Skip to content

खूप रडावेसे वाटते आणि त्याचे कारणसुद्धा कुणाला सांगु शकत नाही…

खूप रडावेसे वाटते आणि त्याचे कारणसुद्धा कुणाला सांगु शकत नाही…


कु. हर्षदा नंदकुमार पिंपळे


गर्दीतही “एकट्या वेदना” वाऱ्यासारख्या बेफाम होऊन वेड्यासारख म्हणजे अगदी वेड्यासारख छळतात….. नी…. , डोळ्यातील आसवं कळत नकळत अलवारपणे गालावर काजवे होऊन ओघळतात….!!

कोण म्हणतं की वेदना , अश्रू हे फक्त एकटं असल्यावर जाणवतं…? खरं तर असं काही नाही. या वेदना आपल्याला कधीकधी भर गर्दीतही मिठी मारतात. इतकच नाही तर त्याच वेदनांमुळे ते अश्रुही त्या गर्दीतून बाहेर पडायला बघतात.कितीही थांबवायचा प्रयत्न केला तरी ते नैसर्गिक आहे. त्या अश्रूंना थांबवणं म्हणजे जरा कठिणच..! मला सांगा आजपर्यंत रडणं कुणाला चुकलय…? कुणालाच नाही. अगदी मुलं , पुरूषसुद्धा दाखवत नसली तरी रडतातच.खरतर रडणं हे अगदी नैसर्गिक आहे. काही झालं की डोळ्यातून टचकन पाणी आपल्या गालावरून ओघळत असतं.त्या अश्रूंना गर्दीच किंवा एकटेपणाच भान कधीच नसतं.

कोण म्हणतं रडणं चांगलं असतं तर कोण म्हणतं रडणं मुळीच चांगलं नसतं.मला वाटत इथे चांगल्या-वाईटाचा प्रश्नच येत नाही. खरंतर,

रडणं हे रडणं असतं
कुठेही,कधीही,कसही
त्याला वेळेच काही भान नसतं..
रडणं हे रडणं असतं…
त्याला चांगलं वाईट
असं काही नाव नसतं..
जवळचं , लांबचं
असं काही गाव नसतं..
मित्रांनो , रडणं हे रडणं असतं…!!

हो रडणं हे रडणच असतं.आणि इथे या भुतलावर असणारा प्रत्येक जण हा कधी ना कधी रडतो.कुणाचे अश्रू दिसतात तर कुणाचे दिसत नाहीत. पण प्रत्येक जण रडतो ही गोष्ट मात्र तितकीच खरी आहे. रडणंसुद्धा किती वेगवेगळ्या तऱ्हेचं असतं.कुणी जवळची व्यक्ती सोडून गेल्यावर रडायला येतं , हसता-हसता कधी रडायला येतं , कधी कधी एखादा चित्रपट पाहताना रडायला येतं , कुणी ओरडलं ,मारलं तर रडायला येतं , कुणाला कुणाच्या वेदना पाहून रडायला येतं , इतकच नाही तर कांदा कापल्यावर रडू येतं ,फोडणी डोळ्यात झोंबल्यावरही रडायला येतं….बापरे..! किती किती तऱ्हेच हे रडणं…!

आता हे असं रडणं तर प्रत्येकालाच माहीत आहे.पण कधी कधी असही होतं की का कोण जाणे खूप रडावसं वाटत असतं , का रडतोय हे तर स्वतःलाही कळत नसतं , इतकच काय तर खरच का रडतोय याचं कारणही आपल्याला इतरांना सांगता येत नाही.इतकी घुसमट झालेली असते आपली कधीकधी की कुणाला काही सांगायची इच्छा नसते.किंवा मग असही होतं की कुणाला सांगु हेच कळत नाही.

कधी कधी जवळची व्यक्ती असूनही त्यांना सांगावस वाटत नाही. आजुबाजुला भरपूर गर्दी असतानाही रडावसं वाटत असतं.इतकं ते दाटून आलेलं असतं की तेव्हा कंठ अक्षरशः कोरडाठक्क पडतो.गर्दीत , लोकांसमोर , सगळ्यांसमोर रडणार कसं ? हा प्रश्न अश्रूंना पडत नसला तरी आपल्याला मात्र क्षणाक्षणाला जाणवतो.आपण त्या अश्रूंना थांबवायचा खूप प्रयत्न करतो आणि आतल्या आत रडत बसतो.

म्हणजे कसही , कुठेही , कधीही पण आपण रडतोच..! तुमचही असं होत असेल नं…? कधी कधी असं वाटत असेल न की रडावं , अगदी धाय मोकलून मनसोक्त रडावं…एकदाच रडून घ्यावं मनभर…पोटभर….! इथेच ते थांबत नसेल…कुणी विचारलं तर सांगूही शकत नसाल काय वाटतय ,किंवा काय कारण आहे ते…? असही तुम्ही म्हणत असाल “नाही , मी नाही सांगु शकत का रडतेय किंवा का रडावसं वाटतय ते…खरच आत्ता काही विचारू नकोस मला…

“पण असं का होत असेल काही कल्पना आहे का कुणाला..??का होत असेल आपल्या बाबतीत असं…? का रडावसं वाटतं आपल्याला…? कुणाला कारण का सांगावस वाटत नाही…? किंवा का सांगु शकत नाही…?पण खरच कधी कधी असं होतं…सगळ्या भावभावना एकत्र दाटून येतात..आणि अशावेळी केवळ रडावसं वाटतं.सगळ्या दाटलेल्या भावनांना अश्रूंद्वारे वाटा मोकळ्या करून द्याव्याशा वाटतात.

एक वेळ येते ज्यावेळी सगळं आठवत असतं.कुणी कुणासाठी केलेलं , न केलेलं , चांगल-वाईट , हसलेलं-रडलेलं , तुटलेलं-जोडलेलं असं सगळं काही एखाद्या संगमासारख एकत्र येतं आणि मग रडावसं वाटतं….रडायला येतं.आसु अनावर होतात त्यावेळी. पण ते इतकं काही असतं त्या रडण्यामागे हे मात्र आपण कुणालाही सांगु शकत नाही. का कोण जाणे…? रडण्याशिवाय त्यावेळी काहीच सुचत नाही….

मित्रांनो , अशावेळी रडावसं वाटत असेन तर बिंधास्त मनसोक्त रडून घ्या.स्वतःला थोडं हलकं करून घ्या.रडून शांत झाल्यावर तुम्हालाच कदाचित बरच बरं वाटेल. रडणं म्हणजे कमकुवतपणा मुळीच नसतो.भावनांना वाट मोकळी करून देण्याचा तो एक मार्गच असतो….रडा…पण रडता रडता थोडं हसायला मात्र विसरू नका…!


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!