Skip to content

जवळची व्यक्ती आपल्याशी वाईट वागूच शकत नाही , हा भ्रम कसा काढावा..

जवळची व्यक्ती आपल्याशी वाईट वागूच शकत नाही , हा भ्रम कसा काढावा..


कु.हर्षदा नंदकुमार पिंपळे


आयुष्य आणि आयुष्यातील व्यक्ती हे पहायला गेलं तर तसं खूप सुंदर समीकरण आहे. व्यक्ती अर्थातच आपलं आयुष्य हे माणसांभोवती फिरत असतं.त्यांच्याशिवाय आयुष्य हे अपूर्ण आहे.माणसांशिवाय या आयुष्यात काही मजाच नाही. ती चांगली वाईट कशीही असो….माणसं ही आयुष्यात असणं गरजेचं आहे. त्यांच्याशिवाय आयुष्य म्हणजे काय…? हे समजायला सहज सोप्पं जातं.

आयुष्याची खरी रूची त्यांच्यामुळे समजते. इतक्या व्यक्ती आपल्या आयुष्यात येतात की कुणाला कुठे ठेऊ नी कुठे नको अशी आपली अवस्था होते.त्यातल्या त्यात काही व्यक्तींशी आपण खूप जवळून जोडले जातो.इतके जवळ जोडले जातो की त्या व्यक्तीमध्ये आपल्याला काही वाईट दिसतच नाही. त्यांच्यावर आपली एक वेगळीच निष्ठा असते.या निष्ठेवर तितकाच दृढ विश्वास देखील असतो.पण…

आपण एक मात्र विसरून जातो की , कितीही जवळची माणसं असली तरीही त्या व्यक्ती आहेत. आणि व्यक्ती तितक्या प्रकृती…. हेही तितकच खरं आहे. आपण एखाद्या व्यक्तीकडे पाहताना केवळ ती आपल्या जवळची , लांबची , बाहेरची या दृष्टीने पाहतो.पण माणूस म्हणून आपण तिच्याकडे पाहत नाही. एखादी व्यक्ती ही माणूस आहे हे आपण विसरून जातो. माणसाचा मूळ स्वभाव आपल्या लक्षातच राहत नाही. किंवा माणूस या दृष्टीने आपण त्याच्याकडे पाहतच नाही. आता व्यक्ती तितक्या प्रकृती म्हंटल्यावर…….

वेगवेगळ्या स्वभावाची माणसं ही आपल्या आयुष्यात येतातच आणि येणारच…! आणि आयुष्यात येणाऱ्या अशा प्रत्येकाशी आपलं चांगल वाईट नातं जोडल जातं.कुणी आपल्यासाठी जवळचं ,अगदी म्हणजे हृदयातील , मनातील एक हक्काचा कोपरा… तर कधी कधी तर ते माझं काळीज , तेच माझं मन वगैरे वगैरे आपण बोलत असतो.ते आपल्यासाठी खूप खास असतात.त्यांच्यासाठी नेहमीच आपली धडपड चाललेली असते.त्यांना अगदी काय नको नी काय हवं …? याचीही आपण काळजी घेतो.

एकूणच तर ही ही व्यक्ती म्हणजे आपला जीव की प्राण असते.पण आपण एकाच दृष्टिकोनातून तिला पाहत असतो.या अशा जवळच्या व्यक्तीमागेही एखादा मुखवटा असु शकतो याचा आपल्याला विसर पडतो. आपण त्या चांगुलपणाला भाळतच राहतो.आपल्याला हे मान्यच नसतं की , आपल्या जवळची व्यक्ती आपल्याशी वाईट वागू शकते… आपल्या जवळची व्यक्ती आहे ती…ती कशी अशी वागेन ..? ती का आपल्याला त्रास देईल..? किती जीव लावते ती… , ती त्रास देणं शक्यच नाही… बापरे ! इतकं काही आपण बोलतो तेही अगदी ठामपणे….

