याच्यात दोष नसतात का?? तर ते प्रत्येकात असतातच. तुमच्यातही आणि माझ्यातही आहेत. पण फक्त आपण आपल्या दोषांकडे कानाडोळा करतो. किंवा कोणी आपले दोष दाखवले तर लगेच आपल्याला राग येतो. आपण सहजपणे स्वीकारत नाही. मान्य करत नाही. आणि त्यात बदल करण्याचाही प्रयत्न करत नाही.

प्रत्येक व्यक्तीची स्वतःबद्दल ठाम समजूत, ठाम मतं असतात. त्याचप्रमाणे अशाच ठाम समजुती आणि ठाम मतं त्याची दुसऱ्या बद्दलही असतात. आपण किती सहजपणे एखाद्याबद्दल मत व्यक्त करतो. सहज कोणाच्याही वागण्याचा न्यायनिवाडा करतो. चूक-बरोबर, चांगलं-वाईट ठरवून मोकळे होतो.

आज आपण टीकाकारांबद्दल बोलणार आहोत. पण आपणही कोणासाठीतरी टीकाकार असू शकतो. सर्वात प्रथम तुम्ही खूप चांगले आहात हे सतत दुसऱ्याला पटवून देऊ नका. यासाठी तुमची ऊर्जा खर्च करू नका. कारण तुम्ही सांगाल ते समोरचा ऐकून घेईल पण त्याला ते पटेलच असं नाही. व्यर्थ स्पष्टीकरण देणे अगदी टाळा. तो त्याच्या कुवतीनुसार ऐकणार आणि त्यातून त्याला हवा तो अर्थ काढणार. मग अशा माणसांशी संवाद करायचाच कशाला??

टीकाकार सरसकट वाईटच असतात, असेही नाही. टीका ही सकारात्मक आहे की नकारात्मक हे ओळखता आलं पाहिजे. केवळ तुमच्या मतांपेक्षा कोणी वेगळं मत मांडलं तर ती टीका होत नाही.

उदाहरण घेऊ. मी एक लेखिका कवयत्री आहे. माझ्या लिहिण्यावर हजारोंनी प्रतिक्रिया येतात. सगळ्याच छान असायला हव्यात हे तर बरोबर नाही ना! प्रचंड कौतुक होतं हे तर खरंच. पण एखादा राहून गेलेला मुद्दा जर कोणी लक्षात आणून दिला तर ती टीका होत नाही. मी त्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहिन आणि माझ्या पुढील लेखनात सुधारणा करायचा प्रयत्न करेन.

तुमचे नातलग, कुटुंबीय, तुमच्या जवळच्या मित्र मैत्रिणी यांनी जर तुमच्यातले दोष सांगितले किंवा तुमच्या एखाद्या कामामध्ये त्रुटी काढली तर ती सरसकट टीका होत नाही. कारण तुमच्यामध्ये सुधारणा व्हावी, तुमची प्रगती व्हावी ही सकारात्मक भूमिका त्यामागे असते. तुमच्या कपड्यांबद्दल, तुमच्या बोलण्याबद्दल एखादी मैत्रीण सहज तुम्हाला सांगू शकते. कारण तुम्ही छान दिसावं ही भूमिका त्यामागे असते. हे सगळं तुम्ही सकारात्मकतेने स्वीकारलं तर तुम्ही स्वतः मध्ये चांगला बदल नक्की कराल.

“तुमच्यावर होणारी टीका तुम्ही कशी घेता यावर सगळे अवलंबून आहे.” सकारात्मक बदल घडवून आणणारी टीका जर तुम्ही स्वीकारली आणि त्यानुसार स्वतः मध्ये बदल केले तर तुमचे नातेसंबंध, नोकरी व्यवसायातील संबंध, तुमच्या स्वतःचे कौशल्य तुम्ही सुधारू शकता. एक माणूस म्हणून तुमची सर्वांगीण प्रगती होते.