कोणत्या गोष्टीच्या आधारावर आपण बोलत असतो तर ते म्हणजे विश्वास , वाटणारी आपुलकी….मान्य आहे की हे सगळं आपल्या जवळच्या व्यक्तीमध्ये असतं.त्यांच आपलं नातं अगदी मोकळं असतं…पण , कुठेतरी आपण त्यापलिकडे जाऊन विचार करतो का…??तर नाही… जोपर्यंत आपल्यावर खरच रडायची वेळ येत नाही…

तोपर्यंत आपण त्या भ्रमातच असतो की आपल्या जवळची सगळी माणसं चांगलीच आहेत , चांगलीच असतात.ती कधी आपल्यासोबत वाईट वागूच शकत नाही….पण मला वाटतं की या अशा भ्रमात न राहता , प्रत्येकाने साधा सरळ विचार करायला हवा की आपण सगळी माणसच आहोत. जवळची किंवा लांबची असा फरक न करता आपण माणूस आहोत या दृष्टिकोनातून बघितलं पाहिजे.

आणि चांगला वाईट हा तर माणसाचा स्वभावच झाला.एखादी व्यक्ती चांगलीच असते असं नाही… आणि एखादी व्यक्ती वाईटच असते असही नाही.हल्ली तर कोण कसं वागेल याचा काही नियमच नाही. मनात आलं तर चांगल नी मनात आलं तर वाईट वागणारी माणसाची वृत्ती फार विचीत्र आहे.

सध्याची परिस्थिती खूप वेगळी आहे. आणि इतकच नाही तर आपण अशी बरीच उदाहरणं आपल्याला पहायला मिळतात. बहिणीने भावाला फसवलं , मित्र-मैत्रिणींनी त्यांच्याच मित्रांना चुकीच्या गोष्टीत अडकवलं , वगैरे वगैरे अशा काही वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी घडताना आपण पाहतोच.खरं तर नात्यांवर , आपल्या जवळच्या माणसांवर असा अविश्वास दाखवण पटत नाही पण हल्ली कोण कोणत्या भावनेतून काय करेल, कसं वागेल सांगता येत नाही.

माणसांचा अहंकरी स्वभाव म्हणजे अग्नितला विस्तवच.. !पद ,प्रतिष्ठा , मान , सन्मान , वाढती स्पर्धा यांमुळे माणूस कोणत्या आहारी जाईल काहीही सांगता येत नाही.त्यामुळे अशा भ्रमात न राहता हा भ्रमाचा भोपळा वेळीच फोडून टाकणं आवश्यक आहे. नाहीतर हीच जवळची माणसं आपला पाय केव्हा खेचतील कळणारही नाही.प्रत्येक व्यक्तीकडे एक माणूस म्हणून नक्की पहा .

त्याची वृत्ती ओळखून त्याला ओळखायला शिका.नाहीतर जवळचीच माणसं जेव्हा वाईट वागतात तेव्हा होणारा त्रास हा सहन होणारा मुळीच नसतो.म्हणून भ्रमातून बाहेर या…आजुबाजुला पहा…काय घडतय….? नी काय नाही…?


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

2 thoughts on “जवळची व्यक्ती आपल्याशी वाईट वागूच शकत नाही , हा भ्रम कसा काढावा..”

  1. अशोक राउत

    खरे आहे हे कारण माणसांच्या मनाचा तळ शोधणे सोपे नाही. म्हणून ” नेहमी सावध राहणे व अति विषवस न ठेवने हेच योग्य! “

  2. जेंव्हा जेंव्हा कुठलीही गोष्ट मर्यादेच्या अत्युच्च शिखरांवर जाते ना….तेंव्हा तेंव्हा ती गोष्टी ( चांगली असो वा वाईट ) लयाला गेल्याशिवाय राहत नाही . मग ती कशाचाही बाबतीत असो….हाच नियतीचा नियम आहे….आणि तो अपरिमित धावणारा असा आहे…त्याला कुणीही बदलू शकत नाही….तिथं इवल्याश्या माणूस प्राण्याचे काय घेऊन बसलात…..राव.
    खूप छान लिहिलत……👍👍

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!