माणूस हा सामाजिक प्राणी आहे. टीका सगळेच करतात. ज्या विषयातलं आपल्याला काहीही कळत नाही, त्यावरही टीका करणारे महाभाग आपल्याला सहज दिसतात. सामाजिक, वैयक्तिक अनुभवांती प्रत्येकाच्या विचारांची चौकट ठरलेली असते. त्या चौकटीबाहेर काहीही घडले तरी तो लगेच त्याच्यावर टीका करतो.

आता नकारात्मक टीका पाहू. एखाद्या व्यक्ती बद्दल, अगदी तुमच्या प्रेमाच्या माणसालाही तुमच्याबद्दल प्रचंड असूया, मत्सर, द्वेष असू शकतो. अशा व्यक्ती तुमच्या प्रत्येक यशाच्या, प्रगतीच्या टप्प्यावर, तुमच्या यशस्वी होण्यावर सतत टीका करतात. कारण तुमचं यशस्वी होणं त्यांना सहन होत नाही. मग काहीही खरं-खोटं गॉसिपिंग करणं, टीका करणं असे प्रकार होतात.

तुमच्या मागे वाईट बोलणं अशी मंडळी करत असतात. काही व्यक्ती प्रचंड अहंकारी असतात. त्या प्रत्येकालाच नाव ठेवतात. त्यांना कोणातच काही चांगलं दिसत नाही. काही व्यक्तींना माणसांना काबूत ठेवायची  सवय असते. अशी माणसं सतत तुमच्यावर टीका करून तुम्हाला कमीपणा देण्याचा प्रयत्न करतात. उदाहरणार्थ. तुमच्या कामाच्या ठिकाणी असलेले वरिष्ठ, तुमचे कार्यालयीन सहकारी अशी अनेक अगदी सहज दिसणारी उदाहरणं आहेत.

या जगात कोणीही परफेक्ट नाही. “लोक काय म्हणतील?” असं काहीही नसतं. असं प्रसिद्ध मानसोपचार तज्ञ डॉक्टर राजेंद्र बर्वे म्हणतात. तुम्ही काहीही केलंत तरी काही लोक नावं ठेवणारच. याला किती महत्त्व द्यायचं ते आपण ठरवायचं. सकारात्मक टीकेचं संवादात रूपांतर होऊ शकतं आणि तुमची प्रगती होते. नकारात्मक टीकेला मात्र रागाने उत्तर देऊ नका.

कारण तुम्ही अशी प्रतिक्रिया द्यावी यासाठीच बरेच लोक प्रयत्नशील असतात. यात त्यांना असुरी आनंद असतो. नकारात्मक लोकांशी संवाद कमी करणे, शांतपणे वेळीच उत्तर देणे किंवा संवाद बंद करणे हेच उपाय असतात. कोणत्याही प्रसंगी तुमचा स्वाभिमान जपणं हे अत्यंत गरजेचं असतं. सर्वात प्रथम तुम्ही जे काही काम वैयक्तिक, व्यवसायिक करत आहात यातून तुम्हाला समाधान आणि आनंद मिळतो, हे महत्वाचं आहे. टीकाकारांना कडे लक्ष देऊ नका. त्यावर अती विचार करून आपली ऊर्जा खर्च करू नका.

स्वतःची तुलना फक्त स्वतःशी करा. स्वतःमध्ये सतत प्रगती होईल यासाठी प्रयत्नशील राहा. टीका करणारे एका अर्थाने तुमचे नावच सगळीकडे पसरवत असतात, हे लक्षात ठेवा. अनेकांचे लक्ष तुमच्याकडे जाते, पण याला अति महत्त्व देऊ नका. टीका करणारी माणसे त्यांच्या नकळत हे मान्य करत असतात की तुम्ही त्यांच्या पेक्षा श्रेष्ठ आहात. त्यांना त्यांचे काम करू द्या. तुमचा फुकटचा प्रचार त्यांना करू द्या. तुम्ही मात्र स्वतःच्या कामावर, प्रगतीवर सकारात्मक दृष्टिकोन ठेवून प्रयत्न करत राहा. आणि उत्तरोत्तर यशाच्या पायऱ्या चढत राहा.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!